शुक्रवार, 21 अप्रैल 2023

अक्षय तृतीया मुहूर्त माहिती...

 अक्षय तृतीया मुहूर्त माहिती...


अक्षय तृतीया हे साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त आहे


हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वर्षभरात साडेतीन शुभ मुहूर्त असतात. ते खालीलप्रमाणे आहेतः


दसरा, गुढीपाडवा, अक्षय तृतीया

हे तीन पूर्ण मुहूर्त आहेत.तर दिवाळीचा पाडवा कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा अर्धा मुहूर्त आहे.


कोणतेही शुभ कार्याचा, नविन कार्याचा प्रारंभ या दिवशी करतात.हे मुहूर्त पुर्ण शुद्ध असल्यामुळे या दिवशी इतर दिवसांप्रमाणे कोणतेही शुभ काम सुरु करण्यास दिनशुद्धी बघण्याची गरज नाही.


ह्या दिवशी हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया येते. अक्षय्य तृतीया हा महत्त्वाच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो.


ह्या दिवशी नर-नारायण या जोडदेवाची जयंती, परशुराम जयंती, बसबेश्वर जयंती आणि, हयग्रीव जयंती असते.


अस्यां तिथौ क्षयमुपैति हुतं न दत्तं


तेनाक्षयेति कथिता मुनिभिस्तृतीया ।


उद्दिश्य दैवतपितॄन्क्रियते मनुष्यैः


तच्चाक्षयं भवति भारत सर्वमेव ।। – मदनरत्न


अर्थ : (श्रीकृष्ण म्हणतो) हे युधिष्ठिरा, या तिथीस केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही; म्हणून हिला मुनींनी ‘अक्षय तृतीया’ असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते.


सांस्कृतिक समारंभ


महाराष्ट्रातील स्त्रिया चैत्रातील एखाद्या दिवशी हळदीकुंकवाच्या निमित्ताने बायकांना घरी बोलावून मोगर्‍याची फुले किंवा गजरा, आंब्याची डाळ (किंवा भिजवलेले हरबरे) आणि पन्हे देतात. त्या हळदीकुंकू समारंभांचा (गौरी उत्सवाचा) अक्षय तृतीया हा शेवटचा दिवस असतो.


ज्योतिषविषयक समजुती 


१. अक्षय तृतीयेला कृत युग संपून त्रेतायुग सुरू झाले असे सांगितले जाते. या दिवशी दुसरया युगाला सुरुवात झाली होती. ज्योतिषशास्त्रात कृत, त्रेता, द्वापर आणि कलियुगाची सर्व वर्ष मिळून होणारया काळाला ‘महायुग' असे म्हणतात. ही चार युगे महायुगाचे चार चरण असल्याचे मानले जाते. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा जो प्रारंभ त्याला ‘कल्पादीं' तसेच त्रेतायुगाचा (१२,९६,००० सौर वर्षाएवढा त्रेतायुगाचाकाळ) प्रारंभ म्हणजे ‘युगादी' ही तिथी वैशाख शुद्ध तृतीयेला येते.


शेतीसंबंधी प्रथा 


१. मातीत आळी घालणे व पेरणी : पावसाळा तोंडावर घेऊन अक्षय्य तृतीया येते. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे मशागत करण्याचे काम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्ण करायची प्रथा आहे. (मशागत म्हणजे नांगरलेल्या शेतजमिनीची साफसफाई करून खत मिश्रित मातीच्या थरांना खालीवर करणे.) या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मृत्तिकेबद्दल कृतज्ञ भाव ठेवून काही शेतकरी पूजन केलेल्या मृतिकेमध्ये आळी घालतात. कोकणात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे, देशावर नाही. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही, अशी धार्मिक समजूत आहे. (बियाणे म्हणजे मळणीतील धान्य आपल्या आवश्यकतेनुसार खाण्यासाठी बाजूला काढून घेऊन पुढच्या पेरणीसाठी राखून ठेवलेले उरलेले धान्य.)


महाराष्ट्राच्या कोकण भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्या कारणाने एकदा पावसाला सुरुवात झाली की, सतत पाऊस पडत राहिल्याने सुपीक जमिनीतील चिकट मातीमध्ये आळी करून बियाणे पेरणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे पावसाळा तोंडावर असतांना मशागत केलेल्या भुसभुशीत मातीमध्ये बियाणे पेरणे सोपे जाते. (निदान पूर्वीतरी, अक्षय्य तृतीयेच्या शुभमूहुर्तावर म्हणजेच पावसाला सुरुवात होण्यापूर्वी पेरणीची कामे पूर्ण केली जात असत. हल्ली पावसाचे प्रमाण कमी झाल्याने व शास्त्राप्रमाणे पेरणी न केल्याने जमिनी नापीक होत चालल्या आहेत व कसदार धान्य पिकण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.)


२.. वृक्षारोपण : अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात अशी समजूत आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही, अशी समजूत आहे.


धार्मिक समजुती 


हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे घागरीयेवढे मडके आणून, त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो.पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात खीर आंब्याचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान केला जातो. असे केल्याने पितरांचा आत्मा शांत होतो असे मानले जाई.


या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ 'अक्षय्य'(न संपणारे) असे मिळते, असा समज आहे. अक्षय्य तृतीयेला ब्रह्मा व श्रीविष्णु यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून, म्हणजे सगुणलोकांतून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्त्विकता १० टक्क्यांनी वाढते, अशी कल्पना आहे.


१. अर्थ : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सदोदित सुख व समृद्धी प्राप्‍त करून देणाऱ्या देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, अशी समजूत आहे


अक्षय तृतीया हा सण साजरा करण्याची पद्धत


‘कालविभागाचा कोणताही प्रारंभदिवस भारतियांना नेहमीच पवित्र वाटतो; म्हणून अशा तिथीस स्नानदानादी धर्मकृत्ये सांगितली गेली आहेत. या दिवसाचा विधी असा आहे – पवित्र जलात स्नान, श्रीविष्णूची पूजा, जप, होम, दान आणि पितृतर्पण. या दिवशी अपिंडक श्राद्ध करावे आणि ते जमत नसेल, तर निदान तिलतर्पण तरी करावे.


२ अ. उदकुंभाचे (उदककुंभाचे) दान


या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून ब्राह्मणाला उदककुंभाचे दान करावे.


२ अ १. महत्त्व


उदककुंभालाच ‘सर्वसमावेशक स्तरावरील निर्गुण पात्र’ असे संबोधले जाते.


२ अ २. उद्देश


अ. उदककुंभाचे दान करणे, म्हणजेच स्वतःच्या सर्व प्रकारच्या देहसदृश, तसेच कर्मसदृश वासनांच्या स्थूल, तसेच सूक्ष्म लहरी कुंभातील जलाला पवित्र मानून त्यात विसर्जित करणे आणि अशा प्रकारे स्वतःचा देह आसक्तीविरहित कर्माने शुद्ध करून त्यानंतर उदककुंभायोगे या सर्व वासना पितर अन् देव यांच्या चरणी ब्राह्मणाला ग्राह्य धरून अर्पण करणे


आ. पितरांच्या चरणी उदककुंभ दान दिल्याने पितर मानवयोनीशी संबंधित असल्याने ते आपल्या स्थूल वासना नष्ट करतात.


इ. देवाचा कृपाशीर्वाद हा आपल्या प्रारब्धजन्य सूक्ष्म कर्मातील पाप नष्ट करत असल्याने सूक्ष्म कर्मजन्य वासना देवांच्या चरणी या दानाकरवी अर्पण केल्या जातात.


२ अ ३. उदकुंभ दानाचा मंत्र


ब्राह्मणाला उदकुंभाचे दान देतांना पुढील मंत्र म्हणावा


एष धर्मघटो दत्तो ब्रह्मविष्णुशिवात्मकः ।


अस्य प्रदानात् तृप्यन्तु पितरोऽपि पितामहाः ।।


गन्धोदकतिलैर्मिश्रं सान्नं कुम्भं फलान्वितम् ।


पितृभ्यः सम्प्रदास्यामि अक्षय्यमुपतिष्ठतु ।। – धर्मसिन्धु


अर्थ : ब्रह्मा, विष्णु आणि शिव ज्यात सामावले आहेत असा हा धर्मघट मी ब्राह्मणाला दान केला आहे. या दानामुळे माझे पितर आणि देवता तृप्त होवोत. गंध, उदक, तीळ, यव आणि फळे यांनी युक्त असा हा कुंभ मी पितरांसाठी देत आहे. हा कुंभ माझ्यासाठी सदा अक्षय्य (क्षय न पावणारा) ठरो.


२ अ ४. शास्त्र


अक्षय तृतीया या दिवशी ब्रह्मांडात अखंड रूपातील, तसेच एकसमान गतीजन्यता दर्शवणार्‍या सत्त्व-रज लहरींचा प्रभाव अधिक प्रमाणात असल्याने या लहरींच्या प्रवाहायोगे पितर आणि देव यांना उद्देशून ब्राह्मणाला केलेले दान पुण्यदायी आणि मागील जन्माच्या देवाणघेवाण हिशोबाला धरून कर्म-अकर्म करणारे ठरत असल्याने या कधीही क्षय न होणार्‍या लहरींच्या प्रभावाच्या साहाय्याने केलेले दान महत्त्वाचे ठरते...


२. मृत्तिका पूजन : सदोदित कृपादृष्टी ठेवणाऱ्या मृत्तिकेमुळेच आपल्याला धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी व वैभवलक्ष्मी यांची प्राप्ती‍ होते. अक्षय्य तृतीया हा दिवस म्हणजे कृतज्ञ भाव ठेवून अशा मृत्तिकेची उपासना करण्याचा दिवस.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी काय करावे 

या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा समुद्रात अंघोळ करावी.

सकाळी पंखा, तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ आणि वस्त्राचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी.

ब्राह्मण भोजन घालावे.

या दिवशी सातूचे महत्त्व असून ते जरूर खायला हवेत.

या दिवशी नवीन वस्त्र, शस्त्र, दागिने विकत घ्यावेत.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामेही केली जातात.

शास्त्रांमध्ये अक्षय्य तृतीया 

या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात. हे मंदिर अक्षय तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते.

नर-नारायण या जोडगोळीने या दिवशी अवतार घेतला होता.

श्री परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते.

वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात.

अक्षय्य तृतीयेचे माहात्म्य 

जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो.

या दिवशी परशुरामाची पूजा करून त्यांना अर्घ्य दिले जाते.

शुभ कार्ये या दिवशी होतात.

श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते, की 'या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय्य तृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय अविनाशी) होते.

या दिवशी बद्रीधाम येथील बद्रीनारायणाच्या मंदिरात सहा महिन्यांच्या बंदकालानंतर प्रथम प्रवेश मिळतो. अयोध्येजवळच्या वृंदावनात कुंजबिहारी श्रीकृष्ण मंदिराचे दरवाजेपण याच दिवशी उघडले जातात. अक्षयतृतीया ही विष्णूचा एक अवतार समजल्या जाणाऱ्या परशुरामाची जन्मतिथी आहे.

अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त आहे. आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करतात व त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे घागरीयेवढे मडके आणून, त्यात पाणी भरुन त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो. पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात खीर आंब्याचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान केला जातो. असे केल्याने पितरांचा आत्मा शांत होतो असे मानतात. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ ‘अक्षय्य'(न संपणारे) असे मिळते.(ज्योतिष राहुल नारायणराव पुराणिक)

गुरुवार, 20 अप्रैल 2023

वाळवणाचे आवडीचे पदार्थ, कोहळ्याचे सांडगे (प्रकार १)

 उन्हाळ्यासाठी special


वाळवणाचे  आवडीचे  पदार्थ


आपल्या रोजच्या जेवणात भाज्या, आमट्या, उसळी, चटण्या, कोशिंबिरी असतात. पण कधी कधी तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा येतो. कधी बाजारात जाऊन भाजी आणायला वेळ नसतो म्हणून तर कधी आवड, बदल म्हणून घरात वर्षभराकरता करून ठेवलेले पदार्थ उपयोगाला येतात.       मूग-तांदळाची खिचडी केली, की उडदाचा पापड हवाच, तर उपवासाच्या साबुदाणा खिचडीबरोबर साबुदाणा पापडी मजा आणते. आणि पापड, कुरडईसारखे कुरकुरीत खमंग पदार्थ आबालवृद्धांनाही मनापासून आवडतात, तर कधी कधी सांडगे, भरल्या मिरच्या, सांडगे मिरच्या जेवणाची लज्जत वाढवितात. त्यामुळे उन्हाळा कडक होऊ लागताच अशा वर्षभराच्या साठवणीची, वाळवणाची गृहिणींची गडबड सुरू होते. खरंतर आजच्या नोकरदार गृहिणीला अशी कामे करायला वेळ तरी कुठे असतो? पण तरीही अनेकजणी उत्साहाने, धडपडत हे पदार्थ बनवतात. कारण उडदाच्या पापडाची गोटी बाहेर विकत मिळते, पण तिला आजीच्या, आईच्या किंवा सासूबाईंच्या हातची चव नसते. म्हणून मग वेळात वेळ काढून हे पदार्थ घरात बनवले जातात. पापड, कुरडयाखेरीज इतर वर्षभराच्या वाळवणाचे काही आगळेवेगळे पदार्थ.


कोहळ्याचे सांडगे (प्रकार १)


साहित्य :-


तीन वाट्या कोहळ्याचा कीस, १०० ग्रॅम भेंड्या, दोन मध्यम काकड्या, आठ-दहा हिरव्या मिरच्या, मीठ, हिंग, हळद, वाटीभर जाडपोहे, वाटीभर साळीच्या लाह्या, कोथिंबिरीची एक मोठी जुडी.

कृती : काकडी जुनी असावी. ती सालासह चिरावी. भेंड्या, कोथिंबीर, चिरून घ्यावी. मिरच्या वाटून घ्याव्यात. हे सगळे कोहळ्याच्या किसात घालावे. मग त्यात मीठ, हिंग, हळद, साळीच्या लाह्या, पोहे घालावेत. सगळे एकत्र करून खलबत्त्यात कुटावे. हे सगळे काम रात्रीच करून ठेवावे. भांड्यात घालून झाकून ठेवावे. सकाळी मिश्रण परत एकदा चांगले मिसळून घ्यावे.  प्लॅस्टिकच्या कागदावर त्याचे छोटे बत्ताशासारखे सांडगे घालावेत. दुसऱ्या दिवशी निघत असल्यास काढून उलटून चांगल्या कडक उन्हात वाळवावेत. घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावेत. हवे तेव्हा तळून तोंडी लावण्यास घ्यावे. (काकडी, भेंडीचे प्रमाण वाढवू शकता.)

  सांडगे मिरच्या


साहित्य :-


 पाव किलो जाड, बुटक्‍या हिरव्या मिरच्या, या अर्धे बोट लांबीच्या मिरच्या असतात. त्यामुळे तळायला सोप्या जातात. मेथीपूड २ चमचे, अर्धी वाटी धनेपूड, मीठ, हिंग, हळद, एका लिंबाचा रस.


कृती :-


दुपारी मिरच्यांना उभी चीर देऊन त्या मिठाच्या पाण्यात टाकाव्यात. देठ काढू नयेत. रात्री सगळा मसाला एकत्र करावा. त्यावर लिंबाचा रस आवश्‍यकतेप्रमाणे घालून कालवावे. पाण्यातल्या मिरच्या काढून निथळून त्यातले बी काढून मिरच्या मोकळ्या कराव्यात. त्यात तयार मसाला दाबून भरावा. एखाद्या तरसाळ्यात ठेवून त्यावर झाकण ठेवावे. सकाळी प्रत्येक मिरचीची भरलेली बाजू वर येईल. अशा त्या मिरच्या उन्हात ठेवून चांगल्या ८-१० दिवस वाळवाव्यात. मिरच्या वाळत आल्या की त्या पांढऱ्या होतात. भरपूर वाळवून त्या डब्यात भरून ठेवाव्यात. या मिरच्या तळून खाण्याकरता, दहिभाते, दहीपोहे, मुळ्याची दह्याची कोशिंबीर, कैरीची डाळ यावर तळून, कुस्करून घालाव्यात. छान चव लागते.


भूस-वडी


साहित्य :-


 गव्हाचा चीक काढल्यावर उरलेला चोथा, तिखट, मीठ, हिंग, हळद, तीळ, थोड्या तांदळाच्या अगर ज्वारीच्या कण्या.


कृती :-


सर्व पदार्थ एकत्र करून अंदाजे पाणी घालून कुकरमध्ये मऊ शिजवावे. कोमट झाल्यावर चांगले मळून घ्यावे. या मिश्रणाच्या छोट्या पापड्या थापून कडक उन्हात चांगल्या वाळवाव्या. या २-३ तळलेल्या पापड्या व भाजके शेंगदाणेही संध्याकाळची पौष्टिक न्याहारी होते.


मिश्र डाळींचे सांडगे


साहित्य :-


 एक वाटी चणाडाळ, अर्धी वाटी मटकीची डाळ, पाव वाटी उडीद डाळ, तिखट, मीठ, हिंग, हळद, चमचाभर धने-जिरे पूड, कोथिंबीर.


कृती :-


तिन्ही डाळी भाजून जाडसर दळाव्यात किंवा तीन तास भिजत घालून नंतर रवाळ वाटाव्यात. वाटताना पाणी निथळून टाकावे. भाजल्यास त्या पिठात इतर सर्व साहित्य घालून थंड पाण्याने पीठ किंचित घट्टसर भिजवावे. भिजवून वाटल्यास असेच सर्व साहित्य घालून पीठ कालवावे. त्याचे प्लॅस्टिक कागदावर अगर पाटाला, ताटाला तेल लावून छोटे-छोटे सांडगे घालावे. कडक उन्हात चांगले वाळवावे व घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावेत. या सांडग्यांची कांदा, वांगे, बटाटे वगैरे घालून रस्सा भाजी करता येते किंवा तळून आमटीतही टाकता येतात. (पीठ जास्त घट्ट झाल्यास सांडगे दडस होतात.)


गवारीच्या शेंगा


साहित्य :-


 गवारीच्या शेंगा, मीठ, आंबट दही, जिरेपूड, लाल तिखट.

कृती : शेंगाची डेरव (देठं) काढावीत. दह्यात लाल तिखट, मीठ, जिरेपूड घालावी व हलवावे. त्यात शेंगा बुडवून बाहेर काढून उन्हात वाळवाव्यात. पुन्हा एक-दोन दिवसांनी दही तयार करून ते सुकलेल्या शेंगा त्यात बुडवाव्यात व बाहेर काढून वाळवाव्यात. म्हणजे त्यावर दह्याचा थर बसेल. या शेंगा तळून जेवणात उपयोगाला आणाव्यात. खूप छान लागतात.


टीप : अशाच तऱ्हेने डिंगऱ्या म्हणजे मुळ्याच्या शेंगा, कारल्याच्या चकत्या, तोंडल-भेंडीच्या चकत्या, कोहळ्याच्या जाड साली वरीलप्रमाणे दही तयार करून त्यात बुडवून वाळवून ठेवतात व तळून खातात.


बाजरीच्या खारोड्या


साहित्य :-


एक वाटी बाजरीचा रवा, पाऊण वाटी पाणी, तिखट एक चमचा, भाजलेले तीळ १ चमचा, जिरे, ४-५ लसूण पाकळ्या खसटून.


कृती :-


बाजरीचा रवा भाजून घ्यावा. पातेल्यात पाणी उकळत ठेवावे. त्यात लाल तिखट, मीठ, तीळ, जिरे, लसूण घालावा. भाजलेल्या रव्यात थोडे पाणी घालून तो किंचित सरसरीत करावा व उकळलेल्या पाण्यात घालून हलवावे. झाकण ठेवून मंद गॅसवर शिजवावे. चांगली वाफ आणावी. खाली उतरून मिश्रण परातीत पसरावे. कोमट झाल्यावर चांगले मळून त्याचे छोटे-छोटे सांडगे घालावेत व कडक उन्हात भरपूर वाळवावेत. हे सांडगे तळून खाता येतात किंवा जरा जास्त तेल घालून त्यात तीळ, सांडगे, कोथिंबीर घालूनही छान लागतात.


पोह्याची मिरगुंड


साहित्य :-


 भाजलेल्या जाड पोह्याचे पीठ एक वाटी, वाटीभर भाजलेल्या साबुदाण्याचे पीठ, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, हिंग, लाल तिखट १ ते २ चमचे, मीठ, अर्धा चमचा पापडखार.


कृती :-


पोह्याचे पीठ, साबुदाणा पीठ, जिरेपूड, तिखट, मीठ, हिंग एकत्र करावे. पापडखार रात्री कोमट पाण्यात भिजत घालावा. त्यातले एक चमचाभर पाणी पिठात मिसळावे. आवश्‍यक तेवढे थंड पाणी घालून पीठ भिजवावे. मळून छोटे गोळे करावेत. पोळी लाटून शंकरपाळ्याप्रमाणे कापावे. ही मिरगुंड २-३ दिवस चांगली वाळवावी. तळून खायला घ्यावीत. या प्रमाणात साहित्य घेऊन वर्षभराकरता मिरगुंडे बनवावी.


कोहळ्याचे सांडगे (प्रकार २)


साहित्य :-


 अर्धी वाटी मूगडाळ, १ वाटी चणाडाळ, पाव वाटी उडीद डाळ, कोहळ्याचा कीस अर्धी वाटी, चमचाभर भाजलेल्या तिळाची पूड, हिंग, हळद, हिरवी मिरची, लसूण ठेचा १ ते २ चमचे आणि मीठ.


कृती :-


डाळी रात्री भिजत घालाव्यात व सकाळी निथळून वाटाव्यात. त्यात इतर सर्व साहित्य घालून एकत्र करावे. त्याचे छोटे सांडगे घालावेत व कडक उन्हात चांगले वाळवावेत.


आंबोशी


साहित्य व कृती :-


ताज्या, घट्ट कैऱ्यांच्या सालीसुद्धा किंचित जाडसर फोडी कराव्यात व चांगल्या कडक उन्हात वाळवाव्यात. उपयोग करताना कोमट पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवाव्यात.


साबुदाणा - बटाटा पापडी


साहित्य :-


 पाव किलो भिजवलेला साबुदाणा, चार मध्यम बटाटे उकडून, मीठ, लाल तिखट, जिरे.


कृती :-


सकाळीच साबुदाणा भिजवावा. रात्री साबुदाणा आधणात ओतून शिजत ठेवावा. बटाटे किसून पुरणयंत्रातून गाळून घ्यावे. त्यात पाणी घालून सरसरीत करावे व शिजणाऱ्या साबुदाण्यात घालावे. तिखट, मीठ, जिरे घालावेत. मंद गॅसवर चांगले शिजवावे. उतरून ठेवावे. सकाळी या थंड पिठाच्या पापड्या घालाव्यात. पीठ घट्ट वाटल्यास आवश्‍यक तेवढे उकळते पाणी घालून हलवावे. या पापड्या बटाट्यामुळे खूप हलक्‍या होतात. आणि भरपूर वाळवल्यास बरेच दिवस टिकतात. शिवाय उपवासालाही चालतात.


तांदळाच्या बिबट्या


साहित्य व कृती :-


तांदूळ किंवा तांदळाच्या कण्या एक दिवस भिजत टाकाव्यात. दुसऱ्या दिवशी त्यात लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या वाटून घालाव्यात. हिंग व चवीप्रमाणे मीठ व पाणी घालून कुकरमध्ये मऊसर शिजवून घ्याव्यात. गार झाल्यावर मळून घेऊन त्याचे बत्ताशे घालावेत व उन्हात चांगले वाळवावेत. वर्षभर केव्हाही तळून खायला उपयोगी पडतात.


आमचूर पावडर


साहित्य व कृती :-


ताज्या व घट्ट कैरीच्या साली काढून त्या किसाव्यात अगर पातळ फोडी कराव्यात. उन्हात छान वाळवाव्यात. मिक्‍सरवर फिरवून पीठ करून बाटलीत भरून ठेवावी. आंबटपणासाठी उपयोग करावा.


छुंदा


साहित्य :-


खोबरी जातीच्या किंवा तोतापुरी ताज्या कडक कैऱ्या, मीठ, साखर, तिखट, जिरेपूड.


कृती :-


 कैऱ्यांची साल काढून त्या स्टीलच्या किसणीने किसाव्यात. त्यात मीठ घालून २-३ तास ठेवावे. नंतर सुटलेले पाणी ओतून काढावे. दाबून काढू नये. मग त्यात आपल्या चवीप्रमाणे एक वाटी किसाला दीड ते दोन वाट्या साखर घालून हलवून काचेच्या बरणीत हा कीस घालावा. वर पातळ दादरा बांधून बरणी आठ दिवस उन्हात ठेवावी. रोज सकाळी चमच्याने हलवावे. आठ दिवसांत साखरेचा पाक होतो. मग त्यात थोडे लाल तिखट व जिरेपूड घालून हलवून एक दिवस उन्हात ठेवावे. हा छुंदा वर्षभर टिकतो.


तवकिरीच्या झटपट पापड्या


साहित्य व कृती :-


  तवकीर पाण्यात कालवावी. पाणी गरम करून त्यात घालून हलवावी व मंद गॅसवर शिजत ठेवावी. चवीप्रमाणे मीठ घालावे. खसखस घालावी. साबुदाण्याच्या पापड्यांसारखे शिजवावे व पापड्या घालाव्यात. या पापड्या हलक्‍या व झटपट होतात.


कानमंत्र


बटाट्याचा कीस करायला बटाटे उकडून फ्रीजमध्ये ठेवावे. सकाळी लवकर सालं काढून जाड्या किसणीने किसून कीस घालावा. म्हणजे दिवसभराचे भरपूर ऊन मिळते. ५-६ दिवस हा कीस वाळवावा. वर्षभर टिकतो.

गाजरे उकडून किंवा कच्ची किसून उन्हात वाळवावा. तीळ, मिरच्या घालून तेलावर परतून छान चटणी होते.

कांदे किसून कीस अगर काप करून कडक उन्हात वाळवावे. चिवडा, मसाला करण्याकरिता हा कांदा उपयोगी पडतो.

वर्षाची हळद, शिंगाड्याचे पीठ करताना रात्री पाणी उकळून त्यात टाकावे. पाणी त्याच्यावर यावे. झाकून ठेवावे. २-३ तासांनी पाणी ओतून ते रोळीत काढून निथळावे. सकाळी कडक उन्हात वाळत टाकावेत. हाताने तुकडा पडेपर्यंत वाळवावे व दळून आणावेत. हळदीसाठी राजापुरी हळद चांगली .

तिखट करण्यासाठी लालभडक मिरच्या आणाव्यात. डेख काढावी. बी घेऊ नये. मिरच्या फार दिवस तापवू नयेत. चुरगळल्या जाऊ लागल्या, की दळून आणाव्यात. अति उन्हाने मिरच्या पांढऱ्या होऊन तिखटेही पांढरे होते, तर देठांमुळे तिखट किडते.

वर्षभरासाठी मोहरी आणल्यावर ती रात्री स्वच्छ धुऊन रोळावी. निथळून कापडात बांधून ठेवावी. सकाळी लवकर पसरून वाळत ठेवावी. लाल व बारीक मोहरी औषधी असते, असे म्हणतात.

वाल वर्षभर टिकण्यासाठी निवडून आठ-दहा दिवस कडक उन्हात चांगले वाळवावेत. नंतर त्याला एरंडेल लावावे.

सीझनमध्ये भरपूर, रसरशीत मिळणाऱ्या मेथी, पालक, हरभऱ्याची भाजी यांसारख्या पालेभाज्या, कोथिंबीर, घेवडा, गवार, मटार यांसारख्या शेंग भाज्यासुद्धा वाळवून ठेवता येतात.

आवळ्याच्या सिझनमध्ये रसरशीत, ताजे आवळे उकडून किंवा कच्चे किसून सेंदोलोण पादेलोण, जिरेपूड, तिखट लावून कीस वाळवावा. वर्षभराची औषधी आवळासुपारी तयार. फोडीही चालतील. आवळे कुस्करून वरील मसाला लावून वड्या किंवा सांडगे करता येतात.

fly