सोमवार, 10 अप्रैल 2023

गणपती हे आराध्य दैवत

 



गणपती हे आराध्य दैवत आहे... गणपती हा दशदिशांचा स्वामी आहे. त्याच्या परवानगीशिवाय इतर देवतादेखील कोणत्याही दिशेने पूजास्थानी येऊ शकत नाही. भारतात मोठ्या संख्येने लोक गणपतीची पूजाअर्चा व साधना करतात. सर्व धार्मिक गोष्टींचा प्रारंभ गणेश पूजन व गायनाने होतो. गणपतीविषयी विस्तृत माहिती खालील लेखातून दिलेली आहे.....            


गणेश हे दैवत सर्वार्थाने केवळ अलौकिक आहे... त्याचे सामर्थ्य अपार आहे. गणपती हा स्थिर बुद्धीचा, शांत स्वभावाचा आणि समोर असलेली व्यक्ती मग ती देव असो किंवा राक्षस असो, कितीही संतापली, रागाच्या पूर्णपणे आहारी गेली, तरी गणपती आपला शांतपणा कधीही सोडीत नाही. तो नृत्य, नाट्य अशा क्षेत्रांचा आदिदेव आहे.....


कोकणातील दहीकाले त्यांच्या पद्धतीने गणेशवंदना करूनच सुरू होतात... तर तमाशाच्या फडावर प्रारंभी जो गण केला जातो, तीसुद्धा गणेशवंदनाच आहे आणि त्यामुळेच अनेक शाहिरांनी, तमासगीरांनी गणेशनमनपर खूपच रचना केल्या आहेत. अगदी ऋग्वेदापासून तमाशाच्या बोर्डापर्यंत गणेशाचा जयजयकार सर्वत्र झालेला आहे, तो का? गणपतीबद्दल मराठी माणसांत नांदणारी श्रद्धा ही उपजतच असते.....


आपण जी देवनागरी लिपी वापरतो, त्या देवनागरी लिपीचा आद्य निर्माता श्रीगणेश आहे... गणपती आणि मराठी माणूस यांचा स्नेहबंध अगदी पुरातन काळापासून आजवर अबाधित राहिलेला आहे. साडेसातशे वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या ज्ञानेश्वरीत ज्ञानोबारायांनी गणपतीच्या स्वरूपाचे रूपक योजून त्याचा साहित्य सृष्टीशी निकटचा संबंध कसा आहे ते दाखविले. सर्व संतांनी गणपतीच्या स्तवनपर रचना केल्या आहेत. इतकेच नव्हे, तर शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी महाराज यांनीही गणपतीवर एक भक्तिगीत लिहिले आहे. मराठी मुलखात गणेशोत्सव सर्वत्र भक्तिभावाने साजरा केला जातो ते आपण पाहतोच. मराठी माणूस कुठेही गेला तरी तो उत्साहाने गणेशोत्सव साजरा करतो.....


आपल्याकडे भक्तीचे मुख्य प्रकार दोन... एक सकाम आणि दुसरी निष्काम. सकाम म्हणजे मनात काहीतरी इच्छा व अपेक्षा बाळगून केलेली भक्ती आणि निष्काम म्हणजे कोणतीही अपेक्षा न बाळगता केलेली भक्ती. गणेशोत्सव साजरा करणारे लोक भक्तिभावपूर्वक हा उत्सव साजरा करतात हे मान्य केले, तर या भक्तीला आपण काय म्हणू शकतो? ही भक्ती सकाम आहे की निष्काम? "सुखकर्ता, दुःखहर्ता' ही आरती म्हणताना "दर्शनमात्रे मनकामनापूर्ती' अशी अपेक्षा आपण व्यक्त करतो. "लाडूमोदकअन्ने परिपूरीत पात्रे' या आरतीत "अष्टहिसिद्धिनवनिधी देसी क्षणमात्रे' याही आरतीत काही अपेक्षा आहेतच.....


अथर्वशीर्षाच्या फलश्रुतीमध्येही अपेक्षा व्यक्त झालेल्या आढळतात आणि गणेशभक्त जी सजावट करतात, आणि गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी जे सतत जागरूक असतात, तीसुद्धा एक गणेशभक्तीच आहे आणि गणपतीसमोर बोलले जाणारे नवस, त्याला अर्पण करण्यात येणारे विविध उपचार हे सगळे सकाम असतात... मग कामना पुरविण्याचे सामर्थ्य या गणपतीपाशी आहेच ना....!


इतक्‍या प्रदीर्घ काळ चाललेल्या या सकाम आराधनेला देशपातळीवर प्रतिसाद का मिळू नये? एक गोष्ट खरी, की चार युगे एक हजार वेळा झाल्यावर ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो... म्हणजे आपल्या दृष्टीने लक्षावधी वर्षांचा काळ म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. त्यामुळे देवाच्या लेखी शंभर किंवा हजार वर्षे हा काही मोठा कालखंड नव्हे. नाही, मला तसे वाटत नाही. गणेशभक्त सांप्रत थोडासा खचल्यासारखा वाटला, तरी आजही अनेक जागी आशेचे किरण आपल्या दृष्टोत्पत्तीस पडतात. नवी पिढी एक वेगळा सर्वसमावेशक विचार घेऊन उदयास येत आहे......


 आज जी पिढी विविध क्षेत्रांत कार्यरत आहे, तिच्या वागण्यात अपापसातील गटांबद्दल थोडेफार वैषम्य आहे, थोडीफार असूया आहे म्हणून जातीयवाद अधिक बोकाळलेला दिसतो... पण हे वातावरण असेच राहणार नाही. "रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल' हे कविवचन इथेही यथार्थ ठरेल आणि उषःकालाचे आगमन सृष्टी शेंदरी रंगाने सूचित करते. तो सिंदुरवदन गणेशाचा शेंदरी रंग उगवत्या पूर्व दिशेवर अगदी लवकरच झळकेल आणि गणेशोपासनेचे फळ येत्या पिढीच्या पदरात पडेल, असा विश्वास मनापासून व्यक्त करावासा वाटतो.....

'भाऊचा धक्का' बांधणारा भाऊ

 


मुंबईत जलवाहतुकीसाठी 'भाऊचा धक्का' बांधणारा भाऊ कोण? ते टोपण नाव आहे की नावाचा झालेला अपभ्रंश?


एकेकाळी कोकणी आणि गोंयकार प्रवाशांनी गजबजणाऱ्या मुंबईतील भाऊच्या धक्क्य़ाला यंदा 158 वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्ताने भाऊच्या धक्क्य़ाच्या इतिहासाची ही सफर.


गेल्या दीड शतकाहूनही अधिक काळ या धक्क्य़ावर गरीब कोकणवासी मुंबईत मिसळून जाण्यासाठी उतरत असतात. पण यातील बऱ्याच लोकांना हे माहीत नसते की, या धक्क्याला भाऊचा धक्का का म्हणतात? कोण हे भाऊ?


‘भाऊ’ हे घरगुती बिरुद जलवाहतुकीच्या टर्मिनसला दिले आहे आणि ते अनेक बेस्ट बसेसवर मराठीत झळकत आहे! कारण याचा जन्मदाता भाऊ अजिंक्य हा पक्का मुंबईकर! पाठारे प्रभू, या मुंबईच्या आद्य रहिवाशांपैकी एक बांधकाम कंत्राटदार….


स्वधन मुंबईच्या हितासाठी खर्चिणारा.. ब्रिटिश राजवटीत कुलाब्याच्या गन फॅक्टरीत हा भाऊ कारकून होता. कॅप्टन रसेल हा तोफखाना विभागातील नामांकित अधिकारी. त्याच्या विभागात एकदा एका मराठी माणसाने चोरी केली. त्याला लष्करी शिस्तीनुसार फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली. एका गरीब मराठी तरुणाला सर्वासमक्ष फटके मिळून त्याची बदनामी होणार, त्यामुळे लक्ष्मण अजिंक्य अस्वस्थ झाला. त्याने रसेलसाहेबाकडे कामगाराच्या वतीने क्षमायाचना केली.


स्वत: देशाभिमानी असलेल्या कॅ. रसेलला, स्वदेशाचा विचार करून एका कामगाराचे फटके वाचविणाऱ्या हेडक्लार्क अजिंक्य या क्षुल्लक कामगाराविषयी आदर निर्माण झाला. कॅप्टन रसेलने लक्ष्मणला मिठी मारून ‘यू आर माय ब्रदर!’ असे उद्गार काढून त्याची पाठ थोपटली.


या उद्गारांमुळे लक्ष्मण अजिंक्यला भाऊ हे नाव पडले ते कायमचे! कॅ. रसेलने या भाऊला व्यापारीक्षेत्रात शिरण्यास उद्युक्त केले. मुंबईत असलेली डबकी आणि सांडपाणी तलाव, मुंबईच्याच कचऱ्याने बुजविण्याचे काम त्या काळी सुरू झालेहोते. भाऊला हे कंत्राट मिळाले. कॅ. रसेलसंबंधी कृतज्ञता म्हणून त्याने आपल्या कंपनीचे नाव ‘भाऊ रसेल आणि कंपनी’ असे दिले.


मुंबईच्या पूर्वकिनाऱ्यावर भरणी घालून करनॅक बंदर आणि क्लेअर बंदर उभारणीचे कामहीही कंपनी करीत होती. तेव्हा आपल्या मराठी माणसांचा जलप्रवास सुखकर व्हावा, यासाठी एक धक्का असावा, असा विचार भाऊ अजिंक्यच्या मनात बळावला. ईस्ट इंडिया कंपनी आणि पोर्ट ट्रस्ट यांची अनुमती मिळवून त्याने तो स्वखर्चाने अमलात आणला.


