मंगलवार, 20 अप्रैल 2021

मोक्षपट

 मोक्षपट!

        गेल्या वर्षभरापासून आपण कोरोना आणि कोरोना या माहामारी शिवाय दुसरे काही ऐकले,बघितले,विचार केले असेल तर नवलच.कोरोनामुळे एकीकडे शाळा,कॉलेज,ट्यूशन,क्लासेस,बंद तर ऑफिसेस वर्क फ्रॉम होम झालेत.वर्षभरापासून घरी राहून घरच्यांसोबत क्कालिटी टाईम घालवणे सगळ्यांना अनिवार्य झाले आहे.त्यासाठी घरबैठे खेळ खेळणे हा पर्याय सर्वांसाठी सोयीस्कर आहे.त्यातूनच पत्ते,UNO,सापसिडी,ल्यूडो,लपंडाव,बुध्दीबळ,काचकांग-या असे अनेकविध जुने खेळ समोर आले.आपल्या लहानपणी उन्हाळ्याच्या,दिवाळीच्या सुट्टीत तर हे सगळे  खेळ म्हणजे दिवस यात कधी संपायचा कळायचेच नाही.

          सापसिडी खेळाची मूळ  संकल्पना,शोधकर्ते,इतिहास,याचा अभ्यास करायचे ठरवले तर कळाले-

       "सापसिडीचा शोध महाराष्ट्रात लागलाय,  तो ही संत ज्ञानेश्वरांनी लावलाय."

          संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली,भगवद्गीतेचे मराठीत भाषांतर केले,पसायदान लिहिले,अनेक अनिष्ट रूढी व परंपरांवर प्रहार केला, त्याच माऊलींनी सापसिडी खेळाचा शोध लावला हे नवलच ऐकावयास मिळाले. 

           डेन्मार्क येथील डॅनिश रॉयल सेंटरचे संचालक डॉ.एरीक सँड यांचे विद्यार्थी असलेले जेकॉब यांना' इंडिया कल्चरल ट्रेडिशन' या संकल्पने अंतर्गत,मध्ययुगीन काळात भारतात खेळल्या जाणा-या विविध खेळांविषयी संशोधन केले.त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की,13व्या शतकातील संत ज्ञानेश्वर यांनी सापसिडीचा शोध लावलेला असू शकतो.पुढील काही संशोधनात त्यांनी ज्ञानेश्वरांचे चरित्र अभ्यासले पण त्यात कुठे उल्लेख काही नव्हता.अखेरीस जेकॉब यांनी संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक व संशोधक वा.ल.मंजूळ यांच्या सहाय्याने डेक्कन कॉलेजमध्ये तशा प्रकारचे संदर्भ शोधले व त्यातून "मोक्षपट"चा उलगडा झाला. 

           मोक्षपट,हा पहिला सापसिडीपट होता.असे सांगितले जाते की,संत ज्ञानेश्वर व त्यांचे ज्येष्ठ बंधू संत निवृत्तीनाथ जेंव्हा भिक्षा मागायला जात तेंव्हा घरात लहानग्ये सोपानदेव व मुक्ताई यांचे मन रमावे म्हणून या खेळाचा-मोक्षपटाचा शोध लावला.

         लहान मुलांना खेळातून चांगले संस्कार लागावेत म्हणून या खेळाची निर्मिती केली गेली असावी.

           ज्ञानदेवांनी 13 व्या शतकात कवड्या व फाश्यांच्या मदतीने खेळावयाच्या या खेळाचा शोध लावला.मोक्षपटाचे दोन्ही पट 20 बाय 20 इंचाचे असून त्यात 50 चौकोनी घरे आहेत.पहिले घर जन्माचे तर शेवटचे घर मोक्षाचे आहे.यातील शिडी म्हणजे सद्गुणांचे प्रतिक व साप म्हणजे दुर्गुणांचे प्रतिक.सत्कृत्याने शिडीमार्गे मोक्षप्राप्ति तर दुष्कृत्याने साप असलेल्या आकड्यांवर गेल्यावर पुन्हा सुरूवात करावी लागते म्हणजे पुनः पुन्हा जन्म चक्रात अडकणे असा त्यांचा गर्भित अर्थ आहे.निवृत्तिनाथ,ज्ञानदेव,सोपानदेव व मुक्ताई ही सर्व भांवंडे हा खेळ खेळत.पुढे भारतभरात या खेळाचा प्रसार झाला.

          पुढे इंग्रज भारतात आले,त्यांना हा खेळ खूप आवडला व त्यांनी बुध्दिबळ,ल्यूडो सह हा खेळ सुध्दा इंग्लंड ला नेला व त्याच्या खेळण्याच्या पध्दतीत बदल केले त्याचे नवे नामकरणही - 'स्नेक ऍण्ड लॅडर' असे केले व आजतागायत आपण तिच नवीन स्वरूपातील सापसिडी खेळतो.

         सहा कवड्यांचे पालथे पडणे म्हणजे मोक्षपट मिळते असे प्रतिक आहे. मोक्षपटात सुध्दा सापसिडीसारखेच साप असतात,त्यात काम,क्रोध,मोह मत्सर,लोभ,मद अशा षडरिपुंचे नावे त्यांना दिली होती.केवळ गंमत म्हणून सापसिडी खेळणा-या लहानग्यांना त्यांचे आई वडिल,आजी आजोबा मोक्षपटाचा आधार घेत माणसाने आयुष्य कशाप्रकारे जगावे याचे तत्वज्ञान सांगत असणार.

कोरोनो के साईड इफेक्टस...

 कोरोनो के साईड इफेक्टस...


गेल्या एक दीड महिन्यांपासून केवळ घरात आणि घरात बसून असल्यामुळे घरातील समोर आलेलं ढळढळीत सत्य...


१. आमच्या घरात गरजेपेक्षा कितीतरी वस्तू जास्त आहेत... ज्यांना घरात का घेतलं आणि अजूनही घरात त्या का आहेत हा एक मोठा प्रश्नच आहे...


२. आमच्या घरात ऐकून चारशे बेचाळीस भांडी असून त्यातील केवळ दोनशे बहात्तर भांडी वापरात असतात...( रोज मी भांडी घासतो त्यामुळे ज्ञानात पडलेली माहिती )


३. आमच्या घराचं एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचे अंतर हे साधारणपणे पंचवीस मीटर असून जवळपास ऐंशी चकरा मारल्या की चार किमी चालणं होतं...


४. आमच्या घरात दोन-तीन वाट्या अशा आहेत की ज्या अतिक्रमण केल्यासारख्या घरात ठाण मांडून आहेत...त्यावर दुसऱ्याच कोणाचतरी नाव टंकलिखित केलेलं असून बायकोने बहुदा त्या वाट्या पाकिस्तानने बळकावलेल्या कश्मीरप्रमाणे आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत...लॉकडाऊन संपला की  सर्जिकल स्ट्राइक करून त्या ताब्यात घेऊन ज्याच्या त्याला परत करण्यात येतील...


५. या बायकोकडे आणि पोरीकडे इतके कपडे आहेत, इतके कपडे आहेत, इतके कपडे आहेत की या त्या त्यांच्या साड्या, सलवार, पॅंट शर्ट यांची एकमेकांची गाठ बांधून लांब केले तर पृथ्वीला वेढा मारून त्याची गाठ घालून तिला आकाशात टांगता येईल...


६. आमच्या घरात असाही काही दुर्गम भाग आहे जेथे माणूस आणि झाडू कधीही पोहोचलेला नाही...


७. घरात तीस टक्के जिन्नस, पदार्थ, वस्तू अशा आहेत की ज्या बायकोला 'कोठेय?' असं विचारल्यावर ती त्या वस्तू घरात असूनही 'नाही आहेत' असं उत्तर देते...


८. बायकोने बोललेल्या प्रत्येक वाक्याला अर्थ असतोच असं नाही आणि आपण उगाचंच आपला मेंदू फ्राय करून त्याचा अर्थ लावून त्याला प्रत्युत्तर द्यायचे नसते हे याकाळात अजून ज्ञानदात पडलेली भर...'शांती' खूप गोड असते...


९. मनात आणलं तर घरातल्या घरात एक तास व्यायाम सहज करता येऊ शकतो...


१०. आमच्या घरातील भांडे घासणाऱ्या मावशी का टिकतं नाही याचा शोध लागला असून घरात तयार केलेला प्रत्येक पदार्थ चोवीस तासात तीन वेळा आपले कपडे सॉरी भांडे बदलत असतो...


११. आमच्या घरातील एका बेडशीटवर दोनशे बेचाळीस फुले असून एकशे बहात्तर पानं आहेत...


१२. घरात टीव्ही असूनही तो जराही न बघता दिवस काढता येऊ शकतो...


१३. आपला मोबाईलचा टॉक टाईम ( एका दिवसात फोन वर बोलण्याचा कालावधी ) हा बायकोच्या मोबाईल टॉकटाईमचे वर्गमुळ काढून त्याला तृतीयांशने गुणल्यावर जो येतो आकडा येतो त्याच्या निम्मा असतो...


सध्या एवढे बास...अजून बरंच काही आहे पण ते पुढच्या भागात...

रामरक्षा स्तोत्राचं सामर्थ्य

 ॥श्री राम समर्थ ॥

  

रामरक्षा स्तोत्राचं सामर्थ्य आणि त्यातल्या प्रत्येक श्लोकाचं महत्व आजपर्यंत अनेकदा अनेकांच्या वाचनात आलं असेल. 


रोजच्या जीवनात कुठल्याही प्रहरी रामरक्षा म्हंटली तरी प्रचंड प्रमाणात ऊर्जा तयार होते. खरं तर जी स्पंदने रामरक्षेतून जागृत होतात, ती दाखविण्यासाठी कुठलाही चष्मा किंवा भिंग उपलब्ध नाही, परंतु "स्वानुभव" ह्या एकमेव साधनेतून काहींना त्याची प्रचीतीही आली असेल. 

म्हणूनच ...

या रामनवमीला म्हणजेच बुधवार २१ एप्रिल रोजी संध्याकाळी ठीक ७ वाजता किमान  १ वेळा आणि शक्य असल्यास  ११ वेळा अत्यंत शांतपणे पण शक्य तितक्या मोठ्या आवाजात सगळे एकत्र रामरक्षा म्हणूया.


रामरक्षेतल्या प्रत्येक मंत्राची vibrations या चराचरात घुमु देत. 


एकाच दिवशी एकाच वेळेस हजारो लाखो लोकांनी हा रामरक्षा पठणाचा संकल्प केला तर वातावरणात एक प्रचंड मोठी सकारात्मक   उर्जा निर्माण होईल.


काही वाईट शक्तीना मारण्यासाठी जशी यंत्राची गरज असते तसच काही वाईट कोरोनारूपी अदृश्य शक्तीचा नायनाट करण्यासाठी आज मंत्राची गरज आहे.


दिवसेंदिवस मनुष्य आणि  विज्ञान या विषाणूपुढे हतबल होताना दिसतोय आणि म्हणूनच त्याच्या जोडीला त्याचं सामर्थ्य व मनोबल वाढवण्यासाठी रामरक्षे सारख्या प्रभावी मंत्र पठणाची गरज आहे.  


ज्यांचा विश्वास आहे ते तर करतीलच परंतु इतरांनीही

नकारात्मक विचार थोड्या वेळापुरते बाजूला ठेऊन संपूर्ण सकारात्मक भावनेने , मनापासून त्या प्रभू रामचंद्राला शरण जाऊया. त्या जगन्नियंत्याला तळमळीने हाक मारू आणि मनुष्य जातीवर आलेलं संकट दूर करण्यासाठी साकडं घालू. 


अहो ज्याने अनंत कोटी ब्रम्हांड निर्माण केली या विश्वनिर्मात्याला हे संकट दूर करणं अवघड आहे का हो ? 


खात्री बाळगा लक्ष लक्ष मुखातून एकाच वेळी निघालेल्या या स्तोत्राचे सकारात्मक परिणाम निश्चित दिसतील. काहीतरी चांगल निश्चित घडेल.


अनेक जण रामरक्षेचे नित्यपठण करतही असतील त्यांनी आणि इतरांनीही या बुधवारी २१ एप्रिल रोजी  रामनवमीला संध्याकाळी ठीक ७ वाजता किमान १ ते ११ वेळा रामरक्षा म्हणावी. आपापल्या घरी वा जिथे असाल तिथे रामरक्षेच पठण करा.

 

ज्यांना पाठ नसेल त्यानी record लावा.


विश्वास असो वा नसो पण विश्वकल्याणासाठी , मानवजातीच्या रक्षणासाठी केलेला हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी .....

कृपया हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवून साथ द्या. 

 


॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

पारसी , पर्शिया ,झोराष्ट्रीयन

 नुसतं माझा धर्म भारी आणि माझी जात भारी म्हणून चालत नसत


बाहेरून आलेल्या पारसींनी पुण्यात हॉस्पिटल्स उभारली आणि अख्खं गाव जगवलं.*


मुळचे पर्शियाचे म्हणून त्यांना आपण पारसी म्हणतो. पर्शिया म्हणजे आजचे इराण. तिथेच झोराष्ट्रीयन हा समाज जन्माला आला. या धर्माला हजारो वर्षांची परंपरा आहे.


पण हे पारसी भारतात कसे आले याची एक कथा सांगितली जाते.

अस म्हणतात की शेकडो वर्षापूर्वी मुस्लीम अरब टोळ्यांनी पर्शियावर आक्रमण केले. धर्मांतर करू लागले. जुलमी आक्रमकांना तोंड देण्याएवढी ताकद या झोराष्ट्रीयन समाजाकडे नव्हती. यातूनच मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागले.


अशीच एक जहाजात भरून निघालेल्या पारशी कुटुंबांची नौका गुजरातला नवसारी इथल्या किनाऱ्यावर येऊन पोहचली. तिथल्या राजा समोर त्यांना उभं करण्यात आलं. त्यांचा म्हातारा प्रमुख समोर आला. राजाला व त्याला एकमेकांची भाषा येत नव्हती.


राजाने एक दुधाने काठोकाठ भरलेला पेला मागवला आणि त्या पर्शियन लोकांच्या प्रमुखाला सुचवलं की आमचा देश असा काठोकाठ भरलेला आहे आता आम्हाला आणखी माणसे नकोत.


तेव्हा तो पारसी माणूस हसला. त्याने त्या दुधात थोडासा मध टाकला. त्याचा अर्थ होता की आम्ही इथे दुधात मध मिसळल्या प्रमाणे राहू व या देशाची गोडी वाढवू. राजा खुश झाला. त्याने पारसी लोकांना भारतात राहण्याची परवानगी दिली.


पारसी लोक बुद्धिमान होते, उद्यमी होते. ते गुजरात बाहेर पडले, देशभर पसरले. इथल्या मातीशी एकरूप झाले.

ब्रिटीश भारतात आले तेव्हा पारसी लोकांनी त्यांची भाषा शिकून घेतली. याचा त्यांना प्रचंड फायदा झाला. ब्रिटीशांच्या मुंबईसारख्या महानगरात त्यांनी बस्तान बसवलं. आधुनिक शिक्षणपद्धतीचा स्वीकार केला. अनेक पारसी कुटुंबांनी आपल नाव कमवल. पैसा कमावला.


पण पारसी फक्त पैशांच्या मागे लागलेले नव्हते. हजारो वर्षांपूर्वी आपल्यावर झालेला अन्याय, हालअपेष्टा ते विसरले नाहीत. आपल्या इतिहासाची जाणीव ठेवली त्यामुळे जिथे जातील तिथे आपल्या कमाईतला वाटा समाजाला काही तरी देण्यासाठी वापरला.


पुण्यात ब्रिटीशांनी लष्करी छावणी उभारली तेव्हा त्यांच्या मदतीसाठी इंग्रजी भाषा जाणनारे स्थानिक कर्मचारी लागणार होते. त्यांनी उच्चशिक्षित पारसी लोकांना पुण्यात आणलं. बऱ्यापैकी कॅम्पच्या भागात हे पारसी वसले. इथले आल्हाददायक हवामान त्यांना मानवल.


त्यामुळे अनेक पारसी कुटुंबांनी आपले बिऱ्हाड पुण्यात कायमच हलवलं.

पारसीप्रमाणेच आपला देश सोडून परागंदा झालेले बगदादचे ज्यू डेव्हिड ससून हे देखील भारतात आले होते. व्यापारात त्यांनी व त्यांचे पारसी पार्टनर जमशेदजी जीभॉय यांनी प्रचंड पैसा कमावला होता. यातूनच पुण्यात पहिले हॉस्पिटल उभे राहिले. त्याला त्यांचे नाव देण्यात आले, डेव्हिड ससून रुग्णालय.


पुण्यात १८६७ साली डेव्हिड ससून रुग्णालय उभे राहिले. हे हॉस्पिटल उभे राहत असताना एक पारसी उद्योजक बैरामजी जीजीभोय हे मुंबईहून पुण्याला आले होते. त्यांनी मुंबईत अनेक शिक्षण संस्था उभारल्या होत्या. जीजीभोय यांनी पुण्यात ससून रुग्णालयाच्या शेजारी एक छोट वैद्यकीय प्रशिक्षण केंद्र उभ केलं. त्याला त्यांचच नाव देण्यात आलं.

 

१८७१ साली स्थापन झालेलं हे वैद्यकीय प्रशिक्षण केंद्र पुढे जाऊन पुण्याचे सुप्रसिद्ध बी.जे.मेडिकल कॉलेज बनलं.


एकोणिसाव्या शतकात पुण्याला प्लेग सारख्या रोगराईने चांगलंच सतवलं होत. इंग्रजांच्या राज्यात पुण्यात आरोग्य सेवा म्हणाव्या तशा सुधारलेल्या नव्हत्या. अजूनही लोक वैद्य, हकीम यांच्यावर अवलंबून असायचे. ससून सोडले तर मोठे रुग्णालय नव्हते.


याकाळात छोटी छोटी पारसी रुग्णालये उभी राहत होती. असाच एक दवाखाना चालवणाऱ्या एडलजी कोयाजी यांनी एक हॉस्पिटल बांधायचं ठरवलं. पारसी समाजातील उद्योगपती पुढे आले. वाडियांनी त्यांना पैशांची मदत केली. तर सर कोवासजी जहांगीर व लेडी हिराबाई या दांपत्याने जागा दिली अत्याधुनिक हॉस्पिटल उभारून दिल.

 

या हॉस्पिटलला त्यांच्या मुलाचं जहांगीरच नाव देण्यात आलं.


१९४६ साली त्या काळच्या सर्वोत्तम सेवा सर्वसामान्य रुग्णांना अत्यल्पदरात  उपलब्ध करून देण्याचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये प्रयत्न करण्यात आला होता.

याच जहांगीर हॉस्पिटलमध्ये हृद्यरोगावर उपचार करायला केकी बैरामजी हे सुप्रसिद्ध डॉक्टर होते. त्यांनी अमेरिकेतून हृद्यरोगावरील विशेष उपचाराचा प्रशिक्षण घेतलं होतं. पण तिथेच स्थायिक होण्याऐवजी आपल्या मूळ गावी पुण्याला परत आले. जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांचे काही कारणांनी एडलजी कोवासजी यांच्याशी मतभेद झाले. यामुळे केकी 

बैरामजी यांनी स्वतःच फक्त चार खाटांच एक हॉस्पिटल सुरु केलं. त्यावेळच्या गव्हर्नरने त्यांना जागा दिली होती. या गव्हर्नरच्या बायकोच्या स्मरणार्थ हॉस्पिटलचं नाव रुबी हॉल क्लिनिक असे करण्यात आले. एकेकाळी ४ बेडचे हॉस्पिटल पुढे जाऊन ७५० बेडचे पुण्यातले सर्वात अत्याधुनिक रुग्णालय बनले.


अशीच कथा केईएमची.

पुण्याच्या रास्ता पेठेत सरदार मुदलियार यांचं एक छोट प्रसूतीगृह होतं. सर्वसामान्य गरीब रुग्णांचा आधार असलेले हे हॉस्पिटल चालवणे सरदार मुदलियार यांना अवघड चालले होते. त्यांनी जहांगीर हॉस्पिटलच्या एडलजी कोयाजी यांना एखादा तज्ञ डॉक्टर व चांगला प्रशासक मिळवून देण्याची मागणी केली. त्यावेळी


एडलजी यांनी प्रसूतीशास्त्रात उच्च पदवी घेतलेल्या आपल्या वहिनीकडे म्हणजेच बानू कोयाजी यांच्याकडे ही जबाबदारी दिली.


काही महिन्यांसाठी लक्ष द्यायचं म्हणून डॉ.बानू कोयाजी यांनी ही जबाबदारी उचलली खरी मात्र केईएम हे पुढच्या आयुष्यभराच हे मिशन बनलं.


बानू कोयाजी यांनी केईएमचा कार्यक्षेत्र पुण्याच्या ग्रामीण भागापर्यंत वाढवल. त्यांचं कार्य फक्त वैद्यकीय सेवेपुरत मर्यादित राहिलं नाही तर कुटुंब नियोजनासारखे समाजहिताचे कार्यक्रम जनजागृती अशा अनेक उपक्रमांची जोड दिली.


डॉ. बानू कोयाजी हे पुणेकरांसाठी एक आदराच आणि आपलेपणाचं नाव बनलं. 

आजही ही जहांगीर पासून ते केईएमपर्यंत अनेक रुग्णालये पुंण्यात तितक्याच कार्यक्षमतेने कार्य करत आहेत. वेळोवेळी येणाऱ्या संकटात मेडिकल इमर्जन्सीमध्ये या हॉस्पिटलनी पुण्याला जगवल आहे.


 सायरस पूनावाला यांच्यासारखे उद्योगपती औषधनिर्मितीच्या क्षेत्रात जगभरात ओळखले जातात.


प्रत्येक समाज पिढ्यानपिढ्या आपापल्या परंपरा जपत असतो पण पुण्याच्या पारसींनी वैद्यकीय क्षेत्रात छाप पाडून एक वेगळीच ओळख निर्माण केली एक अजरामर पायंडा पाडला.


टिपः नुसतंच गर्व से कहो असं म्हणून माणसं जगत नसतात... प्रत्येक धर्मियांचा आदर हेच भारतीयत्व.... Live & Let Live


रतन टाटा .,आदर पुनावाला..डाॕ.बानू कोयाजी...डाॕ.ग्र्ँट...होमी भाभा अशा अनेक पारसी धर्मियांनी देशासाठी सर्वस्व अर्पण करुन भारताचा नावलौकिक वाढवला आहे. 


आणि कोणत्याही जाती धर्माचा द्वेष हे महान लोक करत नाहीत....बघा जमलं तर विचार करा

साभार

fly