शनिवार, 8 अप्रैल 2023

🌹 देवासमोर दिवा 🌹

 महाभारतातील व्याख्येनुसार- " जातकर्मादी संस्कारांनी जो सुसंस्कृत झाला आहे, जो शुद्ध व वेदाध्ययन संपन्न आहे, जो षट्कर्मे करतो, आचरण शुद्ध ठेवतो, यज्ञ करून उरलेले अन्न जो भक्षण करतो, जो गुरुला प्रिय असतो ; नियमशील, सत्यनिष्ठ, दानशील, अद्रोही, दयाळू, सलज्ज, दुष्कृत्यांची घृणा करणारा व तपस्वी असतो, त्यालाच ब्राह्मण असे म्हणतात." (म.भा. शांतिपर्व १८९.२-४) 

ब्राह्मण म्हणजे परम तेज व तप होय. ब्राह्मणांच्या नमस्कारामुळेच सूर्य दिव्य लोकात विराजतो..." (म. भा. वनपर्व, ३०.३.१६), "जे कृद्ध झाले असता अन्य स्वर्गादि लोक व लोकपाल निर्माण करू शकतात, जे देवांनाही शाप देवून मनुष्य योनीत जन्म घ्यायला लावतात, ज्याचा आश्रय धरून लोक व देव नेहमी आपल्या जागी स्थिर राहतात....." (मनुस्मृती, ९.३१५-१६), ब्राह्मण हा राजापेक्षा श्रेष्ठ असून राजाची त्याच्यावर सत्ता चालत नाही असे गौतमही (९.१) म्हणतो.  त्यांच्यावर  कठोर बंधनेही घातली. ती अशी:

ब्राह्मणाने सतत वेदाध्ययन करावे, एका दिवसाच्या गरजेपेक्षा जास्त धनसंचय करू नये, शस्त्रे हाते धरणे तर दुरच, त्याचे दर्शनही घेऊ नये, कसलाही व्यापार करू नये, राजद्रोह केला तर त्याला जलसमाधी द्यावी, गुरुपत्नीगमन-सुरापान असे गुन्हे केले तर मस्तकावर डाग देवून देशाबाहेर हाकलावे इ.

ब्राह्मण ही वैदिक हिंदू धर्मातील चातुर्वर्णांपैकी एक वर्ण व जात आहे.

यास्क ऋषीच्या म्हणण्याप्रमाणे,

जन्मना जायते शूद्रः

संस्कारात् भवेत् द्विजः।

वेद पाठात् भवेत् विप्रः

ब्रह्म जानातीति ब्राह्मणः।।

आणखी,

तत्र मित्र न वस्तव्यं यत्र नास्ति चतुष्टयं । ऋणदाता च वैद्यश्च श्रोत्रियः सजला नदी ॥

मराठी भाषांतर - अरे मित्रा - ऋणदाता म्हणजे (अडचणीच्या वेळी) कर्ज देणारा, (आजारी पडल्यावर औषध देणारा) वैद्य, वेद पारंगत ब्राह्मण (म्हणजे श्रोत्रिय) आणि भरपूर पाणी असलेली नदी जिथे हे चार उपलब्ध नसतील तिथे वस्ती करू नकोस. (किंवा करू नये)

जन्मना ब्राह्मणो ज्ञेयः | संस्कारै: द्विज उच्चते ||

विद्यया याति विप्रत्वम् | त्रिभि: श्रोत्रिय उच्चते ||१||

आणखी,

क्रियावन्तः श्रोत्रिया ब्रह्मनिष्ठा: | स्वयं जुह्वत एकर्षि श्रद्धयन्तः | तेषामेवैता ब्रह्मविद्यां वदेत | शिरोव्रतं विधिवद्यैस्तु चीर्णम् ||२||

 मुण्डकोपनिषद

ब्राह्मणांचा इतिहास प्राचीन काळतील वैदिक धर्मापासून सुरू होतो. मनुस्मृतीमध्ये

आर्यावर्त हे वैदिक लोकांचे स्थान होते अशी नोंद आहे. ब्राह्मणांच्या दिनचर्येचे वेद हे प्राथमिक स्रोत आहेत. ब्राह्मणांतील सर्व संप्रदाय वेदांपासून प्रेरणा घेतात. असे मानण्यात येते की वेद हे अपौरुषेय आणि अनादि असून ते अंतिम सत्यांवर प्रकाश टाकतात. वेदांना श्रुती असे संबोधले जाते कारण परंपरेनुसार पाठांतराने वेद जतन केले गेले. श्रुतींमध्ये चार वेदांशिवाय ब्राह्मणनामक ग्रंथही आहेत.

गोत्र हे एका पुरुष-पूर्वजापासून सुरू झालेल्या आणि अखंडितपणे चालू असलेल्या कुळाच्या उगमाचे नाव असते. पाणिनीने संस्कृतमध्ये गोत्राचे वर्णन "अपत्यम् पौत्रप्रभृती गोत्रम्" असे केले आहे. म्हणजे "मुलाच्या मुलापासून सुरू झालेल्या वंशावळीचा उगम". गोत्रे ही बहुधा ऋषींची नावे असतात. उदा. कश्यप गोत्र म्हणजे कश्यप ऋषींपासून सुरू झालेल्या वंशातील लोक होत. बौधायनसूत्रानुसार अगस्त्य , कश्यप , गौतम ,जमदग्नी , भारद्वाज , वसिष्ठ आणि

विश्वामित्र , या ८ ऋषींपासून ८ प्राथमिक गोत्रे तयार होतात. 

गोत्रांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. आश्वलायन-श्रौतसूत्रानुसार वसिष्ठ गणामध्ये चार उपविभाग आहेत: उपमन्यू, कुंदिन, पराशर आणि वसिष्ठ. या चारांमध्ये पुन्हा उप-उपविभाग आहेत. ज्यांना गोत्र असे म्हणातात. म्हणजे वर्गीकरण प्रथम गणांत, नंतर पक्षांत व नंतर गोत्रांत होते. आजही भृगू आणि अंगिरस गण अस्तित्वात आहेत. बौधायनानुसार मुख्य ८ गोत्रांचे पक्षांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. उपमन्यूंची प्रवरे इंद्रप्रमाद भारद्वसू व वसिष्ठ; पराशर गोत्रातील प्रवरे पाराशर्य, वसिष्ठ व शाक्त्य; कुंदिन गोत्राची कौंडिण्य, मैत्रात्रवरुण व वसिष्ठ ही होत.

प्रवरे दोन प्रकारची असतात: १ शिष्य-प्रशिष्य-ऋषी-परंपरा आणि २ पुत्रपरंपरा.

धर्म, सांस्कृतिक परंपरा, आचार व वैदिक विचार यांच्यातील विविधतेमुळे ब्राह्मणांच्यात पुन्हा पोटजाती निर्माण झाल्या. वेदकाळातील ब्राह्मण वेगवेगळ्या वेदाच्या शिकवणीनुसार वेगळे झाले. एकाच शाखेतील विद्वान ब्राह्मणांच्या नेतृत्वाखाली विविध पंथ निर्माण झाले. या विद्वान ऋषींनी दिलेल्या शिकवणीला सूत्रे असे म्हणतात. प्रत्येक वेदाची स्वतःची सूत्रे आहेत. सामाजिक, नैतिक व कायदे यांच्या सूत्रांना धर्मसूत्रे, विविध धार्मिक विधींच्या सूत्रांना श्रौतसूत्रे तर घरगुती विधींशी संबंधित सूत्रांना गृह्यसूत्रे असे म्हणतात.

अनेक ब्राह्मणांनी विविध नियम तयार केले. उदा: अंगिरस, अत्रि, आपस्तंब, उषानस्, कात्यायन, गौतम, दक्ष, पराशर, बृहस्पती, बौधायन, मनू, यम, याज्ञवल्क्य, वसिष्ठ, विष्णू, व्यास, लिखित, शंख, शतताप, संवर्त आणि हरित. या २१ ऋषींनी स्मृतिलेखनाची सुरुवात केली. यातील आपस्तंब, गौतम, बौधायन आणि वसिष्ठ यांच्या स्मृती सर्वांत जुन्या आहेत.

यास्काच्या निरुक्तात म्हटले आहे की "ब्रह्मम् जानति इति ब्राह्मणम्". म्हणजेच ज्याला अंतिम सत्य माहिती आहे तो म्हणजे ब्राह्मण. परंपरेनुसार ब्राह्मण हिंदू समाजातील पुजारी आणि पंडित म्हणून काम करत आले आहेत. आज मात्र ब्राह्मण विविध क्षेत्रात गुंतलेले दिसतात व त्यांची धार्मिक परंपरा आणि संस्कृती ही दैनंदिन जीवनात फार कमी प्रमाणात वापरली जाते.

खालील श्लोकात ब्राह्मणांची सहा कर्तव्ये दिली आहेत.

शिकणे, शिकवणे, यज्ञयाग करणे, करवून घेणे, दान घेणे व दान देणे ही ब्राह्मणांची सहा कामे आहेत.

  🌹 देवासमोर दिवा 🌹


 

कोणत्याही पूजेची सुरुवात करण्यापूर्वीच सुरुवातीला एका बाजूला दिवा लावला जातो. पूजा करण्याचा घेतलेला संकल्प पूर्ण होईपर्यंत तेवत राहण्याचे, स्थिर राहण्याचे आवाहन अग्नी देवतेला केले जाते. यानंतर पूजा झाल्यानंतरही देवासमोर दिवा लावला जातो. 

आरती करतांना नीरांजनात फ़ुलवात किंवा वात लावून ते देवाच्या तोंडापासून पायापर्यंत ओवाळावे. वात पांढर्या स्वच्छ कापसाची असावी. ती तेलात भिजवू नये. शक्यतोपर्यंत तुपात भिजवावी. निरांनजासारख्या पात्रात दीप लावून तो ओवाळून झाल्यावर समईसारख्या उंच पात्रात ठेवण्याची व्यवस्था असावी. देवाच्या तोंडावर उजेड पडेल अशा ठिकाणी दीप ठेवावा. देवावर अंधार पडेल अशा ठिकाणी दीप ठेवू नये.

दीप लावताना दीपाने दीप लावू नये. काडीने दीप लावावा. दिव्याने दीप लावल्याने आणि विझल्यावर अर्धवट जळकट वातीची घाण सुटल्याने रोग व दारिद्र्य प्राप्त होते. जमिनीवर वात केव्हाही लावू नये. नीरांजनातून वात काढून ठेवू नये. अनेक वाती लावणे असल्यास विषम प्रमाणात म्हणजे १-३-५-७ अशा लावाव्यात. दीप लावताना त्यात वातीशिवाय थोडे तेल किंवा तेल घालावे.

तुळशीपाशी दिवा लावण्यापूर्वी अक्षतांचे आसन अर्थात दिव्याखाली अक्षता ठेवाव्या. त्यावर आपल्या इच्छेनुसार तेल किंवा तुपाचा दिवा लावावा. देवी लक्ष्मी अक्षतांचे आसन ग्रहण करते असे मानले आहे म्हणून अक्षता ठेवल्याने देवी विराजमान होते.

निरंजनात तुप व तेल कधीही एकत्र घालू नये कारण तूप हे सत्व तत्व व निर्गुण आहे व तेल हे रज तत्व व सगुण आहे . म्हणून हे दोन्ही एकत्र करता येत नाही . नाहीतर तम तत्व वाढेल .

द्यावी.आरती म्हणत असताना देवाला ओवाळताना तबक देवाभोवती घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकृती फिरवावे.आरती ओवाळताना ती देवाच्या डोक्यावरून ओवाळू नये.आरती झाल्यानंतर 'घालीन लोटांगण.' ही प्रार्थना म्हणावी.यानंतर ‘कर्पूरगौरं करुणावतारं’ हा मंत्र म्हणत कापूर-आरती करावी.  कापूर-आरती ग्रहण करावी, म्हणजे ज्योतीवर दोन्ही हातांचे तळवे धरून मग उजवा हात डोक्यावरून पुढून पाठी मानेपर्यंत फिरवावा. काही कारणास्तव कापूर-आरती केली नसल्यास तुपाच्या निरांजनाच्या ज्योतीवर हात धरून आरती ग्रहण करावी. देवाला शरणागत भावाने नमस्कार करावा.

 देवासमोर दिवा लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिथे स्थिर होते, अशी मान्यता आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावणे अत्यंत फायदेशीर मानले गेले आहे. शुद्ध तुपात वातावरणातील जंतू दूर करण्याची क्षमता असते. अशा तुपाचा जेव्हा अग्नीशी संबंध येतो; त्यावेळी वातावरण एकदम पवित्र होते. प्रदूषण दूर होते. दिवा लावल्याने संपूर्ण घराला त्याचा फायदा होतो.

दिवा लावताना दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी, याचेही काही नियम सांगण्यात आले आहेत. तेलाचा दिवा आपल्या उजव्या हाताला ठेवावा आणि  तुपाचा दिवा आपल्या डाव्या  हाताला असायला हवा. धनलाभासाठी दिव्याची वात उत्तर दिशेला ठेवावी. आपल्या घरामध्ये वारंवार कोणी आजारी पडत असल्यास दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवावी. या दोन्ही दिशा अत्यंत शुभ मानण्यात आल्या आहेत. पश्चिम दिशेला दिव्याची वात असल्यास आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. दक्षिण यमाची दिशा असल्याने दक्षिण दिशेला कधीही दिव्याची वात नसावी, असे सांगितले जाते.

देवासमोर लावलेला दिवा विझला किंवा दिवा लावताना विझला, तर तो अशुभ संकेत मानला जातो. मात्र, धर्मशास्त्रात याला कोणताही आधार नाही. त्यामुळे दिवा विझल्यास घाबरून जाता कामा नये. देवाची आणि दिव्याची क्षमायाचना करून तो पुन्हा प्रज्वलित करावा. मात्र, दिवा ओवाळताना तो चुकून खाली पडला, तर त्यासाठी दीपपतन नावाची शांत करावी लागते. ज्या ठिकाणी दिवा पडला, त्याच ठिकाणी ती शांत करावी, असे सांगितले जाते.

 🌹 दीप पतन शांती 🌹


 


आपल्या हातून तूपाचा / तेलाचा प्रज्वलीत दिवा पडून गेला तर दीपपतन शांत करावी. याला अद्भुत शांत असेही म्हणतात. दीपपतन झाल्यामुळे अनेकप्रकारची अरिष्ट येऊ शकतात म्हणून येणारी अरिष्ट संकट यांचा नाश होऊन आयुः , आरोग्य प्राप्तीसाठी व दीपपतन झाल्याने जे दोष निर्माण होतात त्यांच परिमार्जन होण्यासाठी दीपपतनशांत करावी. संकल्प करून गणेशपूजन करावे. ज्या ठिकाणी दिवा पडला असेल त्या ठिकाणी पंचगव्य , शुद्धपाणी प्रोक्षण करून थोड तूप , पायस (खीर), लाह्या, पिवळी मोहरी इ. पसरावे. पूर्व दिशेला तांदूळाचे अष्टदल करून त्यावरती विधिवत् कलश स्थापन करावा. कलशावरती वरूण , वैश्रवण व परिवार देवतांचे आवाहन पूजन केले जाते. काही ठिकाणी ग्रहमंडल देवतांचे आवाहन पूजन करतात. आवाहित देवतांच्या प्रितीकरिता हवन करून बलिदान पूर्णाहुती होते. अभिषेक करून यजमानांना आशीर्वाद देवून कार्यक्रम संपन्न होतो.

  🌹 पालाश विधी 🌹


 


ज्याच्या प्रेत किंवा अस्थि मुळींच मिळत नाहींत त्याचें पर्णशर विधीनें दहन करावें. ३६० कुशांनीं किंवा ३६० पळसाच्या समिधांनी प्रेत करावें. याप्रमाणें संख्या सांगितली आहे. भूमीवर कृष्णाजिन पसरुन त्या कृष्णाजिनावर एक शरसंज्ञक तृण दक्षिणायत ठेवून त्यावर पळसाचीं वृत्तें स्थापावीत. ती अशीः-- मस्तकावर ४०, मानेवर १०, प्रत्येक बाहूवर ५० एकूण शंभर; हाताचे बोटांवर १०, वक्षःस्थळावर २०, जठरावर ३०, शिश्नावर ४, अंडावर ३।३ मिळून ६, प्रत्येक मांडीवर ५० मिळून शंभर, जंघेपासून पायांचे तळव्यापर्यंत प्रत्येकास १५, एकूण ३०, पायाचे बोटांवर १०; याप्रमाणें ३६० दर्भानी किंवा पळसाच्या समिधांनी शरीर करुन तें लोंकरीच्या वस्त्रानें बांधून त्यास उदकमिश्र पीठ लिंपावे. शक्ति असल्यास नारळ इत्यादिकही घालावे. तें असें:-- 

मस्तकाचे ठिकाणी नारळ किंवा वाटोळा भोपळा; ललाटाचे ठिकाणी केळीचें पान; दांतांचे ठिकाणीं डाळिंबाच्या बिया, कानांचे ठिकाणी कंकण किंवा ब्रह्मपत्र, नेत्रांचे ठिकाणीं २ कवड्या; नासिकास्थानी तिलपुष्प, नाभिस्थानी कमल, स्तनांचे ठिकाणीं २ जांभळें, वातस्थानीं मनशीळ, पित्तस्थानीं हरताळ, कफस्थानीं समुद्रफेन, रुधिरस्थानीं मध, पुरीषस्थानी गोमय, मूत्रस्थानीं गोमूत्र, रेतस्थानीं पारा, वृषणस्थानीं २ वांगीं, शिश्र्नस्थानीं गाजर, केशस्थानी वनडुकराचे केश, अथवा वडाच्या पारंब्या, लोमस्थानीं लोकर; व मांसस्थानीं उडदाचे पिठाचा लेप करुन पंचगव्य व पंचामृत यांनीं सर्वत्र सिंचन करावें. नंतर ' पुनर्नोअसुं० असुनीते० ' या दोन ऋचा म्हणून प्राणाचा प्रवेश झाला अशी भावना करावी. अथवा ' यत्तेयमं ०' या सूक्तानें व ' शुक्रमसि०' या मंत्रानें पारा घालून ' अक्षीभ्यां०' या मंत्रानें शरीरास स्पर्श करावा. यानंतर शरीरास स्नान घालून चंदनाचा लेप करावा, व वस्त्र आणि यज्ञोपवीत परिधान करवून ' अयंसदेवदत्तः ' असें म्हणून स्पर्श करावा. ' इदंचास्योपासनं ०' असें म्हणून ध्यान करावें व यधाविधि दहनादिक करावें. या स्थळीं आहिताग्नीचा अस्थिदाह किंवा पर्णशर दाह असतां १० दिवस अशौच व अनाहिताग्नीचें ३ दिवस अशौच निर्णय जाणावा. बारा वर्षे इत्यादि कालपर्यंत वाट पाहिल्यावर पर्णशरदाह इत्यादि कर्म करणें असेल तर ३० कृच्छ्रें व ३ चांद्रायणें करुन करावें.

  🌹 चौदा रत्नें 🌹


 


 देव आणि दानव यानीं समुद्र्मंथन करून चौदा रत्नें अथवा मूल्यवान् ‌‍ वस्तु काढल्या त्या - 

१ लक्ष्मी , २ कौस्तुभ , ३ पारिजातक , ४ सुरा , ५ धन्वंतरी , ६ चंद्र , ७ कामधेनु , ८ ऐरावत , ९ रंभा ( आदि अप्सरा ), १० उच्चैःश्रव नामक सप्तमुखी अश्व ( हा श्चेतवर्ण व उन्नतकर्ण असा होता ), ११ कालकूट विष , १२ शाङ्र्ग धनुष्य , १३ पांचजन्य शंख व १४ अमृत होय . पंधरावें रत्न - दाता .


लक्ष्मीः कौस्तुभपारिजातकसुरा धन्वतरिश्चंद्रमाः

गावः कामदुघाः सुरेश्वरगजो रम्मादिर्देवाङ्गनाः ।

अश्वः सप्तमुखो विषं हरिधनुः शङ्खोऽमृतं चांबुधेः

रत्नानीह चतुर्दश प्रतिदिनं कुर्वन्तु वो मङ्र्लम् ‌ ॥ ( मंगलाष्टक ) 

-------------------------


प्रत्येक जातींतील श्रेष्ठं वस्तूला रत्न अशी संज्ञा आहे . अशी चौदा प्रकारचीं रत्ने पुराणांत वर्णिलीं आहेत तीं :- 

१ हत्ती , २ घोडा , ३ रथ , ४ स्त्री , ५ पुरुष , ६ कोश ( धन ), ७ पुषमाला , ८ वस्त्र , ९ वृक्षराजि , १० शक्ति , ११ पाश , १२ मणि , १३ छत्र व १४ विमान .


गजवाजिरथस्त्रीषु निधिमाल्यांवरद्रुमाः ।

शक्तिः पाशं मणिं छत्रं विमानानि चतुर्दश ॥ ( सु . )

जातौ यदुत्कृष्टं तद्रत्नमभिधीयते । ( मल्लिनाथ )

 🌹 शिवलिंग पूजनाचे फल 🌹


 


हिर्‍याच्या लिंगाचे पूजन केल्याने आयुष्य वाढते. मौक्तिक लिंग पूजनाने रोगनाश होतो. वैडूर्यमण्याच्या लिंगपूजनाने शत्रुनाश होतो. पद्मरागलिंगपूजनाने संपत्ति मिळते. पुष्परागलिंगपूजनाने सुखप्राप्ति होते. इन्द्रनीललिंगपूजनाने सत्यलोक मिळतो. तांब्याच्या लिंगाच्या पूजनाने आयुष्य व पुष्टि मिळतात. पितळेच्या लिंगपूजनाने संतोष होतो. काशाच्याने कीर्ति मिळते. लोखंडाच्याने शत्रुनाश होतो. शिशाच्याने आयुष्य वाढते. गंधाच्याने सौभाग्य मिळते. हस्तिदंताच्या सेनापतित्व येते. तांदूळ वगैरे धान्यांच्या पिठाच्या लिंगपूजनेने पुष्टि, सुख, रोगनाश वगैरे होतात. उडदाच्या पिठाच्या लिंगपूजनेने स्त्री मिळते. लोण्याच्याने सुख होते. गाईच्या शेणाच्याने रोगनाश होतो. गुळाच्याने अन्न मिळते. वेळूच्या अंकुराच्याने वंशवृद्धि होते. याप्रमाणेच लिंगाच्या पूजनाचे फल मिळते.

  🌹 धर्मशास्त्र 🌹



व्रतादिकांचा तिथिनिर्णय


 


ज्या कर्मांना जो काल सांगितला असेल त्या कर्माकरिता तत्कालव्यापिनी तिथि घ्यावी. उदाहरणार्थ - विनायकव्रतामध्ये पूजन मध्यान्हकाळी सांगितले आहे; यास्तव, मध्यान्हकाळव्यापिनी तिथी घ्यावी. कर्मकाल जर दोन दिवसाचा असेल अथवा नसेल किंवा अंशतः असेल, तर युग्मवाक्याच्या अनुरोधाने पूर्वविद्धा किंवा परविद्धा तिथि घ्यावी. युग्मवाक्य हे द्वितीया तृतीया विद्धा घ्यावी, तृतीया द्वितीया विद्धा घ्यावी असे सांगते. यावरूनच -द्वितीयातृतीयांचे युग्म, चतुर्थीपंचमीचे युग्म, षष्ठीसप्तमीचे युग्म, अष्टमीनवमीचे युग्म, एकादशीद्वादशीचे युग्म, चतुर्दशीपौर्णिमांचे युग्म व अमावास्याप्रतिपदांचे युग्म- अशी युग्म…

 🌹 अष्टावक्र गीता 🌹




प्रकरण अठरावे 


उच्छृंखलाप्यकृतिका स्थितिर्धीरस्य राजते ।

न तु संस्पृहचित्तस्य शान्तिर्मूढस्य कृत्रिमा ॥ ५२ ॥


अर्थ : -


ज्ञानी पुरूषाची स्वाभाविक उच्छृंखल स्थितीसुद्धा शोधून दिसते. पण स्पृहायुक्त (इच्छा-आकांक्षायुक्त) मनाच्या मूढ व्यक्तिची ढोंगी शांती शोभून स्थित नाही.


विवेचन : -


 मनुष्यात इच्छा आहेत, वासना आहेत. या वासनेमुळेच त्याला हे शरीर प्राप्त झाले आहे. जर या संसारात काही भोगल्याची, काही करण्याची इच्छाच नसती तर त्याला हे शरीर मिळालेच नसते. मातिचा कुंभ तेंव्हाच तयार केला जातो जेंव्हा त्यात काही भरायचे असते. जर भरायचे काहीच नसेल तर कुंभ (रांजण किंवा भांडे) तयारच केले जाणार नाही. इच्छा, व…

 श्री रामदासस्वामीकृत् मनाचे श्लोक 🌹



भाग १११ 

ही क्रियाहि शरीराकडून घडणारी व मनाकडून घडणारी अशी दोन प्रकारची असते. यांत ध्यान, चिंतन, स्मरणादि मानसिक क्रिया आणि श्रवण, पठन, पूजनादि शारीरिक क्रिया यांचा समावेश आहे. प्रेमभक्ति हा अंतरात्म्याचा विषय आहे. मनाच्या माध्यमाने त्याचा अनुभव येऊ शकतो. कोणतीहि क्रिया फलित होण्यासाठी प्रेमभक्तीची नितांत आवश्यकता आहे हें कितीहि खरें असले तरी प्रेमभक्ति उत्पन्न करणें ही गोष्ट माणसाच्या स्वाधीनची नाहीं. देहमनाची शुद्धता आणि भगवतकृपा यांचा तो परिणाम आहे. ही अंतरंग भक्ति सोपी असती तर ' भक्ति तो कठीण सुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा सूर !' असे भक्तीच्या प्रसारासाठी बद्धपरिकर झालेल्या सत्पुरुषानेहि म्हटलें नसतें. तेव्हां प्रेमभक्ति उत्पन्न होईल आणि मग साधना करूं असें म्हणून जर कोणी स्वस्थ बसला तर त्याला काहीच साधावयाचे नाहीं. म्हणून समर्थीनी क्रिया शब्दाचा उपयोग प्रारंभी केला आहे.

मनाची एकाग्रता, मनाची शांतता, मनाची स्थिरता, मनाची प्रसन्नता या गोष्टी उत्तम आणि आवश्यक खऱ्या पण हें मनावर बळाने लादता येत नाहीं. माणसाचे मन हें सर्वतंत्र स्वतंत्र आहे. अर्जुनासारख्या थोर संयमी पुरुषालाहि मनाचा हा नाठाळ हट्टीपणा चांगलाच जाणवला आहे. तेव्हां मनाच्या प्रसन्नतेच्या फारसे नादी न लागता शरीराकरवीं कांहीं गोष्टी व्रत म्हणून नियमानें करीत राहावे. ठराविक वेळीं, ठराविक प्रमाणांत, ठराविक पद्धतीने, शास्त्राज्ञेनुसार, आपल्या रुचीप्रमाणें किवा संतानी, गुरूंनी, सांगितलेल्या पद्धतीने क्रिया करीत राहावे. त्याचाहि हळूहळू परिणाम होतो. मुळांत सात्त्विक असलेलें मन राजस किंवा तामस बनते. बाह्य क्रियांच्या संस्कारांतून, सातत्याच्या प्रयत्नानें हे राजस, तामस गुण ओहोटीला लागून मनाची मूलभूत सात्त्विकता पुन्हा प्रगट होऊं शकते. प्रकृतिभेदानें कोणाला हें लवकर साधेल, कोणाला त्यामानाने फार दीर्घकाल प्रयत्न करावा लागेल. पण धैर्याचा आणि तितिक्षेचा अवलंब करून दीर्घ कालाचे हें आव्हान साधकाने स्वीकारलेंच पाहिजे .

मन कितीहि नाठाळ असलें तरी 'देखलिया गोडीच्या ठाया सोके' हाहि एक त्याचा गुण आहे. त्यामुळें कधीकाळी एकादे निमिष जरी प्रसन्नता त्याला साधनकाळांत लाभली तरी मनाला वळण लागण्याच्या दृष्टीनें ती उपयोगी ठरते म्हणून केवळ शारीरिक पातळीवरच्या क्रियाहि प्राथमिक अवस्थेंत उपयोगी पडतात. त्या आचरीत असतांना प्रेम आणि प्रसन्नता उत्पन्न झाली पाहिजे. ती अद्याप झाली नाहीं एवढी जाणीव ठेवून साधक नित्यनेम आचरूं लागला तरी त्याला लाभ होईल. आरंभी न जाणवण्याइतकी मंद गतीची प्रगतीहि पुढें त्वरेने होऊं लागेल, म्हणून नित्यनेमानें चढत्या वाढला पद्धतीने साधना करीत राहावे असें समर्थांना सांगावयाचें आहे.

हे सर्व ऐकले, वाचले म्हणजे माणूस एक प्रश्न विचारतो कीं मग प्रपंच केव्हां करावा ? खरे म्हणजे हा प्रश्न प्रामाणिक नसतो परमार्थांचें खरे आकर्षण नसते आणि विषयोपभोगाचा लोभ सुटत नाहीं. अशा परिस्थितींत स्वतःच्या वागण्याच्या समर्थनासाठी असे प्रश्न विचारले जातात. व्यावहारिक क्षेत्रामध्येंहि सेवेचे म्हणून कांहीं नियम असतात. चतुर्थश्रेणीच्या सेवकापासून ते श्रेष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्यापर्यंत शासकीय क्षेत्रे, कार्यालये, उद्योगशाळा, सेना, विद्यासंस्था इत्यादि क्षेत्रांत माणसे कामे करीत असतात. कांहीं संस्थांमध्ये आजीव सेवक असेंहि एक कार्याचें स्वरूप असते. आणि या सर्व कार्यक्षेत्रांचे विशिष्ट असे नियम असतात. सैन्यामध्ये तर हे नियम अधिक कडक असतात व त्यांचें पालनहि कांटेकोरपणें करावें असे अनुशासन असतें. आतां हे सर्व करीत असतांना खाणे पिणे, बायकामुले, हौस, करमणूक या गोष्टी नियमाचे पालन प्रामाणिकपणें करणारा मनुष्य करूं शकत नाहीं असें आहे काय ? व कोणत्याहि सेवकाने हे कांहीं करूं नये अशी अपेक्षा नियम घालणाराची अपेक्षा असते काय ?

  🌹 ज्ञानेश्वरी 🌹 



अध्याय चवदावा - गुणत्रयविभागयोगः


 


कीं विरूढलिया जोंधळा । कणिसाचा निर्वाळा ।

वेंचला कीं आगळा । दिसतसे ॥ १२६ ॥


जोंधळ्याचा कण पेरून त्याला अंकुर फुटून कणीस निवडून आल्यावर (म्हणजे कणीस परिपक्व झाल्यावर) तो पहिला पेरलेला दाणा नाहीसा झाला का पुष्कळ पटीने वाढला ? ॥१४-१२६॥


म्हणौनि जग परौतें । सारूनि पाहिजे मातें ।

तैसा नोव्हें उखितें । आघवें मीचि ॥ १२७ ॥


म्हणून जग पलीकडे सारून (म्हणजे जगाचा निरास करून) मला पहावे तसा मी नाही तर सर्व सरसकट मीच आहे. ॥१४-१२७॥


हा तूं साचोकारा । निश्चयाचा खरा ।

गांठीं बांध वीरा । जीवाचिये ॥ १२८ ॥


हे वीरा अर्जुना, हा निश्चयाचा खरा सिद्धांत तू जीवाच्या गाठीस बांधून ठेव. म्हणजे तू आपले अंत:करणात या सिद्धांताचा दृढनिश्चय कर). ॥१४-१२८॥


आतां मियां मज दाविला । शरीरीं वेगळाला ।

गुणीं मीचि बांधला । ऐसा आवडें ॥ १२९ ॥


आता निरनिराळ्या शरीरात माझे प्रकाशन माझ्याकडूनच होते आणि त्या शरीरांमधे गुणांनी मीच बांधला गेल्यासारखा दिसतो. ॥१४-१२९॥


जैसें स्वप्नीं आपण । उठूनियां आत्ममरण ।

भोगिजे गा जाण । कपिध्वजा ॥ १३० ॥


हे अर्जुना, ज्याप्रमाणे स्वप्नामधे आपले मरण आपणच आपल्या कल्पनेने तयार करून त्या स्वकल्पित मरणाचे दु:ख आपण स्वत:च भोगावे. ॥१४-१३०॥


कां कवळातें डोळे । प्रकाशूनि पिवळें ।

देखती तेंही कळे । तयांसीचि ॥ १३१ ॥


अथवा एखादी पांढरी वस्तु पिवळी दिसली म्हणजे आपल्यास कावीळ झाली असे समजते. हे कावीळ झाल्याचे ज्ञान आपल्यास डोळ्यांमुळे होते व तेच डोळे पिवळ्याचे प्रकाशन करतात. (ह्याप्रमाणे डोळ्यांकडून काविळीचे ज्ञान होऊन त्यामुळे दिसणार्‍या पिवलेपणाचेही तेच डोळे प्रकाशन करतात. ॥१४-१३१॥


नाना सूर्यप्रकाशें । प्रकटी तैं अभ्र भासे ।

तो लोपला हेंही दिसे । सूर्येंचि कीं ॥ १३२ ॥


अथवा सूर्य आपल्या प्रकाशाने ज्यावेळेस आपल्यावर आलेल्या ढगांचे प्रकाशन करतो, त्यावेळेस ते ढग आपणास दिसतात व सूर्यबिंबावर आलेल्या ढगाने सूर्यास झाकून टाकले आहे हे देखील सूर्याच्या प्रकाशामुळेच समजण्यात येते. ॥१४-१३२॥


पैं आपणपेनि जालिया । छाया गा आपुलिया ।

बिहोनि बिहालिया । आन आहे ? ॥ १३३ ॥


अर्जुना, आपल्यापासून झालेल्या छायेला भ्याले असता ती छाया भ्यालेल्या पुरुषाहून काही वेगळी आहे का ? तर नाही, म्हणजे त्या छायेचे प्रकाशन आपणच केले आहे. ॥१३३॥


तैसीं इयें नाना देहें । दाऊनि मी नाना होयें ।

तेथ ऐसा जो बंधु आहे । तेंही देखें ॥ १३४ ॥


त्याप्रमाणे हे अनेक देह दाखवून (प्रकाशून) मी अनेक होतो आणि त्या अनेक शरीरात मी गुणांकडून बांधला गेलो आहे असे जे वाटते त्या वाटण्याचे प्रकाशनही मीच करतो. ॥१४-१३४॥


बंधु कां न बंधिजे । हें जाणणें मज माझें ।

नेणणेनि उपजे । आपलेनि ॥ १३५ ॥


माझे मला यथार्थ ज्ञान असणे हे गुणांचा बंध (दिसत) असून त्या बंधाकडून न बांधले जाण्यास कारण्भूत होते व आपल्या नेणण्यानेच (आपल्या यथार्थस्वरूपाच्या अज्ञानानेच) (बंध) उत्पन्न होतो. ॥१४-१३५॥


तरी कोणें गुणें कैसा । मजचि मी बंधु ऐसा ।

आवडे तें परियेसा । अर्जुनदेवा ॥ १३६ ॥


तर अर्जुनदेवा, कोणत्या गुणाने व कसा मी बंधन आहे असे वाटते ते ऐका. ॥१४-१३६॥


गुण ते किती किंधर्म । कायि ययां रूपनाम ।

कें जालें हें वर्म । अवधारीं पां ॥ १३७ ॥


गुण किती आहेत व त्यांचे धर्म काय ? त्यांचे नाव व रूप काय ? व ते कोठे उत्पन्न झाले ? हे वर्म ऐक. ॥१४-१३७॥


सत्त्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसंभवाः ।

निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम् ॥ ५ ॥


हे महाबाहो, सत्व, रज व तम हे गुण आहेत व प्रकृति यांची जन्मभूमि आहे. हे त्रिगुण देहामध्ये अविनाशी जो देही (आत्मा) त्याला बंधन करतात. ॥१४-५॥


तरी सत्त्वरजतम । तिघांसि हें नाम ।

आणि प्रकृति जन्म- । भूमिका ययां ॥ १३८ ॥


तरी सत्व, रज व तम ह्या तिघांनाही गुण म्हणतात आणि यांची प्रकृति ही जन्मभूमि आहे. ॥१४-१३८॥


येथ सत्त्व तें उत्तम । रज तें मध्यम ।

तिहींमाजीं तम । सावियाधारें ॥ १३९ ॥


या तीन गुणात सत्वगुण हा उत्तम, रजोगुण हा मध्यम व तमोगुण हा सहज कनिष्ठ आहे. ॥१४-१३९॥


हें एकेचि वृत्तीच्या ठायीं । त्रिगुणत्व आवडे पाहीं ।

वयसात्रय देहीं । येकीं जेवीं ॥ १४० ॥


ज्याप्रमाणे एका देहाचे ठिकाणी वयाच्या तीन अवस्था (बाल्य, तारुण्य व वार्धक्य) भासतात, त्याप्रमाणे एकाच अंत:करणवृत्तीच्या ठिकाणी त्रिगुणत्व भासते असे समज. ॥१४-१४०॥


कां मीनलेनि कीडें । जंव जंव तूक वाढे ।

तंव तंव सोनें हीन पडे । पांचिका कसीं ॥ १४१ ॥


अथवा हिणकस धातु सोन्यात मिसळला असता जसे जसे त्या सोन्याचे वजन वाढते, तसे तसे सोने पाच रुपये तोळा किंमतीपर्यंतच्या कसाचे हलके होते. ॥१४-१४१॥


पैं सावधपण जैसें । वाहविलें आळसें ।

सुषुप्ति बैसे । घणावोनि ॥ १४२ ॥


आळसाने सावधपणा नाहीसा झाल्यावर मग गाढ झोप दृढ होऊन बसते ॥१४-१४२॥


तैसी अज्ञानांगीकारें । निगाली वृत्ति विखुरे ।

ते सत्त्वरजद्वारें । तमही होय ॥ १४३ ॥


त्याप्रमाणे अज्ञानाचा अंगीकार करून बाहेर पडलेली वृत्ति ज्या वेळेस फैलावते त्यावेळेस ती सर्व, रज होऊन तम देखील होते. ॥१४-१४३॥


अर्जुना गा जाण । ययां नाम गुण ।

आतां दाखऊं खूण । बांधिती ते ॥ १४४ ॥


अर्जुना यांना गुण असे म्हणतात, असे समज. आता हे गुण (आत्म्याला) कसे बांधतात ते वर्म दाखवतो. ॥१४-१४४॥


तरी क्षेत्रज्ञदशे । आत्मा मोटका पैसे ।

हें देह मी ऐसें । मुहूर्त करी ॥ १४५ ॥


तर आत्मा हा जीवदशेत थोडासा प्रवेश करतो न करतो तोच (अज्ञानाचा थोडासा स्वीकार करतो न करतो) तोच हा देह मी आहे असे म्हणावयास आरंभ करतो. ॥१४-१४५॥


आजन्ममरणांतीं । देहधर्मीं समस्तीं ।

ममत्वाची सूती । घे ना जंव ॥ १४६ ॥


जन्मापासून तो मरणापर्यंत सर्व देहधर्माच्या ठिकाणी ममत्वाचा (जन्ममरण वगैरे जे सर्व देहाचे धर्म आहेत ते माझे आहेत असा) अभिमान घेतो न घेतो इतक्यात ॥१४-१४६॥


जैसी मीनाच्या तोंडीं । पडेना जंव उंडी ।

तंव गळ आसुडी । जळपारधी ॥ १४७ ॥


ज्याप्रमाणे मशाच्या तोंडात आमिष पडते न पडते तोच धीवर गळास हिसका देतो, ॥१४-१४७॥


तत्र सत्त्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम् ।

सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ ॥ ६ ॥


त्यामधे सत्वगुण निर्मल असल्यामुळे प्रकाश व उपद्रवरहित आहे हे पापरहिता अर्जुना, तो सत्वगुण सुखाच्या व ज्ञानाच्या संगतीने (या दोन पाशांनी) प्राण्याला बद्ध करतो. (म्हणजे मी सुखी आहे, मी ज्ञानी आहे अशी जाणीव उत्पन्न करतो) ॥१४-६॥


तेवीं सत्त्वें लुब्धकें । सुखज्ञानाचीं पाशकें ।

वोढिजती मग खुडके । मृगु जैसा ॥ १४८ ॥


त्याप्रमाणे सत्वगुणरूपी पारध्याकडून सुख व ज्ञानरूपी पाश ओढले जातात पण हरण जसा पारध्याच्या पाशात अडकतो तसा तो सुख आणि ज्ञान यांच्या पाशात अडकतो. ॥१४-१४८॥


मग ज्ञानें चडफडी । जाणिवेचे खुरखोडी ।

स्वयं सुख हें धाडी । हातींचें गा ॥ १४९ ॥


मग ज्ञानाने चरफडावयास लागतो व जाणीवरूपी लाथा झाडतो आणि अरे, आपल्यापाशी असलेले आपले आत्मसुख आपणच व्यर्थ घालवतो. ॥१४-१४९॥


तेव्हां विद्यामानें तोखे । लाभमात्रें हरिखे ।

मी संतुष्ट हेंही देखे । श्लाघों लागे ॥ १५० ॥


तेव्हा अविद्येने व मानाने संतुष्ट होतो. कोणाताही लाभ झाला तर आनंद पावतो, आपण संतुष्ट आहोत हेही पहातो व आपणास धन्य मानतो. ॥१४-१५०॥

सौभाग्यवती स्रिया कुंकू का लावतात 🌹

  सौभाग्यवती स्रिया कुंकू का लावतात 🌹


 


देवतांच्या पूजेत परिमल द्रव्य म्हणून अष्टगंधाचा उपयोग करतात. त्यात हळद व कुंकू ही दोन मुख्य गंधद्रव्ये आहेत. ‘  रामप्रभूंनी रावण व कुंभकर्ण यांना मारल्यानंतर आपल्या स्वरूपात विलीन करून घेतले. त्यामुळे त्यांची ज्योत सभोवती फ़िरत होती. तेव्हा रामांनी त्यांना बजावले की, मी जेव्हा केदारनाथाचा अवतार घेईन त्यावेळी माझ्याशी विरोधी भक्ती करावी म्हणजे तुम्हांला मोक्ष प्राप्त होईल. रामानी अवतार घेतल्यानंतर राक्षसांचा वध केला. त्यात जलसेना व चंद्रसेना यांचा वध झाला. त्या पतिव्रता स्त्रिया होत्या. देवांना अत्यंत वाईट वाटले. त्या स्त्रियांनी वर मागितला. देवांनी दिला तो, ‘ हळद - कुंकू ही द्रव्ये स्त्रियांनी लावावीत, तरच त्या सौभाग्यवती, सुवासिनी स्त्रिया मानल्या जातील. ’ असा वर देऊन नेमाला दंडक घातला. तेव्हापासून स्त्रियांचे मानचिन्ह झाले. मात्र गतधवा  ( विधवा ) स्त्रीने नवरा वारल्यानंतर हळद - कुंकू लावले तर तिची उभय कुळे नरककुंडात सात जन्म पडतील. यासाठी पतिनिधनानंतर स्त्रिया हळद - कुंकू लावीत नाहीत.

जी सौभाग्यवती स्त्री कपाळी कुंकू लावीत नाही,त्या दुर्भागीचे तोंड पाहू नये. चुकून दृष्टीस पडल्यास सूर्यदर्शन घ्यावे म्हणजे पाप नष्ट होते. 

 


कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यातील शिराळकोप्प तालुक्यातील उडुतडी म्हणजे  अक्का महादेवीचे जन्मगाव. शेठ निर्मलशेट्टी आणि सुमतीदेवी या सदाचारसंपन्न शिवभक्त दाम्पत्यांच्या पोटी अक्का महादेवीचा जन्म झाला. महादेवी अस तिचे नाव ठेवले.

महादेवी बालवयापासून तारुण्यावस्थेपर्यत महादेवी शिवपूजन करणे, फुलांच्या माळा करणे, विभूती लावणे, लिंग रुद्राक्ष धारण करणे, वाचन करणे , समाजाचे निरीक्षण करणे, त्यांच्या प्रश्नावर विचार करणे , वचने श्रवण करणे हीच तिची दिनक्रम होता. बसवादी शरणांच्या वचनाने प्रभावित होऊन  अक्का स्वतः वचने लिहू लागली.

शरणांचा लिंगपती शरणसती हा लिंगायत सिद्धांत  अक्काने आपल्या जगण्यात पुरेपूर उतरविला होता. तिने बालपणीच मल्लिकार्जुनाला आपला पती म्हणून वरले होते. ती नित्य मल्लिकार्जुनाचे ध्यान करणे, अक्कना मल्लिकार्जुनाच्या भेटीची ओढ लागलेली असे.  अक्का महादेवीची वचने ही अध्यात्माच्या उच्च अध्यात्म पातळीला घेऊन जाणारी आहेत. अक्कमहादेवीची वचने जीवन व्यापी, प्रभावी आहेत.

एकदा राजा कौशिक राज्यात फेरफटका मारण्यासाठी गेला असताना त्याला  अक्का महादेवीचे दर्शन झाले, पहाताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला. त्याने अक्काना लग्नासाठी मागणी घातली . अक्कमहादेवीना लग्न करायचे नव्हते. आईवडिलांच्या आग्रहाखातर तिने लग्न केले पण त्यासाठी दोन अटी घातल्या, ” मी शिवपूजेत असताना राजाने मला स्पर्श करू नये. माझ्या इच्छेविरुद्ध मला स्पर्श करू नये.” या दोन अटी राजाने मान्य केल्यानंतर त्यांचे लग्न झाले.

एकदा अक्का इष्टलिंगयोगात मग्न असताना कौशिक राजाने कामांध होऊन स्पर्श केला. अटीच उल्लंघन झाले.  अक्का नी त्या क्षणी अंगावरील वस्त्रांचा आणि राजवैभवाचा त्याग केला. ती रानावनातून भटकत कल्याणकडे निघाली.

पावसात घर करून राहता वादळाला भिऊन चालेल का ? बाजारात घर करून राहता गोंगाटाला भिऊन चालेल का ? जंगलात घर करून राहता हिंस्त्र पशूंना भिऊन चालेल का ? असे प्रश्न  अक्का विचारू लागली. जंगलातून भटकत असताना  अक्काना अनेकवेळा अनेक संकटांना सामोरे जावे लागले. लोकांनी अक्काना नावे ठेवली. अशापरिस्थितीतही अक्क स्थितप्रज्ञ राहिली. अखेर कल्याणच्या अनुभवमंटपात सामील झाली. शरण जीवनाशी एकरूपता पावली. अक्का कल्याणच्या अनुभवमंटपात आल्यानंतर अक्क आणि अल्लमप्रभु यांच्यातील संवाद अक्कच्या ज्ञानाच दर्शन घडवतो. अनुभवमंटपातील शरणांनी अक्कला आपली लाडकी लेक म्हंटले आहे. अनेक वचनात अक्कची स्तुती, गौरव केला आहे. म. बसवण्णांनी आपल्या वचनात “अक्कामहादेवी माझी आई आहे .” अस म्हणून अक्कचा गौरव केला आहे. अक्कमहादेवी म्हणजे अध्यात्माच्या उच्च शिखरावर पोहचलेली शरणी होती.

कल्याणक्रांतीनंतर सर्व शरण आपल्या निजस्थळी गेल्याचा उल्लेख तुरुंगाहि रामण्णा आपल्या वचनात करतात. त्या वचनात  अक्का महादेवी आणि अल्लमप्रभु श्रीशैलजवळच्या कर्दळीबनात जाऊन लिंगैक्य झाले.

यामुळेच अक्का जगन्माता, शिवयोगीणी  अक्कान बळग, या नावाने प्रसिध्द झाली. स्त्रीला कनिष्ठ , शूद्र ठरवून तिच्याकडून ठरवून दुययम वागणूक दिली जात होती. त्यावर अक्कामहादेवी आपल्या वचनात प्रकाश टाकते.


वचन


फुंकिन मी रणशिंग, स्त्री न च अबला अन न हीन,

हिनवू नका स्त्रीला समजून हीन, बंधुनो लक्षात ठेवा.मीही पुरुषासम घालीन कासोटा धैर्याचा,

धारण करीन कवच स्वाभिमानाचा,

लावीन तिलक शिवप्रेमाचा,

हात सरसावून फुंकिन मी रणशिंग,

मनोधैर्याच्या निऱ्या सुटल्या तर शपथ तुमची

हे चेन्नमल्लिकार्जुना.

विकाराचे चामडे, मलमूत्राचे मडके

हाडाचा सापळा, भ्रमाचा भोपळा

आगीत जळणारा, घाणीत कुजणारा

हा देह सोडून चेन्नमल्लिकार्जुनाला जण मानवा.

भूक लागली तर गावात भिक्षा मागीन

तहान लागली तर नदी-तलाव आहेत

थंडीपासून रक्षिणारे पिसाट वारे आहेत

झोपण्यासाठी पडकी देवालये आहेत.

हसणे- खेळणे, सांगणे-ऐकणे, चालणे-बोलणे

शरणांच्या सहवासात आनंदाला उधान येते.

चेन्नमल्लिकार्जुना,

तू दिलेले आयुष्य असे तो,

लिंगसुखीच्या सहवासात दिवस घालवते.

माझी भक्ती बसवण्णांची कृपा,

माझे ज्ञान प्रभुदेवांची कृपा,

माझी परिपूर्णता चेन्नबसवण्णांची कृपा

या तिघांनी एक-एक दिल्याने तीन भाव झाले,

ते तीन भाव तुम्हास समर्पण केल्याने

मला कसला त्रास उरला नाही.

चेन्नमल्लिकार्जुन देवाच्या स्मरणाने

तुमच्या करुणेचा शिशु झाला पहा

संगनबसवण्णा.

कामाला जिंकले बसवा तुमच्या दयेने.

सोमधराला धरले बसवा तुमच्या दयेने.

दिसण्यास स्त्री असले तर काय झाले ?

बलपुरुष मी बनले बसवा तुमच्या दयेने,

अतिकामी चेन्नमल्लिकार्जुनाला बाहुबंधात बांधले.

आमचे मिलन झाले बसवा तुमच्या कृपेने.

चंदनाचे तुकडे तुकडे करून उगाळले तर

ते दुखावून थरथरते का ?

सुवर्ण कापून आगीत भाजले तरी

ते दुखावून काळे कधी होईल का ?

उसाचे लहान लहान तुकडे करून

पाण्यात पिळले, उकळून उकळून रसाची साखर झाली

तरी दुखावून गोडी सोडेल का ?

माझी पूर्वजन्मीची पातके तुम्ही नष्ट

केली नाही तर तुम्हालाच हानी.

माझा पिता चेन्नमल्लिकार्जुनाने कष्ट दिले

तरीही मी शरणागती सोडणार नाही.

देवा, तुमच्या सज्जन सदभक्तांना पाहून

माझे डोळ्यावरील अज्ञान पटल नष्ट झाले,

देवा, तुमच्या सज्जन सदभक्ताच्या श्रीचरणी मस्तक लावताच

माझे कपाळीचे लिखित नष्ट झाले.

चेन्नमल्लिकार्जुना

तुमचा शरण संगनबसवण्णांचे चरण पाहून

पुन्हा पुन्हा वंदन करते.

fly