सिंगापूरचा भाग्यविधाता - ली क्वान यू
सिंगापूरला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या पंतप्रधानपदाची जबाबदारी ली यांच्यावर आपसूकच आली. आधीपासून ते लोकांच्या समस्या सोडवणारे नेते होतेच. केम्ब्रिजमधून कायद्याची पदवी गुणवत्तेसह उत्तीर्ण झालेल्या ली यांनी काही काळ वकिलीही केली. पण नंतर स्वतंत्र झालेल्या सिंगापूरसाठी स्वतःला वाहून घेतले. सिंगापूरच्या प्रगतीसाठी काय करता येईल, त्याला जागतिक स्तरावर एक राष्ट्र म्हणून मानाचे स्थान कसे प्राप्त करून या विचारांनी त्यांना पछाडले होते. सिंगापूरसमोर अनेक समस्या आ वासून उभ्या होत्या. शेतीसाठी पुरेशी सुपीक जमीन नव्हती, नैसर्गिक साधनसंपत्तीचा अभाव होता. गरिबी, अस्वच्छता, भ्रष्टाचाराने देश बरबटलेला होता. विविध वंशीय आणि विविध भाषा बोलणारे लोक सिंगापूरमध्ये स्थायिक झाले होते. पण ली यांनी धैर्याने या सगळ्या संकटांचा सामना करायचे ठरवले. एकेक पाऊल ते विश्वासानं आणि निर्धारानं टाकत गेले.
सिंगापूरवासी नागरिक मेहनती होते. पण या विविध धर्म, वंशाच्या लोकांना एकत्र आणणे, त्यांच्यात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणे सोपे नव्हते. त्यासाठी ली यांनी वेगळ्या विचारांची वाट निवडली. ते सुरुवातीला डाव्या विचारसरणीचे असले तरी पुढे त्यांनी आपल्या विचारसरणीत बदल घडवून आणला. साम्यवादी विचारांची कास धरून आपल्याला चालणार नाही हे त्यांच्या लक्षात आले. लोकांमध्ये प्रबोधन घडवून त्यांच्या विचारसरणीत हळूहळू बदल घडवून आणावा लागेल असे त्यांना वाटत होते. ली तसे उच्चभ्रू ब्रिटिश संस्कृतीत वाढले होते. पण परिस्थितीनुसार ते स्वतःमध्ये बदल घडवत गेले.
बिअर आणि गोल्फ या दोन ली यांच्या आवडीच्या गोष्टी. जीवनाचा आनंद घेणे, नियमित व्यायाम करून आपले शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवणे आणि सकारात्मक विचार करणे या गोष्टींवर त्यांचा भर होता.
गोल्फच्या खेळात खेळताना मैदानावर असलेल्या छोट्याशा खळग्यात आपल्या हातात असणाऱ्या दांडीवजा बॅटने चेंडू टोलवायचा असतो. तो खळग्यात किंवा जास्तीत जास्त खळग्यांजवळ जाईल अशा कौशल्याने खेळ खेळावा लागतो. वाऱ्याचा वेग, चेंडूचे वजन, बॅटच्या फटक्यांचा जोर या सगळ्यांचा अंदाज घेऊन चेंडू टोलवावा लागतो. कुशल खेळाडू हे सरावामुळे सहज करू शकतो. ली यांच्यावर असलेली सिंगापूरची जबाबदारी काहीशी या खेळासारखीच नव्हती का ? सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊनच त्यांना हा चेंडू टोलवावा लागणार होता. त्यांना सिंगापूरला मानाचे स्थान प्राप्त करून द्यायचे होते.
ली म्हणजे सिंगापूरला लाभलेला एक आगळावेगळा असा पंतप्रधान होता. सतत नवनवीन गोष्टी शिकून घेऊन स्वतःला अद्ययावत ठेवणे हा ली यांचा स्वभाव होता. ली यांनी अशीच एक आगळीवेगळी गोष्ट केली. त्यांनी सिंगापूरच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळत असतानाच १९६८ मध्ये अमेरिकेतील सुप्रसिद्ध हार्वर्ड बिझिनेस स्कुलमध्ये व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम शिकण्यासाठी प्रवेश घेतला. पंतप्रधान पदावर कार्यरत असताना जगातील कोणत्याही पंतप्रधानाने यापूर्वी असे केले नव्हते. या मॅनेजमेंटच्या अभ्यासाचा उपयोग त्यांना सिंगापूरचे व्यवस्थापन उत्तम प्रकारे करण्यासाठी आणि सिंगापूरला प्रगतीपथावर नेण्यासाठी झाला.
सिंगापूरमध्ये कमालीची विषमता होती. केवळ काही मोजक्याच लोकांजवळ स्वतःची घरे होती. ज्यांच्या हाती उद्योग आणि संपत्ती केंद्रित झाली होती, अशा लोकांजवळ भरपूर पैसे, स्वतःची प्रशस्त घरे होती. बहुसंख्य जनता झोपडीतच राहत होती. अवतीभवती घाणीचं साम्राज्य होतं. लोकांना उद्योगधंदा नव्हता. तसे लोक मेहनती पण त्यांना रोजगार उपलब्ध नव्हता. ली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या झोपडपट्टीत राहणाऱ्या आणि कामगार वर्गाला स्वतःची घरे मिळवून द्यायची योजना आखली. त्यासाठी हौसिंग डेव्हलपमेंट बोर्ड स्थापन केले. अत्यंत कमी किमतीत गरीब जनतेला सुंदर आणि आवश्यक सुखसोयींनी युक्त अशी घरे बांधून दिली. अशा रीतीने झोपडपट्टीचा प्रश्न निकाली काढला. पण लोकांना अजून स्वच्छता, आरोग्याचे महत्व पटले नव्हते.
त्यांच्या मंत्रिमंडळाने यासाठी अत्यंत कडक कायद्यांची तरतूद केली. लोकांचे प्रबोधन करणे आणि नियमांचे उल्लंघन केल्यास कडक शिक्षा वा दंड करणे अशी दुहेरी पद्धत त्यांनी अवलंबली. इमारतींभोवती घाण आढळली तर इमारतीत राहणाऱ्या सगळ्याच रहिवाशांना दंड भरावा लागे. बसमध्ये किंवा रस्त्यावर एखाद्या मुलाने घाण केली तर पोलीस त्याच्या पालकांना बोलावून ती घाण साफ करायला लावत. कितीही मोठा उच्चपदस्थ अधिकारी वा व्यक्ती असली तरी त्याची या शिक्षेतून सुटका होत नव्हती.
येथील वाहतुकीचे नियम तर अतिशय कडक आहेत. वाहतुकीच्या नियमांचे लोक कसोशीने पालन करतात. सिग्नल कोणीही तोडत नाही. वेगाची ठरलेली मर्यादा कोणीही ओलांडत नाही. नियम तोडल्यास जबर शिक्षा किंवा दंड भरावा लागतो. लोकांच्या अंगवळणी पडलेल्या सवयी बदलायला वेळ जरूर लागतो. पण राजकीय नेतृत्वाकडे इच्छाशक्ती आणि दूरदृष्टी असेल तर यात नक्की सुधारणा होऊ शकते. लोकांच्या सवयी बदलतात आणि त्यांना शिस्त लागते हे आपल्याला सिंगापूरकडे पाहिले म्हणजे कळते.
सिंगापूरमध्ये सुरुवातीला प्रचंड भ्रष्टाचार होता. ली यांनी कठोरपणे हा भ्रष्टाचार निपटून काढायचे ठरवले. त्यासाठी कडक कायदे केले. भ्रष्टाचार विरोधी पथकाला त्यांनी त्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिलं. सामान्य माणूस असो, मंत्रीअसो वा अधिकारी, भ्रष्टाचार सिद्ध झाला तर त्यांना तुरुंगवास हा अटळ. आज सिंगापूर भ्रष्टाचार मुक्त राष्ट्रातील एक देश आहे.
कामचुकार लोकांसाठी त्यांच्या प्रशासनात जागा नव्हती. शिस्तप्रिय आणि काम करणाऱ्या लोकांना हुशार विद्यार्थ्यांना त्यांनी उत्तेजन दिले. अमली पदार्थ जवळ बाळगणे वा त्याची तस्करी करणे हा गंभीर गुन्हा आहे. हा गुन्हा सिद्ध झाल्यास सिंगापूरमध्ये अशा व्यक्तीला फाशीच्या शिक्षेपासून कोणी वाचवू शकत नाही.
पंतप्रधान झाल्यानंतर सिंगापूरच्या रक्षणाच्या दृष्टीने ली यांनी अत्याधुनिक लष्कराची उभारणी केली. त्यासाठी इस्रायल या छोट्या देशाचा आदर्श त्यांच्यासमोर होता. इस्रायलच्या मदतीने आणि मार्गदर्शनाखाली त्यांनी अत्यंत सुसज्ज, शिस्तबद्ध आणि लढाऊ लष्कराची बांधणी केली. आज सिंगापूरचे लष्कर जगातील श्रेष्ठ लष्करांपैकी एक आहे. सिंगापूरमधील अठरा वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांना दोन वर्षे राष्ट्रीय सेवा योजनेसाठी द्यावी लागतात. त्यात लष्करी शिक्षणाचा समावेश असतो. या योजनेत प्रशिक्षणासाठी विविध धर्म, भाषा आणि वंशाचे तरुण एकत्र येतात. या प्रशिक्षणादरम्यान त्यांच्यातील धर्म, भाषा आदींच्या जाणीवा बोथट होऊन आपण सगळे सिंगापूरवासी आहोत, सिंगापूरचे नागरिक आहोत आणि त्या राष्ट्राच्या भल्यासाठी आपल्याला काम करायचे आहे अशी राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होते.
ली आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सगळेच सहकारी आपल्या देशासाठी झटणारे होते. अर्थात ली आणि त्यांचे बुद्धिमान सहकारी गोह केंग स्वी, लिम किन स्विम आणि इतरांनी सिंगापूरसाठी अथक कष्ट तर झेललेच पण आपल्या सहकाऱ्यांमध्ये आणि देशातील नागरिकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले.
सिंगापूरमधील लोक मेहनती तर होतेच. ली सरकारच्या धोरणांमुळे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या सिंगापूरमध्ये आल्या. अनेक नवीन उद्योग सुरु झाले. लोकांच्या हातांना रोजगार मिळाला. सिंगापूरमध्ये उपलब्ध असलेली जमीन फार कमी होती. जी काही थोडीफार जमीन होती, तिची धूप मोठ्या प्रमाणात होऊन ती नापीक झाली होती. अशा जमिनीच्या वरच्या थरात भर घालून त्या जमिनीची सुपीकता वाढवण्यात आणि धूप थांबविण्यात त्यांनी यश मिळवले. तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन त्या जमिनीवर वृक्ष लागवड केली. सिंगापूरला जगातील सर्वात जास्त हरित शहरांपैकी एक बनवण्याचा चमत्कार करून दाखवला.
देशाच्या नेतृत्वाकडे दूरदृष्टी असेल तर असलेल्या समस्यांवर रडत न बसता हातात जे काही उपलब्ध असेल,त्याच्या साहाय्याने कशी प्रगती करता येते हे सिंगापूरकडे पाहिले तर आपल्याला कळू शकते. सिंगापूरच्या पर्यटन व्यवसायाला ली यांनी चालना दिली. सिंगापूरला आज पर्यटन व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर परकीय चलन प्राप्त होते. सिंगापूर हे जगातील अनेक लोकांच्या दृष्टीने उत्तम पर्यटनस्थळ आहे.