सोमवार, 9 अक्तूबर 2023

भगरीचे आरोग्यासाठी फायदे...

भगरीचे आरोग्यासाठी फायदे...


भगर म्हणजेच ‘वरीचे तांदूळ’ हे आपल्या घरी उपवासाच्या दिवशी केले जातात.


सहसा उपवासाचा दिवस सोडला तर इतर दिवशी आपण भगर खात नाही.


पण या भगरीत काय काय घटक आहेत आणि ती किती पौष्टिक आहे हे वाचले तर असे लक्षात येईल की एरवी सुद्धा खायला हा पदार्थ किती चांगला आहे.


आज आपण याच उपवासाच्या पदार्थाबद्दल जाणून घेणार आहोत.


खरंतर भगर हे काही धान्य नाही. भगर म्हणजे शेतात आपोआप उगवणाऱ्या गवताच्या एका प्रकारच्या बिया.


हिंदीमध्ये याला ‘सामा चावल’ म्हणतात.


शिजलेल्या भगरीची चव सुद्धा काहीशी भातासारखीच असते.


भगर हे पटापट वाढणारे पीक आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण ‘बी’ पेरल्यापासून केवळ पंचेचाळीस दिवसात भगरीचे पीक तयार होते.


भगर हे अख्या भारतभर उपवासाच्या दिवशी केले जाते, पण ते केवळ उपवासापुरते मर्यादित न ठेवता इतर वेळेस पण खाण्यासाठी किती उपयुक्त आहे हे आपण आता बघणार आहोत.

जाणून घेऊयात भगरीत असलेली पोषकद्रव्ये आणि त्याचा आपल्या शरीराला होणारा उपयोग

1. जास्त प्रमाणात प्रोटीन


भगरीमध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते.


तांदूळ, गहू, ज्वारी या धान्यापेक्षा भगरीत कॅलरी कमी असतात.


जास्त प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे थोडीशी भगर खाऊन सुद्धा अंगात शक्ती येते.


कॅलरी कमी असल्यामुळे वजन आटोक्यात ठेवण्यासाठी सुद्धा भगर उपयुक्त ठरते.


2. फायबर रिच फूड


भगरीत फायबर खूप जास्त प्रमाणात आढळतात.


आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन व्हायला फायबरची गरज असते.


म्हणूनच आहारात फायबरचे प्रमाण जास्त असेल तर पचनाच्या तक्रारी कमी होतात.


भगर पचायला हलकी असते. भगर खाल्याने कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर तो दूर होतो, गॅसेस होत नाहीत आणि अपचनामुळे पोट दुखत असेल तर ते सुद्धा दुखायचे कमी होते.

 

आहारात फायबरचे प्रमाण जास्त असेल तर पोट भरल्याची भावना सुद्धा लवकर येते आणि जास्त वेळासाठी टिकून राहते.

 

या कारणामुळेच वजन कमी करायचे असेल तर भगर हा एक चांगला पर्याय आहे.


3. लो ग्लायसेमिक इंडेक्स


भगर हे ‘लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड’ आहे. ‘लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड’ म्हणजे असे अन्न ज्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते आणि असलेले कार्बोहायड्रेट पचायला अतिशय सोपे असते.


यामुळे सुद्धा वजन आटोक्यात ठेवण्यासाठी भगर फायदेशीर आहे.


‘लो ग्लायसेमिक इंडेक्स’ असलेल्या अन्नामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.


मधुमेह असणाऱ्या लोकांना या प्रकारचे अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो.


अर्थातच मधुमेह असणाऱ्या लोकांनी भाताच्या ऐवजी भगर खाल्ली तर त्यांच्यासाठी ते फायदेशीर असते.


4. ग्लूटेन फ्री


भगरीत ग्लूटेन नसते. ग्लूटेन म्हणजे आपण खातो त्या धान्यात आढळणारा एक चिकट पदार्थ.


आपण ज्या धन्याच्या पिठाला मळतो त्यात ग्लूटेन असते, उदाहरणार्थ गव्हाचे पीठ. पिझा, पास्ता, ब्रेड यामध्ये ग्लूटेनचे प्रमाण जास्त असते.


ग्लूटेनमध्ये काही पोषक दर्वे नसतात, काही लोकांना ग्लूटेनची ऍलर्जी सुद्धा असते.


ग्लुटेनयुक्त पदार्थ खाल्ल्याने त्यांना पोटात दुखणे, अपचन यासारखे त्रास होतात.


अशांसाठी भगर जे पूर्णपणे ग्लूटेन फ्री आहे हा एक उत्तम पर्याय आहे, जो पचायला हलका आहे हे आपण वर बघितलेच आहे.


5. जास्त प्रमाणात आयर्न असते


भगरीत आयर्न जास्त प्रमाणात आढळते.


म्हणूनच आपल्याला जर ऍनेमियाचा त्रास (शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे) सरल तर शरीरातले हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी भगर उपयोगी आहे.


इतर कोणत्याही धान्यात असते त्यापेक्षा जास्त प्रमाणात आयर्न भगरीतून मिळते.


साधारण 100 ग्राम भगरीतून 18.5 mg आयर्न मिळते. विशेषतः शाकाहारी लोकांसाठी भगर हा आयर्नचा सर्वोत्तम स्रोत आहे.


6. व्हिटॅमिन्स आणि खनिजे यांचे प्रमाण जास्त असते


भगरीत व्हिटॅमिन ‘सी’, ‘ए’ आणि ‘इ’ जास्त प्रमाणात असतात.


तसेच भगरीत खनिजे सुद्धा जास्त प्रमाणात आढळतात ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते.


7. सोडियम फ्री फूड


भगरीत सोडियम नसते ज्यामुळे बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदा होतो.


8. भरपूर अँटिऑक्सिडंट्स


साध्या भातापेक्षा भगरीमध्ये जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात.


अँटिऑक्सिडंट्स आपल्या शरीरातल्या पेशींची फ्री रॅडिकल्स नावाच्या धोकादायक मॉलिक्यूल पासून संरक्षण करतात.


मोठी माणसे भगर जरी उपवासाला खात असले तरी बाळाला पहिल्यांदा बाहेरचे अन्न देताना, अगदी सहाव्या सातव्या महिन्यापासून भगरीची खीर करून दिली तर बाळासाठी तो उत्तम पोषक आहार ठरतो.


कारण ती पचायला अतिशय हलकी असते.


भगरीसारखे इतके सकस अन्न, फक्त उपवासासाठी न वापरता त्याचा रोजच्या आहारात उपयोग झाला पाहिजे.


शिवाय नवरात्रात नऊ दिवसांचा उपवास करताना, आपल्या शरीराला पोषक आहार मिळून ऊर्जा टिकून राहण्यासाठी भगरीचा वापर सर्वात जास्त करावा.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly