🌹 मी फार हेकट, एककल्ली, कुणी व्यावहारिक, प्रापंचिक कल्याणकारी बाबी सांगीतल्या तरी ईतरांना धुत्कारुन मनाला वाटेल असा स्वैर वागणाऱ्या प्रवृत्तीचा मनुष्य आहे.
जगात जसे सर्वांनाच सुख पाहिजे असते असाच मी ही प्रवाहानुसार वाहणारा मात्र आतल्या गाठीचा असा मनुष्य आहे, हे सांगणारा मला कुणी अगदी उन्मत्त म्हणाल तरी चालेल, पण दांभिकपणाचा आव न आणता व सरळ सरळ मनोवृत्ती असलेला फटकळ, भीडभाड न ठेवता जगव्यवहार सांभाळणारा असा माझा काहिसा स्वभाव आहे.
कुणी अहंकारी म्हणाल तरी हरकत नाही, मात्र एक गोष्ट स्वतःला नियमित पटवण्याचा प्रयत्न करतो आहे की या अहंकाराला चालना देणारे तत्व जे दृष्टोत्पत्तीस येत नाही मात्र ते हृदयात आजपर्यंतही प्रविष्ट आहे असा परमात्मा हाच तर या वरील सर्व बाबींचा आधार होय.
प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः,
अहङ्कार विमुढात्मा कर्ताहमिति मन्यते ।।
अहंकाराचे ओझे मनावर ताण निर्माण करते मात्र प्रकृती ही तीन गुणाधिष्टीत कार्य करते याची जाणीव नाही व सर्वांचा आधार चेतना व मन या परमेश्वराच्या विभुति आहेत याचे तर भानच विसरल्यामुळे माझ्या वागण्यातील विकार, अवगुण हे प्रकट होतात.
आजचा विषय सुखाशी निगडीत आहे पण तेच सुख तीन गुणांपैकी सात्विक असेल तर कल्याणकारी ठरते याचे अगदी तात्विक विवेचन स्वामी वरदानंद भारती यांच्या चिंतनातून प्रकट झाले आहे त्याचा विचार आज पाहू.
यत्तदग्रे विषमिव,
अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तं च निगच्छति ।।
यत्तदग्रे विषमिव परिणामेsमृतोपमम,
तत्सुखं सात्विकं प्रोक्तं आत्मबुद्धिप्रसादजम् ।।
अभ्यासामुळे, सातत्यामुळे ज्याच्याविषयी गोडी वाटू लागते, ज्याच्यामुळे दुःखाचा निरास होतो, जे आरंभी विषाप्रमाणे नको वाटते, पण परिणामी अमृतासारखे हितकर ठरते त्याला सात्विक सुख म्हणतात. हे सात्विक सुख आत्मविषयबुद्धीच्या निर्मलतेतून उत्पन्न होत असते.
सात्विक सुख हे सुख खरे, पण ते आरंभी तरी बहुतेक वेळा वाटत नाही. नको नकोसे वाटते, त्रास देते, कंटाळा आणते उदा. आरोग्यशास्त्राने स्वास्थ्य चांगले राहावे यासाठी जे आहारविहाराचे नियम सांगितले आहेत, त्याचे पालन करणे माणसाला सहसा आवडत नाही.
आहार साधा असावा. पुष्कळ तिखट-मीठ घातलेले, चमचमीत फोडणीचे खमंग पदार्थ, गूळ-साखरेचा मुक्त हस्ताने वापर केलेली मिष्टान्ने, आटवलेले दूध, खवा यांसारखे पचावयास जड असलेले पदार्थ खाऊ नयेत. जेवणात तिखट-मिठाचे प्रमाण अत्यल्प असावे.
रात्री लवकर झोपावे. पहाटे लवकर उठावे. अंथरुण सोडण्याचे दृष्टीने ब्रह्ममुहुर्त (सूर्योदयापूर्वी दोन अडीच तास) फार चांगला.
आहार -विहार अगदी नियमित प्रमाणात, नियमित वेळेत असावेत. प्रतिदिनी व्यायाम आवश्य करावा. मद्यादी मादक पदार्थाचेच काय, पण बिडी सारखेही व्यसन नसावे. शय्या टणक असावी. मऊ दुलदुलीत असू नये. इत्यादी नियम आरोग्यशास्त्र सांगते. पण त्याचा आचार राहुद्याच, विचार तरी किती लोक करतात ? कारण हे सर्व कृतीत आणणे आरंभी आरंभी तरी कष्टदायक असते.
पहाटेच्या गुलाबी गारव्यात अंथरूण सोडायला नको वाटते. दूरदर्शन, चित्रपट, नाटक, नृत्यगीताचे कार्यक्रम यांचे आकर्षण रात्री लवकर झोपणे टाळीत असते.
तिखट-मीठ मसाल्याच्या अभावाने खमंग नसलेला पदार्थ तोंडात घोळतो, गिळला जात नाही. त्याचे कारण एकच की, आरोग्यासाठी सांगितलेले नियम परिणामी हितकर असले तरी आरंभी नकोसे वाटणारेच असतात. त्यांच्या चांगुलपणाची अभ्यासाने सवय जडवून घ्यावी लागते. असा प्रयत्न दीर्घकाल करावा लागतो. तेव्हाच या नियमांच्या पालनात सहजता येते आणि मग ते सुखावहही वाटू लागतात. परिणामी ते सुखाचेच नव्हे, तर हिताचेही ठरत असते. पण या सात्विक सुखाचे एक वैशिष्ट्य आहे. त्याचे सुख सहजासहजी जाणिवेत येत नाही. सात्विक सुख हे काहीसे वरच्या पायरीवरचे आहे.
श्रीमद्भगवद्गीतेतील अठराव्या अध्यायातील भगवंतांच्या बोधपूर्ण श्लोकाधारीत हे श्रीसद्गुरु स्वामीजींचे हे विवेचन आहे, श्रद्धा विश्वासाने स्विकारले तरच सात्विक सुखाचे धनी व्हाल !
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें