सोमवार, 3 मई 2010

सेफ ड्रायव्हिंग : ओव्हरटेक करताना

नियमांचं काटेकोर पालन तुम्ही करत आहात आणि नवशिके चालक आहात तरी आपल्याला ओव्हरटेक करायचं आहे. तुमची कार ६०-७० च्या वेगानं हायवेवर धावते आहे. समोर ट्रकची रांगच रांग आहे. उजव्या बाजूनेही ट्रक एकामागून एक येत आहेत. या परिस्थितीत ट्रकच्या मागे विशिष्ट अंतर सोडून तुम्ही कार चालवत आहात. समोर जो ट्रक आहे, त्याच्या चालकाला तुम्ही मागे आहात हे दिसलं पाहिजे. यासाठी पहिल्यांदा हॉर्न वाजवा. कार थोडी उजव्या अंगानं घ्या. ट्रकच्या साईड मिररमध्ये तुम्हाला ट्रक ड्रायव्हरचा चेहरा दिसू लागतो. ट्रक चालकाच्या लक्षात येते, एक कार मागे आहे, तिला पुढे निघायचं आहे पण, पुढेही अजून ट्रक आहेत आणि समोरूनही ट्रक येत आहेत. आपली उजवी बाजू मोकळी दिसली की पुन्हा उजवीकडे कार घ्या. ट्रक ड्रायव्हर साईड मिररकडे बघेल. समोरून वाहन येत नसेल तर ट्रक ड्रायव्हर हात बाहेर काढून तुम्ही पुढे व्हा असे सांगतो. अशा वेळी लगेच तिसऱ्या गिअरमध्ये कार घेऊन समोरच्या ट्रकपेक्षा अधिक वेग घेऊन कार उजव्या अंगानं काढावी. पहिला ट्रक मागे पडल्याबरोबर एकदम डावीकडे कार घेऊ नका. मागे पडलेला ट्रक स्टिअरिंगवरच्या आरशात (मिरर) दिसायला हवा. तुमच्या समोर आता दुसरा ट्रक आहे. समोरच्या दिशेनं वाहन येत नसेल तर त्याच वेगात दुसरा ट्रकही तुम्हाला ओलांडायचा आहे पण, समोर वाहन येताना दिसते आहे, अशा वेळी आपल्या कारचे डावीकडे जाण्याचे इंडिकेटर सुरू करावे. म्हणजे मागच्याला समोरून वाहन येत आहे आणि कारवाल्याला आपल्या समोर राहायचं आहे हे कळेल. ट्रकचालक स्वत:च्या ट्रकचे स्पीड कमी करतो. आपली कार दोन नंबरच्या ट्रक मागे चालू देतो. हायवेवर कार चालवणं म्हणजे खो-खोचाच खेळ असतो. इथं धावणारा गडी चुकायला नको. दुसऱ्या तिसऱ्या चवथ्या ट्रकला याच पद्धतीनं मागे टाकत पुढे निघायचं आहे पण, नजर एकटक समोर पाहिजे. आपल्या मागेही भरधाव ट्रक आहेत. समोरूनही अवजड वाहनं येत आहेत. घाबरून जायचं कारण नाही. आपल्या सारखेच सगळे वेगावर स्वार झाले आहेत. चवथा ट्रकही आपण ओलांडला. आता समोर काही नाही पण, समोरून येणारी वाहनं आहेत. (समोरून म्हणजे आपल्या विरुद्ध दिशेनं) आपल्याला आता आपल्या लेनमधूनच कार पुढे पळवायची आहे. एखाद्या वेळी दुसरा कारवाला आपल्यासमोर मागाहून ओव्हरटेक करीत येतो. त्याचा सन्मान करून त्याला आपल्यापुढे राहू द्या. काहीच हरकत नाही. कारण तो अतिशय वेगानं आला आहे. त्याची बरोबरी आपल्याला करायची नाही. आता आपल्यामागे ट्रकची रांग आहे. समोर दुसरा कारवाला आहे. तो फार वेळ आपल्या समोर राहणार नाही. तो पुढे निघून जाणार आहे. त्या घाईनेच तो आला आहे. तुमची साठ-सत्तरची स्पीड कायम ठेवा. यापेक्षा अधिक स्पीड घ्यायची नाही. या तुमच्या स्पीडमध्येही ट्रक आरामशीरपणे मागे पडत आहेत. दुसरी कार तर समोर निघून गेली पण, पुन्हा अवजड ट्रक समोर दिसतो आहे. ट्रकच्या समोरचा रस्ता आपल्याला दिसत नाही. एक तर लांबलचक ट्रक, किती टायर लागलेले आहेत तेही कळत नाही. त्यावर मालाची अवाढव्य इमारत. तरी पुन्हा घाबरून जाण्याचं कारण नाही. आपली कार त्या ट्रकच्या मागे, काही विशिष्ट अंतर ठेवून चालवायची. वेग कमी होतो आहे, तिसरा गिअर टाका. एकदा उजवीकडे वळा. पुन्हा आपल्या रांगेत या. हे वळण म्हणजे एकदम उजवीकडे कार घ्यायची नाही. समोरच्या ट्रकचालकाचं लक्ष आपल्याकडे गेलं पाहिजे यासाठी क्षणभर कार थोडी उजवीकडे वळवून घ्यायची, पुन्हा आपल्या रांगेत आणायची. हायवेवर रांग सोडायची नाही कधी. समोरचा रस्ता मोकळा असेल तेव्हा ट्रकवाला आपल्याला साईड देईल. तोपर्यंत चालू द्या त्याच्या मागोमाग. हॉर्न वाजवणं सुरू ठेवा. मध्येच रात्रीचा लावतो तो लाईट एकदा लावा. बंद करा. आपण मागे आहोत याचा त्रास त्या ट्रकचालकाला होत असतो. रस्ता मोकळा झाल्यावर तो लगेच हात बाहेर काढतो. त्याच्या बाजूनं निघून आपल्याला त्याच्या समोर चालायचं आहे. आपली कार तिसऱ्या गिअरमध्येच आहे. लांबलचक ट्रकला ओलांडताना हा तिसरा गिअरच हवा. अ‍ॅक्सिलेटर द्या. गाडी ट्रकच्या समोर आणा पण, एक लक्षात ठेवा. ट्रक जवळून आपली कार निघाल्यावर लगेच डावीकडे घेऊ नका. पहिल्यांदा उजवीकडून सरळ सरळ जा. समोरून म्हणजे विरुद्ध दिशेनं वाहन येत असेल तर मागे पडलेल्या लांबलचक ट्रकला इंडिकेटर द्या. ट्रकवाला सावध राहतो.
हायवेवर कार चालवताना रस्ता अभावानेच मोकळा सापडतो. मोकळा रस्ता सापडला की चालू ठेवावी ६०-७० स्पीड. यापेक्षा अधिक नको. १०० च्या स्पीडनं कार चालवणारा आपल्या मागून केव्हा येईल याचा नेम नसतो. म्हणून आपल्या लेनमधूनच कार चालवावी. हायवेवर खो-खो खेळण्याचा चांगला सराव झाला की, तुमची कार १०० च्या स्पीडनं पळू लागेल. तूर्तास आपण नवशिके ड्रायव्हर आहोत हे लक्षात ठेवावं.
ओव्हरटेक करताना रस्ता कसा आहे हे समजणंही महत्त्वपूर्ण आहे. हायवे असो की, आणखी कुठला रस्ता. अनेकदा हायवेवर देखील मोठाले खड्डे पडत असतात. खड्डय़ांचा रस्ता दिसला तर ओव्हरटेक टाळावं. नाही तर एखादा ट्रक समोर निघण्यासाठी आपल्याला संकेत देतो आणि आपण ट्रकजवळून कार न्यायला लागतो. ट्रक आणि आपली कार समांतर चालत असतात. अचानक आपल्याला खड्डा समोर दिसतो अशावेळी खड्डय़ातून कार काढावी लागते. कारचा बॅलेन्स बिघडतो. कार ट्रकच्या दिशेनं वळू लागते, असे प्रसंग येत राहतात म्हणून ओव्हरटेक करताना रस्त्याचाही अंदाज चालकाला घेता आला पाहिजे.
ओव्हरटेक करताना नियमांचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. ज्याला ओव्हरटेक करायचं त्याला आपण पाठीमागे आहोत हे दिसायला हवं. त्याला हॉर्न देऊन मला पुढे निघायचं आहे ही सूचना दिली पाहिजे. जोपर्यंत समोरचा जाण्यासाठी आपल्याला हात दाखवत नाही किंवा संकेत देत नाही तोपर्यंत आपली कार वाहनाच्या समोर काढायची नाही. रस्ता मोकळा असेल तर आपल्या समोरचं वाहन आपल्याला पुढे जाण्याचा संकेत देतेच. हायवेवर मला अनेकदा ट्रकवाले संकेतांचं व्यवस्थित पालन करताना दिसले आहेत. याउलट एस.टी.वाले किंवा खाजगी ट्रॅव्हल्सवाले सर्व संकेत, नियम झुगारून गाडय़ा चालवताना दिसले आहेत. भन्नाट वेगात ओव्हरटेक कधीच करू नये. आपलं वाहन मागे राहिलं तरी चालेल. वेगात असलेल्या वाहनावर केव्हाही कठीण प्रसंग येऊ शकतो. कार चालवताना आपल्यासोबत आपली जीवाभावाची माणसंही असतात. आपल्या एखाद्या चुकीचा क्षण त्यांच्याही जीवावर बेतू शकतो ही जाणीव सदैव ठेवली पाहिजे. हायवेवर ओव्हरटेक करताना थट्टा मस्करी, विनोद किंवा चर्चा कारमध्ये व्हायला नको. ड्रायव्हर विचलित होतो. त्याचं अर्धवट लक्ष गप्पा-गोष्टींकडे असते. अनेकदा अपघात या असल्या गोष्टींमुळेही घडतात. ही जबाबदारी कारमध्ये बसलेल्या लोकांनी पाळायची असते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly