सदवस्तू साध्य करून घेण्याचा उपाय सत्संगती.
एखाद्या दारूबाजाप्रमाणे विषयी मनुष्य वागत असतो. त्याला सर्व कळते, पण वळत नाही.
एकीकडे स्वतःला तो परमात्म्याचा अंश म्हणवितो, आणि दुसरीकडे विषयांच्या आहारी जातो.
खरोखर, भक्तीशिवाय सर्व काही वाया आहे. संताजवळ राहावे आणि भक्तीचे साधन करावे.
आपल्याला काही करायचे उरले आहे असे जे वाटते, ते न वाटू लागले, म्हणजे साधनात प्रगती झाली असे समजावे.
भगवंताची भक्ती घडायला गुरूसेवा हे एक मुख्य साधन आहे. जो शिष्य आज्ञा पाळतो त्याला भेटणे गुरूला भागच पडते.
वास्तविक, गुरू मनात काही इच्छाच येऊ देत नाही; म्हणून कामधेनूपेक्षाही गुरू श्रेष्ठ आहे.
अत्यंत तळमळीशिवाय भगवंताचा योग शक्य नाही.
संतसमागम प्रारब्धाने होतो, पण 'सम' रीतीने जाता आले तर खरा 'समागम' घडतो.
पण आमचा मार्ग विषय आहे; म्हणून संत भेटूनही त्याचा 'समागम' आपल्याला होत नाही. विषयांमध्ये धुंद असलेल्या आम्हांला पाहून संतांच्या मनात कालवाकालव होते; त्याची आपल्याला कल्पनाही येणार नाही.
आपली बुद्धी आपल्याला समाधानप्रत नेत नाही, तर दुसर्याची मदत घेणे आवश्यक आहे. अशा वेळी, ज्यांची मदत आपण घेतो त्यांचे आपण ऐकायला नको का ?
भगवंताच्या जिज्ञासेचा मार्ग आक्रमायला संतांनी सांगितले. संतांना जिज्ञासा मूळचीच असते. आपल्याला ती नाही, म्हणून ती उत्पन्न करणे भाग आहे.
काही केल्याशिवायच सद्वस्तू साध्य करून घेण्याचा उपाय, म्हणजे सत्संगती हा होय. सत्संगती अती अपूर्व काम करणारी आहे. ज्याचे भाग्य थोर असेल त्यालाच ती लाभेल.
एखादा मनुष्य भोवर्यात सापडला तर त्याला बाहेर काढण्याचे दोन मार्ग आहेत.
एक मार्ग असा की, दुसर्या चांगल्या पोहणार्याने त्या भोवर्यामध्ये उडी मारून तो फोडायचा आणि बुडत्याला बाहेर ओढून काढायचे. पण यासाठी शक्ती फार लागते.
दुसरा मार्ग असा की, आपणच भोवर्यामध्ये बुडी मारून तळाशी जायचे आणि खालून बाहेर निघायचे.
विद्वत्ता ही भोवर्यासारखी आहे. वर वर पाणी फिरत असते तरी तळाशी ते संथ असते.
तसे, जे लोक वरवर विद्या शिकतात ते वादाच्या आणि मतांतराच्या चक्रात सापडतात;
पण जे लोक खोल तळाशी जातात त्यांना खरे काय ते आपोआप कळते, आणि ते सगळीकडे एकच असते.
विद्येच्या भोवर्यामध्ये सापडणार्यांना बाहेर ओढून काढण्याचे काम फार मोठया संतांचे असते.
शहाण्याने त्या भानगडीत न पडावे. हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हे खरे संतांचे काम होय.
१०३. कोणत्याही सत्पुरूषाची परंपरा रक्षण केली पाहिजे. त्यात आपले घुसडू नये.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें