संस्कृती लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
संस्कृती लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

बुधवार, 28 जनवरी 2015

ऋतू, गूळ-चणे, चैत्र, नैवेद्य, पंजिरी, प्रसाद, रामनवमीची, संस्कृती, हनुमानजयंती

रामनवमीची पंजिरी आणि हनुमानजयंतीचे गूळ-चणे यांची चव आपण सर्वांनी कधी ना कधी घेतलेली असेल. या दोन्ही दिवशी विशेष प्रसादाची योजना आपल्या संस्कृतीमध्ये केलेली आहे. यासाठी लागणारी घटकद्रव्ये तशी पाहता साधीच असतात, प्रत्येकाच्या घरात असतात. मात्र त्यांची प्रसादरूपाने योजना करण्याने अंततः आपलेच आरोग्य सुरक्षित राहत असते. संस्कृतीतील गोष्टींकडे जरा डोळसपणे पाहिले तर लक्षात येते की, नैवेद्य, प्रसाद, निरनिराळी फुले, पाने वापरून केली जाणारी पूजा, धूप, आरती अशा सर्व गोष्टी करण्यामागे आरोग्यरक्षण हा मुख्य उद्देश असतो.

रामनवमीची पंजिरी आणि हनुमान जयंतीचे गूळ-चणे यांची चव आपण सर्वांनी कधी ना कधी घेतलेली असेल. आजआपण त्याचे आरोग्यदायी गुणधर्म काय असतात, हे पाहणार आहोत. रामनवमीला केल्या जाणाऱ्या पंजिरीमध्ये मुख्य घटकद्रव्य असतात, धणे, बडीशेप, सुंठ, जिरे, डिंकाची लाही, थोड्या प्रमाणात ओवा, मिरी, खसखस, वेलची, जायफळ, जायपत्री, केशर आणि अर्थातच खडीसाखर. कोणत्याही स्वयंपाकघरात मिळू शकतील अशा या गोष्टी औषधी गुणधर्माने परिपूर्ण आहेत, हे आयुर्वेदातील पुढील माहितीवरून लक्षात येईल. 

आयुर्वेद, भारतीय संस्कृती आणि आरोग्यरक्षण या तिन्ही गोष्टींची सांगड अशी काही पक्की घातलेली आहे की तिचा पदोपदी अनुभव घेता येतो. चैत्राची सुरवात म्हणजेच वसंत ऋतूचे आगमन. वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे पाडव्याच्या दिवशी कडुनिंबाला गुढीमध्ये दिलेले अढळ स्थान, जेवणाच्या सुरुवातीला सेवन केली जाणारी कडुनिंबाची चटणी याचीच उदाहरणे होत. पाडव्याच्या पाठोपाठ येतात ते रामनवमी व हनुमान जयंती हे दोन उत्सव. याही दिवशी विशेष प्रसादाची योजना आपल्या संस्कृतीमध्ये केलेली आहे. यासाठी लागणारी घटकद्रव्ये तशी पाहता साधीच असतात, प्रत्येकाच्या घरात असतात मात्र त्यांची प्रसादरूपाने योजना करण्याने अंततः आपलेच आरोग्य सुरक्षित राहत असते.

बडीशेप - सर्वसाधारणतः मुखशुद्धीसाठी प्रसिद्ध असणारी बडीशेप अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरली जाते. मुख्यत्वे वातदोष व कफदोष कमी करणारी बडीशेप पचनसंस्थेसाठी हितावह असते. वसंतऋतूत कफ वितळला की, त्यामुळे अग्नी मंदावणे स्वाभाविक असते. या मंद अग्नीला पुन्हा प्रदीप्त करण्याचे काम बडीशेप करू शकते. पोटात वायू धरणे, त्यामुळे पोट दुखणे, जड वाटणे वगैरे सर्व तक्रारींवर बडीशेप भाजून घेऊन खाण्याचा उपयोग होतो. अगदी लहान बालकांनाही बडीशेप पाण्यात उकळून तयार केलेला काढा थोडा थोडा देण्याने वात सरायला मदत मिळते. लहान मुलांची कफ प्रवृत्ती असतेच, त्यामुळे अग्नी मंद झाला की, त्यातून वारंवार खोकला, ताप, जुलाब, भूक न लागणे वगैरे त्रासांना आमंत्रण मिळते. यावरही बडीशेपेचे पाणी किंवा काढा पिण्याचा उपयोग होतो. पोटात आव होऊन जुलाब होत असतील, पोटात मुरडा येऊन शौचाला जावे लागत असेल तर त्यावरही बडीशेप उपयोगी पडते.

सुंठ - "विश्‍वभेषज' म्हणजे विश्‍वातील सर्व रोगांवर औषध म्हणून उपयोगी पडणारी सुंठ चवीला तिखट असली तरी विपाकाने म्हणजे पचनानंतर मधुर होते. म्हणूनच मुख्यत्वे वात व कफदोष कमी करणारी सुंठ पित्त वाढवत नाही. सुंठीची विशेषतः अशी, की ती जिभेवर ठेवल्या ठेवल्याच तिचे काम करू लागते. सुंठीचे चूर्ण तोंडाचा बेचवपणा दूर करते, मुख व कंठामधील कफदोष दूर करून स्वर सुधारण्यासही मदत करते. सुंठ ही पचनसंस्थेसाठी वरदानच होय. वसंतातील कफप्रकोपामुळे मंदावलेला अग्नी पुन्हा कार्यक्षम करण्यासाठी, शरीरातील आमदोष पचविण्यासाठी, जुलाब, ताप, आमवात वगैरे विकार बरे करण्यासाठी सुंठ हे एक उत्कृष्ट औषध समजले जाते. तापामध्ये सुंठ व पित्तपापडा यांचा काढा थोडा थोडा घेण्याचा उपयोग होतो. आमवातामध्ये सुंठ-गूळ-तुपाची गोळी घेणे चांगले असते.

जिरे - जिरे स्वयंपाकघरात जेवढे वापरले जाते तेवढेच ते आयुर्वेदिक औषधांमध्येही महत्त्वाचे असते. अग्निदीपन, अन्नपचनासाठी जिरे हे एक उत्तम औषध आहे. अग्नीची कार्यक्षमता वाढवणे, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करणे, तोंडाचा बेचवपणा दूर करणे अशी किती तरी कामे जिरे करत असते. ताकाबरोबर घेतलेले जिरे पोटातील वायू सरून जाण्यास मदत करते, ग्रहणीरोगात हितकर असते. साखरेबरोबर घेतलेले जिरे पित्तामुळे होत असलेल्या उलट्या थांबविण्यास मदत करते. लोण्याबरोबर घेतलेले जिरे शुक्रासाठी पोषक असते. लघवी कमी, अडखळत किंवा दाह होऊन होत असल्यास धण्या-जिऱ्याचे पाणी पिण्याने लगेच बरे वाटते. याशिवाय डोळे, बुद्धी यांसाठीही जिरे उपयोगी असतात. बाळंतिणीसाठी जिरे फारच उपयुक्‍त असते. गर्भाशयशुद्धी, स्तन्यवृद्धी, स्तन्यशुद्धी अशी अनेक कार्ये जिरे करत असते. अशा प्रकारे वसंतातील मंदावलेले पचन पुन्हा सुरळीत होण्यासाठी जिऱ्याचे योगदान महत्त्वाचे होय.

ओवा - प्रकुपित कफाचे शमन करण्यासाठी ओव्यासारखे उत्तम औषध नाही. कफ वाढला की परिणामतः अग्नी मंदावतो, तोंडाची चव जाते अशा वेळी ओवा खाणे उत्तम होय. मिठाबरोबर भाजलेला ओवा जेवणानंतर खाण्याने वायू सरण्यास मदत मिळते, पोटदुखी कमी होते, जंत होण्याच्या प्रवृत्तीलाही आळा बसतो.

वेलची - ही त्रिदोषशामक असते. अतिशय सुगंधी व चविष्ट असणारी वेलची पदार्थाचा स्वाद तर वाढवतेच; पण तोंडालाही रुची आणते. वसंतातील उष्णतेमुळे वाढणारा कफदोष कमी करण्यासाठी व मंदावलेल्या पचनाला ताकद देण्यासाठी वेलची उत्तम होय. लघवीला जळजळ होणे, अडखळत होणे, वाढत्या उष्णतेमुळे डोके दुखणे अशा अनेक तक्रारींवर वेलची औषध म्हणून वापरली जाते.

केशर - अतिशय सुगंधी व रसायन गुणांनी युक्‍त केशर त्रिदोषशामक असते. केशर रक्‍तधातूला वाढवते, रक्‍तशुद्धीसुद्धा करते, त्यामुळे कांतिवर्धनासाठी उत्तम असते. वाढलेला कफदोष कमी करणे, रोगप्रतिकारशक्‍ती टिकवून ठेवणे, अग्नीची कार्यक्षमता वाढवणे यासाठी केशर उत्तम असते, अगदी कमी मात्रेतही केशर उत्तम गुणकारी ठरू शकते.
खसखस - हीसुद्धा अतिशय पौष्टिक व रसायन गुणांनी युक्‍त असते, हाडांसाठी पोषक असते.

अशा प्रकारे पंजिरीतील प्रत्येक घटकद्रव्य या ऋतूत आपले आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करणारे आहे. रामनवमीच्या निमित्ताने पंजिरी करून ठेवली व उन्हाळा संपेपर्यंत रोज खाल्ली तर उन्हाळ्यासारखा अवघड ऋतू कधी सुरू झाला व कधी संपला, हे कळणारही नाही.

हनुमान जयंतीला चणे-गूळ एकत्र करून देण्याची पद्धत असते. हरभरे भाजून त्याचे चणे तयार केले जातात. यालाच फुटाणे असेही म्हणतात. चांगल्या प्रतीच्या हरभऱ्यापासून बनविलेले फुटाणे किंवा फुटाणे सोलून तयार केलेले डाळे हे रुचकर तर असतातच; पण पौष्टिकही असतात. अतिप्रमाणात घाम येणे, अनुत्साह वाटणे, कफदोष वाढल्यामुळे अंगाला जडपणा येणे, अकारण थकवा जाणवणे वगैरे तक्रारींवर चणे उपयोगी असतात. नियमित व्यायाम करणाऱ्यांसाठी चणे धातुपुष्टीस उत्तम होत. चण्याबरोबर गुळाची योजना केलेली असते कारण गुळातील उष्णता चणे पचवण्यास मदत करते. गुळाचा खडा तोंडात ठेवला रे ठेवला की त्यातून लगेच शरीराला शक्‍ती मिळते म्हणून उन्हातान्हातून आल्यावर गूळ-पाणी देण्याची पद्धत असते. गूळ हा रक्‍तवर्धकही असतो. अशा प्रकारे हनुमानजयंतीला दिला जाणारा चणे-गुळाचा प्रसादही आरोग्याच्या दृष्टीनेच योजलेला आहे. 

जायफळ, जायपत्री - कफशामक, कृमिनाशक असे जायफळ अतिशय सुगंधी असते. केशराप्रमाणे जायफळ व जायपत्री अगदी थोड्या प्रमाणात वापरायची असते. पचनसंस्थेत वाढलेला कफदोष शोषून घेण्याची क्षमता यात असते. त्यामुळे अग्नी प्रदीप्त होतो, पचन सुधारते, जंत कमी होतात, मुखदुर्गंधी नष्ट होते, खोकला, दमा वगैरे विकारातही आराम मिळतो.

डिंक - उत्तम प्रतीचा बाभळीचा डिंक हा नैसर्गिक कॅल्शिमयचा उत्तम स्रोत असतो, हाडांना ताकद मिळावी व एकंदर शक्‍ती टिकून राहावी यासाठी साजूक तुपात तळून घेतलेला डिंक (डिंकाची लाही) अतिशय पौष्टिक असतो.

धणे - कोथिंबिरीची फळे म्हणजे धणे. धणे त्रिदोषशामक असतात. वसंत म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात. वातावरणात वाढलेल्या उष्णतेमुळे शरीराचा दाह होऊ नये यासाठी धण्यासारखे उत्तम औषध नाही. उष्णता वाढली की शरीरात साठलेला कफदोष वितळण्यास सुरवात होते, परिणामतः सर्दी, शिंका, ताप, खोकला वगैरे कफाचे त्रास होऊ शकतात. कफदोषाचा हा प्रकोप शांत करण्याचे कामही धणे उत्तम प्रकारे करतात. तापामध्ये शरीराचा दाह होतो, कितीही पाणी प्यायले तरी तहान शमत नाही अशा वेळी धण्याचे पाणी किंवा धण्याचा काढा घेणे उत्तम असते. उष्णता वाढली की "उन्हाळी' लागण्याचा त्रासही अनेकांच्या अनुभवाचा असतो. धणे मूत्रल म्हणजे लघवीचे प्रमाण वाढवून मूत्राशय साफ होण्यास मदत करणारे असल्याने लघवी कमी होणे, दाहयुक्‍त होणे, अडखळत होणे वगैरे त्रासांवर धण्याचे पाणी साखरेसह घेणे उपयुक्‍त असते. धणे पचनक्रियेस मदत करणारे व आमदोषाला पचविणारे असल्याने पोट जड होणे, भूक न लागणे, वायू न सरणे वगैरे त्रासातही धणे उपयोगी ठरतात.



थोडक्‍यात, नैवेद्य, प्रसाद, निरनिराळी फुले, पाने वापरून केली जाणारी पूजा, धूप, आरती अशा सर्व गोष्टी करण्यामागे आरोग्यरक्षण हा मुख्य उद्देश असतो. संस्कृती महत्त्वाची समजणाऱ्यांना, परंपरेचा सन्मान करणाऱ्यांना हा फायदा आपसूकच मिळत असतो.

TAG:Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love, केसात कोँडा कारणे.

fly