tharoor लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
tharoor लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

मंगलवार, 20 अप्रैल 2010

आता मोदींच्या मॅण्डेटरी ओव्हर्स सुरू

आता मोदींच्या मॅण्डेटरी ओव्हर्स सुरू

कोची आयपीएलच्या मालकीहक्क वादातून परराष्ट्र राज्यमंत्री शशी थरुर यांचा राजीनामा पंतप्रधानांनी घेतल्यानंतर या नाटय़ाचे आणखी पडसाद उमटणे बाकी आहे. आयपीएलचे कमिशनर ललित मोदी यांचे दिवसही भरले असून, त्यांची पदावरून हकालपट्टी होणार असल्याचे संकेत आहेत. बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मोदी यांना हटवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. मोदी यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे बीसीसीआय प्राप्तिकर खात्याच्या कचाटय़ात सापडली, असा आरोप त्यांच्यावर आहे. गेल्या काही दिवसांत मोदी यांच्याविरोधात वातावरण चांगलेच तापले आहे. कोची आयपीएलच्या मालकीचे विवरण त्यांनीच सोशल नेटवर्किंग साईटवर दिले व त्यात सुनंदा पुष्कर यांच्या नावाचाही उल्लेख होता. त्यानंतर सगळे वादळ उठले व काँग्रेस विरोधकांना आयते कोलित मिळाले होते, पण थरुर यांचा राजीनामा घेऊन पंतप्रधानांनी विरोधकांची हवा काढून घेतली. ललित मोदी यांनी त्यांचे कुटुंबीय व मित्र यांना आयपीएल संघांमध्ये शेअर्स मिळवून दिले असल्याचेही बोलले जाते.
बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले, की मोदी यांची हकालपट्टी अटळ आहे. कारण बीसीसीआयचे पदाधिकारी ललित मोदी यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. बीसीसीआयच्या इतिहासात आतापर्यंत कधीच कार्यालयांवर प्राप्तिकर पथकांचे छापे पडले नव्हते. छापे पडल्याने बीसीसीआयची प्रतिमा खालावली व आयपीएल ब्रँडलाही हादरा बसला आहे. दुबई येथे आयसीसी कार्यकारी मंडळाच्या बैठकीसाठी आलेल्या ललित मोदी यांना बीसीसीआयमध्ये असलेला पाठिंबा झपाटय़ाने कमी होत चालला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी ललित मोदी यांना वाचवण्याचे प्रयत्न चालवले असले तरी दुसरा कुणीही मातब्बर पदाधिकारी मोदी यांच्या पाठिशी नाही. थरुर यांचा राजीनामा घेतल्यानंतर आता केंद्र सरकारही ललित मोदी यांना लक्ष्य बनवल्याशिवाय राहणार नाही व यात बीसीसीआय आगीशी खेळ करू शकणार नाही. बीसीसीआयचे प्रवक्ते राजीव शुक्ला यांनी सांगितले, की या विषयावर चर्चा केली जाईल. मोदी यांचे वर्चस्व कमी केले जाईल हे केवळ प्रसारमाध्यमांचे आडाखे आहेत. प्रशासकीय मंडळाच्या बैठकीत मोदी यांच्यासह सर्व मुद्दय़ांवर चर्चा होईल. दरम्यान, बीसीसीआयच्या कार्यकारी समितीची बैठक २ मे पर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. प्रशासकीय मंडळाची बैठक मात्र आयपीएलच्या अंतिम सामन्यानंतर म्हणजे २६ एप्रिलला होण्याची शक्यता आहे. मोदी यांच्या विरोधकांनी अगोदरच त्यांना डच्चू देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. प्रशासकीय मंडळाच्या बैठकीत त्यांना पदावरून दूर करण्यासाठी ठराव मांडला जाणार असल्याचे अनधिकृत वृत्त आहे.

fly