मंगलवार, 13 दिसंबर 2011

कोरफड

कोरफड ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ही बहुवार्षिक आहे. पाने जाड मांसल असून पानामध्ये पाणी गराच्या रूपात साठवलेले असते. पाने लांबट असून खोडाभोवती गोलाकार वाढतात. पानांची लांबी ४५ ते ६० सें.मी. आणि रुंदी ५ ते ७ सें.मी. असते. पानाच्या कडांना काटे असतात. झाडाच्या मध्यातून एक लालसर उभा दांडा निघतो व त्यावर केशरी रंगाची फुळे घोसाने येतात.

कोरफडीस संस्कृतमद्ये कुमारी, इंग्रजीत Barabados aloe व शास्त्रीय परिभाषेत Aloe barbadensis असे म्हणतात. ही वनस्पती Liliaceae या कुळातील असून हिचे उत्पत्तिस्थान वेस्ट इंडीज आहे. हिच्या भारतीय जाती Aloe vera आणि Aloe indica या आहेत.

उपयोगः
कोरफडीमध्ये अँलोइन (२० ते २२%), बार्‌बॉलाइन (४ ते ५%) तसेच शर्करा, एन्झाइम व इतर औषधी रसायने असतात. कोरफड ही शीतल, कडू, मधुर, पुष्टिकर, बलदाती अशा विशेष गुणधर्माची आहे. कोरफडीपासून कुमारी आसव बनवितात. हे आसव शारीरिक अशक्तपणा, खोकला, दमा, क्षय यासारखे आजार बरे करण्यासाठी उपयोगी आहे. कोरफडीपासून बनविण्यात येणारे तेल केसांना चकाकी आणण्यासाठी वापरतात. त्वचेचा दाह होत असल्यास कोरफडीचा गर लावतात. हा गर पोटदुखी, अपचन, पित्तविकार यांवरसुद्धा उपयोगी आहे. डोळ्यांच्या विकारावर तसेच भाजल्यामुले झालेल्या जखमेवर कोरफडीचा गर उपयोगी पडतो. सौदर्यवृद्धीसाठी कोरफडीच्या गराचा उपयोग करतात. कोरफडीच्या रसात जिवाणू प्रतिकारक शक्ती असते. हिच्या पानांत अँलोइन व बार्बालाइन ही मुख्य ग्लुकोसाइड्‌स असतात


कोरफड कुंडीत सहज लागते व थोड्याशा पाण्यावरही झपाट्याने वाढते. कोरफडीचा गर रोज सेवन करण्याचे; तसेच बाहेरून लावण्याचे अनेक फायदे आहेत. यकृताची कार्यक्षमता उत्तम राहण्यासाठी आणि वाढविण्यासाठी कोरफडीसारखे उत्तम औषध नाही. कोरफडीचा चमचाभर गर छोट्या कढईत मंद आचेवर गरम करून त्यावर चिमूटभर हळद टाकून घेणे यकृतासाठी हितावह असते. याप्रमाणे काही दिवस नियमाने कोरफड घेतल्यास भूक चांगली लागते व शौचास साफ होण्यासही मदत मिळते.

रोज सकाळी कोरफडीचा चमचाभर गर घेण्याने स्त्रियांच्या बाबतीत पाळी नियमित येण्यास मदत मिळते. अंगावरून कमी रक्‍तस्राव होत असल्यास किंवा पाळीच्या वेळेला गाठी पडून वेदना होत असल्यास कोरफडीचा गर घेणे उपयोगी ठरते.

शरीरावर कोठेही भाजले असता कोरफडीचा गर लावल्याने दाह कमी होतो व फोड वगैरे न येता त्वचा पूर्ववत होते. मूळव्याधीमुळे वेदना होत असल्यास किंवा आग होत असल्यास त्यावर कोरफडीचा नुसता गर ठेवण्याने बरे वाटते.

कोरफडीचा ताजा गर न्हाण्यापूर्वी केसांना लावून ठेवण्याने केस निरोगी राहण्यास मदत मिळते; तसेच कंडिशनिंग होते. त्वचेवरही कोरफडीचा गर लावल्याने त्वचा मऊ व सतेज राहण्यास मदत मिळते.

संगणकावर वा इतर कोणत्याही प्रखर प्रकाशाकडे पाहण्याने डोळे थकले, लाल झाले वा डोळ्यांची आग होऊ लागली, तर कोरफडीच्या गराची चकती बंद पापण्यांवर ठेवण्याने लगेच बरे वाटते. चकती ठेवणे अवघड वाटले, तर गराची पुरचुंडी करून डोळ्यांवर वारंवार फिरविण्याने बरे वाटते.

याप्रमाणे कोरफडीचे एकाहून एक उत्तम उपयोग असल्याने आजकाल कोरफडीचा गर बाटलीत भरून विकायला ठेवतात; पण टिकण्याच्या दृष्टीने यात प्रिझर्वेटिव्ह्‌ज टाकली आहेत का हे बघावे लागेल व कोरफडीतील एखादे तत्त्व नष्ट झाले आहे का हेही पाहावे लागेल. त्यापेक्षा घरी कोरफड लावली, तर घरच्या घरी कोरफडीचा ताजा गर सहज मिळू शकतो.

कोरफड ही नित्य वापरातील वनस्पती आहे. ती सदैव, ताजी, टवटवीत दिसते म्हणून तिला 'कुमारी' असेही म्हणतात. यकृत, प्लीहेच्या सर्व रोगांवर कोरफड अतिशय उत्तम आहे. यकृताला सूज येणे, कावीळ, बिलीरूबिनचे प्रमाण वाढणे यावर कोरफडीचा खूप चांगला उपयोग होतो. कोरफड यकृताचे टोनिक आहे. तसेच प्लीहावृद्धी, रक्त कमी होणे यावरही कोरफडीचा खूप चांगला उपयोग होतो. काविळीवर कोरफडीचा रस, कोरफडीपासून तयार केलेल्या कुमारी आसवाचा वापर करतात.
डोळे येणे, डोळ्यांची आग होणे यावर कोरफडीचा गर डोळ्यांवर ठेवावा. कफ होणे, खोकला यावर कोरफडीचा गर मधातून द्यावा. केसांच्या वाढीसाठी, केस मुलायम आणि तजेलदार व्हावेत म्हणून कोरफडीचा गर केसांना लावतात.
सौन्दर्यासाठी, त्वचा ताजीतवानी दिसावी, चेहर्यावरचे डाग, पुळ्या कमी व्हाव्यात म्हणून कोरफडीचा गर लावावा. कोरफड रक्तशुद्धीकर असून ताप कमी करणारी, पित्तनाशक, भूक वाढवणारी आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly