बुधवार, 12 मई 2010

क्षयरोग

एखाद्या गोष्टीचा क्षय होणे म्हणजे नाश होणे असे आपण समजतो. तसेच क्षयरोगाचा संसर्ग आपल्या शरीरातील निरनिराळय़ा अवयवांना झाल्यास त्यातील पेशींचा नाश होऊन रसग्रंथी व आवरण यांचा क्षय होतो. क्षय हा आजार संसर्गजन्य असून पूर्वी तो गुरांकडून संसर्गित होतो असे समजले जात असे. पूर्वीच्या काळी क्षय हा जीवघेणा आजार होता. त्यास राजयक्ष्मा असे संबोधिले जायचे. तसेच क्षय हा दीर्घकाळ चालणारा आजार असून फक्त फुफ्फुसाचा रोग समजला जायचा. परंतु तो इतर अवयवांनासुद्धा बाधा करू शकतो.
विश्वस्वास्थ्य संघटनेच्या माहितीनुसार जगातील एकतृतीयांश लोकांना क्षयरोगाच्या जंतूंशी सामना करावा लागतो. त्यातील आठ लाख लोकांना क्षयरोगाची बाधा होते व दोन लाख लोक क्षयरोगाने मरतात. आफ्रिकेमध्ये ३५६ प्रतिलाख लोकांना क्षयरोगाचा संसर्ग होतो. अमेरिकेमध्ये हे प्रमाण ४१ प्रतिलाख असे आहे. जगामध्ये क्षयरोगाने मरणाऱ्या माणसांमध्ये जननक्षम स्त्रिया व एड्स झालेल्या लोकांचे प्रमाण अधिक आहे. अप्रगत देशांमध्ये क्षयरोगाची बाधा होणाऱ्या लोकांचे प्रमाण भारतात सर्वात जास्त आहे. आफ्रिकेमध्ये पौगंडावस्थेतील व तरुण लोकांना क्षयरोगाची बाधा जास्त प्रमाणात होते. अमेरिकेत वृद्ध व प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना क्षयरोगाची बाधा जास्त प्रमाणात होते. २० सिगारेट्स प्रतिदिवस ओढणाऱ्या लोकांना बाधा होण्याची शक्यता दोन ते तीनपट जास्त वाढते. शाकाहारी जेवणाऱ्या मनुष्याला जर लोह, व्हिटॅमिन बी १२ व व्हिटॅमिन डी यांची कमतरता असेल तर क्षयरोग व्हायचा धोका ८.५ पटींनी वाढतो. त्यामुळे कित्येक अप्रगत राष्ट्रांमध्ये कुपोषण व प्रतिकारशक्ती कमी असलेल्या माणसांमध्ये क्षयरोगाच्या संसर्गाची वाढ दिसून येते.
फार प्राचीन काळापासून क्षयरोगाचे अस्तित्व माणसांत आढळून आले आहे. ७००० बीसी पूर्व सापडलेल्या हाडांमध्ये क्षयरोगाचे अस्तित्व दिसून आले आहे. २०००-२४०० बी.सी.मधल्या इजिप्शियन ममीजच्या मणक्यांमध्ये क्षयरोगाचा क्षय झालेला दिसतो. हिप्पोक्रेट्सने हा आजार फथीसिस (ग्रीक शब्द) नावाखाली ओळखून त्यात रक्ताची उलटी व ताप येऊन माणसे मृत्युमुखी पडतात असे नोंदविले आहे. क्षयरोग हा मनुष्याला खातो व या आजारात रक्तशोषण होते असा समज लोकांमध्ये होता. १८८२ मध्ये रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने क्षयरोग हा सस्तन प्राण्यांमध्ये मायकोबॅक्टेरियम टय़ुबरकल जिवाणूमुळे होतो असा शोध लावला. १८९५ मध्ये जोहन या शास्त्रज्ञाने गुरांमध्ये होणाऱ्या क्षयरोगाचे जिवाणू शोधून काढले व त्यास मायकोबॅक्टेरियम पॅराटय़ुबरकल असे नाव दिले.
क्षयरोगाचे जिवाणू बुरशींच्या तंतूसारखे असून झील नेल्सन पद्धतीने रंजनक्रिया केल्यावर ते आम्लजित असून सूक्ष्मदर्शक यंत्राखाली लाल रंगाचे दिसतात. आम्लाने यांच्या रंजक गुणांवर परिणाम होत नसल्याने त्यांना आम्लस्थिर असे म्हणतात. मायकोबॅक्टेरियम जिवाणूंच्या प्रजातीमध्ये ८० प्रकारच्या पोटजाती आढळतात. ज्यापैकी काहीच पोटजातींमुळे मनुष्यप्राणी व इतर प्राण्यांना क्षयरोग व कुष्ठरोग होतो. मायकोबॅक्टेरियम टय़ुबरक्युलॉसिस व मायकोबॅक्टेरियम अ‍ॅफ्रिकॅनममुळे मनुष्याला क्षयरोग होतो. मायकोबॅक्टेरियम बोव्हिसमुळे गुरांना क्षयरोग होतो.
क्षयरोगाच्या निदानाप्रमाणे व लक्षणांवरून त्याचे सहा प्रकारांत चिकित्साविषयक वर्गीकरण केले जाते. १) या प्रकारात व्यक्ती ही क्षयरोग्याच्या संपर्कात आलेली नसते व टय़ुबरक्युलीन स्कीन टेस्ट नकारात्मक असते. २) यामध्ये मनुष्याला क्षयाचा संपर्क झालेला असतो. परंतु संसर्ग झालेला नसतो. टय़ुबरक्युलीन परीक्षाही नकारात्मक असते. ३) यात क्षयाचा संसर्ग झालेला असून रोगाची लक्षणे नसतात, पण टय़ुबरक्युलीन परीक्षा सकारात्मक असते. तसेच चिकित्साविषयक, जिवाणूविषयक व क्ष-किरण या तपासण्या नकारात्मक असतात. ४) यामध्ये क्षयाची बाधा झालेली असून रोगाची सर्व लक्षणे दिसू लागतात. चिकित्साविषयक परीक्षा, जिवाणूसंवर्धन परीक्षा, क्षकिरण परीक्षा सकारात्मक असतात. ५) या प्रकारात क्षयाच्या बाधेची लक्षणे नसतात, परंतु क्षय संसर्गाचा इतिहास असतो. टय़ुबरक्युलीन परीक्षा सकारात्मक असते. जिवाणूविषयक परीक्षा नकारात्मक असते. क्ष-किरण तपासणीमध्ये अनियमितपणा दिसतो, परंतु क्षयाच्या बाधेचे पुरावे दिसत नाहीत. ६) यात क्षयाच्या संसर्गाची अनिश्चिती असते.
क्षयाचा संसर्ग व बाधा झालेल्या ७५ टक्के लोकांना फुफ्फुसक्षय (पलमोनरी टीबी) होतो. यामध्ये फुफ्फुसे श्वासवाहिन्या, रसग्रंथी व फुफ्फुसावरण यांना संसर्ग होऊन क्षय होतो. २५ टक्के लोकांना फुफ्फुसाशिवाय इतर अवयवांना संसर्ग होतो. मेंदूला संसर्ग झाल्यास मस्तिष्क आवरणदाह होतो. लसिकापेशींना संसर्ग झाल्यास लसिकाद्रव्य वाहून नेणाऱ्या व्यवस्थेमध्ये गाठी निर्माण होतात. त्याची सुरुवात मानेमधील गाठी निर्माण होण्यापासून होते. लहान आतडे, मूत्रपिंड व जननेंद्रियाच्या ठिकाणी क्षयाचा संसर्ग होऊ शकतो. रक्तावाटे या जिवाणूंनी प्रवेश केल्यावर हाडे व हाडांचे सांधे यांना क्षयरोग होतो. काही वेळेस फुफ्फुस व इतर अवयवांचा संसर्ग एकाच वेळी दिसून येतो. क्षय होण्याचे प्राथमिक कारण असलेल्या मायकोबॅक्टेरियम टय़ुबरक्युलॅसिस या जिवाणूंची वाढ फार धिमी असते. एका जिवाणूची वाढ होण्यास १६-२० तास लागतात. इतर जिवाणू एका तासात वाढतात. क्षयाच्या जिवाणूच्या पेशीआवरणामध्ये फॉस्फोलिपिडचे आवरण नसल्यामुळे त्याला ग्रॅम पॉझिटिव्ह जिवाणू म्हणतात. ग्रॅम सुषकरंजनक्रियेमध्ये हे जिवाणू फार कमी प्रमाणात रंजकद्रव्ये शोषून घेतात, कारण त्याच्या पेशीआवरणावर मेदाम्ले व मायकोलिक आम्लाचे आवरण असते.
क्षयबाधा झालेल्या माणसांच्या थुंकीतील जंतू हे संसर्ग पसरविण्यास कारणीभूत ठरतात. धुळीतून सुकलेल्या थुंकीतून, रुग्णाच्या खोकल्यातील थुंकीचे तसेच दूध, मांस, लोणी यांसारख्या दूषित अन्नातून क्षयाचे जंतू माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. हे क्षयजंतू श्वासावाटे, रक्तामधून व रसवाहिन्यांमधून श्वासनलिकांच्या रसग्रंथीत शिरतात आणि तेथून फुफ्फुसात शिरतात.
फुफ्फुसाच्या क्षयाच्या तीन अवस्था असतात. पहिल्या अवस्थेमध्ये रुग्णाला कोरडा खोकला येतो व संध्याकाळी बारीक ज्वर असतो. अशक्तपणा येऊन भूक लागत नाही व निरुत्साह वाटतो. फुफ्फुसात रक्तसंचय झाल्यामुळे रक्तमिश्रित कफ पडतो. या आजाराच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये स्पंजाप्रमाणे छिद्रयुक्त मऊ फुफ्फुसे कठीण बनतात. पंडुरोग वाढतो व कफाचे बेडके पडायला सुरुवात होते. रात्री खूप घाम येतो. तिसऱ्या अवस्थेमध्ये फुफ्फुसातील छिद्रे नाहीशी होऊन पोकळय़ा निर्माण होतात. खोकल्याचे व तापाचे प्रमाण वाढते. खोकल्यातून पिवळे बेडके पडून श्वासाला दरुगधी येते. बेडक्यातून थोडे थोडे रक्त पडू लागते. छातीतील धडधड वाढून हाडांचा सापळा होतो. या सर्व अवस्था येण्यास १ ते २ वर्षे किंवा अधिक काळ लागू शकतो. यावर उपाय न केल्यास आजार पचनसंस्थेपर्यंत पोहोचतो. छोटय़ा आतडय़ाला क्षयरोगाची बाधा झाल्यास आतील आवरणातून जिवाणूंचा प्रवेश होतो. अनेक व्रण तयार होऊन आवरणांना चुण्या पडून आतडय़ाचा परिघ कमी होऊन अडथळा निर्माण होतो. रुग्णास अपचन, उलटय़ा, पोट फुगणे इ. लक्षणे दिसू लागतात. आमाशयात ताठरपणा येऊन पोट दुखते. लसिकाग्रंथी बाधित झाल्यावर त्यांना सूज येऊन त्या वितळतात. त्यास आतडी चिकटून गोळा तयार होऊन हा गोळा पोटात फिरतो असे रुग्णास वाटते. उदरावेष्टनाच्या क्षयरोगात गाठी तयार होऊन काही वेळेस जलोदर होतो. लहान आतडय़ास क्षयरोग झाल्यास मलावरोध होतो तर मोठय़ा आतडय़ास क्षयरोग झाल्यास अतिसार होतो. हाडांच्या क्षयरोगामध्ये पूयुक्त हाडांचे व्रण तयार होतात व विकार जर मणक्यांपर्यंत पोहोचल्यास कणा वक्राकार होऊन रुग्ण सरळ उभा राहू शकत नाही.
एखाद्या मनुष्याला मायकोबॅक्टेरियम टय़ुबरक्युलॅसिस या जिवाणूंचा संसर्ग झाला आहे याचे निदान करण्यासाठी रुग्णाच्या थुंकीतील थेंब पसरण काचपट्टीवर घेऊन त्यावर झील नेल्सन रंजनक्रिया केल्यावर सूक्ष्मदर्शकाखाली आम्लजित दंडाणू लाल रंगाचे दिसतात. जर असे जिवाणू काचपट्टीवर आढळले नाहीत तर पुढे क्ष-किरण तपासणी आणि टय़ुबरक्युलीन स्कीन टेस्टमुळे चिकित्सा निदान करता येते. क्षयरोगाच्या जिवाणूंचे संवर्धन होण्यास ४ ते १२ आठवडे लागत असल्यामुळे लवकर निदान करण्यासाठी लसशास्त्रीय परीक्षा व स्कीन परीक्षेवर निर्भर राहावे लागते. जर क्षयरोग प्रतिकारशक्तीचे इंजेक्शन दिले असेल किंवा आधी कधीतरी क्षय झाला असेल तर टय़ुबरक्युलीन स्कीन टेस्टचे निदान चुकीचे येऊ शकते. सारकायडॉसिस, हॉजकिन लिम्फोमा कुपोषण या रोगावस्थेत स्कीन परीक्षा निदान चुकीचे येऊ शकते. क्षयाच्या जिवाणूंचे संवर्धन हे थुंकी, मूत्र, चैतजल यांपासून होऊ शकते. त्यासाठी द्रवरूप व घनरूप अशी दोन्ही प्रकारची माध्यमे वापरली जातात. जिवाणूसंवर्धन करण्यासाठी थुंकी किंवा कफाच्या बेडक्यापासून जिवाणूंचे समकेंद्रीकरण व इतर जिवाणूंचे दूषितीकरण नाहीसे केले जाते. या पद्धतीला पेट्रॉप्स मेथड असे संबोधिले जाते. या पद्धतीमध्ये थुंकी किंवा कफाच्या घनतेएवढे ४ टक्के सोडियम हायड्रॉक्साईड टाकून बाटली. ३६ अंश सेल्सिअसला ३० मिनिटे उबवून ते मिश्रण द्रवरूप दिसेपर्यंत हलविले जाते. सोडियम हायड्रॉक्साईडमुळे इतर जिवाणू मरतात. नंतर हे मिश्रण ३००० १स्र्े ला संकेंद्रित करून त्यात ८ टक्के हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड घालून उदासीनीकरण केले जाते. त्यातील पातळ वरचा ऊध्र्वभाग फेकून देऊन खालील संकेंद्रित भाग जिवाणू संवर्धनासाठी वापरला जातो. क्षयाचे दंडाणू हे अंडे, अ‍ॅस्पॅरॅजिन, बटाटा, लसद्रव्य मटणाचे अर्क असलेल्या माध्यमामध्येच फक्त वाढतात. बहुतेक प्रयोगशाळांमध्ये एलजे माध्यम संवर्धनासाठी वापरतात. यामध्ये साकळवलेले अंडे, विशिष्ट क्षार, ग्लिसेरॉल बटाटय़ाचे पीठ व अ‍ॅस्फरॅजिन असते. काही माध्यमांमध्ये पायरुव्हिक अ‍ॅसिड घातले जाते. तसेच मॅलॅकाईट ग्रीन हा प्रतिबंधित साधन म्हणून वापरला जातो. काही वेळेस अगार आधारित माध्यमांमध्ये विशिष्ट क्षार, मूलद्रव्ये, ओलिक अ‍ॅसिड, अल्ब्युमिन, कॅटलिज, ग्लिसेरॉल व डेक्सट्रोज घातले जाते. यास मिडलब्रुक ७ एच १० माध्यम म्हणतात. या माध्यमात जिवाणूसंवर्धन १० ते १२ दिवसांत होते. एलजे माध्यमामध्ये जिवाणूसंवर्धन व्हायला १८ ते २४ दिवस लागतात. असे हे संवर्धित मायकोबॅक्टेरियम जिवाणू ओळखण्यासाठी जीवरासायनिक परीक्षा केल्या जातात. ज्यामध्ये नियासिन परीक्षा अ‍ॅरिल सल्फेट परीक्षा कॅटॅलेज परीक्षा या अंतर्भूत होतात. नियमित परीक्षेमुळे मायकोबॅक्टेरियम टय़ुबरक्युलॉसिसचे निदान लवकर होऊ शकते. लॉवेनसन जॉन्सन (एलजे) माध्यमामध्ये वाढलेले मायकोबॅक्टेरियम टय़ुबरल्युलॉसिसचे जिवाणूंच्या वसाहती कोरडय़ा खडबडीत आणि पिवळसर पांढऱ्या दिसतात. १२ आठवडय़ांच्या गिनिपिग प्राण्याला हे जिवाणूसंवर्धन झालेले द्रवरूप टोचले तर ३ ते ४ आठवडय़ांनी प्राण्यांचे वजन घटते व टय़ुबरक्युलीन स्कीन टेस्ट सकारात्मक असते.
क्षयरोग निदानासाठी जी टय़ुबरक्युलीन स्कीन टेस्ट केली जाते, त्यामध्ये कातडीला इंजेक्शन टोचून त्याचे परिणाम ४८ ते ७२ तासांनी बधतात. १९४१ मध्ये सिबर्ट या शास्त्रज्ञाने कार्यक्षम असे क्षयप्रथीन जिवाणूसंवर्धन केलेल्या गाळून  केलेल्या द्रवामध्ये ५० टक्के अमोनियम सल्फेट घालून घनरूप शुद्ध साधित वेगळे केले. हे क्षयप्रथीन आता स्कीन स्टेटसाठी वापरले जाते. या प्रथिनाचे वेगवेगळय़ा प्रकारचे औषधप्रमाण वापरतात, ज्यास टय़ुबरक्युलिन युनिट असे म्हणतात. नेहमी स्कीन टेस्टसाठी ५ टय़ुबरक्युलिन युनिट हा डोस वापरतात. वरील सर्व प्रकारांमुळे निदान झाले नाही तर पीसीआर तंत्रज्ञान वापरून निदान केले जाते. ज्यामध्ये जिवाणूंच्या डीएनएचा अभ्यास करून क्षयप्रथिनाशी निगडित इंटरफेरॉन गॅमाचा अभ्यास केला जातो.
क्षयरोगाचा समूळ नाश करण्यासाठी प्रतिजैविके द्यावी लागतात. यामध्ये रिफामसिन व आयसोनियाझिड ही औषधे नेहमी दिली जातात. क्षयाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी औषधोपचार बरेच दिवस द्यावा लागतो. अतिशय सक्रिय असणाऱ्या क्षयामध्ये अनेक प्रकारची प्रतिजैविके एकाच वेळी द्यावी लागतात. क्षयाची औषधे ही तीव्र स्वरूपाची असून त्याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. काही वेळेस यकृतात बिघाड होऊन रुग्णास इस्पितळात ठेवावे लागते. क्षयाच्या रुग्णास औषधोपचार ठराविक काळापर्यंत न दिल्यास जिवाणू त्या औषधांना दाद देईनासे होतात व रोग बळावू शकतो. याकरिता डॉट्स नावाची औषधोपचार पद्धती १९७० मध्ये मद्रास येथे अस्तित्वात आली व आता सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये ती उपलब्ध असून गोरगरीबसुद्धा त्याचा लाभ घेऊ शकतात.
आयुर्वेदामध्ये या आजारावर अनेक औषधे उपलब्ध आहेत. कोरडा खोकला व तापासाठी सुवर्णमालती रस १२५ ग्रॅम, अमृतारिष्ट १० मिली व प्रवाळपिठी २५० ग्रॅम द्यावे. थुंकीतून रक्त पडत असल्यास स्वर्णमक्षिकाभस्म ५० ग्रॅम, वासावलेह ५ ग्रॅम व प्रवाळपिष्ठी १२५ ग्रॅम द्यावे. वरील औषधे बकरीच्या दुधातून द्यावीत. तसेच द्राक्षासव, च्यवनप्राश, सीतोपलादीचूर्ण द्यावे. राजमृगांकरस, महाभृगांकरस, सुवर्णभूपती रस, जयमंगलरस इ. औषधे वैद्यांच्या सल्ल्यानुसार द्यावीत. क्षय झालेल्या रुग्णाला दूध व फळांचे रस द्यावेत. उकळून थंड केलेले पाणी व बकरीचे दूध द्यावे. मनुका, बदाम, दूध, लोणी, जव, गहू, मूगडाळ व फळे यांचा आहारात समावेश असावा. दही, ताक, पिकलेले केळे, पेरू देऊ नये. तेलकट, खारट, आंबट पदार्थ कमी खावेत. शरीराला विश्रांती देऊन मन प्रसन्न व शरीर स्वच्छ ठेवावे. थकवा येणारे काम करू नये.
असा हा क्षयरोग होऊ नये म्हणून करावयाचे उपाय दोन प्रकारे करावे लागतात. पहिल्या प्रकारात क्षयरोग झालेल्या माणसाच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधून त्यांचे क्षयरोगाच्या बाधेचे निदान करून योग्य औषधोपचार करावे लागतात. दुसऱ्या प्रकारात लहानपणीच बालकांना प्रतिक्षय लस टोचणे, दुर्दैवाने मोठय़ा माणसांसाठी अशी लस उपलब्ध नाही. बऱ्याच देशांमध्ये बॅसिलस कामेट गुवारिन (बीसीजी) ही लस लहानपणी टोचली जाते. ही लस लॉन्समधील पाश्चर संस्थेमध्ये १९०५ ते १९२१ मध्ये विकसित केली गेली. बीसीजी लस ही अमेरिकेत काही लहान मुलांना ज्यांची स्कीन टेस्ट नकारात्मक असून ते क्षयरोगाच्या संपर्कात आहेत अशांना दिली जाते. तसेच स्वास्थ्यकार्यातील कामगार जे क्षयरोग्यांच्या संपर्कात सतत येतात अशांनाच दिली जाते.
बीसीजी लसीमुळे लहान मुलांना होणाऱ्या वेगवेगळय़ा प्रकारच्या क्षयरोगापासून संरक्षण होते, परंतु मोठय़ा वयात होणाऱ्या फुफ्फुसाच्या क्षयापासून संरक्षण होईलच असे सांगता येत नाही. यामुळे क्षयरोगाच्या इतर अनेक लसी विकसित केल्या गेल्या. २००४ मध्ये अमेरिकेतील राष्ट्रीय रोगप्रवणता व सांसर्गिक रोग संस्थेमध्ये रिकॉम्बिनंट क्षयरोग लस तयार केली गेली. २००५मध्ये एक लस डीएनए टीबी नावाने विकसित होऊन त्याचे प्रयोग उंदरावर केलेले आहेत. ६ ते ७ वर्षांनी ती माणसासाठी उपलब्ध होईल. ऑक्सफर्ड विद्यापीठाने आफ्रिकेमध्ये संशोधन करून जनुकीय परिवर्तनाची पद्धत वापरून व्हॅक्सिनिया व्हायरस लस तयार केली आहे. दोन रिकॉम्बिनंट प्रथिने आणि अडेनोव्हायरस वापरून नवीन संयुग लस तयार झाली आहे. मानवावर याचे मोठय़ा प्रमाणावर प्रयोग व्हायचे आहेत. बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने क्षयरोगाच्या लसीकरता अनुदान दिले आहे. त्यातून क्षयरोगाच्या लसीकरता चिकित्साविषयक चाचण्या चालू आहेत. अशा प्रकारे सूर्यप्रकाश असणाऱ्या जागेत राहणे व स्वच्छ, निरोगी वातावरण घरात ठेवणे हे आपल्या हातात असते, ज्यामुळे क्षयरोगाचे जंतू आपल्याकडे फिरकणारसुद्धा नाहीत. प्राणायाम केल्याने शुद्ध हवा शरीरात खेळती राहते. पौष्टिक आहार घेऊन व्यसने टाळल्यास क्षयरोगासारखा यक्षप्रश्न सहज सोडविता येईल.

डेव्हिड कॅमेरून ब्रिटनच्या पंतप्रधानपदी


४३ वर्षीय कॅमेरून हे ब्रिटनच्या इतिहासातील सर्वांत लहान वयाचे पंतप्रधान आहेत. तसेच, त्यांच्या नियुक्तीने तब्बल १३ वर्षांनंतर मजूर पक्ष पायउतार झाले आहे.

डेव्हिड कॅमेरून यांच्या रूपाने ब्रिटनला नवे पंतप्रधान मिळाले असून त्यांच्या नेतृत्वाखाली हुजूर पक्षाचे आघाडी सरकार स्थापन होत आहे. तर, लिबरल डेमॉक्रेटिक नेते निक क्‍लेन यांची उपपंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे.


सलग पंधरा वर्षांच्या कार्यकाळामध्ये, इराकमधील सैनिकी कारवाई, ढासळलेली अर्थव्यवस्था आणि वाढते परकी स्थलांतर यांमुळे मजूर पक्षाविरोधात असंतोष होता. संसदेच्या 649 जागांसाठी चुरशीने मतदान झाले. रात्रीपर्यंत जाहीर झालेल्या 621 जागांपैकी हुजूर पक्षाला 291, तर मजूर पक्षाला 251 जागा मिळाल्या. सर्वांचे लक्ष असणाऱ्या निक क्‍लेग यांच्या लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाला 52 जागाच मिळाल्या. या पक्षाला 100 पेक्षा अधिक जागा मिळतील, असा अंदाज होता.

fly