कोकणच्या जलवाहतुकीसाठी आजतागायत वापरात असलेला ‘भाऊचा धक्का!’ भाऊ रसेल म्हणजेच लक्ष्मण अजिंक्यचे जिवंत स्मारक. रस्ता वाहतुकीसाठी एसटीचा जन्म झाला नव्हता, त्या काळी अर्ध्या अधिक मुंबईकरांचे मूळ कोकणात होते. बेशिस्तीच्या खासगी बस वाहतुकीपेक्षाही त्या काळी कोकणातून मुंबईकडे प्रवास जलमार्गानेच व्हायचा. 1862 साली भाऊ रसेलने हा धक्का बांधण्यापूर्वी उतारूंचे बोटीतून जमिनीवर पाय टेकेपर्यंत खूप हाल व्हायचे. रात्रभर प्रवास करून आलेली बोट समुद्रात लांब कोठे तरी नांगर टाकायची.


मग मोठय़ा हिंदकळणाऱ्या होडय़ांमधून प्रवासी खच्चून भरून, चिखलाने भरलेल्या मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर पाऊल ठेवायचे. गोदीत कंत्राटदारी करणारा भाऊ हे दृश्य पाहून रोज हळहळत असे. ब्रिटिश सरकार हे हाल निवारण्यासाठी काही करणार नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांच्याच पैशावर गडगंज झालेल्या कंत्राटदार भाऊ अजिंक्यने धक्का स्वत:च उभारण्याचे ठरवले, आणि अल्पावधीतच कोकणी माणसांच्या हक्काचा धक्का तयार झाला. कालांतराने कोकण आणि गोव्याकडे जाणारी जलवाहतूक बंद पडली तरी १९७० पर्यंत भाऊचा धक्का दिवसभर प्रवाशांनी गजबजलेला असे.


सकाळी साडेसहा वाजता रेवस-धरमतरकडे जाणारी छोटी बोट सुटली की, आठ वाजता दाभोळ बंदरापर्यंतची मोठी बोट सुटत असे. लागोपाठ रत्नागिरी, विजयदुर्ग, गोवा या लाइनीवरील अगडबंब बोट सुटत असे. याबोटी निघून गेल्या तरी आदल्या दिवशी कोकण-गोव्याकडे गेलेल्या बोटी परतण्याची वेळ झाल्यामुळे दुपापर्यंत भाऊच्या धक्क्य़ाला उसंत नसेच. या काळात भाऊच्या धक्क्य़ाचा अवतार. रेल्वेच्या कुठल्याही टर्मिनसवर दिसणारा असा,  बोट धक्क्य़ाला टेकण्याच्या सुमारास, लाल डगलेवाल्या हमालांचा जथ्था..


एक गलेलठ्ठ जाडीचा दोरखंड घेऊन तो डेकवर फेकण्यासाठी सज्ज दिसे. मुख्य डेकवर तोंडात चिरूट धरलेला शुभ्र वस्त्रातील गोवेकर कॅप्टन ‘..आऽऽरी माऽऽर, आऽरीऽमाऽऽर’ अशी अनाकलनीय ऑर्डर देऊन बोट धक्क्य़ाला समांतर आणीत असे.


बोटीवरून खेचून घेतलेला जाड दोरखंड धक्क्य़ावरील दगडी मनोऱ्याला (कॅपस्टन) बांधला की, हमालांचा जथ्था बोट खेचून धक्क्य़ाला अंगलट करीत असत. सशक्त, चपळ हमाल बोट आणि धक्का यांना जोडणारा सेतू लागण्याच्या अगोदरच कठडय़ावरून हनुमानउडी मारून आत घुसून प्रवाशांचा कब्जा घेऊ पाहत.


कोकणी प्रवासी वैतागलेल्या गबाळ्या अवतारात, लाल मातीने रापलेल्या कपडय़ात, केव्हा एकदा जमिनीवर पाऊल ठेवतो, यासाठी आतुर असे. उलट्या करून थकलेले चेहरे, ढीगभर वळकट्या आणि आंबा-फणसाची पोती उचलण्याची करामत करताना तो केविलवाणा होई. तरीही आपल्या गावच्या मातीची ऊब घेतलेला कोकणी माणूस नव्या उत्साहाने गजबजलेल्या मुंबईत धनार्जनासाठी मिसळून जात असे.


एके काळी दिवसभर गजबजलेला भाऊचा धक्का आता वयस्कर माणसासारखा सुस्त झाला आहे. आधुनिक कोकण रेल्वे त्याला वाकुल्या दाखवीत असली, तरी स्थितप्रज्ञ ज्येष्ठाच्या नात्याने तो निनादत असतो.....

'मीच खरा कोकणी माणसाचा जिवाचा सखा!’

fly