मंगलवार, 20 अप्रैल 2010

पृथ्वीपासून सर्वात जवळ असलेला बटू तारा सापडला

पृथ्वीपासून सर्वात जवळ असलेला थंड तपकिरी बटू तारा (ड्वार्फ) खगोलशास्त्रज्ञांनी नुकताच शोधून काढला आहे. हा बटू तारा पृथ्वीपासून फक्त १० प्रकाशवर्ष दूर आहे. ब्रिटनमधील हेर्टफोर्डशायर विद्यापीठातील फिलीप लुकास यांच्या नेतृत्वाखालील एका गटाने हा नष्ट झालेला तारा शोधला असून त्याचे नामकरण ‘यूजीपीएसजे ०७२२-०५’ असे केले आहे.
प्राचीन काळात एखाद्या ताऱ्याच्या गुरुत्वीय बलाच्या परिणामामुळे मूळ ताऱ्याच्या प्रणालीतून बाहेर फेकला गेल्यामुळे अथवा स्वतंत्रपणेच या ‘तपकिरी ड्वार्फ’ची निर्मिती झाली असावी, असे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. आपल्या आकाशगंगेत असे अनेक ‘तपकिरी ड्वार्फ’ असल्याचे मानले जात आहे. या ‘तपकिरी ड्वार्फ’चे निश्चित स्थान शास्त्रज्ञांच्या दृष्टीने अगदीच अनपेक्षित नसले, तरी त्याच्या वातावरणाची रासायनिक संरचना त्यांना कोडय़ात टाकणारी आहे.
लुकास म्हणाले की, ‘यूजीपीएसजे ०७२२-०५’ हा तारा आजवर शोधलेल्या ‘तपकिरी बटू ताऱ्या’ मध्ये सर्वात थंड बटू तारा वाटत आहे. त्याच्या पृष्ठभागाचे तापमान ४०० केल्व्हीनपेक्षा कमी असू शकते. ‘तपकिरी बटू तारा’ आकाराने अतिशय लहान असल्याने त्यांच्या गाभ्यामध्ये आण्विक संमीलनाची प्रक्रिया बराच काळ सुरू होऊ शकत नाही. त्यामुळेच त्यांची सामान्य ताऱ्यांमध्ये गणना होऊ शकत नाही, असेही लुकास यांनी सांगितले.
हा ‘तपकिरी बटूतारा’ त्या जागी कसा आला याबाबत अजून काही माहिती मिळालेली नाही, पण त्याचे स्थान पृथ्वीपासून जवळ असल्याने शास्त्रज्ञांना त्याचे अधिक विश्लेषण करणे शक्य होणार आहे, असे ‘डिस्कव्हरी’ वाहिनीने म्हटले आहे. या ‘तपकिरी ड्वार्फ’च्या अंतर्गत भागात प्रवाही पदार्थ असतात. त्यामुळे त्या पदार्थांची सतत सरमिसळ होऊन त्यातील रसायने स्थिर होऊ शकत नाहीत. रासायनिक भिन्नता हा ग्रहांचा विशेष गुण आहे. मात्र ‘तपकिरी ड्वार्फ’मध्ये तो गुण अस्तित्वात नसल्यामुळे त्यांना गुरुसारखे सर्वात अजस्त्र ग्रह आणि सर्वात लहान तारे यांच्यातील ‘सेतू’ मानले जाते. तपकिरी बटू तारा’ला तांत्रिकदृष्टय़ा ‘अपयशी तारा’ (फेल्ड स्टार) म्हटले जाते. ते अतिशय मंद दृश्यलहरी सोडत असतात. मात्र इन्फ्रारेड आणि किरणोत्सर्गाचे त्यांच्याकडून उत्सर्जन होत असते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly