गुरुवार, 13 मई 2010

हार्ट अटॅक टाळण्यासाठी काय करावे ?

हार्ट अटॅक टाळण्यासाठी काय करावे ?
हृदयविकारास कारणीभूत होणार्‍या रक्तवाहिन्या चरबीच्या अंतर्लेपाने जाड होण्याची प्रक्रिया कोणत्याही एकाच कारणाने होत नसते. संशोधनांती अशा अनेक गोष्टी आढळून आल्या आहेत की ज्यामुळे हा विकार वाढीस लागतो त्यांना रिस्क फॅक्टर्स म्हणतात. त्यापैकी बरीच कारणे टाळता येण्यासारखी असतात. ती दूर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
१) स्निग्धाहार

आपल्या आहारात चरबीयुक्त व स्निग्ध पदार्थ जास्त प्रमाणात असल्यास ती रक्तात कोलेस्टेरॉल व त्यासारखी इतर द्रव्ये वाढतात. त्यांचा थर रोहिण्यांच्या आतील मुलायम भागावर जमू लागतो. रोहिण्यांची पोकळी कमी कमी होऊ लागते व शरीरातील अवयवांच्या रक्तपुरवठ्यात घट पडू लागते. इतर अवयवांच्या मानाने हृदय आणि मेंदू कितीतरी अधिक नाजूक आहेत. त्यांना जरासुद्धा प्राणवायूचा व पोषणाचा तुटवडा सोसत नाही. परिणामी स्निग्धताप्रधान आहार हा धोकादायक बनतो. म्हणून हृदयरोग झालेल्या तसेच होण्याचा संभव असलेल्यांनी आपल्या रक्तातील चरबीचे प्रमाण तपासून घेणे आवश्यक आहे. 


शारीरिक कष्टाची कामे करणार्या कष्टकरी वर्गातील माणसांपेक्षा बैठे काम करणार्यांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण जास्त आढळते. व्यायामाचा अभाव असलेल्या व्यक्तीच्या शरीराची कार्यक्षमता कमी असते. कोणतेही शारीरिक काम करताना अशा व्यक्तींच्या हृदयाच्या ठोक्यांचा वेग जास्त वाढतो व थकवा लवकर येतो. त्यांच्या रक्तात चरबीचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे त्यांना अॅथेरोस्क्लेरोसिसचा विकार होण्याची आणि हृदयाच्या रक्तपुरवठ्यात अडथळा येण्याची शक्यता तसेच रक्ताची गाठ होण्याची शक्यता जास्त असते. परिणामी हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाणसुद्धा वाढते. नियमित व्यायाम केल्याने हे सर्व दुष्परिणाम टाळता येतात. नियमित व मर्यादशील व्यायाम घेणे हे तब्येतीला नक्कीच फायदेशीर असते; पण अती व्यायाम व तोही अधेमधेच घेतला तर तो अपायकारकसुद्धा ठरू शकतो.

ज्यांना व्यायामाची सवय नाही त्यांनी थोड्या व्यायामाने सुरुवात करून हळूहळू त्याचे प्रमाण वाढवावे. हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर साधारण तीन आठवड्यानंतर ‘ट्रेडमिल टेस्ट’ करून किती व्यायाम करावा याबाबत सल्ला घेणे चांगले.
३) तंबाखूचे सेवन टाळणे :
धूम्रपान करणार्यांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण इतरांच्या तुलनेने दुप्पट ते तिप्पट आढळते. तंबाखूतील निकोटीन या घटकामुळे हृदयाचे ठोके वाढतात, रक्तदाब वाढतो, रक्तातील चरबी वाढते, तिचे रक्तवाहिन्यामधील थर वाढतात व रक्त गोठण्याची प्रवृत्तीही वाढते. तंबाखूच्या बाबतीत तरी ‘थोडीशी हरकत घ्यायला हरकत नाही’ हे असत्य आहे. तंबाखूचे सेवन मग तो थोड्या प्रमाणात का होईना, तब्ब्येतीस घातक असते यात शंका नाही.
४) अतिमद्यपान टाळावे :
दररोज थोड्या प्रमाणात (एक ते दीड पेग) मद्यपान केल्यास रक्तातील अपायकारक चरबी कमी होऊन एच.डी.एल. कोलेस्टेरॉल या लाभदायक घटकाचे प्रमाण वाढते, असे संशोधनात दिसून आले आहे; पण अतिमद्यपानामुळे शरीरातील इतर अवयवांवर होणारे अनिष्ट परिणाम व व्यसनाधीनतेची शक्यता लक्षात घेता दररोज मद्यपान न करणे हेच बरे. मद्यपानानंतर स्निग्ध आहार व मांसाहार जास्त प्रमाणात केला जातो. त्यामुळे लठ्ठपणा उत्पन्न होऊ शकतो.
५) मानसिक ताण कमी करणे :
जी माणसे स्वभावाने उतावळी, अती महत्वाकांक्षी, जास्तीत जास्त गोष्टी मिळविण्यासाठी आसुसलेली, तसेच लवकर चिडणारी रागावणारी असतात त्यांना हृदयविकार होण्याचा धोका अधिक असतो. हृदयविकार झालेल्यांनी मानसिक तणावापासून दूर राहणे गरजेचे आहे. बरेचदा त्रासदायक गोष्टी आपण टाळू शकत नाही; पण अशा गोष्टींमुळे मानसिक संतुलन बिघडू न देणे हे मात्र आपल्या हातात नक्कीच आहे.

६) मधुमेह आणि उच्च रक्तदाब यावर नियंत्रण :
या दोन्ही विकाराच्या रोग्यांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण अदिक दिसून येते. यापैकी कोणताही विकार असणार्यांनी त्यावर नियमित उपचार करवून घेणे आवश्यक ठरते. तसे हृदयविकार चोरवाटेने तर झालेला नाही ना? याची जरूर ती तपासणीही वेळोवेळी करून घ्यावी. विशेषतः मधुमेहींमध्ये हृदयविकार उद्भवलेला असूनही त्याची कोणतीही पूर्वलक्षणे उघड दिसून येत नाहीत. त्यामुळे हृदयरोगासाठी शोधतपासणी महत्वाची ठरते. मधुमेहीप्रमाणेच काही व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा विकार असूनसुद्धा त्याची काहीही लक्षणे दिसत नाहीत, अगर त्रास होत नाही. म्हणून नियमित औषधोपचारांनी रक्तदाब नियंत्रणात ठेवणे अत्यावश्यक आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly