२३ प्रकारचे पराठे
१)आलू पराठा
साहित्य
२ वाट्या कणीक, अर्धा चमचा मीठ, २ टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन, ३ मोठे उकडलेले बटाटे, ७-८ लसूण पाकळ्या, ५-६ हिरव्या मिरच्या वाटून, १ चमचा अनारदाणा पावडर किंवा आमचूर पावडर, मीठ, साखर, चवीनूसार पराठे तळ्ण्याकरता तेल अथवा तूप
कृती
कणीक कडकडीत तेलाचे मोहन, मीठ, साखर घालून घट्ट भिजवून झाकून ठेवावी.
बटाटे गरम असतानाच सोलून किसणीला तेलाचा हात लावून किसून घ्यावेत, किंवा पुरणयंत्रातून काढून घ्यावेत.
किसलेल्या बटाट्यात वाटलेली लसूण, मिरची, साखर, मीठ, अनारदाणा पावडर किंवा आमचुर पावडर घालून गोळा तयार करावा.
भिजलेली कणीक हातानी मळून घ्यावी व तिचे आठ समान भाग करावेत. बटाट्याच्या सारणाचेपण तेवढेच सारखे भाग करावेत.
कणकेच्या एका भागाची हाताने खोलगट वाटी करावी. त्यात सारणाची एक लाटी भरून लाटीचे तोंड सर्व बाजूंनी बंद करुन हलक्या हाताने गोल पराठा पोळपाठावर पिठी लावून लाटावा.
जाड अथवा नॉनस्टिक तव्यावर तूप किंवा रिफाइंड तेल टाकुन दोन्ही बाजूंनी खमंग परतावा.
२)चीझ व भाजीचा पराठा
साहित्य
१ कप मैदा, १ कप कणीक, ६ टे. स्पून डालडाचे मोहन, १/४ कप किसलेले चीझ, १ लहानसा फ्लॉवर, १ गाजर, १ वाटी मटारचे दाणे, १ कांदा, ३/४ हिरव्या मिरच्या, लहानसा आल्याचा तुकडा, २/४ लसूण पाकळ्या, थोडा पुदिना, कोथिंबीर
कृती
सर्व भाज्या किसुन घ्या. मटारचे दाणे व भाज्या थोडे मीठ घातलेल्या पाण्यात वाफवून घ्याव्यात. नंतर सर्व मिश्रण घोटून घ्यावे. पाणी अजिबात राहू देऊ नये.
नंतर त्यात मीठ, मिरच्या, आले, लसूण, पूदिना वगैरे घालून मिश्रण ढवळावे, चीझही घालावे. नंतर मिश्रण थंड होऊ द्यावे.
पिठात थोडे मीठ व मोहन घालून पोळ्यांच्या कणकेसारखी कणीक भिजवावी.
फुलक्याच्या आकाराच्या दोन पोळ्या करुन, मधे सारण पसरुन, कातण्याने कापून परोठे शेकावे. बाजूने तूप सोडावे.
उलटताना फार जपून व बेताने उलटावेत. हे परोठे चवीला फारच सुंदर लागतात.
३)दुधी भोपळ्याचा पराठा
साहित्य
३०० ग्रॅम दुधी भोपळा, ३ वाट्या कणीक, १ चमचा तिखट, १/२ चमचा हळद, १ चमचा मीठ, २ चमचे धणे-जीरे पूड, १ चमचा गरम मसाला, ४ चमचे डालडयाचे मोहन
कृती
भोपळा किसुन घ्यावा. पाणी पिळून बाजूला काढून ठेवावा.
नंतर सर्व एकत्र करुन पीठ भिजवावे. पीठ घट्ट असावे.
जरुर वाटल्यास भोपळ्याचेच काढलेले पाणी वापरावे.
नंतर त्याचे फुलक्याएवढे परोठे करुन दोन्ही बाजूने शेकावेत व नंतर बाजूने तूप सोडावे.
४)मिक्स डाल पराठा
साहित्य
३ वाट्या कणीक, १/४ वाटी बारीक रवा, मीठ, १/२ तेल, ओवा
सारणाच साहित्य
१/४ वाटी प्रत्येकी तूर, चणा, मसूर, हरभरा डाळ, १ टे.स्पून आले-लसूण-मिरची पेस्ट, तिखट मीठ, अनारदाणा/आमचूर पावडर
कृती
कणीक, रवा, मीठ व तेल घालून भिजवून १ तास ठेवावे.
नंतर मळून एकसारखे गोळे करावे. डाळी भिजवून २-३ तासांनी रवाळ वाटाव्यात.
तेल तापवून ओव्याची फोडणी करावी. डाळीचे मिश्रण घालून परतून २ वाफा आण्याव्यात. त्यात आले-लसूण-मिरची पेस्ट, तिखट, मीठ, कोथिंबीर, ग. मसाला घालून परतावे.
आमचूर पावडर घालून उतरावे. कणकेचे व सारणाचे सारखे भाग करुन पराठा करुन लाटावे.
हे पराठे पौष्टिक व चवदार होतात.
५)कोबीचा पराठा
साहित्य
५०० ग्रा. कणीक,२०० ग्रा. किसलेली कोबी, १ जुडी कापलेली कोथंबीर, १ चमचा गरम मसाला, १/२ चमचा मीठ, ३/४ चमचे लाल मिरची, १ तुकडा बारीक कापलेले अदरक,२ कापलेली हिरवी मिरची, तूप तळणासाठी
कृती
कणीक मध्ये एक चिमूटभर मीठ मिळवून घट्ट मळावे.
कोबीत कोथिंबीर, गरम मसाला, उरलेले मीठ, लाल मिरची, आले व हिरवी मिरची टाकुन थोड्याशा तुपात दोन मिनीट फ्राय करून उतरावे.
पिठाचे बरोबर ८ गोळे करावे.
एकास लाटून कोबी भरावा व तव्यावर शेकावी.
अशा पद्धतीने सर्व पराठे बनवून दह्याबरोबर किंवा चटणी सोबत गरम गरम वाढावे.
६)मुळ्याचा पराठा
साहित्य
२ ताजे किसलेले मुळे, १/२ चमचे लाल मिरची, १/२ चमचे वाटलेले अनारदाने, १ कांदा बारीक कापलेला, १ कापलेली हिरवी मिरची, १ जुडी कापलेली कोथिंबीर, १ कप तूप तळणासाठी, २५० ग्रा. गव्हाचे पीठ, १ चमचा तूप पीठात मळण्यासाठी,मीठ चवीनुसार
साहित्य
पीठात तुप व मीठ मिळवावे. नंतर किसलेले मुळे, कांदा, हिरवी व लाल मिरची व कोथिंबीर व मीठ मिसळून आवश्यकतेनुसार पाणी टाकुन घट्ट मळावे.
मळलेल्या पिठाचे बरोबर सहा गोळे करून गोल पराठे लाटावे व दोन्ही बाजुस तूप लावून शेकावावे.
दही, हिरवी चटणी किंवा लोणच्या बरोबर गरम गरम वाढावे
७)पालक पराठा
साहित्य
साहित्य:
१ जुडी पालक, पाने खुडून घ्यावीत. (बारीक चिरून साधारण २ ते अडीच कप)
कणीक
६-७ लसूण पाकळ्या
३-४ तिखट मिरच्या
१/४ टीस्पून हळद
१ टीस्पून जीरे
चवीपुरते मीठ
तेल
कृती:
१) मिरची आणि लसणीच्या पाकळ्या मिक्सरमध्ये वाटून घ्याव्यात.
२) पालक धुवून बारीक चिरून घ्यावा. त्यात मिरची-लसणीचे वाटण घालावे. हळद घालावी.
३) त्यात मावेल इतपत कणीक घालावी (साधारण १ ते दीड कप). चवीनुसार मीठ आणि जीरे घालावे.
४) अगदी थोडे पाणी घालून मळावे. जास्त पाणी घालू नये कारण मळताना पालकाचे सुद्धा पाणी निघते, जर गोळा सैल झाला तर गरजेनुसार कणीक वाढवावी. मिश्रण एकजीव झाले की त्यात २ टेबलस्पून तेल घालावे. पीठ जास्त वेळ मळावे.
५) मळलेल्या पीठाचे गोळे करून मध्यम आकाराचे पराठे लाटावेत. परोठा गरम तव्यावर टाकावा. बाजूने तेल किंवा तूप सोडावे.
६) दोन्ही बाजूने मध्यम आचेवर भाजून घ्यावा.
टिपा :
१) आवडीनुसार परोठा बटर वर करू शकतो.
२) पालक चीरण्याऐवजी मिक्सरमध्ये भरडसर वाटू शकतो.
८)मेथी पराठा
साहित्य:
बारीक चिरलिली मेथीची पाने: २ कपबारीक चिरलेली कोथिंबीर: १/२ कपगव्हाचे पीठ: २ कपतांदळाचे पीठ: १/२ कपहिरवी मिरची, आले , लसूण पेस्ट: चवीनुसारदही: १ टेबल स्पूनओवा: १ टी स्पूनहळदचवीनुसार मीठतेल किंवा तूप
कृती
मेथीच्या पाने आणि थोडे मीठ एकत्र हलवून १० मिनिटे बाजूला ठेवा.नंतर त्यामधे बाकीचे साहित्य घालून चांगले एकत्र हलवा. त्यामधे थोडे पाणी टाकून पीठ चांगले मळून घ्या. शेवटी थोडे तेल घालून मळून घ्या आणि हे कणीक अर्धा तास तरी बाजूला तसेच ठेवा.नंतर त्या कणीक चे छोटे छोटे गोळे करून ठेवा. गॅस वर एक तवा गरम करायला ठेवा. प्रत्येक गोळ्या चे पराठे लाटा. हा पराठा दोन्ही बाजूने चांगला भाजून घ्या. पराठा भाजताना थोडे तूप किंवा तेल लावा.हा गरमागरम पराठा कोणत्याही चटणी किंवा लोणचे किंवा दही बरोबर छान लागतो.
८)मसाला पराठा
साहित्य :-
१) प्रत्येकी एक चमचा धनेपूड
२) जिरे पूड , तेल किंवा बटर
३) कांदा मसाला किंवा गरम मसाला
४) चिरलेली कोथिंबीर
५) अर्धा चमचा मीठ
६) पाव चमचा पिठीसाखर
७) दोन-तीन चमचे तीळ
८) सहा पोळ्यांची कणीक (नेहमीचच) .
कृती :-
१) कणकेचा एक गोळा घेऊन पिठीवर फुलक्याएवढी पोळी लाटावी .
२) मग नेहमीप्रमाणे तेल वा बटर लावावं . तीळ सोडून इतर सर्व मसाले एकत्र कालवावे .
३) त्यापैकी एक चमचा मसाला लाटलेल्या फुलक्यावर पसरावा व त्याची गुंडाळी करून चकलीप्रमाणे घट्ट वळवावी , दाबावी व पिठी आणि तिळावर जाडसर लाटावी . तेल सोडून हा पराठा खरपूस भाजावा . सॉसबरोबर वाढवा .
९)पावभाजी पराठा
साहित्य :-
१) पावभाजीची भाजी
२) नेहमीचच कणीक
३) डाळीचं पीठ .
कृती :-
१) पावभाजीच्या भाजीत बसेल एवढी कणीक व थोडसं डाळीचं पीठ घालून पराठ्यासाठी आवश्यक पीठ
तयार करावं .
या तयार पीठाचे जाडसर पराठे करून तव्यावर खमंग भाजावेत . लोण्याबरोबर खायला दयावेत .
१०)ओल्या नारळाचे पराठे
साहित्य :-
१) अर्ध्या नारळाचा चव
२) एक वाटी कणीक
३) एक वाटी मैदा
४) तेल आणि तूप
५) चार-पाच हिरव्या मिरच्या
६) कोथिंबीर आणि थोडं जिरं यांचं वाटण
७) एक चमचा साखर
८) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) नारळाचा चव नारळाचंच पाणी घालून बारीक वाटून घ्यावा .
२) मैदा आणि कणीक एकत्र करून त्यात वाटण , मीठ , साखर घालून दहा मिनिटं घट्ट भिजवून ठेवावं .
३) मोठया लिंबाएवढा गोळा घेऊन प्लास्टिक पेपरवर छोटे पराठे लाटावे आणि तूप सोडून नॉनस्टिक तव्यावर खमंग भजावे .
४) साखरेऐवजी दोन पेढे बारीक करून घातल्यास छान चव येते
११) कांदा पराठा
साहित्य :-
१) एक वाटी कणीक
२) अर्धी वाटी मैदा
३) एक मोठा चमचा तुपाचं मोहन
४) अर्धा चमचा मीठ
५) अर्धा चमचा साखर
६) दोन कांदे अगदी बारीक चिरून किंवा किसून + चवीपुरतं मीठ + चिमुटभर साखर + अर्धा चमचा तिखट हे मिश्रण कालवून .
कृती :-
१) मीठ-साखर आणि तुपाचं मोहन घालून कणीक व मैदा भिजवून घ्यावा .
२) त्याचे मध्यम आकाराचे बारा फुलके करावेत . आता एका फुलक्यावर कांद्याचं मिश्रण पसरावं .
३) त्यावर दुसरा फुलका कडा दाबून चिकटवावा आणि हलक्या हातानं लाटावा व तव्यावर शेकावा .
४) अगदी खायला घेतांना पुन्हा तेल सोडून खरपूस भाजावा . उरलेल्या फुलक्यात पाच पराठे करावे
१२)पनीर चीझ पराठा
साहित्य :-
१) दीड कप कणीक
२) पाव किलो पनीर
३) अर्धा चमचा कांदा मसाला
४) अर्धा चमचा जिरे पूड
५) अर्धा चमचा धणेपूड
६) अर्धी वाटी चीज स्प्रेड
७) अर्ध वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
८) दोन मिरच्या बारीक चिरून
९) अर्धा चमचा साखर , अर्धा कप मैदा
१०) डाळीचं पीठ पाव कप , लाटायला मैदा
११) एक कांदा बारीक चिरून
१२) एक डाव तेल , तूप वरून सोडायला .
कृती :-
१) कणीक , मीठ , मैदा आणि डाळीचं पीठ एकत्र करून डावभर गरम तेल घालून मऊ भिजवावं .
२) पनीर किसून त्यात कांदा , कोथिंबीर , मिरच्या , धने-जिरे पूड , कांदा मसाला , साखर घालून हलक्या हातानं मिसळावं .
३) भिजवलेल्या पीठाचे दहा गोळे करून त्याच्या पातळ पोळ्या लाटाव्यात .
४) मग एक पोळी घेऊन तिच्या अर्ध्या भागावर चीज स्प्रेड हातानं लावावं .
५) त्यावर पनीर मिश्रण पसरवावं व पोळीच्या उरलेल्या अर्ध्या भागनं ते झाकून कडा दाबून चिकटवाव्या .
६) त्यावरून हलकेच लाटणं फिरवावं व तव्यावर तूप सोडून अशा घडया केलेले पराठे भाजावेत . लोणचं किंवा पुदिन्याच्या दह्याबरोबर दयावेत
१३) पनीर पराठा
साहित्य :-
१) अर्धी वाटी किसलेलं पनीर
२) एक चमचा लोणच्याचा मसाला
३) अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा
४) मुठभर कोथिंबीर चिरून
५) मीठ-साखर चवीप्रमाणे
६) चार पोळ्यांची कणीक
७) तेल किंवा तूप किंवा बटर .
कृती :-
१) प्रथम सारणाचे जिन्नस तयार करावे . व कणकेचे आठ गोळे तयार करावे .
२) आता एका फुलक्यावर पनीरचे मिश्रण पसरावं . त्यावर दुसरं फुलका कडा दाबून चिकटवावा आणि हलक्या हातांनी लाटावा व तव्यावर शेकावा .
३) फुलके उरलेले असतील तर त्या फुलक्यात पराठे तयार करावे .
१४)गाजराचे पराठे
साहित्य
३-४ मध्यम गाजरे - साधारण २ कप खिस होईल इतपत
२-२.५ कप गव्हाचे पीठ (थोडे कमी जास्त)
३-४ हिरव्या मिरच्या
१/२ लिंबाचा रस
चवीप्रमाणे मीठ
१ टीस्पून साखर
मुठभर चिरलेली कोथिंबीर
१ टीस्पून जिरे
पाणी लागेल तसे
कृती -
गाजरे धुवुन साले काढुन खिसुन घ्यावीत. हिरव्या मिरच्या आणि जिरे वाटुन गाजराच्या खिसात घालावे. त्यातच चवीप्रमाणे मीठ, लिंबाचा रस, साखर, कोथिंबीर घालून नीट मिसळून घ्यावे. त्यात बसेल इतके पीठ घालून १०-१५ मिनीटे ठेवावे. १५ मिनिटानंतर थोडे पाणी लावून कणीक मळावी. भिजवलेली कणिक १० मिनिटे झाकून ठेवावी. त्यावर नेहेमीप्रमाणे पराठे करावेत. गरम गरम पराठे लोणचे, चटणी, कोशिंबीरीसोबत फस्त करावेत.
१५)वांग्याचे पराठे
साहित्य –
एक मध्यम आकाराचं भरिताचं वांगं, चिंचेचा कोळ, दीड ते दोन वाटया गव्हाचं पीठ, अर्धी वाटी तेल, चवीपुरतं लाल तिखट, साखर, मीठ.
कृती –
वांगं भाजून त्याची सालं आणि देठ काढून घ्यावा. भाजलेल्या वांग्यांचा गर मिक्सरमधून वाटून घ्यावा. त्यात चवीनुसार मीठ, तिखट, साखर, चमचाभर चिंचेचा कोळ आणि दोन चमचे गरम केलेलं तेलं घालावं. या मिश्रणात दीड ते दोन वाटया गव्हाचं पीठ घालून कणीक मळावी. पिठाचा गोळा तयार केल्यावर त्याचे छोटे-छोटे गोळे तयार करावेत. चपाती लाटतो त्याप्रमाणे गोळा लाटावा, फार पातळ लाटू नये. चपातीप्रमाणे दोन्ही बाजूंनी चांगला शेकून घ्यावा.
१६)कोथिंबिरीचे पराठे
साहित्य –
दोन ते अडीच वाटया गव्हाचं पीठ, पाच ते सहा चमचे मैदा, कोथिंबिरीची मध्यम आकाराची जुडी, वाटीभर तेल, आलं-मिरचीचा वाटलेला ठेचा, एका लिंबाचा रस, थोडंसं लाल तिखट, हळद, वाटीभर चणाडाळीचं खरपूस भाजलेलं पीठ, थोडीशी आमचूर पावडर, फोडणीसाठी जिरं आणि हिंग, आवडत असल्यास लसणीच्या तीन ते चार पाकळया, चवीपुरतं मीठ.
कृती –
कोथिंबिरीची जुडी नीट निवडून, स्वच्छ धुवून, बारीक चिरावी. कढईत अर्धी वाटी तेलावर जिरं, हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यात चमचाभर आलं-मिरचीचा वाटलेला ठेचा घालावा. आवडत असल्यास लसणीच्या पाकळ्याही ठेचून घालाव्यात. नंतर कोथिंबीर घालून फोडणी परतून घ्यावी. मग एक वाटी डाळीच्या पिठात अर्धी-पाऊण वाटी पाणी घालावं. पीठ पाण्यात व्यवस्थित कालवून, पिठाच्या गुठळ्या फोडून घ्याव्यात. ते मिश्रण फोडणीला घातलेल्या कोथिंबिरीत ओतावं. चवीला मीठ, साखर, आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस घालून कढईतील मिश्रण व्यवस्थित परतून घ्यावं. हवं असल्यास त्यात थोडं लाल तिखट घालावं. कढईतील मिश्रणाला एक वाफ येऊ द्यावी. ही कोथिंबिरीची भाजी गार झाल्यावर हाताला मऊ लागली पाहिजे, पण चिकट असता कामा नये. भाजी थोडी झणझणीत झाली तरी चालते. भाजी तयार होईपर्यंत मधल्या वेळात कणकेत मैदा आणि किंचित मीठ घालून पराठयासाठी पीठ मळून घ्यावं. साधारण दीड ते दोन तासांनी कणकेचा तयार गोळा पुन्हा एकदा तेल-पाणी लावून मळून घ्यावा. तो चांगला सैल करावा. त्यात थोडं तेल ओतून झाकून ठेवावं. कणकेच्या गोळयाच्या तिप्पट भाजीचा गोळा घेऊन त्याच उंडा तयार करावा. तो व्यवस्थित लाटून घ्यावा. लाटताना थोडा भाकरीसारखा थापून लाटावा. म्हणजे कडा फुटणार नाहीत. आवडीप्रमाणे दोन्ही बाजूंनी तूप किंवा तेल सोडून पराठा खरपूस भाजावा.
१७)टोमॅटोचे पराठे
साहित्य –
दोन ते तीन वाटया कणकेचं पीठ, दोन ते तीन चिरलेले टोमॅटो, आलं-लसूण-मिरचीची पेस्ट, गोडा मसाला, चवीनुसार तिखट, थोडीशी साखर, मीठ, अर्धी वाटी तेल.
कृती –
दोन ते तीन चिरलेले टोमॅटो मिक्सरमध्ये लावून त्याची प्युरी करावी. या प्युरीत तिखट, मीठ, आलं-लसूण-मिरचीची पेस्ट, चवीपुरती साखर घालून प्युरी चांगली एकजीव करावी. प्युरीतील साखर विरघळल्यावर त्यात मावेल इतकं पीठ घालावं. तेलाचा हात लावून पीठ मळून घ्यावं. तयार गोळयाच्या पोळया लाटून त्या तूप किंवा तेलावर भाजून घ्याव्यात. या पराठयांचं वैशिष्टय म्हणजे ते मस्त गुलाबीसर रंगाचे दिसतात आणि खायलाही तितकेच चविष्ट लागतात.
१८)मक्याच्या पिठाचे पराठे
साहित्य :-
तीन वाट्या मक्याचे पीठ, पाच उकडलेले बटाटे, ७ ते ८ हिरव्या मिरच्या,एक इंच आले, हिंग, तेल .
कृती -:
मक्याच्या पिठात थोडे गरम तेल व चवी नुसार मीठ टाकून पीठ भिजवावे. बटाटे उकडून सोलून किसून घ्यावे त्यात मिरच्या व आले एकत्रित वाटून घालावे. चवी नुसार मीठ, हिंग, हळद, घालून मिश्रण सारखे करून घ्यावे. मक्याच्या पिठाची थोडी मोठी लाटी करून वाटीचा आकार द्यावा व त्यात बटाटाचे सारण भरावे. नंतर हलक्या हाताने जाड पुरीप्रमाणे लाटून घ्यावे व तळावे.
१९)मुगडाळीचे पराठे
साहित्य -:
हिरवी मुग दाळ दोन वाट्या, दोन तासापूर्वी भिजत घालावी, अद्रक लसुन ची पेष्ट, हिंग, जिरे, हिरवी मिरची ५ ते ७, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, गव्हाचे पीठ तीन वाटया.
कृती -:
भिजवलेल्या डाळीची साल काढून घ्यावी, कुकर मध्ये ती दोन शिटी होईस्तोवर शिजवावी, नंतर मिक्सर मध्ये हिंग, अद्रक, लसून, मिरची, एकत्रित करून थोडेबारीक करून घ्यावे , मीठ घालावे, नंतर गव्हाच्या पिठात बारीक चिरलेली कोथिंबीर, टाकून एकत्रित करून गोळा भिजवावा. नंतर छोटे गोळे करून त्याचे पराठे लाटावे. व तव्यावर तेल टाकून भाजावे. मुग दाळ पराठे तयार झाले कि लोणचे किंवा दह्या सोबत खाण्यास दयावे.
२०)मक्याच्या कणसाचे पराठे
साहित्य –
अर्धी वाटी मक्याचे कोवळे दाणे, एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा, एक मोठा चमचा तिळकूट, आवडीप्रमाणे तिखट, मीठ, तीन-चार डाव कणीक, (कणीक लागेल तशी घ्यावी), एक वाटी तेल.
कृती –
बटाटा किसून घ्यावा. कणसाचे दाणे अगदी मऊ वाटावेत. मग दोन्ही एकत्र करून त्यात तिळकूट, तिखट, मीठ व तेलाचे मोहन घालून या मिश्रणात मावेल तेवढी कणीक घालून मध्यम आकाराचे पराठे करावेत. दोन्ही बाजूंनी तेल सोडावे. तांबूस भाजावेत. लोणी वा तूप आणि आंब्याच्या लोणच्याबरोबर खाण्यास द्यावेत.
२१)मेथी केळ्याचे पराठे
साहित्य
मेथी २ जुड्या, ४ पिकलेली केळी, ओवा १ चमचा, तीळ २ चमचे, साखर २ चमचे, लाल तिखट १ लहान चमचा,
चिमुटभर हिंग, चिमुटभर हळद, बेसन २ चमचे, रवा २ चमचे, तांदुळाचे पीठ १ चमचा, दही १ चमचा,मीठ चवीनुसार, दोन मोठे चमचे तेल, मिश्रणात मावेल तितकी कणीक
कृती
१) प्रथम मेथी धुवून बारीक चिरून घयावी.
२) पिकलेल्या केळ्यांची साले काढून आतल्या गराचे बारीक तुकडे करून घ्यावे.
३) कढईत तेल तापल्यावर त्यात केळ्याचे तुकडे टाकून थोडेसे परतून घ्यावे. नंतर त्यातच ओवा, तीळ,साखर,लाल तिखट,हिंग ,हळद,मीठ टाकून परतून घ्यावे.
४) या मिश्रणात चिरलेली मेथी टाकून सर्व मिश्रणाला एक वाफ आणावी.
५) हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात रवा, बेसन, तांदुळाचे पीठ, दही, टाकून व शेवटी त्यात मावेल तितकीच किणक टाकून एकजीव करून घ्यावे. (मिश्रणात पाणी घालू नये. )
६) तयार मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत.
७) या गोळ्यांचे फुलक्यांच्या आकाराचे पराठे लाटून घ्यावेत व म्ध्यम आचेवर दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यावेत. (भाजताना वाटल्यास थोडे तेल सोडावे. )
८) गरम गरम पराठे आपल्या आवडीच्या कुठल्याही चटणीसोबत सर्व्ह करावे.
२२)बिटाचा पराठा
साहित्य
मध्यम आकाराचे १ बीट.
चमचाभर तीळ
तीन चार हिरव्या मिरच्या (भरड वाटून)
बारीक चिरून कोथिंबीर
अर्धीपळी कच्चे तेल
थोडे पाणी
चिमुटभर साखर
चवीप्रमाणे मिठ, हळद,हिंग
कृती:
बीट बारीक किसणीने किसून घ्या.
त्यात तीळ-हळद-हिंग-मिठ-साखर-कच्चेतेल-मिरची-कोथिंबीर घालून कालवून घ्या.
थोडे पाणी घाला. साधारण पाव वाटी पुरते. आता त्यात मावेल तेवढी कणिक भिजवुन थोडावेळ झाकुन ठेवा.
पातळ पराठे लाटा. मध्यम आचेवर भाजून वरून साजूक तूप लाऊन खा.
२३) राहिलेल्या उसळीचा पराठा
राहिलेली कोणतीही उसळ मिक्सर मधून काढून त्यात थोडा उकडलेला बटाटा घालून मिश्रण तयार करा व पराठा करतो तसा पराठा करा.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें