सोमवार, 3 मई 2010

सेफ ड्रायव्हिंग : रात्री कार चालवताना

स्वत:ची कार असेल तर दिवसा-रात्री कोणत्याही वेळेला कार बाहेर काढावी लागते. एखाद्यावेळी सकाळी आपण कार घेऊन निघालो पण, परत येताना संध्याकाळ किंवा रात्र होते. असे प्रसंग वारंवार येणार आहेत. कुणी म्हणेल काय हो, दिवसा आम्ही एवढी चांगली कार चालवतो, तर रात्रीही अशीच चालेल? चुकीचे आहे हे म्हणणे. दिवसा आणि रात्री कार चालवणे यात फार फरक आहे. रात्रीची कार चालवण्याचे स्वतंत्र ट्रेनिंगच हवे.
संध्याकाळच्या वेळी कार घेऊन परतीचा प्रवास सुरू झाला आहे. संध्याकाळ झाली आहे. अजून रात्र व्हायची आहे. जोपर्यंत दिवे लावण्याची गरज रस्त्यावर भासत नाही, तोपर्यंत जास्तीत जास्त अंतर कापण्याचा विचार करायला हवा. हा वेळ उगाच चहापाण्यासाठी कुठे घालवू नका. ऐन संध्याकाळी रस्त्यावर अडचणी खूप येतात. आपला वेग मंदावतो, जनावरे गावातल्या गोठय़ाकडे परत जाण्यासाठी रस्त्यावर आलेली असतात, शेतकरी काम आटोपून घराकडे-गावाकडे परतत असतात, मजूर असतात, बैलगाडय़ा असतात, रस्त्यावर नेहमीची इतर वाहनेही धावत असतात. ऐन संध्याकाळी अशा खूप अडचणी, अडथळे कारचालकाला येत असतात. एकसारखे क्लच दाबणे, ब्रेक देणे, स्पीड कमी करणे, गिअर बदलणे हे पाच-दहा मिनिटांच्या अंतराने कमी अधिक प्रमाणात सुरू असते. त्यामुळे वेग मंदावत असतो.
आपल्या कारला दिव्यांची गरज वाटायच्या आधी अधिकाधिक अंतर गाठणे हे काम संधीप्रकाशात व्हायला हवे. याचा अर्थ खूप वेगाने कार चालवा असा होत नाही. ताशी ६०-७० असाच वेग ठेवावा. अतिवेग हा नेहमीच प्राणावर बेतणारा ठरतो. ‘कॉन्फीडन्स’ आल्यावर हरकत नाही. तरी वेगावर आपण स्वार झालो आहोत. वेगाला आपल्यावर स्वार होऊ देऊ नये, ही दक्षता घेतली पाहिजे. संधीप्रकाश आता हळूहळू कमी होतो आहे. वाहनांनी डिप्पर लावून ठेवले आहेत. काही वाहने तशीच धावत आहेत. आणखी काही वेळाने रस्त्यावरचे दिसणार नाही. त्यावेळी आपल्या कारचे दिवे लावावेत. आता समोरून येणाऱ्या गाडय़ांचे प्रचंड प्रकाशझोत आपल्यावर पडतात आणि समोरचे काही दिसेनासे होते. वाहनेही अंदाज घेत घेत हळूहळू सरकत असतात. आपल्यालाही अंदाज घेत पुढे कार काढायची आहे. अशावेळी कार तिसऱ्या गिअरमध्ये घ्या. हळूहळू कार पुढे जाऊ द्या. रात्रीची ही अशी कार चालवणे अतिशय कौशल्याचे काम आहे.
आता अप्पर डिप्पर या दिव्याचे काम सुरू होते. विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाच्या प्रकाशझोतात समोरचे काहीच दिसत नाही. अशावेळेला अप्पर दिवा बंद करावा, डिप्पर सुरू ठेवा. डिप्पर सुरू ठेवल्यावरही आपल्याला दिसत नाही कारण, विरुद्ध दिशेने येणारे वाहन जवळ आलेले असते. त्याचा भडक प्रकाश त्रास देत असतो. वाहन निघून गेल्यावर लगेच अप्पर सुरू करा. म्हणजे आपल्या कारचा प्रकाश रस्त्यावर पडेल. समोरचा रस्ता चांगला दिसेल. रात्री ड्रायव्हिंग करणे तसे फार रिस्की समजले जाते पण, वाहतुकीच्या नियमाचे तंतोतंत पालन केले तर कुठलाही धोका संभवत नाही.
आता रात्रीच्या वेळेला कार चालवण्यासाठी कुठले वाहतुकीचे नियम आले असेही वाटण्याची शक्यता आहे. आपण वृत्तपत्र वाचता, बातम्या बघता. जास्तीत जास्त अपघात रात्रीचेच आहेत. त्यामुळे रात्री कार चालवताना दक्षता घेतलीच पाहिजे. अगदी अलर्ट राहिले पाहिजे. रस्त्यावर वाहने नाहीत म्हणून वेगमर्यादा वाढवू नये. ५०-६०-७० या रेंजमध्येच कार चालली पाहिजे. रस्त्यावर आपली एकटय़ाचीच कार असल्यामुळे समोरचा रस्ता व्यवस्थित दिसतो. म्हणून गाडीला अ‍ॅक्सिलेटर देत राहणे योग्य नव्हे. कधी कधी भडक प्रकाशातही रस्त्यावरचे खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे कॉन्स्टंट स्पीड मेन्टेन करावी. आपल्या कारच्या विरुद्ध दिशेने येणारी कार किंवा दुसरे वाहन हे एकमेकांच्या जसे जवळ येऊ लागतात, तसे समोरचे काहीच दिसत नाही. अशावेळेला डिप्पर द्यावा. डिप्पर दिल्यानंतरही काही दिसत नाही. अंदाज घेऊन कार समोरून काढावी लागते. कधी कधी रस्त्यावर एखादा ट्रक बिघाड होऊन थांबलेला असतो. त्याला इंडिकेटरही नसतात. मागचा दिवाही नसतो. या प्रकारानेही बरेचसे अपघात होतात. म्हणून रात्रीच्या ड्रायव्हिंगमध्ये वेग वाढवू नये. गाडी प्रत्येक क्षणाला कंट्रोलमध्येच असावी. एखाद्यावेळी विरुद्ध दिशेने समोरून एखादी मोटारसायकल येत आहे असे वाटते. प्रत्यक्षात मोटारसायकल जवळ आल्यावर आपल्या लक्षात येते की, तो एकच दिवा असलेला ट्रक आहे. त्याचा दुसरा लाईट बंद असतो. असले फसवे प्रकार रात्रीच्या ड्रायव्हिंगमध्ये पदोपदी होत असतात.
रात्रभर एकसारखी कार धावत असेल तर ड्रायव्हिंग करणाऱ्याला झोप येते. एखादी डुलकी लागू शकते. आपल्याला झोपेची गरज आहे, हे लक्षात घेऊन जवळपास असलेल्या गावाजवळ किंवा शहरालगत कार घेऊन जावी. रस्त्यावर दिवे आहेत, अशा जागी कार रस्त्याच्या बाजूला उभी करावी. मागील सीटवर काही वेळ विश्रांती घेऊन मग पुढे जाता येते. डुलक्यांवर डुलक्या येत असतील तर पुढे जाण्याचे टाळावे. व्यावसायिक गाडय़ांवर असलेले चालक दिवसभर गाडी चालवून दमलेले असतात. रात्रीच्या वेळी रस्त्यातल्या एखाद्या गावी मुक्काम केलेला बरा. दिवसरात्र ड्रायव्हर गाडी चालवत असेल तर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
अस्मादिकांना मात्र रात्रीचे ड्रायव्हिंग आवडते. रात्रीचे दीड दोन वाजत आहेत. ड्रायव्हिंग सीटवर आपण बसलो आहोत. बाजूच्या दरवाजाची काच खाली आहे. थंडगार हवा सुरू आहे. रस्त्यावर आपण एकटेच. लांबलचक पसरलेला रस्ता. आजूबाजूला डोंगराच्या रेषेदार कडा दिसत आहेत. आभाळ टपटप चांदण्यांनी बहरले आहे. एका विशिष्ट रिदममध्ये आपली कार रस्त्यावरून धावते आहे. याच्यासारखा दुसरा आनंद नाही. झोप तर नाहीच नाही.
अर्थात, एकेकाचा पिंड असतो पण, सर्वसाधारणपणे रात्रीचे ड्रायव्हिंग टाळता येत असेल तर टाळावे. नसेल टाळता येत तर नियम पाळून रात्रीची कार चालवावी.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly