गणपती हे आराध्य दैवत आहे... गणपती हा दशदिशांचा स्वामी आहे. त्याच्या परवानगीशिवाय इतर देवतादेखील कोणत्याही दिशेने पूजास्थानी येऊ शकत नाही. भारतात मोठ्या संख्येने लोक गणपतीची पूजाअर्चा व साधना करतात. सर्व धार्मिक गोष्टींचा प्रारंभ गणेश पूजन व गायनाने होतो. गणपतीविषयी विस्तृत माहिती खालील लेखातून दिलेली आहे.....
गणेश हे दैवत सर्वार्थाने केवळ अलौकिक आहे... त्याचे सामर्थ्य अपार आहे. गणपती हा स्थिर बुद्धीचा, शांत स्वभावाचा आणि समोर असलेली व्यक्ती मग ती देव असो किंवा राक्षस असो, कितीही संतापली, रागाच्या पूर्णपणे आहारी गेली, तरी गणपती आपला शांतपणा कधीही सोडीत नाही. तो नृत्य, नाट्य अशा क्षेत्रांचा आदिदेव आहे.....
कोकणातील दहीकाले त्यांच्या पद्धतीने गणेशवंदना करूनच सुरू होतात... तर तमाशाच्या फडावर प्रारंभी जो गण केला जातो, तीसुद्धा गणेशवंदनाच आहे आणि त्यामुळेच अनेक शाहिरांनी, तमासगीरांनी गणेशनमनपर खूपच रचना केल्या आहेत. अगदी ऋग्वेदापासून तमाशाच्या बोर्डापर्यंत गणेशाचा जयजयकार सर्वत्र झालेला आहे, तो का? गणपतीबद्दल मराठी माणसांत नांदणारी श्रद्धा ही उपजतच असते.....
आपण जी देवनागरी लिपी वापरतो, त्या देवनागरी लिपीचा आद्य निर्माता श्रीगणेश आहे... गणपती आणि मराठी माणूस यांचा स्नेहबंध अगदी पुरातन काळापासून आजवर अबाधित राहिलेला आहे. साडेसातशे वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या ज्ञानेश्वरीत ज्ञानोबारायांनी गणपतीच्या स्वरूपाचे रूपक योजून त्याचा साहित्य सृष्टीशी निकटचा संबंध कसा आहे ते दाखविले. सर्व संतांनी गणपतीच्या स्तवनपर रचना केल्या आहेत. इतकेच नव्हे, तर शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी महाराज यांनीही गणपतीवर एक भक्तिगीत लिहिले आहे. मराठी मुलखात गणेशोत्सव सर्वत्र भक्तिभावाने साजरा केला जातो ते आपण पाहतोच. मराठी माणूस कुठेही गेला तरी तो उत्साहाने गणेशोत्सव साजरा करतो.....
आपल्याकडे भक्तीचे मुख्य प्रकार दोन... एक सकाम आणि दुसरी निष्काम. सकाम म्हणजे मनात काहीतरी इच्छा व अपेक्षा बाळगून केलेली भक्ती आणि निष्काम म्हणजे कोणतीही अपेक्षा न बाळगता केलेली भक्ती. गणेशोत्सव साजरा करणारे लोक भक्तिभावपूर्वक हा उत्सव साजरा करतात हे मान्य केले, तर या भक्तीला आपण काय म्हणू शकतो? ही भक्ती सकाम आहे की निष्काम? "सुखकर्ता, दुःखहर्ता' ही आरती म्हणताना "दर्शनमात्रे मनकामनापूर्ती' अशी अपेक्षा आपण व्यक्त करतो. "लाडूमोदकअन्ने परिपूरीत पात्रे' या आरतीत "अष्टहिसिद्धिनवनिधी देसी क्षणमात्रे' याही आरतीत काही अपेक्षा आहेतच.....
अथर्वशीर्षाच्या फलश्रुतीमध्येही अपेक्षा व्यक्त झालेल्या आढळतात आणि गणेशभक्त जी सजावट करतात, आणि गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी जे सतत जागरूक असतात, तीसुद्धा एक गणेशभक्तीच आहे आणि गणपतीसमोर बोलले जाणारे नवस, त्याला अर्पण करण्यात येणारे विविध उपचार हे सगळे सकाम असतात... मग कामना पुरविण्याचे सामर्थ्य या गणपतीपाशी आहेच ना....!
इतक्या प्रदीर्घ काळ चाललेल्या या सकाम आराधनेला देशपातळीवर प्रतिसाद का मिळू नये? एक गोष्ट खरी, की चार युगे एक हजार वेळा झाल्यावर ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो... म्हणजे आपल्या दृष्टीने लक्षावधी वर्षांचा काळ म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. त्यामुळे देवाच्या लेखी शंभर किंवा हजार वर्षे हा काही मोठा कालखंड नव्हे. नाही, मला तसे वाटत नाही. गणेशभक्त सांप्रत थोडासा खचल्यासारखा वाटला, तरी आजही अनेक जागी आशेचे किरण आपल्या दृष्टोत्पत्तीस पडतात. नवी पिढी एक वेगळा सर्वसमावेशक विचार घेऊन उदयास येत आहे......
आज जी पिढी विविध क्षेत्रांत कार्यरत आहे, तिच्या वागण्यात अपापसातील गटांबद्दल थोडेफार वैषम्य आहे, थोडीफार असूया आहे म्हणून जातीयवाद अधिक बोकाळलेला दिसतो... पण हे वातावरण असेच राहणार नाही. "रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल' हे कविवचन इथेही यथार्थ ठरेल आणि उषःकालाचे आगमन सृष्टी शेंदरी रंगाने सूचित करते. तो सिंदुरवदन गणेशाचा शेंदरी रंग उगवत्या पूर्व दिशेवर अगदी लवकरच झळकेल आणि गणेशोपासनेचे फळ येत्या पिढीच्या पदरात पडेल, असा विश्वास मनापासून व्यक्त करावासा वाटतो.....
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें