मलय पर्वतावर भिल्लाच्या कुळी शबरी लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
मलय पर्वतावर भिल्लाच्या कुळी शबरी लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

मंगलवार, 11 अप्रैल 2023

शबरी

 शबरी

मलय पर्वतावर भिल्लाच्या कुळी शबर राजाच्या पोटी एक मुलगी जन्माला आली तिचे नाव शबरी .पाहता पाहता ती आठ वर्षाची झाली .आपल्याच कुळातील एका मुलाशी तिचे लग्न जुळविण्यात आले आणि लग्नाची तयारी सुरू झाली .लग्नाच्या  मेजवानीसाठी बकऱ्यांची पिल्ले आणण्यात आली .त्या सर्व कोकरांना बाभळीच्या फांद्यांचे कुंपण करून त्यात ठेवण्यात आले .त्यातील काही पिल्ले बाहेर येत असत आणि त्या पिल्लां बरोबर ती लहानशी शबरी खेळत असे ,त्या पिल्लांचा तिचा इतका लळा लागला की ती जेवण करायचे विसरुन जाइ .तेव्हा तिची आई रागावून तिला म्हणाली ,किती वेळ त्या कोकरांशी खेळतेस !घे खेळून !उद्या ती मेल्यावर कोणाशी खेळशील ?

शबरी म्हणाली ,उद्या ही मरणार !आई म्हणाली ,अगं तुझ्या लग्नात मेजवानीसाठी आणली आहेत ती सर्व पिल्ले यांचा उद्या बळी जाणार आहे .आईचे हे शब्द ऐकल्यावर शबरीचे अंतःकरण कळवळले .ती म्हणाली ,आई यांना मारणार छे छे !

आई म्हणाली ,का नाही मारायचं आपला कुळाचार ,कुळधर्म त्यांचा बळी देऊनच आपल्या देवता प्रसन्न होतील आपल्यावर !शबरी आईला म्हणाली ,देवकार्याच्या नावाखाली राक्षसी कृती आहे ही ! बघ आई ,ती लहानगी पिल्ले कशी दीन होऊन पाहत आहेत ही सर्व हरीची लेकरे आहेत एकाच्या कुळासाठी दुसऱ्याचा बळी का द्यावा ?

तिला काही सुचेना यांचा जीव वाचवायचा असेल तर एकच उपाय तिला दिसू लागला तो म्हणजे लग्न न करणे ?त्याच दिवशी मध्यरात्री उठून तिने  सर्व कोकरे सोडून दिली आणि ती स्वतःही निघाली .मलय पर्वतावरून मजल-दर-मजल करीत .इकडे सकाळी तिची शोधाशोध सुरू होणार हे तिला माहीत होते .तेव्हा दिवसा ती एखाद्या उंच झाडावर जाऊन बसत असे आणि शोधणारी माणसे पुढे निघून गेल्यावर त्यांच्या मागून ती रात्रीचा प्रवास करीत असे. असे करीत करीत ती गोदातीरी आली तिथे पोहोचल्यावर तिला सुंदर असा आश्रम व पर्णकुट्या दिसल्या आणि इथेच आपण राहावं असे तिला वाटू लागले .

तो आश्रम होता मतंग ऋषींचा .तिला असे वाटले आपल्या हीन कुळामुळे आपणास इथे थारा मिळणार नाही ,म्हणून तिने आश्रमाबाहेर एका झाडावर आश्रय घेतला आणि तेथून ती आश्रमाची दिनचर्या पाहत असे .सर्व आश्रमवासी भल्या पहाटे गोदावरीवर स्नानास येत .ते सर्वजण ज्या मार्गाने स्नानास जात तो मार्ग तिने पाहुन ठेवला आणि दुसऱ्याच दिवसा पासून रात्री तो मार्गे झाडायला तिने सुरुवात केली .दिवसेंदिवस पायाखालची दगडादुगडाची-काट्याकुट्याची वाट मऊ व्हायला लागली , हे मातंगऋषीच्या लक्षात आले ,त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितले !असा कोण सेवाचोर आहे ते पहा ?

मातंगऋषींना माहित होते की हे करणारे आपले शिष्य नव्हेत .उत्तररात्री झाडावरून खाली येऊन मार्ग साफ करणाऱ्या बालशबरीला शिष्यांनी पाळत ठेऊन पकडले आणि ओरडत-ओरडत मातंगऋषीच्या समोर आणले व म्हणाले ,सेवाचोर सापडला !या पोरीने आपला आश्रम बाटविला हिला कडक शासन करा ?

मातंगऋषीच्या समोर आणल्या बरोबर शबरीने त्यांच्या चरणावर लोळण घेतली .मातंगऋषीनी तिला जवळ घेऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, बाळ मी तुझ्यावर प्रसन्न झालो !तू खरंच सेवामूर्ती आहेस !

शबरी म्हणाली ,महाराज मला सेवे शिवाय दुसरे काहीच नको !मागे घडलेला सर्व वृत्तांत तिने मातंगऋषींना सांगितला .महाराजांनी तिला आश्रमात ठेवून घेतले आणि शबरी दहा-अकरा वर्षाची होते ना तोच मातंगऋषीना दीव्य साक्षात्कार झाला की ,

आपले कार्य झाले आहे आपण हिमालयात जावे आणि तिथेच समाधिस्थ व्हावे .मातंगमुनी जाण्यास निघाले .त्यांच्या चरणांवर डोके ठेवून शबरी म्हणाली ,महाराज मी आपल्या आश्रयाने इथे राहिले आपण जाणार आता मी कुठे जावे काय करावे ?

मातंगऋषी म्हणाले ,बाळ तुला कुठेही जाण्याची गरज नाही ,तू इथेच रहा ,तू प्रत्यक्ष सेवामूर्ती आहेस .पुढे जेव्हा श्रीनारायण राम अवतार घेतील तेव्हा साक्षात प्रभु श्रीराम तुला येऊन भेट देतील !

गुरु वाक्यावर विश्वास आणि स्वतःकडे दिनत्व घेऊन शबरीने सेवा करण्यास सुरुवात केली .इकडे मातंगऋषी हिमालयात निघून गेले .पंपा सरोवराच्या पश्चिमतिरी चित्रकूट पर्वतावर शबरीचे आयुष्य सुरू झाले .ती बालशबरी तारुण्यामध्ये प्रवेशकरती झाली आणि विचार करता तिच्या असे लक्षात आले की ,प्रभू श्रीराम येतील असे गुरुंनी सांगितले खरे पण ते कधी येतील हे विचारायचेच राहून गेले ?

तेव्हा आता जोपर्यंत प्रभू भेट होत नाही तोपर्यंत आपण या आश्रमात सेवा करत राहिले पाहिजे .जसजसे आयुष्य वाढत चालले तसतसे तिला वाटू लागले श्रीराम येणार मला भेटणार !

पण अजून प्रभू श्रीरामांचा जन्म अयोध्येत व्हायचा होता

तिच्या मनाला प्रभू भेटीचा छंद लागला होता ,तिला असे वाटे की आज प्रभू येथील या विचारात ती जगाला विसरून गेली होती .

प्रभाती उठावे .

मातंगऋषीचा मार्ग ती हाताने झाडत होती पण ,महाराजांनी ज्या प्रभू भेटीचा उपदेश केला त्या प्रभू श्रीरामांचा मार्ग ती हाताने झाडत नव्हती तर

ती स्वतःचे केस मोकळे सोडत असे ,ते पुढे घेत असे व कमरेत वाकून त्या सर्व केसांनी ती त्या आश्रमाचे सर्व मार्ग झाडून काढत असे .

कमलपुष्पासमान प्रभू श्रीरामांच्या चरणांना खडे टोचतील म्हणून ती त्या मार्गातून त्यांना दूर काढत असे .हातात जपमाळ घेऊन ती मार्गात वाट पाहत बसत असे .उजाडणाऱ्या प्रत्येक दिवशी तिचा हाच नित्य क्रम असे .

दिवसामागून दिवस लोटले ,वर्ष लोटली .बालवयातील शबरी तारुण्यात आली ,आता आयुष्याची संध्याकाळ व्हायला सुरुवात झाली ?आता तिच्या सुंदर केसांचा अंबाडा झाला ?अंगावर सुरकुत्यांचे जाळे चढले ?डोळे अधू व्हायला लागले ?कान बधीर झाले ?शरीर थरथरायला लागले ?

पण रोजचा तोच नित्यक्रम आणि प्रभू भेटीची वाट पाहावी .आज येतील श्रीराम ,आज नाही आले तर उद्या येतील श्रीराम .

आजूबाजूच्या तपोवनातील लोकांनी तिच्या या नित्य कार्याकडे पाहून तिला वेडी भिल्लीण म्हणून संबोधण्यास सुरुवात केली .

प्रभू श्रीराम नेमके कोणत्या दिशेने येतील हे माहीत नसल्याने ती आठही दिशांचे मार्ग झाडत असे .आता तिचे शरीर थकायला लागले आता तिला हातात जपमाळ घेऊन बसता सुद्धा येईना आणि म्हणून आश्रमाच्या अंगणात श्रीरामांच्या स्वागताची सर्व तयारी करून ठेवून ती तिथेच अंगणात पडून राहात असे परंतु ,हातातील जपमाळ पडल्या पडल्या चालू असे आणि असे हे वृद्ध जीर्ण झालेले शबरीचे शरीर पडलेले पाहिल्या नंतर ,त्या जंगलात असलेल्या कावळ्यांना असे वाटे की हे प्रेतच आहे ,आणि त्या कावळ्यांनी येऊन तिच्या शरीराला टोचा मारून तिचे माऊस काढायला सुरुवात केली .तेव्हा ,

त्या शबरीने त्या कावळ्याकडे दिन वाणीने पहावे आणि म्हणावे ,


कागा अरे कागा !


कागा सब कुछ खाईये !


चुन चुन खयीये मास !


दो नैना मत खाईये ,प्रभू देखन की आस !


 एका राम भेटी शिवाय तिला दुसरा कोणताच छंद नव्हता .तेव्हा ,


" भाव पराकोटीला पोहोचला की भगवंताला यावंच लागतं "

आणि ...भाग्याचा दिवस उजाडला .तिने दोन आकृत्या आश्रमाच्या दिशेने येताना पाहिल्या .

मातंगऋषींनी सांगितलेल्या प्रमाणे !


शबरी देखी रामजी गृह आये।


सर शिज लोचन बाहू विशाला।


जटा मुकुट सिर ऊर पर माला।


या दोन आकृत्या आश्रमाच्या दिशेने येतांना पाहून ती प्रेतवत झालेली शबरी खडबडून उठून बसली आणि किलकिले डोळे बारीक करून पाहते तर त्यातल्या सावळ्या वर्णाच्या आकृतीच्या डोळ्यातील दयेचा सागर तिने पाहिला आणि ताबडतोब ओळखल हाच माझा प्रभू श्रीराम याच्या शिवाय दुसरा राम असणं शक्य नाही .अंगात चैतन्य संचारले आणि त्यांच्या चरणावर लोटांगण घातले .पूजनाची सर्व तयारी केली होतीच ,पण त्याची गरज पडलीच नाही ?कारण की ,तिच्या डोळयातून वाहणाऱ्या अश्रूंच्या पुरानेच श्रीरामांचे चरण धुतले गेले .धन्य मी शबरी श्रीरामा , लागली श्री चरणे आश्रमा प्रत्यक्ष श्रीराम माझ्यासाठी इथे आले या भावनेने ती सद्गदीत झाली होती तिच्या मुखातुन शब्द व्यवस्थित फुटत नव्हते .ती म्हणाली ,माझ्या कुटीपर्यंत यायला तुला फार श्रम झाले असतील ना रामा !माझे त्रिविध ताप शांत केलेस .

प्रभू श्रीरामाची पूजा झाली व प्रसाद म्हणून कंदमुळे ,पक्वमधुर बोरं फळे तिने त्यांच्या पुढे ठेवली आणि स्वतः ती चाखून गोड तेवढी प्रभूंना देत होती तेव्हा सोमैत्र (लक्ष्मण) शंकेने तिच्या कडे पाहू लागला त्यावर ती म्हणाली ही फळे उष्टी नव्हेत सोमैत्रे ती अभिमंत्रित आहेत .हात जोडुन थरथर कापत ती उभी राहिली आणि रामचंद्राना विचारले ,प्रभू मी आता तुमचं स्तवन कसे करावे ?

प्रभू श्रीराम म्हणाले ,याची आता काहीच गरज नाही .ज्या भक्तिमार्गाने तू गेलीस तेव्हा आता माझे स्तवन करण्याची काहीच गरज उरत नाही !


श्रीरामांनी तिला नवविधा भक्तीचा उद्देश केला .


सत्संग कर ,माझ्या कथेच्या ठिकाणी आनंद घे ,सगळ्यांशी प्रेमाने वाग ,सर्व जग विष्णुमय आहे अशी दृष्टी ठेव .अशा प्रकारे भक्तीचे नऊ प्रकार सांगितले आणि भगवान म्हणाले ,या पैकी एक जरी भक्ती केलीस तरी तू माझ्या जवळ येऊन पोहोचशील .भगवंतांना माताशबरीची स्तुती करायची होती .तिने ती करून दिली नसती म्हणून हा सगळा नवविधा भक्तीचा उद्देश करून झाल्यावर रामराया शबरीला म्हणतात ,शबरी या नऊही भक्ती तू केलेल्या आहेस तू धन्य आहेस !

शबरीमाता म्हणाल्या ,प्रभू तुमचे दर्शन होणे हेच माझ्या आयुष्याचे कार्य होते .आता ते झाले माझे कार्य झाले आणि माताशबरीने रामरायाकडे पाहीले आपले आसन दृढ केले .


" निघाला प्रभू नेत्री तो साठविला।


आयुष्या मध्ये जो सदा आठविला।


कुटी सोडूनि चालिला राम जेव्हा ,कुडी सोडूनि चालले प्राण तेव्हा।


साठवलेला राम सामान्य होता का माताशबरीचा ?नाही ,मातंगऋषींच्या आश्रमात आल्या पासुन तो या क्षणापर्यंत .ज्या रामाच्या आठवणी शिवाय त्या माताशबरीने दुसरे काहीच केले नाही ,

तो राम तिने नेत्रात साठविला .

 तेव्हा ,इतके दिवस त्या कुडीत रामाच्या आशेने निवास करणारे तिचे जे प्राण होते ते प्राण आता कुडीच्या बाहेर जाऊ पहायला लागले .


महामुनी वाल्मिकी म्हणतात की ,रामरायांची आणि माताशबरीची नजर एक झाली आणि माताशबरीच्या देहाच्या ठिकाणी आपणहून अग्नी प्रगट झाला आणि प्रभू रामरायांच्या देखत माताशबरीचा देह पंचमहाभूतांच्या ठिकाणी विलीन झाला .


ही आहे राम भक्ती ,


हे आहे राम दर्शन ,


ही आहे राम प्राप्ती .

 जय श्री राम🙏🚩🌹


                🙏राम कृष्ण हरी🙏

fly