कार आता तुम्हाला चालवायला आली आहे. म्हणजे तुम्ही कार इंजिन स्टार्ट करू शकता, क्लच दाबून पहिल्या गिअरमध्ये कार टाकता, क्लच हळूहळू उचलत अॅक्सिलेटर देता देता कार आता ‘ऱ्हिदम’ पकडू लागते. गर्दीतूनही कार काढता, ती ही हळूहळू. सर्व गिअर तुम्हाला कळले आहेत. कार रिव्हर्समध्येही नेता येते. हे सर्व तुम्हाला नीट समजलं, आत्मसात केलं म्हणून काही कार चालवता आलीच, असे होत नाही.
माणूस खरी कार चालवायला शिकतो ते लाँग ड्राईव्हवर. खरा सराव लांब पल्ल्याच्या अंतरावरच होतो. त्याच्यासाठी शहरापासून ५०-१०० किलोमीटर अंतरावरच्या एखाद्या ठिकाणी जाण्याची तयारी करावी. घरून तुम्ही लांब पल्ल्याच्या ठिकाणी निघाला आहात. आधी कारची कागदपत्रे नीट बघून कारमध्ये ठेवा. ड्रायव्हिंग लायसन्स खिशात असू द्या. ड्रायव्हिंग सीटवरचा बेल्ट तुम्हाला लावावा लागेल. नागपूरसारख्या शहरात हा बेल्ट चालकानं लावला नाही तर दंड होतो. शहरात कार चालवताना ड्रायव्हरला आणि त्याच्यासोबत बसलेल्या व्यक्तीला हा बेल्ट लावावा लागतो. एकदम ब्रेक मारण्याचं काम पडल्यावर आपलं डोकं स्टिअरिंगवर आदळू नये, आपली कंबर मोडू नये म्हणून ही खबरदारी घ्यावी.
तर तुम्ही लाँग ड्राईव्हवर निघालात. रस्ता मोकळा दिसतो म्हणून दाबा अॅक्सिलेटर असं करू नका. तुम्हाला कार चालवता येते हा फाजील आत्मविश्वास ठेवू नका. रस्त्यावर कधी काय होईल हे सांगता येत नाही पण, म्हणून घाबरून जाण्याचंही काम नाही. रस्ता मोकळा दिसतो म्हणून सावधचित्ताने ५०-६० च्या वेगाने चला. तुमच्या समोर आता एखादा अवजड ट्रक आहे. त्याला ओव्हरटेक करू नका. सध्या आपण नुकतीच कार चालवायला शिकलो आहोत. जाऊ द्या कार त्या ट्रकच्या मागोमाग पण, विशिष्ट अंतर ठेवायचं आहे. निदान १०० फुटांचे. समोरचा ट्रक केव्हाही जागेवर थांबू शकतो. ट्रक आणि आपल्या कारमध्ये काही अंतर नसेल तर आपण ट्रकवर जाऊन आदळू शकतो. नवशिक्या चालकानं जास्त ओव्हरटेकच्या भानगडीत पडू नये. अधिकतर अपघात ओव्हरटेकमुळे होतात. ओव्हरटेक कसे करायचे हे आपण पुढच्या प्रकरणात पहाणारच आहोत पण, तूर्तास आपण लाँग ड्राईव्हला निघालो आहोत. रस्ता मोकळा आहे पण, समोरुन अवजड ट्रक चाललेला आहे.
याशिवाय रस्त्यावरून वाहनं सुरू असतात. मोटारबाईकवाले, एखादी एस.टी. जात असते. सकाळची वेळ असेल तर म्हशी, गाई, बकऱ्या कळपाकळपानं जंगलाकडे चरायला निघालेले असतात. गुराखी त्यांच्या गुरांना आवरतील असे नाहीच. तेही मुद्दाम जनावरांना रस्त्यावरून चालू देत असतात. एखादी बैलगाडी येत जात असते. बैलगाडीच्या जवळून आपली कार काढताना बरच अंतर ठेवा, कारण कधी कधी बैल आवाजाने घाबरतात आणि बैलगाडी रस्त्याच्या मधोमध येते. अशा वेळी लगेच गिअर बदला म्हणजे पहिल्या किंवा दुसऱ्या गिअरमध्ये कार घ्या. कार हळूहळू चालवायचा आपल्याला सराव झालाच आहे. हळूहळू कार बैलगाडीच्या जवळून काढा.
पुढे असा प्रसंग येतो की, जनावरांनी संपूर्ण रस्ता व्यापलेला आहे. अशा वेळी आपली कार जागेवर उभी राहिली पाहिजे. तरी एखादी म्हैस आपले शिंग कारला घासत जाणार म्हणून हॉर्न एकसारखा वाजवत रहा. म्हणजे जनावरे अंतर ठेवून चालतील. हॉर्नचा उपयोग जसा माणसांसाठी होतो तसा तो या जनावरांसाठीही होतो. पुन्हा पहिला गिअर टाकून कार सुरू करा किंवा गिअरमध्येच ब्रेक देऊन कार थांबवली असेल तर ब्रेकवरचा पाय हळूच काढा. क्लच उचला. कार पळू द्या आता समोर, असे अडथळे वारंवार येत राहतात म्हणून चालक हा प्रत्येक क्षणाला अती दक्ष हवा. पुढे पुढे हा सगळा भाग सरावाचा होतो.
समोरच्या ट्रकला आपण ओव्हरटेक केलेले नाही. तो काहीशा अंतरावर दिसतो आहे. आपल्या समोरचा रस्ता तसा आता मोकळा आहे. म्हणून चाळीस पन्नासपर्यंत अॅक्सिलेटर द्या. मध्ये काही ठिकाणी रस्ता एकदम वळतो आहे, तसे चिन्ह रस्त्याच्या कडेला लागलेले आहे. अशा वेळेला अॅक्सिलेटर सोडून द्या. हलकासा ब्रेक दाबा. क्लचवरच पाय ठेवा. कार वळणाच्या रस्त्यावर कंट्रोलमध्ये असायला हवी. आपल्या डाव्या अंगानेच आपण वळण पार पाडलं पाहिजे. एखाद्या वेळी वळणाच्या ऐन मोक्यावर दुसरं वाहनही येते. म्हणून आपली डावी बाजू अधिक आखडती घ्यावी, अशा लाँग ड्राईव्हमध्ये वळणरस्ता दिसल्याबरोबर अॅक्सिलेटरवरचा पाय काढून घ्यावा.कार हळूहळू काढावी.
लाँग ड्राईव्हला जाताना रस्त्यावर अनेक गावं लागतात. गावातली माणसं रस्ता ओलांडत असतात, जनावरही रस्त्यावर असतात. स्पीड ब्रेकर असतात, अशा वेळेला लगेच गिअर बदलून कार हळूहळू चालवावी, म्हणजे दुसऱ्या गिअरमध्ये कार घ्यावी. स्पीड ब्रेकरसाठी क्लच, ब्रेक दाबावा. ब्रेकवरचा पाय काढून अॅक्सिलेटरवर ठेवा. क्लच आणि अॅक्सिलेटरच्या संयोगातून स्पीड ब्रेकरवरून कार हलकेच काढा. लांबच्या रस्त्यावरून कार चालवताना रस्त्यावरच्या संकेतांकडेही लक्ष ठेवावे. पुढे स्पीड ब्रेकर आहेत, याची सूचना आपल्याला आधीच मिळते. अशा वेळेला कार हळूहळू चालवावी. एखाद्या वेळेला आपण ऐटीत ५०-६० च्या वेगात चाललेलो असतो तेव्हा स्पीड ब्रेकर दिसत नाही. मग कार उसळते, असे होऊ नये यासाठी कार चालवताना रस्त्यावरच्या संकेतांकडे लक्ष ठेवावे. ज्याला कार चालवायची आहे, त्याने सगळीकडे नजर ठेवली पाहिजे. एखाद्या कारला आपल्या पुढे जायचं आहे, तर मागाहून येणारी कार आपल्या आरशात दिसायला हवी. आरसे नीट लावले तर ती दिसतेच. मागचा कारवाला हॉर्न वाजवतो तेव्हा आरशात त्याला एकदा बघून घ्यावं आणि डाव्या अंगाला कार थोडीशी वळवून घ्यावी. म्हणजे आपल्याला ओव्हरटेक करताना मागचा कारवाला व्यवस्थित निघू शकेल. या प्रकरणात आपण ओव्हरटेक करीत नाही. इतरांना पुढे जाण्यासाठी किंवा ओव्हरटेक करण्यासाठी सांगत आहोत. ओव्हरटेक करणे हा एक स्वतंत्र विषय आहे. त्याची चर्चा आपण पुढील प्रकरणात करणार आहोत.
लाँग ड्राईव्ह करताना मागच्यांना सर्रास पुढे जाऊ द्यावे. आपल्याला घाई नाही, आपण नुकतेच कार चालवायला शिकलो आहोत. ज्या रस्त्यावरून आपण कार चालवत आहोत त्या मोठय़ा रस्त्याला अनेक ठिकाणी लहान रस्तेही येऊन मिळतात. चौक तयार होतो, अशा वेळी कारला लगेच आवर घालावा. अॅक्सिलेटर सोडून द्यावे. एखाद्या वेळी आपल्याला चहा प्यावासा वाटतो, अशा वेळी आपली कार डाव्या भागाने रस्त्याच्या थोडी खाली घ्यावी. रस्त्यावर उभी करू नये. पार्किंग लाईट सुरू ठेवावे. खुशाल चहा-पाणी आटपावे पण, कारमध्ये बसल्यावर पहिल्यांदा पार्किंग लाईट बंद करावेत.
लाँग ड्राईव्हनं चालक अनुभवसंपन्न होतो. या अनुभवातून स्वत:चे निष्कर्ष, अंदाज त्याला काढता येतात. आत्मविश्वास वाढतो, स्टिअरिंगवर बसल्यावर कुठल्याही गोंधळाचे भाव मनावर नकोत किंवा कुठलंही दडपण नको. यासाठी लाँग ड्राईव्हचा अनुभव प्रत्येक नवशिक्या चालकाने घेतलाच पाहिजे. रस्ता मोकळा दिसला की अॅक्सिलेटर देता येते पण, एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवावी की आपला वेग ७०-८० च्या पुढे जाऊ नये. नवशिक्या चालकाने जास्तीत जास्त वेगमर्यादा ५०-६० पर्यंतच ठेवावी. त्यामुळे आपली कार पाहिजे तेव्हा कंट्रोल करता येते. ८० वेगमर्यादेच्या पुढे कारला आवरणं कठीण जाते. मग आवाक्यात राहून, कार चालवणं केव्हाही योग्यच.
अनेक ठिकाणी रस्त्याची कामं सुरू असतात. तेव्हा तेथे ‘डायव्हर्शन’चे बोर्ड लागलेले असतात. अशा वेळी आपली कार दुसऱ्या गिअरमध्ये घेऊन हळूहळू डायव्हर्शनमधून काढावी. वळण घेणारा हा रस्ता कधीकधी कच्चा असतो. असंख्य उंचवटे, खोलगट भाग असतात रस्त्यावर तेव्हा कार जपून पुढे काढावी. डायव्हर्शन म्हणजे तुमच्या कारला ब्रेकच लागला आहे, त्यामुळे अत्यंत सावधतेनं डायव्हर्शनचा रस्ता कापावा. कारण समोरूनही वाहनं येत असतात.
लाँग ड्राईव्ह हे चालकासाठी वैविध्यपूर्ण अनुभवाचं गाठोडं असते म्हणून नवशिक्या चालकाने हा अनुभव घेतलाच पाहिजे. खऱ्या ड्राईव्हिंगचा अनुभवही येथे आनंद देत असतो. जेवढा आनंद आहे तेवढाच धोकाही आहे म्हणून रिस्क घ्यायचीच नाही असे नाही. तुम्ही स्वत:ची कार घेतली आहे ना, मग मुळात हीच फार मोठी रिस्क आहे. मग आता घाबरायचं कशाला? आव्हान पेलण्यालाच मानवी जीवन म्हणावं.
सोमवार, 3 मई 2010
सेफ ड्रायव्हिंग : ओव्हरटेक करताना
नियमांचं काटेकोर पालन तुम्ही करत आहात आणि नवशिके चालक आहात तरी आपल्याला ओव्हरटेक करायचं आहे. तुमची कार ६०-७० च्या वेगानं हायवेवर धावते आहे. समोर ट्रकची रांगच रांग आहे. उजव्या बाजूनेही ट्रक एकामागून एक येत आहेत. या परिस्थितीत ट्रकच्या मागे विशिष्ट अंतर सोडून तुम्ही कार चालवत आहात. समोर जो ट्रक आहे, त्याच्या चालकाला तुम्ही मागे आहात हे दिसलं पाहिजे. यासाठी पहिल्यांदा हॉर्न वाजवा. कार थोडी उजव्या अंगानं घ्या. ट्रकच्या साईड मिररमध्ये तुम्हाला ट्रक ड्रायव्हरचा चेहरा दिसू लागतो. ट्रक चालकाच्या लक्षात येते, एक कार मागे आहे, तिला पुढे निघायचं आहे पण, पुढेही अजून ट्रक आहेत आणि समोरूनही ट्रक येत आहेत. आपली उजवी बाजू मोकळी दिसली की पुन्हा उजवीकडे कार घ्या. ट्रक ड्रायव्हर साईड मिररकडे बघेल. समोरून वाहन येत नसेल तर ट्रक ड्रायव्हर हात बाहेर काढून तुम्ही पुढे व्हा असे सांगतो. अशा वेळी लगेच तिसऱ्या गिअरमध्ये कार घेऊन समोरच्या ट्रकपेक्षा अधिक वेग घेऊन कार उजव्या अंगानं काढावी. पहिला ट्रक मागे पडल्याबरोबर एकदम डावीकडे कार घेऊ नका. मागे पडलेला ट्रक स्टिअरिंगवरच्या आरशात (मिरर) दिसायला हवा. तुमच्या समोर आता दुसरा ट्रक आहे. समोरच्या दिशेनं वाहन येत नसेल तर त्याच वेगात दुसरा ट्रकही तुम्हाला ओलांडायचा आहे पण, समोर वाहन येताना दिसते आहे, अशा वेळी आपल्या कारचे डावीकडे जाण्याचे इंडिकेटर सुरू करावे. म्हणजे मागच्याला समोरून वाहन येत आहे आणि कारवाल्याला आपल्या समोर राहायचं आहे हे कळेल. ट्रकचालक स्वत:च्या ट्रकचे स्पीड कमी करतो. आपली कार दोन नंबरच्या ट्रक मागे चालू देतो. हायवेवर कार चालवणं म्हणजे खो-खोचाच खेळ असतो. इथं धावणारा गडी चुकायला नको. दुसऱ्या तिसऱ्या चवथ्या ट्रकला याच पद्धतीनं मागे टाकत पुढे निघायचं आहे पण, नजर एकटक समोर पाहिजे. आपल्या मागेही भरधाव ट्रक आहेत. समोरूनही अवजड वाहनं येत आहेत. घाबरून जायचं कारण नाही. आपल्या सारखेच सगळे वेगावर स्वार झाले आहेत. चवथा ट्रकही आपण ओलांडला. आता समोर काही नाही पण, समोरून येणारी वाहनं आहेत. (समोरून म्हणजे आपल्या विरुद्ध दिशेनं) आपल्याला आता आपल्या लेनमधूनच कार पुढे पळवायची आहे. एखाद्या वेळी दुसरा कारवाला आपल्यासमोर मागाहून ओव्हरटेक करीत येतो. त्याचा सन्मान करून त्याला आपल्यापुढे राहू द्या. काहीच हरकत नाही. कारण तो अतिशय वेगानं आला आहे. त्याची बरोबरी आपल्याला करायची नाही. आता आपल्यामागे ट्रकची रांग आहे. समोर दुसरा कारवाला आहे. तो फार वेळ आपल्या समोर राहणार नाही. तो पुढे निघून जाणार आहे. त्या घाईनेच तो आला आहे. तुमची साठ-सत्तरची स्पीड कायम ठेवा. यापेक्षा अधिक स्पीड घ्यायची नाही. या तुमच्या स्पीडमध्येही ट्रक आरामशीरपणे मागे पडत आहेत. दुसरी कार तर समोर निघून गेली पण, पुन्हा अवजड ट्रक समोर दिसतो आहे. ट्रकच्या समोरचा रस्ता आपल्याला दिसत नाही. एक तर लांबलचक ट्रक, किती टायर लागलेले आहेत तेही कळत नाही. त्यावर मालाची अवाढव्य इमारत. तरी पुन्हा घाबरून जाण्याचं कारण नाही. आपली कार त्या ट्रकच्या मागे, काही विशिष्ट अंतर ठेवून चालवायची. वेग कमी होतो आहे, तिसरा गिअर टाका. एकदा उजवीकडे वळा. पुन्हा आपल्या रांगेत या. हे वळण म्हणजे एकदम उजवीकडे कार घ्यायची नाही. समोरच्या ट्रकचालकाचं लक्ष आपल्याकडे गेलं पाहिजे यासाठी क्षणभर कार थोडी उजवीकडे वळवून घ्यायची, पुन्हा आपल्या रांगेत आणायची. हायवेवर रांग सोडायची नाही कधी. समोरचा रस्ता मोकळा असेल तेव्हा ट्रकवाला आपल्याला साईड देईल. तोपर्यंत चालू द्या त्याच्या मागोमाग. हॉर्न वाजवणं सुरू ठेवा. मध्येच रात्रीचा लावतो तो लाईट एकदा लावा. बंद करा. आपण मागे आहोत याचा त्रास त्या ट्रकचालकाला होत असतो. रस्ता मोकळा झाल्यावर तो लगेच हात बाहेर काढतो. त्याच्या बाजूनं निघून आपल्याला त्याच्या समोर चालायचं आहे. आपली कार तिसऱ्या गिअरमध्येच आहे. लांबलचक ट्रकला ओलांडताना हा तिसरा गिअरच हवा. अॅक्सिलेटर द्या. गाडी ट्रकच्या समोर आणा पण, एक लक्षात ठेवा. ट्रक जवळून आपली कार निघाल्यावर लगेच डावीकडे घेऊ नका. पहिल्यांदा उजवीकडून सरळ सरळ जा. समोरून म्हणजे विरुद्ध दिशेनं वाहन येत असेल तर मागे पडलेल्या लांबलचक ट्रकला इंडिकेटर द्या. ट्रकवाला सावध राहतो.
हायवेवर कार चालवताना रस्ता अभावानेच मोकळा सापडतो. मोकळा रस्ता सापडला की चालू ठेवावी ६०-७० स्पीड. यापेक्षा अधिक नको. १०० च्या स्पीडनं कार चालवणारा आपल्या मागून केव्हा येईल याचा नेम नसतो. म्हणून आपल्या लेनमधूनच कार चालवावी. हायवेवर खो-खो खेळण्याचा चांगला सराव झाला की, तुमची कार १०० च्या स्पीडनं पळू लागेल. तूर्तास आपण नवशिके ड्रायव्हर आहोत हे लक्षात ठेवावं.
ओव्हरटेक करताना रस्ता कसा आहे हे समजणंही महत्त्वपूर्ण आहे. हायवे असो की, आणखी कुठला रस्ता. अनेकदा हायवेवर देखील मोठाले खड्डे पडत असतात. खड्डय़ांचा रस्ता दिसला तर ओव्हरटेक टाळावं. नाही तर एखादा ट्रक समोर निघण्यासाठी आपल्याला संकेत देतो आणि आपण ट्रकजवळून कार न्यायला लागतो. ट्रक आणि आपली कार समांतर चालत असतात. अचानक आपल्याला खड्डा समोर दिसतो अशावेळी खड्डय़ातून कार काढावी लागते. कारचा बॅलेन्स बिघडतो. कार ट्रकच्या दिशेनं वळू लागते, असे प्रसंग येत राहतात म्हणून ओव्हरटेक करताना रस्त्याचाही अंदाज चालकाला घेता आला पाहिजे.
ओव्हरटेक करताना नियमांचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. ज्याला ओव्हरटेक करायचं त्याला आपण पाठीमागे आहोत हे दिसायला हवं. त्याला हॉर्न देऊन मला पुढे निघायचं आहे ही सूचना दिली पाहिजे. जोपर्यंत समोरचा जाण्यासाठी आपल्याला हात दाखवत नाही किंवा संकेत देत नाही तोपर्यंत आपली कार वाहनाच्या समोर काढायची नाही. रस्ता मोकळा असेल तर आपल्या समोरचं वाहन आपल्याला पुढे जाण्याचा संकेत देतेच. हायवेवर मला अनेकदा ट्रकवाले संकेतांचं व्यवस्थित पालन करताना दिसले आहेत. याउलट एस.टी.वाले किंवा खाजगी ट्रॅव्हल्सवाले सर्व संकेत, नियम झुगारून गाडय़ा चालवताना दिसले आहेत. भन्नाट वेगात ओव्हरटेक कधीच करू नये. आपलं वाहन मागे राहिलं तरी चालेल. वेगात असलेल्या वाहनावर केव्हाही कठीण प्रसंग येऊ शकतो. कार चालवताना आपल्यासोबत आपली जीवाभावाची माणसंही असतात. आपल्या एखाद्या चुकीचा क्षण त्यांच्याही जीवावर बेतू शकतो ही जाणीव सदैव ठेवली पाहिजे. हायवेवर ओव्हरटेक करताना थट्टा मस्करी, विनोद किंवा चर्चा कारमध्ये व्हायला नको. ड्रायव्हर विचलित होतो. त्याचं अर्धवट लक्ष गप्पा-गोष्टींकडे असते. अनेकदा अपघात या असल्या गोष्टींमुळेही घडतात. ही जबाबदारी कारमध्ये बसलेल्या लोकांनी पाळायची असते.
हायवेवर कार चालवताना रस्ता अभावानेच मोकळा सापडतो. मोकळा रस्ता सापडला की चालू ठेवावी ६०-७० स्पीड. यापेक्षा अधिक नको. १०० च्या स्पीडनं कार चालवणारा आपल्या मागून केव्हा येईल याचा नेम नसतो. म्हणून आपल्या लेनमधूनच कार चालवावी. हायवेवर खो-खो खेळण्याचा चांगला सराव झाला की, तुमची कार १०० च्या स्पीडनं पळू लागेल. तूर्तास आपण नवशिके ड्रायव्हर आहोत हे लक्षात ठेवावं.
ओव्हरटेक करताना रस्ता कसा आहे हे समजणंही महत्त्वपूर्ण आहे. हायवे असो की, आणखी कुठला रस्ता. अनेकदा हायवेवर देखील मोठाले खड्डे पडत असतात. खड्डय़ांचा रस्ता दिसला तर ओव्हरटेक टाळावं. नाही तर एखादा ट्रक समोर निघण्यासाठी आपल्याला संकेत देतो आणि आपण ट्रकजवळून कार न्यायला लागतो. ट्रक आणि आपली कार समांतर चालत असतात. अचानक आपल्याला खड्डा समोर दिसतो अशावेळी खड्डय़ातून कार काढावी लागते. कारचा बॅलेन्स बिघडतो. कार ट्रकच्या दिशेनं वळू लागते, असे प्रसंग येत राहतात म्हणून ओव्हरटेक करताना रस्त्याचाही अंदाज चालकाला घेता आला पाहिजे.
ओव्हरटेक करताना नियमांचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. ज्याला ओव्हरटेक करायचं त्याला आपण पाठीमागे आहोत हे दिसायला हवं. त्याला हॉर्न देऊन मला पुढे निघायचं आहे ही सूचना दिली पाहिजे. जोपर्यंत समोरचा जाण्यासाठी आपल्याला हात दाखवत नाही किंवा संकेत देत नाही तोपर्यंत आपली कार वाहनाच्या समोर काढायची नाही. रस्ता मोकळा असेल तर आपल्या समोरचं वाहन आपल्याला पुढे जाण्याचा संकेत देतेच. हायवेवर मला अनेकदा ट्रकवाले संकेतांचं व्यवस्थित पालन करताना दिसले आहेत. याउलट एस.टी.वाले किंवा खाजगी ट्रॅव्हल्सवाले सर्व संकेत, नियम झुगारून गाडय़ा चालवताना दिसले आहेत. भन्नाट वेगात ओव्हरटेक कधीच करू नये. आपलं वाहन मागे राहिलं तरी चालेल. वेगात असलेल्या वाहनावर केव्हाही कठीण प्रसंग येऊ शकतो. कार चालवताना आपल्यासोबत आपली जीवाभावाची माणसंही असतात. आपल्या एखाद्या चुकीचा क्षण त्यांच्याही जीवावर बेतू शकतो ही जाणीव सदैव ठेवली पाहिजे. हायवेवर ओव्हरटेक करताना थट्टा मस्करी, विनोद किंवा चर्चा कारमध्ये व्हायला नको. ड्रायव्हर विचलित होतो. त्याचं अर्धवट लक्ष गप्पा-गोष्टींकडे असते. अनेकदा अपघात या असल्या गोष्टींमुळेही घडतात. ही जबाबदारी कारमध्ये बसलेल्या लोकांनी पाळायची असते.
सदस्यता लें
संदेश (Atom)