बुधवार, 3 मई 2023

संध्येतील २४ नावे ...

 संध्येतील २४ नावे ... 

महाराष्ट्रात संध्येच्या आरंभी विष्णूची चोवीस नावे म्हणण्याची प्रथा आहे, ... 

संध्यावंदन किंवा कोणत्याही  कार्यारंभी संकल्प करतात तेंव्हा केशवादि चोवीस नाम घेतात. विष्णूसहस्रनाम असो वा केशवादि चतुर्विंशती (चोवीस) नाम असो त्या नामाचा अर्थ समजल्यामुळे आनंद द्विगुणीत होतो म्हणून केशवादि नामांचा अर्थ जाणून घेण्याचा अल्पसा प्रयत्न.


केशव

केशव शब्दाची व्याख्या अशी केली आहे. 

कश्च इशश्च केशौ,

तौ सृष्ट्यादिना वर्तयति इति केशवः

कः म्हणजे ब्रह्मदेव 

इश म्हणजे महादेव या दोघांना सृष्टीच्या व्यापारासाठी (उत्पती व लय) जो प्रवृत्त करतो तो केशव.

हिरण्यगर्भः कः प्रोक्तः इशः शंकर एव च सृष्ट्यादिना वर्तयति तौ यतः केशवः भवान् .


केशे वर्तते इति केशवः म्हणजे प्रलयकालीन उदकात,पाण्यात रहाणारा म्हणून तो केशव.(महोदधिशयोंतकः)


एका नामाचे अनेक अर्थ आहेत .आपणास एक देखील अर्थ पूरेसा आहे.


नारायण


नारायण या शब्दाचा विग्रह   न  अर  अयन

असा केला जातो.

न अराः नाराः 

नाराणां अयनः नारायणः

अर म्हणजे दोष .

ज्याचे ठिकाणी दोष नाहीत अर्थात गुण आहेत .सर्व गुणांचे अयन म्हणजे आश्रयस्थान म्हणजे नारायण.


नार याचा दुसरा अर्थ ज्ञान असाही होतो. जो ज्ञानाचा आश्रय आहे तो नारायण.


आपो नारा इति प्रोक्ता आपो वै नरसुनवः अयनं तस्य ताः पुर्वं तेन नारायणः स्मृतः

आप म्हणजे पाणी व पाण्यात रहाणारा ,क्षीरसागर मधे रहाणारा तो नारायण.


आप म्हणजे जीवश्रेष्ठ वायुदेव त्यांना आश्रयस्थान असणारा नारायण.


असा तो नारायण  सर्व गुणांनी युक्त(गुणैःसर्वैं उदीर्णं) व दोषदूर (दोषवर्जितं)  सर्व शास्त्रांनी  ज्ञेय आहे व मुक्त जीवांना प्राप्य (गम्य) असाआहे.


अशी थोडक्यात नारायण शब्दाची व्याख्या आहे.


माधव


माया धवः माधवः

माया म्हणजे महालक्ष्मी

तिचा धवः म्हणजे पती लक्ष्मीपती .

माधव म्हणजे लक्ष्मीपती.


मधु कुलात उत्पन्न झालेला या अर्थानेही माधव.


गोविन्द


गोभिः वेद्यते इति गोविंदः 

गां वेदलक्षणां वाणीं विंदत इति गोविंदः .

वेदांचे द्वारे जो जाणल्या जातो तो गोविंद .


२ गवां अविं द्यति इति गोविंदः 

वेदांच्या द्वारे अज्ञानाला  नष्ट करणारा तो गोविंद.


३ गवां विंदयति इति गोविंदः 

गायींना आनंद देणारा ,रमविणारा तो गोविंद.


गौरेषा तु तथा वाणी तां तु विंदयते भवान्

गोविंदस्तु ततो देव मुनिभिः कथ्यते भवान्


गायी व वेद यांना आनंद देणारा तो गोविंद.


श्रीकृष्ण लहान असताना गोवर्धनपर्वतोद्धारानंतर इंद्राने पश्चात्ताप पावून आकाशगंगा व सुरभी गोमातेच्या दुधाने कृष्णास अभिषेक करुन त्याला गोविंद  असे नामाभिधान दिले.


फाल्गुन महिन्यांचा मासनियामक, मासाभिमानी  देवता 

गोविंद आहे.


जेवण करत असताना  गोविंद गोविंद असे नाम म्हणतात.


असा हा गोविंद महिमा,


विष्णु


सर्वत्र व्याप्तत्वात् 

सर्वेषु प्रविष्टत्वात् 

विष्णु नाम.

सर्वत्र व्यापून राहिलेला आहे

तसेच सर्वांचे ठिकाणी प्रवेश करतो म्हणून तो विष्णु.

यज्ञो वै विष्णुः असे म्हणले आहे.अर्थात यज्ञ हे विष्णुचेच रुपसर्व नावे ही विष्णुचीच वाचक आहेत 

"नामानि सर्वाणियमाविशंती तं वै विष्णुः परम मुदाहरन्ति".


चैत्र महिन्याची मासनियामक देवता

विष्णु होय.


सर्वही कार्ये विष्णुच्या नामस्मरणाने परिपुर्ण होतात म्हणून कार्यसंपताना

"विष्णुस्मरणात् परिपूर्णतास्तु"

असे म्हणले जाते.


मधुसूदन


मधु दैत्यं सूदयति इति मधुसूदनः


मधु नामक दैत्य मर्दनः


मधु नावाच्या दैत्याला विष्णुने मारले म्हणून त्याला "मधुसूदन " हे नांव मिळाले.


मधु व कैटभ नावाच्या दोन दैत्यांना विष्णुने मारले होते. 


त्रिविक्रम


त्रिविधाः क्रमः यस्य सः त्रिविक्रमः


तीन प्रकारांनी ज्याचा पादविक्षेप होतो असा.


तीन पाउलांनी ज्याने त्रैलोक्य, ब्रह्मांड आक्रमिले आहे असा तो त्रिविक्रम .


याला उरुक्रम असेही म्हणले आहे:-


ज्येष्ठ महिन्याची मासनियामक देवता 

त्रिविक्रम आहे.


त्रिविक्रम निष्क्रम विक्रम वंदे 

संक्रम सुक्रम हुंक्रत वक्त्र 

असे म्हणून मध्वाचार्य द्वादशस्तोत्रात त्रिविक्रमरुपी परमात्माला वंदन करतात:-


 वामन


वामैः नियमति इति वामनः

मंगलमय वाणीने सर्वांचे कल्याण करतो तो "वामन".


बली चक्रवर्तीच्या यज्ञात बटुरुपाने ,नुकत्याच उपनयन झालेल्या ,बुटक्या,कमी उंचीच्या रुपात आलेला तो वामन.

बली राजाने इंद्राचे हरण केलेले राज्य 

बलीकडून  दानस्वरुपात घेवून इंद्राला परत न करणारा.


आषाढ महिन्याचा मासनीयिमक वृषाकपि वामन.


श्रीधर

श्री म्हणजे लक्ष्मीदेवीला धारण करणारा म्हणून तो श्रीधर.

लक्ष्मीला आश्रय असणारा श्रीधर. लक्ष्मीदेवीला वक्ष स्थळावर धारणकरणारा श्रीधर.


श्रावण महिन्याचा मासनियामक श्रीधर.


श्रीधर श्रीधर शंधर वंदे भूधर वार्धर कंधर धारिन असे म्हणून मध्वाचार्य श्रीधर परमात्म्याला वंदन करतात.


हृषिकेश

हृषीकाणां इशः हृषिकेशः


हृषिक म्हणजे इंद्रिये


इंद्रियाभिमानी देवतांचा स्वामी तो हृषीकेश.

सर्व इंद्रियांचा नियामक तो हृषीकेश .

इंद्रियांना प्रेरणा देणारा.


प्रत्येक इंद्रियाभिमानी एक देवता असते व त्या देवतेच्या त्याइंद्रियाचे ठिकाणी  असण्यामुळे त्या त्या इंद्रियाचे कार्य सुचारु रुपाने चालते.

उदा.  चक्षुरिंद्रायाची अभिमानी देवता सूर्य  .डोळ्याचे ठिकाणी सूर्य राहील तर डोळ्यांना व्यवस्थित दिसेल नाहीतर व्यक्ती अंध होईल.

अशा सर्व इंद्रियाभिमानी देवतांचा ईश हृषीकेश परमात्मा आहे.


भाद्रपद महिन्याचा मासनियामक हृषीकेश आहे.


 पद्मनाभ


पद्मं नाभौ यस्य सः पद्मनाभः


ज्याचे नाभीतून कमल आले आहे असा तो पद्मनाभ .

क्षीरसागर समुद्रात शेषशायी परमात्म्याचे नाभीतून कमल निर्माण झाले म्हणून तो पद्मनाभ.


(या कमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. कमलोद्भव ,कमलज असे ब्रह्मदेवाला म्हणले जाते.)


अश्विन महिन्याचा मासनियामक  पद्मनाभ  आहे.


 दामोदर


दाम उदरे यस्य सः 

दामोदरः  .

यशोदेने कृष्णाला एका दोरीने उखळाला बांधल्याची कथा सर्वांना विदित आहेच.दोरीने कृष्णाच्या उदराला बांधले म्हणून त्याला दामोदर असे नांव मिळाले.

वास्तविक परमात्माला कुणीही बांधून ठेवू शकत नाही हे कृष्णाने प्रत्येक वेळी दोन अंगुले दोरी कमी पडली यातून सुचित केले परंतु तो परमात्मा भक्तांना केवळ भक्तीचे द्वारा (माहात्म्य ज्ञान पुर्वस्तु सुदृढः सर्वतोधिकः स्नेहः=भक्ती)

वश होतो हे दाखविण्यासाठी यशोदेकडून ,आपल्या अनन्य भक्ताकडून बांधवून घेतला. अहं भक्तपराधीनः असेही भगवंतांनी  दुर्वासांना सांगितले होतेच.


 कार्तिक महिन्याचा मासनियामक दामोदर आहे म्हणून कार्तिक द्वादशीला तुलसी विवाह दामोदराशी लावण्याची परंपरा निर्माण झाली.


संकर्षण

सम्यक कर्षयति इति संकर्षणः

मुमुक्षुंच्या सर्व कर्मांचा नाश करतो तो संकर्षण .


कर्षण केलेला म्हणजे ओढून नेलेला या अर्थाने .

देवकीच्या गर्भातून कर्षण करुन रोहिणीच्या गर्भात स्थापन केला गेला (योगमायेच्या द्वारा) तो भगवंताचा शुक्लकेशावतार

संकर्षण .


संकर्षणश्च बभूव पुनः सुनित्यः

संहारकारणवपुस्तदनुज्ञयैव ||

देवी जयेत्यनु बभूव स सृष्टीहेतोः प्रद्युम्नतामुपगतः कृतितां च देवी.

(मभा तात्पर्य निर्णय अध्याय १)

ब्रह्मांडाच्या संहाराला कारणीभूत असणारे संकर्षण रुप विष्णूने घेतले.

अनिरुद्ध प्रद्युम्न संकर्षण वासुदेव हे परमात्म्याचे "चतुर्व्युह " आहे.


असे हे संकर्षण स्वरुप.


 वासुदेव


वसन्ति भूतानि यस्मिन् इति वासुः


वासुश्चासौ देवश्च वासुदेवः

सर्व भूतांना प्राणिमात्रांना आश्रय असणारा व क्रीडादिगुणविशिष्ट असा वासुदेव परमात्मा.


वसुदेवस्य अपत्यं पुमान् वासुदेवः

वसुदेव याचा मुलगा म्हणून तो वासुदेव.


प्रद्युम्न अनिरुद्ध संकर्षण वासुदेव या चतुर्व्युहातील एक वासुदेव.


 प्रद्युम्न


प्रकृष्टं द्युम्नं यस्य सः प्रद्युम्नः

ज्याचे तेज उत्कृष्ट आहे असा तो प्रद्युम्न.


द्युम्न म्हणजे धन ,विपुल धन ज्याचेपाशी आहे असा.


चतुर्व्युहातील  एक परमात्मा प्रद्युम्न


"संकर्षणश्च स बभूव पुनः सुनित्यः संहारकारणवपुस्तदनुज्ञयैव ||

देवी जयेत्यनु बभूव स सृष्टीहेतोः

प्रद्युम्नतामुपगतः कृतितां च देवी ||नारायण परमात्म्याने सृष्टी उत्पन्न करण्यास्तव प्रद्युम्न रुप घेतले तर लक्ष्मीदेवीने कृति रुप घेतले.

मभातानिर्णय 


असे हे प्रद्युम्नस्वरुप.


 अनिरुद्ध


अनिभिः रुध्यते इति अनिरुद्धः

भक्तांकडून त्यांचे हृदयात कोंडला जातो तो अनिरुद्ध .

भागवतात परमात्मा भक्तांचेद्वारा हृदयात कोंडला जातो तो.

सद्योरुध्यवरुध्यतेsत्र कविभिः शुश्रुशुभिस्तत्क्षणात्.

ज्याला कुणीही विरोध करु शकत नाही असा अनिरुद्ध 

ज्याला कुणीही अडवू शकत नाही असा अनिरुद्ध .


"स्थित्यै पुनः स भगवान् अनिरुद्ध

नामादेवी च शांतिरभवत् शरदां सहस्रम्||

नारायणाने सृष्टीच्या रक्षणार्थ अनिरुद्ध नामक रुप घेतले तर लक्ष्मीदेवीने शांति असे रुप  घेतले.(मभातानिर्णय )


असे हे अनिरुद्ध स्वरुप.


 पुरुषोत्तम


पुरुषेशु उत्तमः पुरुषोत्तमः


क्षर व अक्षर यांचेपेक्षाही श्रेष्ठ असणारा.

क्षर म्हणजे नाशिवंत व अक्षर म्हणजे अविनाशी.

अक्षर म्हणजे अविनाशी महालक्ष्मी.

यस्मात् क्षरमतीतोsहं अक्षरात् अपि चोत्तमः अतोsस्मि लोके वेदेच प्रथितः पुरुषोत्तमः

अशी पुरुषोत्तम शब्दाची व्याख्या गीतेत स्वतः भगवंतांनी केली आहे.


असा हा पुरुषोत्तम .

म्हणजेच हरि सर्वोत्तम


 अधोक्षज


अधः कृतानि अक्षजानि येन सः 

अधोक्षजः 


ज्यांचेमुळे इंद्रियांचे  विषय नाहीसे होतात तो अधोक्षज .

कधीही क्षीण न होणारा तो अधोक्षज 

पृथ्वी व अंतरिक्षात विराट स्वरुपाने रहाणारा तो अधोक्षज  परमात्मा.


 नरसिंह


नरश्चासौ सिंहश्च नरसिंहः

न रीयते इति नरः

हिनस्ति इति सिंहः


जो नाश पावत नाही व जो दैत्यांचा नाश करतो तो नरसिंह.


आपला भक्त प्रल्हाद याचे वचन सत्य ठरविण्यासाठी व परमात्मा सर्वव्यापी आहे दर्शविण्यासाठी घेतलेले रुप.

या रुपात शरीर नर,मानवाचे तर डोके सिंहाचे असे स्वरुप घेवून ब्रह्मदेवाने हिरण्यकशिपुला दिलेल्या सर्व वरांच्या पलीकडे जावून त्याचा वध केला.

"सत्यं विधातुं निजभृत्यभाषितं व्याप्तिं च भूतेष्वखिलेषू चात्मनः||

अदृश्यतात्यद्भूत रुपमुद्वहन् स्तंभे सभायां न मृगं न मानुषम् ||


असे हे नरसिंहस्वरुप.


 अच्युत


अच्युत म्हणजे अविनाशी . 

सर्व विकारांनी रहित असणारा, न घसरणारा,

जसाच्या तसा रहाणारा. अच्युत नामक परमात्मा .


 जनार्दन


जनान् अर्दयति इति जनार्दनः

सज्जनांना सद्गती देतो म्हणून तो जनार्दन .


न जायत इति जनः

संसारम् अर्दयति इति जनार्दनः

जनांच्या भवसागराचा,संसारसागराचा नाश करणारा तो जनार्दन .


उपेन्द्र


इंद्राचा अनुज  

आदितीचा पुत्र म्हणून अवतार घेवून इंद्राचे बलीने हरण केलेले राज्य बलीचक्रवर्ती कडून दान घेवून इंद्राला परत देणारा तो

उपेन्द्र.


 हरि


हरति इति हरिः


भक्तांचे दुःख हरण करतो ,भक्तांचे दुःख दूर करतो तो हरि.


अज्ञानरुप कारणासहित संसार नाहीसा करणारा तो हरि.


श्रीकृष्ण


कर्षति इति कृष्णः

दैत्यांना नरकात ओढतो असा कृष्ण.

परिपूर्ण ज्ञानानंदात्मक स्वरुपवान आहे असा तो कृष्ण.


ज्याचा वर्ण काळा आहे असा.जो सच्चिदानंदस्वरुपी आहे व जो लोकांना आपल्याकडे आकर्षून घेतो तो श्रीकृष्ण.

--------------------------------------

असे हे थोडक्यात केशवादि चोवीस नावांचे अर्थ.

प्रत्येक नावाचे अनेक अर्थ असतात .

अर्थ न समजून घेता केलेले कर्म निरर्थक होते


व्यासस्मृतीत म्हटले आहे 

वेदस्याध्ययनं कार्यं धर्मशास्त्रस्य वापि यत्||

अजानतार्थं तत्सर्वं तुषाणां कंडनं यथा||

यथा पशुर्भावाही न तस्य लभते फलं

द्विजस्तथार्थानभिज्ञो न वेद फलमश्रुते||


वेदांचे व धर्मशास्त्राचे अध्ययन ब्राह्मणाने केले पाहिजे .हे अध्ययन अर्थानुसंधान रहित असेल तर तांदळाच्या कोंड्याप्रमाणे निरर्थक होय,धान्याचे ओझे वाहणाऱ्या पशूला जसा धान्याचा उपयोग नसतो तद्वत अर्थ न जाणणार्यांला इष्ट फळ मिळत नाही.

(म्हणून केशवादि चोवीस नावे समजून घेण्याचा छोटासा प्रयत्न)

शनिवार, 29 अप्रैल 2023

सिंगापूरचा भाग्यविधाता - ली क्वान यू | Lee Kuan Yew | ली कुआन यू

  सिंगापूरचा भाग्यविधाता - ली क्वान यू   





सिंगापूरला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या पंतप्रधानपदाची जबाबदारी ली यांच्यावर आपसूकच आली. आधीपासून ते लोकांच्या समस्या सोडवणारे नेते होतेच. केम्ब्रिजमधून कायद्याची पदवी गुणवत्तेसह उत्तीर्ण झालेल्या ली यांनी काही काळ वकिलीही केली. पण नंतर स्वतंत्र झालेल्या सिंगापूरसाठी स्वतःला वाहून घेतले. सिंगापूरच्या प्रगतीसाठी काय करता येईल, त्याला जागतिक स्तरावर एक राष्ट्र म्हणून मानाचे स्थान कसे प्राप्त करून या विचारांनी त्यांना पछाडले होते. सिंगापूरसमोर अनेक समस्या आ वासून उभ्या होत्या. शेतीसाठी पुरेशी सुपीक जमीन नव्हती, नैसर्गिक साधनसंपत्तीचा अभाव होता. गरिबी, अस्वच्छता, भ्रष्टाचाराने देश बरबटलेला होता. विविध वंशीय आणि विविध भाषा बोलणारे लोक सिंगापूरमध्ये स्थायिक झाले होते. पण ली यांनी धैर्याने या सगळ्या संकटांचा सामना करायचे ठरवले. एकेक पाऊल ते विश्वासानं आणि निर्धारानं टाकत गेले. 


सिंगापूरवासी नागरिक मेहनती होते. पण या विविध धर्म, वंशाच्या लोकांना एकत्र आणणे, त्यांच्यात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणे सोपे नव्हते. त्यासाठी ली यांनी वेगळ्या विचारांची वाट निवडली. ते सुरुवातीला डाव्या विचारसरणीचे असले तरी पुढे त्यांनी आपल्या विचारसरणीत बदल घडवून आणला. साम्यवादी विचारांची कास धरून आपल्याला चालणार नाही हे त्यांच्या लक्षात आले. लोकांमध्ये प्रबोधन घडवून त्यांच्या विचारसरणीत हळूहळू बदल घडवून आणावा लागेल असे त्यांना वाटत होते. ली तसे उच्चभ्रू ब्रिटिश संस्कृतीत वाढले होते. पण परिस्थितीनुसार ते स्वतःमध्ये बदल घडवत गेले. 


बिअर आणि गोल्फ या दोन ली यांच्या आवडीच्या गोष्टी. जीवनाचा आनंद घेणे, नियमित व्यायाम करून आपले शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवणे आणि सकारात्मक विचार करणे या गोष्टींवर त्यांचा भर होता. 


गोल्फच्या खेळात खेळताना मैदानावर असलेल्या छोट्याशा खळग्यात आपल्या हातात असणाऱ्या दांडीवजा बॅटने चेंडू टोलवायचा असतो. तो खळग्यात किंवा जास्तीत जास्त खळग्यांजवळ जाईल अशा कौशल्याने खेळ खेळावा लागतो. वाऱ्याचा वेग, चेंडूचे वजन, बॅटच्या फटक्यांचा जोर या सगळ्यांचा अंदाज घेऊन चेंडू टोलवावा लागतो. कुशल खेळाडू हे सरावामुळे सहज करू शकतो. ली यांच्यावर असलेली सिंगापूरची जबाबदारी काहीशी या खेळासारखीच नव्हती का ? सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊनच त्यांना हा चेंडू टोलवावा लागणार होता. त्यांना सिंगापूरला मानाचे स्थान प्राप्त करून द्यायचे होते. 


ली म्हणजे सिंगापूरला लाभलेला एक आगळावेगळा असा पंतप्रधान होता. सतत नवनवीन गोष्टी शिकून घेऊन स्वतःला अद्ययावत ठेवणे हा ली यांचा स्वभाव होता. ली यांनी अशीच एक आगळीवेगळी गोष्ट केली. त्यांनी सिंगापूरच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळत असतानाच १९६८ मध्ये अमेरिकेतील  सुप्रसिद्ध हार्वर्ड बिझिनेस स्कुलमध्ये व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम शिकण्यासाठी प्रवेश घेतला. पंतप्रधान पदावर कार्यरत असताना जगातील कोणत्याही पंतप्रधानाने यापूर्वी असे केले नव्हते. या मॅनेजमेंटच्या अभ्यासाचा उपयोग त्यांना सिंगापूरचे व्यवस्थापन उत्तम प्रकारे करण्यासाठी आणि सिंगापूरला प्रगतीपथावर नेण्यासाठी झाला. 


सिंगापूरमध्ये कमालीची विषमता होती. केवळ काही मोजक्याच लोकांजवळ स्वतःची घरे होती. ज्यांच्या हाती उद्योग आणि संपत्ती केंद्रित झाली होती, अशा लोकांजवळ भरपूर पैसे, स्वतःची प्रशस्त घरे होती.  बहुसंख्य जनता झोपडीतच राहत होती. अवतीभवती घाणीचं साम्राज्य होतं. लोकांना उद्योगधंदा नव्हता. तसे लोक मेहनती पण त्यांना रोजगार उपलब्ध नव्हता. ली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या झोपडपट्टीत राहणाऱ्या आणि कामगार वर्गाला स्वतःची घरे मिळवून द्यायची योजना आखली. त्यासाठी हौसिंग डेव्हलपमेंट बोर्ड स्थापन केले. अत्यंत कमी किमतीत गरीब जनतेला सुंदर आणि आवश्यक सुखसोयींनी युक्त अशी घरे बांधून दिली. अशा रीतीने झोपडपट्टीचा प्रश्न निकाली काढला. पण लोकांना अजून स्वच्छता, आरोग्याचे महत्व पटले नव्हते. 


त्यांच्या मंत्रिमंडळाने यासाठी अत्यंत कडक कायद्यांची तरतूद केली. लोकांचे प्रबोधन करणे आणि नियमांचे उल्लंघन केल्यास कडक शिक्षा वा दंड करणे अशी दुहेरी पद्धत त्यांनी अवलंबली. इमारतींभोवती घाण आढळली तर इमारतीत राहणाऱ्या सगळ्याच रहिवाशांना दंड भरावा लागे. बसमध्ये किंवा रस्त्यावर एखाद्या मुलाने घाण केली तर पोलीस त्याच्या पालकांना बोलावून ती घाण साफ करायला लावत. कितीही मोठा उच्चपदस्थ अधिकारी वा व्यक्ती असली तरी त्याची या शिक्षेतून सुटका होत नव्हती.


 येथील वाहतुकीचे नियम तर अतिशय कडक आहेत. वाहतुकीच्या नियमांचे लोक कसोशीने पालन करतात. सिग्नल कोणीही तोडत नाही. वेगाची ठरलेली मर्यादा कोणीही ओलांडत नाही. नियम तोडल्यास जबर शिक्षा किंवा दंड भरावा लागतो.  लोकांच्या अंगवळणी पडलेल्या सवयी बदलायला वेळ जरूर लागतो. पण राजकीय नेतृत्वाकडे इच्छाशक्ती आणि दूरदृष्टी असेल तर यात नक्की सुधारणा होऊ शकते. लोकांच्या सवयी बदलतात आणि त्यांना शिस्त लागते हे आपल्याला सिंगापूरकडे पाहिले म्हणजे कळते.


सिंगापूरमध्ये सुरुवातीला प्रचंड भ्रष्टाचार होता. ली यांनी कठोरपणे हा भ्रष्टाचार निपटून काढायचे ठरवले. त्यासाठी कडक कायदे केले. भ्रष्टाचार विरोधी पथकाला त्यांनी त्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिलं. सामान्य माणूस असो, मंत्रीअसो वा अधिकारी, भ्रष्टाचार सिद्ध झाला तर त्यांना तुरुंगवास हा अटळ. आज सिंगापूर भ्रष्टाचार मुक्त राष्ट्रातील एक देश आहे.


 कामचुकार लोकांसाठी त्यांच्या प्रशासनात जागा नव्हती. शिस्तप्रिय आणि काम करणाऱ्या लोकांना हुशार विद्यार्थ्यांना त्यांनी उत्तेजन दिले. अमली पदार्थ जवळ बाळगणे वा त्याची तस्करी करणे हा गंभीर गुन्हा आहे. हा गुन्हा सिद्ध झाल्यास सिंगापूरमध्ये अशा व्यक्तीला फाशीच्या शिक्षेपासून कोणी वाचवू शकत नाही. 


पंतप्रधान झाल्यानंतर सिंगापूरच्या रक्षणाच्या दृष्टीने ली यांनी अत्याधुनिक लष्कराची उभारणी केली. त्यासाठी इस्रायल या छोट्या देशाचा आदर्श त्यांच्यासमोर होता. इस्रायलच्या मदतीने आणि मार्गदर्शनाखाली त्यांनी अत्यंत सुसज्ज, शिस्तबद्ध आणि लढाऊ लष्कराची बांधणी केली. आज सिंगापूरचे लष्कर जगातील श्रेष्ठ लष्करांपैकी एक आहे. सिंगापूरमधील अठरा वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांना दोन वर्षे राष्ट्रीय सेवा योजनेसाठी द्यावी लागतात. त्यात लष्करी शिक्षणाचा समावेश असतो. या योजनेत प्रशिक्षणासाठी विविध धर्म, भाषा आणि  वंशाचे तरुण एकत्र येतात. या प्रशिक्षणादरम्यान त्यांच्यातील धर्म, भाषा आदींच्या जाणीवा बोथट होऊन आपण सगळे सिंगापूरवासी आहोत, सिंगापूरचे नागरिक आहोत आणि त्या राष्ट्राच्या भल्यासाठी आपल्याला काम करायचे आहे अशी राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होते. 


ली आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सगळेच सहकारी आपल्या देशासाठी झटणारे होते. अर्थात ली आणि त्यांचे बुद्धिमान सहकारी गोह केंग स्वी, लिम किन स्विम आणि इतरांनी सिंगापूरसाठी अथक कष्ट तर झेललेच पण आपल्या सहकाऱ्यांमध्ये आणि देशातील नागरिकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले.


 सिंगापूरमधील लोक मेहनती तर होतेच. ली सरकारच्या धोरणांमुळे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या सिंगापूरमध्ये आल्या. अनेक नवीन उद्योग सुरु झाले. लोकांच्या हातांना रोजगार मिळाला. सिंगापूरमध्ये उपलब्ध असलेली जमीन फार कमी होती. जी काही थोडीफार जमीन होती, तिची धूप मोठ्या प्रमाणात होऊन ती नापीक झाली होती. अशा जमिनीच्या वरच्या थरात भर घालून त्या जमिनीची सुपीकता वाढवण्यात आणि धूप थांबविण्यात त्यांनी यश मिळवले. तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन त्या जमिनीवर वृक्ष लागवड केली. सिंगापूरला जगातील सर्वात जास्त हरित शहरांपैकी एक बनवण्याचा चमत्कार करून दाखवला.


देशाच्या नेतृत्वाकडे दूरदृष्टी असेल तर असलेल्या समस्यांवर रडत न बसता हातात जे काही उपलब्ध असेल,त्याच्या साहाय्याने कशी प्रगती करता येते हे सिंगापूरकडे पाहिले तर आपल्याला कळू शकते. सिंगापूरच्या पर्यटन व्यवसायाला ली यांनी चालना दिली. सिंगापूरला आज पर्यटन व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर परकीय चलन प्राप्त होते. सिंगापूर हे जगातील अनेक लोकांच्या दृष्टीने उत्तम पर्यटनस्थळ आहे.

fly