“भाजलेल्या शेंगा” लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
“भाजलेल्या शेंगा” लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

मंगलवार, 19 जुलाई 2022

“भाजलेल्या शेंगा”

 “भाजलेल्या शेंगा” 


खूप दिवसांनी छान गाढ झोप लागली. जाग आल्यावर हॉस्पिटलमध्ये आहोत हे लक्षात यायला काही क्षण लागले. बेल वाजवल्यावर रुममध्ये नर्स आल्या.

“गुड ईव्हिनिंग सर,”

“कोणी भेटायला आलं होत का?

“नाही”

“बराच वेळ झोपलो होतो म्हणून विचारलं” मोबाईलवरसुद्धा एकही मिस कॉल किवा मेसेज नव्हता.

“आता कसं वाटतंय” नर्स 

“प्रचंड बोर झालंय”

“तीन दिवसात ते प्यून काका सोडून तर भेटायला दुसरं कोणीच कसं आलं नाही?”

“सगळे बिझी असतील”

“आपलं माणूस म्हणून काळजी आहे कि नाही” नर्स बोलत होत्या, पण मी काहीच उत्तर दिलं नाही.

“सॉरी, मी जरा जास्तच बोलले.” नर्स 

“जे खरं तेच तर बोललात!”

ब्लडप्रेशर तपासताना दोन-तीन वेळा ‘सॉरी’ म्हणून नर्स निघून गेल्या. त्यांनी सहजपणे म्हटलेलं खोलवर लागलं. दोन शब्द बोलायला, विचारपूस करायला हक्काचं, प्रेमाचं कोणीच नाही याचं खूप वाईट वाटलं. एकदम रडायला आलं. भर ओसरल्यावर बाहीने डोळे पुसले. डोक्यात विचारांचा पंखा गरागरा फिरायला लागला.अस्वस्थता वाढली.

आज मला काही कमी नाही. मोठा बंगला, फार्म हाउस, तीन तीन गाड्या, भरपूर बँक बॅलन्स, सोशल स्टेटस सगळं आहे, तरीही मन शांत नाही. कशाची तरी उणीव भासतेय. प्रत्येकजणच स्वार्थी असतो, पण मी पराकोटीचा आहे. प्रचंड हुशार, तल्लख बुद्धी परंतु तिरसट, हेकेखोर स्वभावामुळे कधीच आवडता नव्हतो. फटकळ बोलण्यामुळे फारसे मित्र नव्हते. जे होते तेसुद्धा लांब गेले. माझ्या आयुष्यात कधीच कोणाला ढवळाढवळ करू दिली नाही अगदी बायकोलासुद्धा. तिला नेहमीच ठराविक अंतरावर ठेवलं. लौकिक अर्थाने सुखाचा संसार असला, आमच्यात दुरावा कायम राहिला. पैशाच्या नादात म्हातारपणी आई-वडिलांना दुखावले. मोठ्या भावाला फसवून वडिलोपार्जित संपत्ती नावावर करून घेतली. एवढं सगळं करून काय मिळवलं तर अफाट पैसा सोबत विकृत समाधान आणि टोचणारं एकटेपण. विचारांची वावटळ डोक्यात उठली होतो. स्वतःचा खूप राग आला. मन मोकळं करायची इच्छा झाली. बायकोला फोन केला पण उगीच डिस्टर्ब करू नकोस. काही हवं असेल तर मेसेज कर असं सांगत तिनं फोन कट केला. तारुण्याच्या धुंदीतल्या मुलांशी बोलायचा तर प्रश्नच नव्हता.

......फोन नंबर पाहताना दादाच्या नंबरवर नजर स्थिरावली. पुन्हा आठवणींची गर्दी. दादाचा नंबर डायल केला पण लगेच कट केला कारण आमच्यातला अबोला. तीन वर्षांपूर्वी आमच्यात कडाक्याचे भांडण झालं होत. त्यानंतर  पुढाकार घेऊन दादानं समेटाचा प्रयत्न केला पण माझा ईगो आडवा आला. म्हणूनच आता तोंड उघडायची हिंमत होत नव्हती तरीपण बोलावसं वाटत होतं. शेवटी धाडस करून नंबर डायल केला आणि डोळे गच्च मिटले.

“हं” तोच दादाचा आवाज 

“दादा, मी बोलतोय”

“अजून नंबर डिलीट केलेला नाही”

“कसायेस”

“फोन कशाला केलास”

“तुझा राग समजू शकतो.खूप चुकीचा वागलो.गोड गोड बोलून तुला फसवले” ठरवलं नसताना आपसूकच मनात साठलेलं धाडधाड बोलायला लागलो.

“मुद्द्याचं बोल.उगीच शिळ्या कढीला ऊत आणू नकोस. आपल्यात आता काही शिल्लक राहिलेलं नाही”

“दादा, इतकं तोडून बोलू नकोस”

“मी तर फक्त बोलतोय. तू तर..........”

“पैशाच्या नादानं भरकटलो होतो. चुकलो.”

“एकदम फोन का केलास. सगळ्या वाटण्या झाल्यात आता काहीच शिल्लक नाही”

“मला माफ कर” म्हणालो पण पलीकडून काहीच उत्तर आलं नाही.

“दादा!!!”

“ऐकतोय, काय काम होतं”

“माझ्याकडून डोंगराएवढ्या चुका झाल्यात”

“मुद्द्याचं बोल”

“झालं गेलं विसरून जा.”

“ठीकय”दादा कोरडेपणाने बोलला परंतु मी मात्र प्रचंड भावूक झालो.

“झालं असेल तर फोन ठेवतो”

“आज सगळं काही आहे अन नाहीही.”

“काय ते स्पष्ट बोल”

“हॉस्पिटलमध्ये एकटा पडलोय”

“का, काय झालं” दादाचा आवाज एकदम कापरा झाला.

“बीपी वाढलंय. चक्कर आली म्हणून भरती झालोय. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय.”

“सोबत कोण आहे ”

“कोणीच नाही. दिवसातून दोनदा बायको आणि मुलं व्हिडीओ कॉल करून विचारपूस करायचं कर्तव्य पार पाडतात”

“अजबच आहे”

“जे पेरलं तेच उगवलं. मी त्यांच्याशी असाच वागलोय. कधीच प्रेमाचे दोन शब्द बोललो नाही. फक्त व्यवहार पाहिला. स्वार्थासाठी नाती वापरली आणि तोडली. आता एकटेपणाने कासावीस झाल्यावर डोळे उघडलेत”

कंठ दाटल्याने फोन कट केला. अंधार करून पडून राहिलो. बऱ्याच वेळानंतर नर्स आल्या. लाईट लावून हातात कागदाचा पुडा दिला.मस्त घमघमाट सुटला होता. घाईघाईने पुडा उघडला तर त्यात  भाजलेल्या शेंगा. प्रचंड  आनंद झाला.

“नक्की दादा आलाय. कुठंय????”

“मी इथचं आहे” दादा समोर आला. 

आम्ही सख्खे भाऊ तीन वर्षानंतर एकमेकांना भेटत होतो. दोघांच्याही मनाची विचित्र अवस्था झाली. फक्त एकमेकांकडे एकटक पाहत होतो. नकळतपणे माझे हात जोडले गेले.

“राग बाजूला ठेवून लगेच भेटायला आलास.” 

“काय करणार तुझा फोन आल्यावर रहावलं नाही. जे झालं ते झालं. आता फार विचार करू नको.”

“तुला राग नाही आला” 

“खूप आला. तीन वर्षे तोच कुरवाळत होतो पण आज तुझ्याशी बोलल्यावर सगळा राग वाहून गेला.तुला आवडणाऱ्या भाजलेल्या शेंगा घेतल्या आणि तडक इथं आलो”

“दादा!!!!!....”मला पुढे काही बोलता येईना. दादानं डोक्यावरून हात फिरवला तेव्हा खूप शांत शांत वाटलं.

“राग कधीच नात्यापेक्षा मोठा नसतो. मग ते रक्ताचं असो वा मैत्रीचं.चुका,अपमान काळाच्या ओघात बोथट होतात.जुन्या गोष्टींना चिकटून बसल्याचा त्रास स्वतःलाच जास्त होतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव - आपलं नातं म्हणजे फेविकोल का जोड ... ..” 

दादा लहानपणी द्यायचा तसचं शेंगा सोलून दाणे मला देत बोलत होता.त्या भाजलेल्या खरपूस दाण्यांची चव अफलातून होती.

सहज कचऱ्याच्या डब्याकडे लक्ष गेलं त्यात शेगांच्या टरफलाच्या जागी मलाच माझा इगो दिसत होता!!

fly