सोमवार, 3 मई 2010

सेफ ड्रायव्हिंग : रात्री कार चालवताना

स्वत:ची कार असेल तर दिवसा-रात्री कोणत्याही वेळेला कार बाहेर काढावी लागते. एखाद्यावेळी सकाळी आपण कार घेऊन निघालो पण, परत येताना संध्याकाळ किंवा रात्र होते. असे प्रसंग वारंवार येणार आहेत. कुणी म्हणेल काय हो, दिवसा आम्ही एवढी चांगली कार चालवतो, तर रात्रीही अशीच चालेल? चुकीचे आहे हे म्हणणे. दिवसा आणि रात्री कार चालवणे यात फार फरक आहे. रात्रीची कार चालवण्याचे स्वतंत्र ट्रेनिंगच हवे.
संध्याकाळच्या वेळी कार घेऊन परतीचा प्रवास सुरू झाला आहे. संध्याकाळ झाली आहे. अजून रात्र व्हायची आहे. जोपर्यंत दिवे लावण्याची गरज रस्त्यावर भासत नाही, तोपर्यंत जास्तीत जास्त अंतर कापण्याचा विचार करायला हवा. हा वेळ उगाच चहापाण्यासाठी कुठे घालवू नका. ऐन संध्याकाळी रस्त्यावर अडचणी खूप येतात. आपला वेग मंदावतो, जनावरे गावातल्या गोठय़ाकडे परत जाण्यासाठी रस्त्यावर आलेली असतात, शेतकरी काम आटोपून घराकडे-गावाकडे परतत असतात, मजूर असतात, बैलगाडय़ा असतात, रस्त्यावर नेहमीची इतर वाहनेही धावत असतात. ऐन संध्याकाळी अशा खूप अडचणी, अडथळे कारचालकाला येत असतात. एकसारखे क्लच दाबणे, ब्रेक देणे, स्पीड कमी करणे, गिअर बदलणे हे पाच-दहा मिनिटांच्या अंतराने कमी अधिक प्रमाणात सुरू असते. त्यामुळे वेग मंदावत असतो.
आपल्या कारला दिव्यांची गरज वाटायच्या आधी अधिकाधिक अंतर गाठणे हे काम संधीप्रकाशात व्हायला हवे. याचा अर्थ खूप वेगाने कार चालवा असा होत नाही. ताशी ६०-७० असाच वेग ठेवावा. अतिवेग हा नेहमीच प्राणावर बेतणारा ठरतो. ‘कॉन्फीडन्स’ आल्यावर हरकत नाही. तरी वेगावर आपण स्वार झालो आहोत. वेगाला आपल्यावर स्वार होऊ देऊ नये, ही दक्षता घेतली पाहिजे. संधीप्रकाश आता हळूहळू कमी होतो आहे. वाहनांनी डिप्पर लावून ठेवले आहेत. काही वाहने तशीच धावत आहेत. आणखी काही वेळाने रस्त्यावरचे दिसणार नाही. त्यावेळी आपल्या कारचे दिवे लावावेत. आता समोरून येणाऱ्या गाडय़ांचे प्रचंड प्रकाशझोत आपल्यावर पडतात आणि समोरचे काही दिसेनासे होते. वाहनेही अंदाज घेत घेत हळूहळू सरकत असतात. आपल्यालाही अंदाज घेत पुढे कार काढायची आहे. अशावेळी कार तिसऱ्या गिअरमध्ये घ्या. हळूहळू कार पुढे जाऊ द्या. रात्रीची ही अशी कार चालवणे अतिशय कौशल्याचे काम आहे.
आता अप्पर डिप्पर या दिव्याचे काम सुरू होते. विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाच्या प्रकाशझोतात समोरचे काहीच दिसत नाही. अशावेळेला अप्पर दिवा बंद करावा, डिप्पर सुरू ठेवा. डिप्पर सुरू ठेवल्यावरही आपल्याला दिसत नाही कारण, विरुद्ध दिशेने येणारे वाहन जवळ आलेले असते. त्याचा भडक प्रकाश त्रास देत असतो. वाहन निघून गेल्यावर लगेच अप्पर सुरू करा. म्हणजे आपल्या कारचा प्रकाश रस्त्यावर पडेल. समोरचा रस्ता चांगला दिसेल. रात्री ड्रायव्हिंग करणे तसे फार रिस्की समजले जाते पण, वाहतुकीच्या नियमाचे तंतोतंत पालन केले तर कुठलाही धोका संभवत नाही.
आता रात्रीच्या वेळेला कार चालवण्यासाठी कुठले वाहतुकीचे नियम आले असेही वाटण्याची शक्यता आहे. आपण वृत्तपत्र वाचता, बातम्या बघता. जास्तीत जास्त अपघात रात्रीचेच आहेत. त्यामुळे रात्री कार चालवताना दक्षता घेतलीच पाहिजे. अगदी अलर्ट राहिले पाहिजे. रस्त्यावर वाहने नाहीत म्हणून वेगमर्यादा वाढवू नये. ५०-६०-७० या रेंजमध्येच कार चालली पाहिजे. रस्त्यावर आपली एकटय़ाचीच कार असल्यामुळे समोरचा रस्ता व्यवस्थित दिसतो. म्हणून गाडीला अ‍ॅक्सिलेटर देत राहणे योग्य नव्हे. कधी कधी भडक प्रकाशातही रस्त्यावरचे खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे कॉन्स्टंट स्पीड मेन्टेन करावी. आपल्या कारच्या विरुद्ध दिशेने येणारी कार किंवा दुसरे वाहन हे एकमेकांच्या जसे जवळ येऊ लागतात, तसे समोरचे काहीच दिसत नाही. अशावेळेला डिप्पर द्यावा. डिप्पर दिल्यानंतरही काही दिसत नाही. अंदाज घेऊन कार समोरून काढावी लागते. कधी कधी रस्त्यावर एखादा ट्रक बिघाड होऊन थांबलेला असतो. त्याला इंडिकेटरही नसतात. मागचा दिवाही नसतो. या प्रकारानेही बरेचसे अपघात होतात. म्हणून रात्रीच्या ड्रायव्हिंगमध्ये वेग वाढवू नये. गाडी प्रत्येक क्षणाला कंट्रोलमध्येच असावी. एखाद्यावेळी विरुद्ध दिशेने समोरून एखादी मोटारसायकल येत आहे असे वाटते. प्रत्यक्षात मोटारसायकल जवळ आल्यावर आपल्या लक्षात येते की, तो एकच दिवा असलेला ट्रक आहे. त्याचा दुसरा लाईट बंद असतो. असले फसवे प्रकार रात्रीच्या ड्रायव्हिंगमध्ये पदोपदी होत असतात.
रात्रभर एकसारखी कार धावत असेल तर ड्रायव्हिंग करणाऱ्याला झोप येते. एखादी डुलकी लागू शकते. आपल्याला झोपेची गरज आहे, हे लक्षात घेऊन जवळपास असलेल्या गावाजवळ किंवा शहरालगत कार घेऊन जावी. रस्त्यावर दिवे आहेत, अशा जागी कार रस्त्याच्या बाजूला उभी करावी. मागील सीटवर काही वेळ विश्रांती घेऊन मग पुढे जाता येते. डुलक्यांवर डुलक्या येत असतील तर पुढे जाण्याचे टाळावे. व्यावसायिक गाडय़ांवर असलेले चालक दिवसभर गाडी चालवून दमलेले असतात. रात्रीच्या वेळी रस्त्यातल्या एखाद्या गावी मुक्काम केलेला बरा. दिवसरात्र ड्रायव्हर गाडी चालवत असेल तर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
अस्मादिकांना मात्र रात्रीचे ड्रायव्हिंग आवडते. रात्रीचे दीड दोन वाजत आहेत. ड्रायव्हिंग सीटवर आपण बसलो आहोत. बाजूच्या दरवाजाची काच खाली आहे. थंडगार हवा सुरू आहे. रस्त्यावर आपण एकटेच. लांबलचक पसरलेला रस्ता. आजूबाजूला डोंगराच्या रेषेदार कडा दिसत आहेत. आभाळ टपटप चांदण्यांनी बहरले आहे. एका विशिष्ट रिदममध्ये आपली कार रस्त्यावरून धावते आहे. याच्यासारखा दुसरा आनंद नाही. झोप तर नाहीच नाही.
अर्थात, एकेकाचा पिंड असतो पण, सर्वसाधारणपणे रात्रीचे ड्रायव्हिंग टाळता येत असेल तर टाळावे. नसेल टाळता येत तर नियम पाळून रात्रीची कार चालवावी.

सेफ ड्रायव्हिंग : गिअर्स बदलणे


या आधीच्या लेखात आपण क्लच आणि अ‍ॅक्सिलेटर यांच्या संयोगबिंदूचा उल्लेख केला. कार पहिल्या गिअरमध्ये टाकून आपण हळूहळू पुढे न्यायला शिकलो आहोत. आपल्याला स्टिअरिंग बॅलन्स जमलेले आहे. कार सुरू करून आपण पहिल्या गिअरमध्ये टाकून चालू करू शकतो. हळूहळू पुढे नेऊ शकतो. ब्रेक आपल्या पायाशी आहे. चुकून अ‍ॅक्सिलेटर अधिक दाबले गेले तर ब्रेक आपल्या मदतीसाठी आहे. त्याचा विसर पडू नये. हा सगळा सराव आपण मोकळ्या मैदानात केला आहे. आपल्या कारवर आपला संपूर्ण ताबा असणे ही महत्त्वाची बाब आहे. हे आपण मोकळ्या मैदानात शिकलो आहोत.
आता पहिल्या गिअरमध्ये आपल्याला कार चालवता येते, स्टिअरिंग नीट सांभाळता येते, अशा वेळेला आपण आता रहदारीच्या (पण फार गर्दीच्या नव्हे) मोकळ्या सडकेवर कार घेऊन आलो आहोत. तुरळक माणसांची ये-जा सुरू आहे. सायकलवाले आहेत रस्त्यावर. एखादा ट्रक, बस मागून पुढे येत आहे. आपण गाडी मुंगीच्या पायानं हळूहळू पुढे चालवायला शिकलो आहोत. आता पुन्हा आपण स्टिअरिंगवर बसलो आहोत. आपण रस्त्यावर आहोत त्यामुळे आपल्या कारचे दरवाजे नीट बंद पाहिजे. ते आधी बघून घ्या आणि मग स्टिअरिंगवर बसा. कार इंजिनला चावी देण्याआधी क्लच दाबून गिअर रॉड नीट डावीकडे-उजवीकडे सरळ रेषेत हलवून बघा. डावीकडे आणि उजवीकडे तो सहज जात असेल तर आपली गाडी न्यूट्रलवर आहे. कार न्यूट्रलवर असताना क्लचवर पाय न ठेवता इंजिन सुरू झाले तरी कार जागेवरच उभी राहील. जोपर्यंत आपण पहिला गिअर टाकणार नाही तोपर्यंत गाडी चालायला लागणार नाही. न्यूट्रलवर कार असताना आपण चावी देऊन इंजिन स्टार्ट केले आहे. आता क्लच दाबा (डाव्या पायातला) ब्रेकवर हलका पाय ठेवा. न्यूट्रलमधली कार पहिल्या गिअरमध्ये टाका. क्लचवरचा पाय एकदम उचलायचा नाही. गिअर बदलताना संपूर्ण क्लच खाली दाबायचा आहे. अर्धवट क्लच दाबू नये. पुढे ट्रेण्ड झाल्यावर अर्धवट क्लच दाबला तरी गिअर बदलू शकता पण, सध्या शिकत असताना क्लच पूर्णपणे खाली दाबावा. आता क्लच अगदी हळूहळू उचला. गाडी पुढे सरकू लागेल. ब्रेकवरचा पाय काढा. नाहीतर इकडे क्लच उचलत आहात आणि उजव्या पायाने ब्रेक दाबत राहिला तर कार पुढे सरकणार नाही.
पहिल्या गिअरमध्ये तुमची कार रस्त्याच्या डाव्या बाजूने अगदी समोरच्या सरळ रेषेत चालली आहे. स्टिअरिंग तुमच्या हातात आहे. थोडं थोडसं अ‍ॅक्सिलेटर देऊन कार समोर चालली आहे. आता समोर बघा. रस्ता जर मोकळा दिसत असेल तर लगेच क्लच दाबा आणि गिअर रॉड समोर गेलेला, सरळ रेषेत मागे ओढा. क्लचवरचा पाय हळूहळू वर उचला. तुमची कार थोडी अधिक पळते आहे असं वाटत असेल तर थोडासा हलका ब्रेक दाबा. आता आपली कार सेकंड गिअरवर आहे. सेकंड गिअरवर कार स्मूथली चालत असते. कार सुरू करून चालण्यासाठी जसा पहिला गिअर महत्त्वाचा आहे तसाच हा सेकंड गिअर गाडीला वेग देण्यासाठी, रस्त्याचा चढाव आला असेल तर चढाव चढून जाण्यासाठी महत्त्वाचा आहे. या गिअरला स्पीड (वेग) मर्यादित आहे. २०-३० पर्यंत काटा जाईल. अधिक अ‍ॅक्सिलेटर दिलं तर इंजिन जड लागेल, आवाज करील. तेव्हा समजून घ्यावं, आपल्या या दोन नंबरच्या गडय़ाच्या अंगाबाहेर काम दिसतं. अशावेळेला पुन्हा क्लच संपूर्ण दाबून मागे नेलेला गिअर रॉड तिसऱ्या गिअरकडे न्यावा. गिअर रॉडवर गिअरची डायरेक्शन दिलेली असते.
एक लक्षात ठेवा, गिअर्स बदलताना क्लच पूर्णपणे खाली दाबलेला असावा. आता तिसऱ्या गिअरमध्ये कार सुरू आहे. क्लचवरचा पाय हळूहळू उचला. अ‍ॅक्सिलेटर द्या. पुन्हा संयोगबिंदू साधा. कार तिसऱ्या गिअरमध्ये स्मूथली पळत असते. पुढे ४०-५०च्या आकडय़ापर्यंत वेगाचा काटा सरकतो आणि अचानक कार जड वाटायला लागते. इंजिन भारी झालं आहे असं वाटते. अशावेळेला पुन्हा क्लच दाबून गिअर बदलावा म्हणजे चवथ्या गिअरमध्ये कार टाकावी. पद्धत तीच क्लच खाली पूर्ण दाबणे, हळूहळू क्लच सोडणे, क्लच आणि अ‍ॅक्सिलेटर यांचा संयोगबिंदू साधणे. आता चवथा गिअर हा स्पीडसाठी आहे. साठच्या पुढे गाडी नेऊ शकता. काही कार्सना पाच गिअर असतात. सहावा गिअर रिव्हर्स गिअर असतो. पाचवा गिअरदेखील वेग वाढवण्यासाठी असतो.
हे सारं ठीक आहे हो! तुम्ही कारचा आता पहिला, दुसरा, तिसरा, चवथा गिअर बदलू शकता पण, रस्त्यावरच्या ऑबस्टॅकलचं काय? बकऱ्या धावतात, कुत्री धावतात, ट्रक धडधडत येतात, सायकल चालवत जाणारी दोन पोरं सायकलवरच मस्ती करत रस्त्यानं जातात, एक ना अनेक असंख्य अडथळे रस्त्यावर असतात. यासाठी चालकाची नजर अष्टावधानी पाहिजे. या मुद्याचा विचार आपण स्वतंत्र प्रकरणात करणारच आहोत. येथे फक्त आपण गिअर्स बदलणे ही प्रक्रिया पहात आहोत.
पहिल्या गिअरमधून कार दुसऱ्या गिअरमध्ये टाकताना आपण अ‍ॅक्सिलेटर सोडून द्यावे. म्हणजे अ‍ॅक्सिलेटर गिअर बदलताना अधिक वाढवू नये. कार ज्या स्पीडवर आहे तेथेच आपल्याला गिअर बदलायचा आहे. कारची स्पीड कमी नको व्हायला म्हणून ब्रेक दाबू नये. क्लच दाबून कार दुसऱ्या गिअरमध्ये टाकल्यावर हळूहळू क्लचवरचा पाय काढावा. म्हणजे वर उचलावा. दुसरा गिअर टाकल्यावर तिसरा गिअरही तेथे ताबडतोब टाकता येतो. फक्त कारची स्पीड मेन्टेन झाली पाहिजे. तिसऱ्या गिअरवर कार जड वाटत असेल तर लगेच थोडा क्लच दाबावा, अ‍ॅक्सिलेटर दाबावे, संयोगबिंदू साधावा म्हणजे कार सुरळीत धावू लागेल. तिसऱ्या गिअरमधूनही चौथ्या गिअरमध्ये याच पद्धतीने आपली कार न्यावी.
गिअर बदलण्यासाठी एका विशिष्ट वेगाची मर्यादा सांभाळणे आवश्यक आहे. तुमची कार ६०-७० च्या वेगानं पळते आहे आणि तुम्हाला वेग कमी करायचा आहे तर पहिल्यांदा अ‍ॅक्सिलेटरवरचा पाय बाजूला ठेवा. म्हणजे अ‍ॅक्सिलेटर सोडून द्या. आता वेगात फरक पडतो. ६०-७० च्या ऐवजी कार ४०-५० कडे लगेचच येते. आता ताबडतोब क्लच दाबून गिअर बदला. म्हणजे चौथ्या गिअरमधून तिसऱ्या गिअरवर आणा. स्पीड हळूहळू कमी होते. ४०-५० या स्पीडमधून कार व्यवस्थित चालते. यापेक्षाही वेग कमी करायचा आहे, त्यासाठी गाडी सेकंड गिअरमध्ये टाका. म्हणजे २०-३० या वेगात आपली कार चालते.
२०-३० च्या वेगात कार क्लच दाबला आणि थोडासा ब्रेक दिला तर जागेवरही थांबते. आपण गर्दीच्या रस्त्यावर गाडी चालवू लागलो तर या तंत्राचा उपयोग करावाच लागतो. दुसऱ्या गिअरमध्ये निव्वळ क्लच दाबून कार जागच्या जागेवर उभी करता येते. क्लच उचलला की कार पुढे सुरू होते. निव्वळ क्लचवर गाडी धावते किंवा थांबूही शकते.
गिअर बदलणं हा एक कौशल्याचा भाग आहे. आपण गिअर बदलला हे मागे बसलेल्या लोकांच्या लक्षातही यायला नको. एवढी नीट-व्यवस्थित गिअर बदलण्याची प्रक्रिया आपल्या हातून व्हायला हवी. अर्थात, हे देखील आपल्या प्रत्येकाला साधते. तुमचा जास्तीत जास्त कार चालवण्याचा सराव झाला असेल तर तुम्ही निष्णात चालक बनणारच!
स्वत:ची कार घेतल्यानंतर तुमचा अधिकाधिक सराव झाला पाहिजे. रोज निदान एखादा तास कार बाहेर काढून फिरवली पाहिजे. कारण कार चालवणं हे स्वत:चं जजमेंट आहे, जे स्वत:ला समजलं पाहिजे. आलं पाहिजे.
म्हणून गिअर्स बदलण्याचा सराव केला पाहिजे. कधी कधी आपण ६०-७०-८० या वेगाच्या दरम्यान कार चालवत असतो. अशावेळी त्वरित कारचा वेग कमी झाला पाहिजे. म्हणून जर आपण चवथ्या गिअरमध्ये कार चालवत आहोत, समोर स्पीड ब्रेकर आला आहे, स्पीड ब्रेकरच्या जवळ लगेच पहिल्या दुसऱ्या गिअरमध्ये कार आली पाहिजे. स्पीड कमी पाहिजे म्हणून आपण त्वरित गिअर बदलले पाहिजेत. यासाठी शहराबाहेर लांबवर कार चालवत आपण जायला हवं. यामुळे आपला सरावही होतो. कार चालवण्यातले बारकावेही लक्षात येतात. आत्मविश्वास वाढतो. एक गोष्ट ध्यानात घ्यावी. अ‍ॅक्सिलेटर दाबणे म्हणजे आपण गाडीचा वेग वाढवत आहोत. अ‍ॅक्सिलेटर सोडून देणे म्हणजे स्पीड कमी करणे. गिअरचा उपयोगही वेग वाढवण्यासाठीच असतो. तसाच तो वेग कमी करण्यासाठीही असतो. म्हणून चालकाने क्लच, ब्रेक, गिअर्स, अ‍ॅक्सिलेटर यांची कार्यप्रणाली नीट समजून घ्यावी. ६०-७० किंवा ८० च्या वेगात कार असताना एकदम स्पीड कमी करायची यासाठी आपण पहिल्यांदा अ‍ॅक्सिलेटरून पाय बाजूला करावा. क्लच दाबून तिसऱ्या किंवा दुसऱ्या गिअरमध्ये कार घ्यावी. अशावेळी क्लच घाईनं सोडू नये. तो नेहमीप्रमाणे हळूहळूच सोडायचा आहे. अशा वेगात एकदम क्लचवरून पाय काढला तर गाडी धक्का देऊन पुढे जाईल. अशा वेळेला स्टिअरिंगवरचा ताबा सुटू शकतो. म्हणून क्लच दाबल्यानंतर थोडासा ब्रेकही दाबा. मग गिअर बदला.

fly