रानभूल....(१)
अधिकारी पदावरील पदोन्नती नंतर पहिलीच पोस्टिंग तेलंगणा (पूर्वीचा आंध्र प्रदेश) राज्यातील आदिलाबाद ह्या आदिवासी बहुल जिल्ह्यातल्या उतनूर नावाच्या अतिदुर्गम गावात झाली, तेंव्हाची ही गोष्ट..
फिल्ड ऑफिसर पदाचा कार्यभार दिला असल्यामुळे कर्जवसुलीसाठी नेहमीच आसपासच्या छोट्या छोट्या गावांत, गावाबाहेरील वस्त्यांत, शेतातील वाड्यांमध्ये जावं लागायचं. सर्वत्र साग, अर्जुन, हिरडा, बेहडा, चिंच, आवळा व मोह वृक्षांची दाट झाडी असलेला उंच सखल डोंगर पर्वतांच्या रांगांचा हा अवघड वाटा वळणांचा प्रदेश होता.
विशाल आकाराची पाने असलेल्या अती उंच साग वृक्षांच्या सावल्यांमुळे दुपारी चार पासूनच जंगलातील अरुंद पायवाटांच्या रस्त्यावर अंधार पडायला सुरवात व्हायची. त्यामुळे कर्जवसुली व अन्य कामांसाठी निघताना सकाळी लवकर निघून शक्यतो दुपारी तीन पर्यंत उतनुरला परत यायचो.
उतनुरच्या चोहिकडील सुमारे पंचवीस किलोमीटरच्या परिसरातील सुदूर जंगलात वसलेली प्रामुख्याने आदिवासी वस्ती असलेली छोटी छोटी गावे हे आमच्या बँकेच्या शाखेचे कार्यक्षेत्र होते.
त्या दिवशीही नेहमीप्रमाणेच सकाळी आठ वाजता नाश्ता करून घरातून निघालो. रमेश नावाच्या बँकेच्या तरुण चपराशालाही सोबत घेतले होते. स्थानिक तेलगू भाषेसोबतच मोडकी तोडकी हिंदी व अर्धवट मराठीही त्याला बोलता येत असे.
उतनुरच्या दक्षिणेकडील जन्नारम रस्त्यावरील बिरसाई-पेट व भू-पेट या दोन गावांना आज भेट द्यायची होती. वाटेतील आठ किलोमीटर अंतरावरील दंतनपल्ली गावाजवळील झोपडीवजा टपरीवर थांबून चहा घेतला, रस्त्याच्या कडेला असलेल्या एक दोन कर्जदार दुकानदारांकडून कर्जाचे हप्ते वसूल केले आणि चार किलोमीटर पुढे असलेल्या बिरसाईपेटकडे निघालो.
रस्त्याला लागूनच असलेल्या बिरसाईपेट गावात भरपूर कर्जवसुली झाली. गावात लवकर पोहोचल्यामुळे बहुतेक सर्व कर्जदार घरीच भेटले. सर्वांच्या घरी जाऊन पीक कर्ज नविनीकरण व अन्य कर्जाबद्दल हिंदी व मराठीतून माहिती दिली. तेथील बऱ्याच गावकऱ्यांना हिंदी प्रमाणेच थोडी थोडी मराठीही समजत असे. ज्यांना फक्त तेलगू भाषा समजायची त्यांच्यासाठी रमेश दुभाषी म्हणून काम करीत असे.
अपेक्षेपेक्षा खूप कमी वेळेत बिरसाईपेट मधील सर्व कामं आटोपल्यामुळे त्या उत्साहातच तेथून डावीकडे चार किलोमीटर आत जंगलात असलेल्या भूपेट गावाकडे निघालो. या गावात फक्त पंधरा वीसच जुने थकीत कर्जदार रहात होते. त्या सर्वांची घरे रमेशला ठाऊक होती.
तो दिवस आमच्या दृष्टीने खूपच चांगला होता, कारण भूपेट गावातही बरीच वसुली झाली. नुकतेच तेथील शेतकऱ्यांकडे पीक विक्रीचे पैसे आले होते. आम्ही त्यांच्याकडे वेळेवर पोहोचल्यामुळे त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता अगदी सहजपणे कर्ज हप्त्याची रक्कम आमच्या हातात ठेवली. एक दोन खूप जुन्या थकीत कर्जदारांनी सुद्धा कर्जाची बाकी चुकविल्यामुळे आम्ही खूपच आनंदात होतो.
दाट जंगलातील भूपेट गावच्या अवघड पायवाटेच्या रस्त्याने अतिशय काळजीपूर्वक मोटसायकल चालवीत आम्ही दुपारी बारा वाजेपर्यंत पुन्हा बिरससाईपेट गावाच्या मुख्य रस्त्याला लागलो. आमचं आजचं नियोजित सर्व काम खूप लवकर आटोपलं होतं. बँकेतही परत जाऊनही आज काही विशेष करण्याजोगं काम नव्हतं. मग आता एवढ्या लवकर उतनुरला परत जाऊन काय करायचं ? असा मनाशी विचार करीतच होतो, तेवढ्यात रमेश म्हणाला..
"साब, रस्ते के दाहिनी ओर के जंगलमें चार किलोमीटर अंदर बालमपुर गांव है.. वहां हमारे दो बहुत पुराने बडी रकम के डिफॉल्टर बॉरोअर रहते है.. मैं कुछ साल पहले वहां गया था.. बहुतही सुंदर जंगल का रास्ता है.. रास्ते में कई झरने, तालाब है.. एक नदी भी क्रॉस करनी पड़ती है.. अगर आप चाहो तो हम अभी वहां जाकर चार बजे के पहले वापस आ सकते है..!"
रमेशची ही सूचना मला लगेच पटली. बालमपुर गावातील त्या दोन जुन्या मोठ्या थकीत कर्जदारांबद्दल मला माहिती होती. आजचा दिवस शुभ होता. योगायोगाने जर त्या दोन जुन्या कर्जदारांकडूनही कर्ज वसुली झाली असती तर ती आमच्यासाठी फार मोठी अचिव्हमेंट ठरली असती.
आम्ही दुपारच्या जेवणाचे डबे सोबत आणले होते. ते भूपेट गावात खाऊन मग ऊतनुरला परतायचे, असे पूर्वी ठरले होते. पण आता बालमपुरला जाऊनच जेवण करायचे असे ठरवले आणि मोटर सायकल उजव्या बाजूच्या जंगलातील उतारावरील पायवाटेकडे वळवली.
रमेशने म्हटल्याप्रमाणे हे जंगल खरोखरीच खूप रमणीय होते. खूप वेगळ्या जातीची सुंदर रानफुले पायवाटेच्या दोन्हीकडे फुललेली होती. जंगलातील वृक्षही जरा वेगळे, मंद, मोहक, सुवासिक असे भासत होते.
जवळच कुठेतरी एखादा लहानसा ओढा किंवा झरा वाहत असावा. त्याचा हलकासा मंद खळखळाट पैंजण घातलेल्या नर्तिकेच्या पदरवासारखा मधुर, मंजुळ भासत होता. मधूनच एखाद्या पक्ष्याने सुरेल शीळ वाजवत घातलेली साद व त्याला अन्य पक्ष्यांनी नाजूक चिवचिवाट करीत दिलेला तितकाच गोड प्रतिसाद एक वेगळीच अनुभूती देऊन जात होता.
आवळा, चिंचा, बोरं तसेच अन्य जंगली फळझाडांच्या पिकलेल्या फळांचा सुवास सर्वत्र दरवळत होता. जागोजागी मोहाच्या फुला व फळांचा सडा पडलेला दिसत होता. त्यांचा मादक गंधही वातावरणात भरून राहिलेला होता. बाहेरचे कडक ऊन जंगलातील हिरव्यागार वनश्रीेत सुखद, उबदार भासत होते.
ही जंगलातील बालमपुरच्या दिशेने जाणारी पायवाट पालापाचोळ्याने झाकून गेली होती. बहुदा ह्या रस्त्यावर फारशी वहिवाट नसावी. जंगलातील आसपासचा परिसर कुतूहलाने न्याहाळीत अतिशय संथ गतीने व निःशब्दपणे आमचा प्रवास सुरु होता.
वाटेत अनेक मोठे खड्डे, खाच खळगे लागले. अशावेळी गाडीवरून खाली उतरून गाडी ढकलत पुढे न्यावी लागायची. काही छोटे मोठे स्वच्छ पाण्याचे उथळ नालेही लागले. ते मात्र मोटर सायकलवर बसूनच ओलांडले.
आम्ही जसे जसे जंगलाच्या आत आत खोल जात होतो तसे तसे ते जंगल अधिकाधिक निबीड, दाट होत चालले होते. मोठ्या आकाराच्या दाट पानांमुळे फार कमी सूर्यप्रकाश आत पोहोचू शकत होता. झाडांना लटकुन खालपर्यंत आलेल्या जंगली रानवेली चेहऱ्याला चाटून जात होत्या. कमी, अंधुक प्रकाश व झाडांच्या लांब लांब सावल्यांमुळे संध्याकाळ झाल्याचा भास होत होता.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी चार पाच फूट उंचीची मोठी मोठी वारुळे होती. कोणत्याही क्षणी त्यातून फणा काढलेला नाग बाहेर येईल अशी भीती वाटत होती. एवढंच नव्हे तर पायवाटेवरील पालापाचोळ्याच्या खालीही एखादं जनावर असू शकेल असं वाटत होतं.
असा बराच वेळ त्या अनोळखी रस्त्याने प्रवास झाल्यावर पाठीमागे बसलेल्या रमेशला विचारलं..
"क्या टाईम हुआ होगा..?"
"एक बज कर बीस मिनट..!"
मनगटावरील घड्याळाकडे पहात रमेश उत्तरला.
"ठहरो साब.. ठहरो !"
अचानक काहीतरी आठवल्यासारखं करीत रमेश म्हणाला..
"कुछ तो गड़बड़ है..! पिछली बार जब हम बालमपुर गए थे तो सिर्फ आधे घंटेमे गाँव के अंदर पहुंचे थे.. रास्ते में एक नदी भी लगी थी.. लगता है हम गलत रास्ते से जा रहे है..!"
रस्ता चुकल्याची थोडी थोडी शंका मला देखील येत होती. पण आतापर्यंत आम्ही अगदी सरळ सरळ पायवाटेनेच येत होतो. ही वाट कुठेही दुभागली नव्हती किंवा तिला कोणताही दुसरा फाटाही फुटला नव्हता.
आम्ही बिरसाईपेटहुन उजवीकडील जंगलात शिरताना तिथे गावाचे नाव लिहिलेली वन खात्याची एक तेलगू भाषेतील पाटी देखील होती, हे आठवलं.
"रमेश, तुमने वो बोर्ड ठीकसे पढ़ा था नं.. ?"
"हां साब..! बोर्ड पर बालमपुर ही लिखा था.. पास ही में वेलफेयर डिपार्टमेंट और इरिगेशन डिपार्टमेंट का बोर्ड भी था.. उस पर भी बालमपुर ही लिखा था..!"
रमेश छातीठोकपणे म्हणाला.
.. मग कसला तरी कानोसा घेत तो म्हणाला..
"लगता है वो नदी पास ही में है.. !"
खरोखरीच थोडं पुढे जाताच सुमारे तीस चाळीस फुटाचे खूपच उथळ पात्र असलेली एक नदी वाहताना दिसली. मोटर सायकल उभी करून नदीच्या काठावरील एका मोठ्या दगडावर आम्ही दोघेही बसलो. नदीला जेमतेम फुटभर खोल पाणी होतं. नदीच्या पात्रात अनेक उंच झाडे मोडून आडवी पडली होती. त्यांच्यामुळे नदीवर लाकडी पूल असल्यासारखे वाटत होते. स्वच्छ पाण्यात नदीतील वाळू, गोटे अगदी स्पष्टपणे दिसत होते.
"हम शायद दूर के रास्ते से आए, लेकिन गांव तक तो पहुंच गए..! बस, अब नदी के उस पार.. बहुत ही नजदीक बालमपुर गांव है !"
सुटकेचा निःश्वास टाकीत रमेश म्हणाला.
मोटर सायकलवर बसून उत्साहातच नदी पार केली. आता आम्हा दोघांनाही कडाडून भूक लागली होती. बालमपुरला गेल्यागेल्याच आधी डबा खाऊन घ्यायचा आणि मगच त्या दोघा कर्जदारांबद्दल चौकशी करायची असं ठरवलं.
नदी पार करून बरेच पुढे आलो तरी बालमपुर गावाचा काहीच थांगपत्ता नव्हता. उलट पायवाट जंगलात आणखी खोल खोल जात चालली होती. जंगलही अधिकाधिक दाट झाल्यासारखं वाटत होतं. आम्ही जात होतो ती पायवाट, ते जंगल ओळखी ओळखीचं वाटत होतं. या वाटेवरून आपण पूर्वीही कधीतरी गेल्याचं पुसटसं आठवत होतं.
असाच आणखी अर्धा एक तास गेला असावा.
"रमेश, क्या टाईम हुआ..?"
काहीतरी विचारायचं म्हणून म्हणालो.
"एक बज कर बीस मिनट.. अरे..! बंद पड़ गई शायद मेरी घड़ी..!"
मनगटावरील घड्याळ कानाजवळ नेत टिकटिक ऐकण्याचा निष्फळ प्रयत्न करीत रमेश म्हणाला.
तितक्यात.. मोहाच्या झाडावरून खाली लटकणाऱ्या एका लांबलचक वेलीने रमेशच्या चेहऱ्याला तडाखा दिला आणि रमेश किंचाळत ओरडला..
"रुको.. रूको.. साब !"
मी गाडी थांबवली.
"यहीं पर.. यहीं बेल..घंटा भर पहले मेरे चेहरे से टकराई थी.. वो देखो.. ईप्पु पुव्वा, ईप्पु पंडु..!!"
उत्तेजित होऊन रमेश ते मोहाच्या झाडाखाली असलेले फुलांचे व फळांचे ढीग दाखवीत होता. मोहाच्या झाडाला तेलगू भाषेत "ईप्पु" असे म्हणतात. फळाला "पंडु" तर फुलाला "पुव्वा" असे म्हणतात.
तासाभरापूर्वी हेच मोहाच्या फुलांचे व फळांचे ढीग रमेशने मला दाखविले होते. त्यावेळीही त्याला असाच लटकणाऱ्या वेलीने तडाखा दिला होता.
आम्ही नीट निरखून सभोवताली पाहिलं. नक्कीच... इथूनच गेलो होतो आम्ही तासाभरापूर्वी.. हीच अशीच झाडं होती तेंव्हा.. अगदी याच क्रमाने.. ते कोवळ्या सागाचं पाच फूट उंचीचं झाड.. त्याच्या बाजूचं ते आवळ्याचं झाड.. ते तिरपं उगवलेलं हिरड्याचं झाड.. अगदी तसंच..
पण.. हे कसं शक्य आहे..? आम्ही तर कुठेच वळलो नाही.. सरळ सरळ पुढे पुढेच जात आहोत. मग असे गोलाकार..मागे वळून पुन्हा त्याच रस्त्यावर कसे आलो..?
पूर्वी जेंव्हा याच वेलीने रमेशच्या तोंडावर तडाखा दिला होता तेंव्हा चेहऱ्याला लागलेला वेलीचा चीक, गाडी साफ करायच्या कपड्याने पुसून तो कपडा रमेशने तिथेच फेकून दिल्याचं आठवलं. म्हणून थोडं पुढे जात तो कपडा शोधून पाहिला. आणि काय आश्चर्य..? तो फेकलेला कपडाही अगदी तिथेच होता.
हा काय प्रकार आहे ? आम्ही तिथल्या तिथेच गोल गोल तर फिरत नाही आहोत ना ?
तो खाली पडलेला कपडा उचलून घेतला आणि खूण म्हणून तिथल्याच पाच फूट उंचीच्या कोवळ्या सागाच्या झाडाला बांधला.
आता आम्ही सतर्क, सावध झालो होतो. काळजीपूर्वक, आजूबाजूचे चौफेर, चिकित्सक निरीक्षण करीत सजग राहून अगदी हळू हळू पुढे जात होतो. कुठेही कुणा माणसाची, प्राण्याची किंवा पक्ष्याची जराशीही चाहूल लागत नव्हती. फक्त शांत स्तब्ध असलेल्या.. खाली वर.. चोहीकडे पसरलेल्या वृक्ष वेली..
पूर्वी ऐकला होता तसा नदीच्या वाहण्याचा आवाज पुन्हा ऐकू आला. आम्ही गाडी थोडी पुढे नेली.. तो काय..?
आमची गाडी त्याच नदीकाठच्या त्याच मोठ्या दगडाजवळ उभी होती, ज्यावर बसून आम्ही मघाशी विश्रांती घेतली होती. नदीत मोडून आडवी पडलेली तीच उंच झाडे आणि स्वच्छ पाण्यात चमकणारे तसेच वाळू, गोटे..
किंकर्तव्यमुढ होणं म्हणजे काय ? याचा प्रत्यक्ष अनुभव घेत नदीकाठी बराच वेळ उभे होतो. पुढे जावे की मागे फिरावे ? पण.. मागच्या रस्त्याने तर आम्ही सावधपणे येतच आहोत.. मग..पुन्हा नदी ओलांडून पहावी काय..?
त्या नदीकाठच्या मोठ्या दगडाजवळ बराच वेळ उभे असूनही पुन्हा त्या दगडावर बसण्याची यावेळी आमची हिंमतच झाली नाही. अन्य दुसरा कोणता मार्गच नसल्यामुळे पुढे जाण्यासाठी पुन्हा नदीत मोटर सायकल घातली. तत्पूर्वी खूण म्हणून आसपासचे दगड गोळा करून नदीकाठी त्याचे छोटे छोटे ढीग करून ठेवले. तसेच काही वेली तोडून एक दोन झाडांभोवती त्यांच्या गाठी बांधून ठेवल्या.
काही तरी चमत्कार होईल आणि नदी पार करताच बालमपुर गाव आमच्या दृष्टिपथात येईल अशी भाबडी आशाही कुठेतरी मनात होतीच.
🙏🌹🙏
(क्रमशः)
रानभूल... (२)
नदीच्या बाहेर पडल्यावर पुढे जाताना थोड्या थोड्या वेळाने सारखा मागे वळून पहात होतो. आपण पुन्हा पुन्हा त्याच त्याच ठिकाणी कसे जाऊन पोहोचतो आहोत..? हा चकवा तर नाही ना ?
चकव्याचा विचार मनात येताच भीतीने अंग शहारलं. लहानपणापासून ऐकलेल्या चकव्याबद्दलच्या अनेक गूढ कथा, कहाण्या आठवल्या. चकवा हा कोणत्याही वस्तूचे, माणसाचे, पक्ष्याचे, प्राण्याचे रूप घेऊ शकतो, हे ही ऐकल्याचं आठवलं. पण.. आम्हाला तर अजूनपर्यंत एकही माणूस, पक्षी किंवा प्राणी भेटला नव्हता..!
चकवा कोणत्याही सजीव किंवा निर्जीव वस्तूचे रूप घेऊ शकतो.. म्हणजे मग आम्हाला पुन्हा पुन्हा दिसणारे ते वृक्ष.. तो कोवळा पाच फुटी साग.. ते तिरपे हिरड्याचे झाड.. ही सारी चकव्याने घेतलेली रूपे तर नाहीत..? अगदी ती पुन्हा पुन्हा दिसणारी गूढ, भयावह नदी म्हणजे सुद्धा चकव्याचे छद्मरूप असू शकते.
किंवा.. मी मघापासून ज्याच्याशी बोलतो आहे तो बँकेचा प्यून.. रमेश.. तो सुद्धा खरा आहे की चकव्याने घेतलेले रूप आहे..?
मी मोटर सायकल थांबवून रमेशकडे निरखून बघितले.
"..तुम.. रमेश ही हो नं.. ?"
गोंधळलेल्या रमेशकडे अविश्वासपूर्ण नजरेने पहात थरथरत्या घोगऱ्या आवाजात मी विचारलं..
" ऐसा क्यूँ पूछ रहे हो साब..! और.. ऐसा घूर घूर के मत देखो साब मेरी तरफ.. डर लगता है..!"
अगोदरच भीतीने गारठून गेलेला रमेश खाली नजर वळवित म्हणाला. त्याला माझ्या संशयी नजरेची भीती वाटत असावी.. की.. त्यालाही माझ्यासारखीच भीती वाटते आहे.. म्हणजे उलट तो मलाच तर चकवा समजत नाहीय ना..?
...तसं असेल तर आधी रमेशची भीती घालवणं अत्यंत जरुरीचं होतं. कारण या भयावह, एकाकी जंगलात आता आम्हाला एकमेकांचाच आधार होता.
रमेशचा हात धरून आश्वासक शब्दात त्याला म्हणालो..
"देखो रमेश.. हम इस जंगल की भूलभुलैया में अटक गए है.. यहां से कैसे बाहर निकला जाएं.. तुम्हे कुछ सूझ रहा है..?"
"साब.. मुझे पूरा यकीन है, ये छलावा ही है..!"
अत्याधिक अनामिक भयाने स्तब्ध होऊन थिजलेल्या आवाजात एक एक शब्द संथपणे उच्चारीत रमेश म्हणाला.
"छलावा..?.. वो क्या होता है..?"
मी हा शब्द नव्यानेच ऐकत होतो..
"यहां के गोंड आदिवासी उसे साडतीन कहते है.. कुछ आदिवासी उसे भूलनी भी कहते है.. इसे लोगों को सताने में, भटका कर परेशान करने में मजा आता है.."
मी ओळखलं.. रमेश चकव्याबद्दलच बोलत होता.
चकव्याला मराठीत "रानभूल" ही म्हणतात. ग्रामीण भाषेत त्याला "बाहेरची बाधा" म्हणतात तर काही ठिकाणी त्याला "झोटिंग" असे ही म्हणतात.
पूर्वी माणसं फारसा प्रवास करीत नसत. आतासारखी दळणवळणाची साधनं तेव्हा नव्हती. बिकट वाटा आणि अनवट वळणांवरून प्रवास करावा लागायचा. म्हणून माणसं फारसा प्रवास करीतच नसत. काही माणसं तर आयुष्यभर बाहेर गेलेली नसत. अशाकाळी कुणी प्रवासाला निघाला तर त्याच्यावर बरंच दडपण येत असे. दऱ्या, डोंगर, झाडी, वाटमारी याला माणसं सतत घाबरत. मनावर ताण घेऊन केलेल्या प्रवासात माणसं बऱ्याचदा वाट चुकत. आडरानात फिरून फिरून पुन्हा त्याच ठिकाणी येत. दिशांचे ज्ञान विस्मृत झाल्यामुळे दिशाभूल होत असे. याला रानभूल म्हणत. त्यालाच आपण चकवाही म्हणतो.
जे लोक चकव्याला एक प्रकारचे "भूत" मानतात त्यांचा असा समज आहे की हे भूत माणसाला ऐन मध्यान्ही चकविते.
आम्ही देखील ऐन मध्यान्हीच या चकव्याच्या तावडीत सापडलो होतो. त्यातल्या त्यात समाधानाची बाब ही होती की, चकवा हा तसा निरुपद्रवी असतो.. थोडा वेळ भटकवून मग सोडून देतो.. हे वाचून, ऐकून माहिती होतं त्यामुळे जीवावर बेतण्यासारखा काही धोका नव्हता.
चकव्याच्या नादी लागून व्यर्थ जंगलात गोल गोल फिरण्याऐवजी एका ठिकाणी शांत बसून डबे खाऊन घ्यावेत असा विचार करून जवळच एका झाडाखाली बसलो. त्या दाट घनघोर जंगलात डब्यातील अन्नाचा एकेक घास खाताना चारी दिशांना मान वळवून भोवतालच्या वृक्ष वेलींचे बारकाईने निरीक्षण करीत होतो. मधेच मान वर करून उंच उंच झाडांच्या शेंड्यांची न दिसणारी टोकं बघण्याचा प्रयत्न करीत होतो. मघाशी सुंदर, रमणीय वाटणारं हे जंगल आता दुष्ट, क्रूर आणि अक्राळविक्राळ भासत होतं.
खूप भूक लागली असूनही भीतीमुळे घास घशाखाली उतरत नव्हता. आता पुढे काय होणार..? आपण ह्या चक्रव्यूहातून बाहेर कसे पडणार..? जर आपल्याला वाट सापडलीच नाही आणि रात्र जंगलातच काढावी लागली तर..? आपण ज्याला निरुपद्रवी चकवा समजतो आहोत, तो चकवा नसून दुसरा काहीतरी भयंकर प्रकार असेल तर..?
एका मागोमाग एक असे अनेक विपरीत, अनिष्ट, अशुभ विचार मनात येत होते.. विविध शंका कुशंका मनात दाटून येत होत्या. भीतीमुळे घशाला कोरड पडली होती. डबे खाऊन झाले होते. आता तहान लागली होती. आम्ही प्यायचं पाणी सोबत आणलं नव्हतं.
रमेश मध्येच उठून दोन तीन वेळा लघवी करून आला. तसेच पायात चप्पल घालताना त्याचा उजवा की डावा असा गोंधळ होत होता.
"क्या बात है रमेश..? बार बार चप्पल का पांव बदल रहे हो..! और.. हमने कितनी देर से एक घूंट भी पानी नहीं पिया, फिर भी तुम्हे बार बार पेशाब कैसे आ रही है..?"
शेवटी न राहवून विचारलंच...
"सुना है, इस छलावेसे बाहर निकलना हो तो तुरंत पेशाब के लिए बैठ जाना चाहिए ! साथ ही में जूता चप्पल का पांव भी अदला बदली करना चाहिए ! ऐसा करने से छलावे का जादू खत्म हो जाता है !"
रमेशच्या उत्तरामुळे त्याच्या विचित्र वागण्याचा उलगडा झाला.
"चलो फिर.. निकल पडते है..! और एक बार ट्राय कर के देखेंगे..! हो सकता है के तुम्हारा नुस्खा काम कर गया हो और शायद अब की बार हमे रास्ता मिल भी जाये.."
असं म्हणत आम्ही उठलो आणि उसनं अवसान आणून एकमेकांकडे पाहून केविलवाणं हसत मोटर सायकलवर बसून जंगलातल्या पायवाटेने पुढे निघालो.
जाताना वाटेतली सारी झाडं झुडुपं, वृक्ष वेली, खाच खळगे, शिळा, वारुळं ओळखीची वाटत होती. तेच ते स्वप्न आपण वारंवार पहात आहोत असं वाटत होतं. थोड्या वेळाने त्याचा उबग येऊन आजूबाजूला पाहणं सोडून दिलं आणि नाकासमोर पहात गाडी चालवू लागलो.
"रानावनात पडणारा चकवा किंवा पडणारी रानभूल म्हणजे पानाफुलांतील, वृक्षवेलींतील अज्ञात गूढ शक्तीचा अनुभव असतो.."
असं काहीसं एका लेखात वाचल्याचं मला स्मरत होतं. त्या लेखात पुढे असं ही म्हटलं होतं की..
"जंगलातल्या अनेक वृक्षवेलींमध्ये, झाडाझुडपांमध्ये अनेक प्रकारची शक्ती असते. ती आपल्या जाणिवेच्या पलीकडे असल्यामुळे गूढ वाटते. मात्र ही शक्ती सर्वच वृक्षवेलींत नसते. ठरावीक परिसरातच ती आढळते.
रानात भटकायला गेल्यावर अमक्याला ‘चकवा’ लागला किंवा ‘बाहेरची बाधा’ झाली, अशा गोष्टी कुणाकुणाकडून ऐकायला मिळतात. वनस्पती अभ्यासकांच्या मते या ‘चकव्या’लाही वनस्पतीशास्त्रात काही आधार आहे. त्याचा संबंध भुताखेताशी नसून ठरावीक वनस्पतींचं स्वयंसंरक्षणासाठीचं ते एक शस्त्र आहे.
जंगलातल्या काही जागा पवित्र, मंगलमय वाटतात. केवढं प्रसन्न आणि रमणीय वाटतं तिथे. याचा अर्थ तिथे सकारात्मक ऊर्जेचे प्रवाह वाहत असतात. तर काही जागा गूढ, रहस्यमय शक्तींनी भारलेल्या असतात असं वाटतं, आणि त्या आपल्याला अस्वस्थ करतात. तिथे नकारात्मक ऊर्जेचं प्राबल्य असतं. त्या ऊर्जेच्या संपर्कात माणूस आला, की माणसाचं संतुलन बिघडतं. तो भारलेल्या अवस्थेत जातो. कधी आजारीही पडतो. अशी भारून टाकणारी एक अरण्यशक्ती तिथे असते. या अरण्यशक्तीचे, निसर्गऊर्जेचे अनेक अनुभव, अरण्य हेच आपलं घर मानून, सारं जीवन अरण्यात घालवणाऱ्यांना येतात."
....हे सारं आठवत गाडी चालवता चालवता किती वेळ गेला ते कळलंही नाही.
अचानक मागे बसलेल्या रमेशच्या तोंडावर पूर्वी दोनदा बसला होता अगदी तस्साच एका रानवेलीचा जोरदार फटका बसला आणि तो वेदनेनं कळवळला.
मी गाडी थांबवली. तीच जागा.. तीच वेल.. आणि तेच त्या झाडाखाली रचलेले मोहाच्या फळाफुलांचे ढीग..
मोटर सायकल वर पुढे बसलेल्या मला टाळून दरवेळी नेमका मागे बसलेल्या रमेशच्या चेहऱ्यावरच या वेलीचा आघात कसा काय होतो ? हा नेम धरून हल्ला करण्याचा प्रकार तर नाही ना ?
अनेक वृक्षवल्लींत पंचेंद्रियांची गूढ शक्ती असते. जंगलात येणाऱ्या प्रत्येक परक्याचं अस्तित्व ही घुसखोरी वाटल्यामुळे त्यांना ती सहन होत नाही. आपल्याला उपद्रव व इजा करण्यासाठीच कुणीतरी आलेलं आहे अशी त्यांची समजूत होते. मग त्यांची स्वसंरक्षणासाठी प्रतिक्षिप्त क्रिया (Reflex action), हालचाल होते.
... हा वेलीचा रमेशवरील हल्ला म्हणजे अशीच प्रतिक्षिप्त क्रिया तर नाही ना ?
काही वृक्षवेली आपण त्यांच्या जवळपास जाताच पानाफुलांतून उग्र गंध सोडून त्रस्त करून सोडतात. त्या उग्र गंधाचा परिणाम सौम्य किंवा तीव्र भूल दिल्यासारखा होतो. परिणामी प्राणिमात्रांना गुंगी येते. प्रत्येकाच्या मनोबलानुसार कमी-जास्त प्रमाणात स्मृतिभ्रंश होतो. त्यामुळे आजूबाजूच्या व्यक्ती, दिशा यांचं भान राहात नाही. आपण कुठे आहोत, कुठे चाललो आहोत, कुठे जायचं आहे, हे कळेनासं होतं. मेंदू बधिर होतो, आणि मागे, पुढे, डावीकडे, उजवीकडे जाण्याचा रस्ता सापडत नाही. फिरून फिरून व्यक्ती त्याच जागेवर येते. हीच रानभूल! हाच चकवा, आणि हेच झोटिंग!
...आम्हालाही असाच स्मृतिभ्रंश तर झालेला नाही ना ? कारण योग्य दिशा न सापडल्यामुळे आम्हीही फिरून फिरून त्याच जागी येत होतो.
पण नाही..! ज्याअर्थी मला सारं काही व्यवस्थित आठवत होतं त्याअर्थी माझी स्मरणशक्ती जागृत होती. माझी तर्कशक्ती, चिकित्सक वृत्ती व विनोदबुद्धी ही अद्याप शाबूत होती. वास्तवाचं पुरेपूर भानही मला होतं. पण.. पण या व्यतिरिक्त इथे असं काहीतरी होतं की जे माझ्या बुद्धीच्या आकलन कक्षेबाहेरचं होतं.
हा निसर्गाचा भोवरा, हे मायावी अरण्याचं दुष्टचक्र कधी संपणार..? असा सचिंत मनाने विचार करीत असतानाच जंगलातील वातावरण ढवळल्यासारखं होऊन जोरदार वारे वाहू लागले. जवळच्या झाडीतून कुणाच्या तरी दबक्या आवाजातील हसण्याचा व कुजबुज करण्याचा आवाजही कानी पडला. बोलणाऱ्या व्यक्तींची भाषा जरी समजत नसली तरी ऐकू येणाऱ्या विविध प्रकारच्या आवाजांवरून तो किमान सहा सात माणसांचा घोळका असावा.
आतापर्यंत अतिशय शांत, स्तब्ध, नीरव असलेल्या त्या जंगलात कोणतीही चाहूल न लागू देता अचानक एवढी सारी माणसे कुठून आली..? असा प्रश्न पडून भीती वाटण्याऐवजी उलट या जंगलात आम्हाला कुणीतरी सोबतीला आलं आहे याचा आनंदच झाला. या व्यक्तींना जंगलातील सर्व रस्त्यांची खडानखडा माहिती असेल आणि त्यांच्या मदतीने या जंतरमंतर मधून आता नक्कीच बाहेर पडू या विचाराने आम्ही सुखावलो.
बराच वेळ झाला तरी त्या हसत गप्पा करणाऱ्या व्यक्ती जंगलातून बाहेर येण्याचे नावच घेत नव्हत्या. शेवटी कंटाळून त्यांचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही मोठ्याने ओरडून आवाज देत टाळ्याही वाजवल्या. थोडा वेळ तो आवाज एकदम शांत झाला. त्यापाठोपाठ वाहता वाराही लगेच थांबला. पण मग आमच्या आवाजाकडे संपूर्ण दुर्लक्ष करीत पुन्हा त्यांचं हसणं खिदळणं पूर्ववत सुरू झालं. वाराही पूर्वीसारखा अनिर्बंध वाहू लागला.
ती माणसं जंगलातून परस्पर निघून गेली तर या चकव्यातून बाहेर पडण्याची आलेली संधी आपण गमावून बसू या धास्तीने उतावीळ होऊन मी त्यांना गाठण्यासाठी झाडीत शिरण्यासाठी पुढे सरसावलो.. तोच.. रमेशने माझा हात धरून "थांबा..!" अशी खूण केली. मी भिवया उंचावत चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव आणून त्याच्याकडे पाहिलं, तेंव्हा तो हलकेच पुटपुटला..
"साब.. यहीं छलावा है !"
रमेशचे हे शब्द ऐकताच मी विंचू चावल्यागत झटकन झाडीत घातलेला पाय मागे घेतला.
रमेशने इतक्या हळू आवाजात बोललेलं त्या दूर झाडीतील चकव्याला कसं काय ऐकू गेलं कोण जाणे..! पण त्या नंतर तो आवाज एकाएकी एकदम लुप्त झाला. वाहता वाराही अचानक थंड झाल्यामुळे जंगलात स्मशान शांतता पसरली. आम्ही बराच वेळ त्या आवाजाच्या दिशेने कानोसा घेत उभे होतो. पण पुन्हा काही तो आवाज ऐकू आला नाही.
कदाचित तो चकवाही.. आता आम्ही काय करतो..? याची गंमत पहात आमच्या अगदी जवळच उभा असावा. कारण थोडा वेळ कानोसा घेऊन जेंव्हा आम्ही तिथून आपल्या वाटेने पुढे जायला निघालो तेंव्हा त्या झाडीतून विकट हास्याचा एक कल्लोळ उठला. जणू काय.."कसं फसवलं..!" असंच चिडवित तो आम्हाला हसत असावा. पुन्हा सुरू झालेल्या बेभान वाऱ्यासंगे तो गडगडाटी अट्टाहास ध्वनी जंगलभर घुमत असतानाच मी गाडीचा वेग वाढवला.
थोडं पुढे आल्यावर रमेश म्हणाला..
"जब तक हम इस रास्ते पर है, तब तक सेफ है ! उस छलावेका इरादा हमे किसी तरह जंगल के अंदर बुलाकर, दूर खींच के ले जाने का है ! अगर हम गलती से भी रास्ता छोड़कर जंगल के अंदर गए तो बहुत बुरे फंस जाएंगे !"
रमेशचे हे बोलणे ऐकतांच कॉलेजातील मित्राने एकदा सांगितलेला चकव्या संबंधीचा असाच एक किस्सा आठवला.
या मित्राच्या गावाकडील शेतात काम करणारा एक तरणाबांड मजूर दुपारी रानाजवळील वाटेने शेतात जात असताना बाजूच्या झुडुपात त्याला कसलातरी आवाज ऐकू आला. म्हणून त्याने जवळ जाऊन पाहिले तर त्याला काहीच दिसले नाही. तो थोडा पुढे आल्यावर पुन्हा त्याला तसाच आवाज ऐकू आला. यावेळीही त्याला त्या झुडुपात काहीच दिसलं नाही. तिसऱ्या वेळी पुन्हा जेंव्हा तसा आवाज आला तेंव्हा त्याने चिडून त्या दिशेने एक मोठा दगड भिरकावला, तेंव्हा एक गलेलठ्ठ रानकोंबडी पंख फडफडवित रानाच्या दिशेने पळाली.
रान कोंबडी पाहून मजुराला तिला पकडण्याचा मोह झाला आणि तिच्या मागे धावत तो खूप खोल रानात गेला. रानकोंबडी तर त्याला गुंगारा देऊन कुठेतरी गडप झाली पण तो मजूर मात्र त्या रानात अडकला. फिर फिर फिरला, पण रानातून बाहेर पडण्याचा मार्गच त्याला सापडेना. असा चार पाच तास भटकल्यानंतर संध्याकाळी तो गावापासून दहा किलोमीटर दूर तालुक्याच्या दिशेने जाताना दिसला. त्याची अवस्था भ्रमिष्टा सारखी झाली होती. आपल्याला कुठे जायचे आहे याची त्याला शुद्धच नव्हती. गावकऱ्यांनी त्याला कसेबसे घरी आणल्यानंतर बरेच दिवस तो संभ्रमित, अस्थिर मानसिक अवस्थेत होता.
...आम्हीही मघाशी उताविळपणे त्या हसण्याच्या आवाजाच्या दिशेने खोल जंगलात शिरलो असतो तर आमची अवस्था काय झाली असती या नुसत्या कल्पनेनेच मला कापरं भरलं.
जंगलातील ओबड धोबड पायवाटेवरून खडखड असा आवाज करीत हळूहळू पुढे जाणाऱ्या मोटर सायकल वरून आमचा अर्थहीन व अंतहीन प्रवास सुरूच होता.
एवढ्यात.. तोच चिरपरिचित नदीच्या पाण्याचा खळखळाट पुन्हा ऐकू आला. समोर पाहिलं तर तोच नदीकाठचा मोठा दगड, तीच मोडून नदीत आडवी पडलेली झाडे, फुटभर खोल स्वच्छ पाण्यात चमकणारे तेच दगड वाळू गोटे आणि एखाद्या भयनाट्यातील मायावी चेटकिणी प्रमाणे भासणारी तीच तीस चाळीस फुटाच्या उथळ पात्राची खळखळ वाहणारी गूढ रहस्यमय नदी..
"रमेश, क्या नाम है इस नदी का..?"
या नदीचं नक्कीच निर्दया, भीषणा, भेसूरा, कर्कशा, कठोरा, निष्ठूरा, आक्रोशा, रुद्रा, डाकिणी, पिशाचीणी असं काहीतरी भीतीदायक नाव असलं पाहिजे, असा मनाशी विचार करीत रमेशला विचारलं..
"ये नदी आगे जा कर "प्राणहिता नदी" को मिल जाती है इस लिये इस नदी को भी सब लोग प्राणहिता ही कहते है..!"
रमेशचं हे उत्तर ऐकून हसू आलं. एखाद्या निर्दयी कसायाचं नाव दीनदयाळ असावं.. तसंच होतं हे ! खरं तर "प्राणहिता" ऐवजी या नदीचं नाव "प्राणहरा" किंवा "प्राणहंता" असंच असायला हवं होतं..!
हतबुद्ध होऊन नाईलाजाने नदीकाठच्या त्या मोठ्या दगडावर बसून क्षणभराची विश्रांती घेताना आणखी किती वेळा ही नदी आपल्याला पुन्हा पुन्हा आडवी येणार आहे असाच विचार राहून राहून मनात येत होता..
🙏🌹🙏
(क्रमशः)
रानभूल... (३) अंतिम
एका गोष्टीचं मात्र राहून राहून आश्चर्य वाटत होतं की आम्हाला अद्याप एकही माणूस अथवा सजीव प्राणी दिसला नव्हता. आजपर्यंत चकव्याच्या जितक्या कथा ऐकल्या होत्या त्या सर्व कथांत चकव्याने कुत्रा, मांजर, ससा किंवा बकरी यांचेच रूप घेऊन फसवणूक केली होती.
माझा एक मित्र कारने पंढरपूरला जात असताना तुळजापूरच्या पुढे एक वळण घेतल्यावर चुकीच्या रस्त्याला लागला. जेंव्हा खूप वेळ पासून एकही वाहन क्रॉस झाले नाही आणि रस्त्याच्या दुतर्फा असणारे अंतर दर्शविणारे माईल स्टोन्स ही दिसेनात तेंव्हा त्याला रस्ता चुकला असे वाटले व त्याने मागे झोपलेल्या मित्राला उठवून सांगितले की दिवसाची वेळ असूनही रस्त्यावर एकही वाहन दिसत नाही. मात्र सशांचे थवेच्या थवे कारच्या पुढून रस्ता ओलांडून जात आहेत, हे मला जरा विचित्र वाटते आहे.
त्या अनुभवी मित्राने हे ऐकताच ओळखले की त्यांना चकवा लागला आहे. संध्याकाळ होईपर्यंत थांबून गाडीतच बसून वाट पाहण्याचे त्यांनी ठरवले. संध्याकाळ होताच चकव्याचा प्रभाव संपला आणि त्यांना समोरच पंढरपूरचा वाहता रस्ता दिसू लागला.
असाच चकव्याचा आणखी एक अनुभव माझ्या मित्राच्या वडिलांनाही आला होता.
तालुक्याच्या आठवडी बाजारातून खेड्यातील घरी परतताना एक छोटेसे बकरीचे पिल्लू त्यांच्या मागे मागे चालत येऊ लागले. ते पिल्लू एवढे गोंडस होते की त्याला उचलून घेण्याचा त्यांना अनिवार मोह झाला. पिल्लाला उचलून घरी नेताना वाटेतील नदी ओलांडताना त्या पिल्लाचे पाय लांब लांब होऊ लागले. जेंव्हा ते पाय लांब होऊन नदीच्या पाण्याला लागले तेंव्हा त्यांनी ते पिल्लू दूर भिरकावून दिले आणि मागे न पाहता भराभर गावाकडे निघाले. तोच मागून आवाज आला..
"आज वाचलास... !"
रानातील, जंगलातील चकव्याप्रमाणेच उजाड माळरानावरही चकवा लागल्याचे अनेक किस्से आहेत.
अकोल्यात आमच्या घराशेजारी राहणाऱ्या काकांना उमरीच्या माळावर एका माणसाने कसलातरी पत्ता विचारला. त्यानंतर काय झाले माहीत नाही, पण हे काका त्या माणसाच्या मागे मागे चालू लागले. रस्त्याने एक दोन ओळखीच्या माणसांनी त्यांना नमस्कार केला पण त्यांच्याकडे अजिबात न पाहता जादूने भारल्यासारखे ते त्या माणसाच्या मागून चालत राहिले.
एका कोरड्या विहिरीपाशी आल्यावर तो माणूस एकाएकी अदृश्य झाला आणि मग काका किंचित भानावर आहे. पण आपण इथवर का व कसे आलो आणि आता आपल्याला कुठे जायचे आहे हेच त्यांना आठवेना. त्यांची अशी संभ्रमित अवस्था पाहून एक दोघा परिचितांनी त्यांना घरापर्यंत पोहोचविले.
चकव्याच्या अशा एका मागून एक थरारक कहाण्या आठवत असतानाच बाजूलाच बसून काहीतरी विचार करीत असलेला रमेश म्हणाला..
"साब, ये प्राणहिता नदी इस जंगलमे सांप जैसी मोड़ लेते हुए (नागमोड़ी वळणे घेत) बहती है.. और शायद हम नदी के ऐसे ही एक मोड़ के बीच घूम रहे है ! बाहर निकलनेका रास्ता पास ही है, लेकिन हमे कुछ न सूझने के कारण दिखाई नहीं दे रहा.."
रमेश जो विचार करत होता त्यात तथ्य होतं. नदीच्या दोन गोलाकार वळणांमध्ये आम्ही अडकलो असण्याचीही शक्यता होती. रानभुलीमुळे आम्हाला बाहेर निघण्याची वाट जवळ असूनही दिसत नव्हती.
आम्ही सरळ सरळ पुढेच जात असल्याने एकाच पद्धतीने विचार करीत आहोत आणि पुन्हा पुन्हा त्याच रस्त्यावर येत आहोत. पुढे जाण्याऐवजी मागे फिरून पाहिलं तर..? कदाचित उलट दिशेने गेल्यास एखादी नवी वाट सापडूही शकेल..!
रमेशलाही ही कल्पना पटली आणि मग पुन्हा पुन्हा नदी ओलांडण्याऐवजी आलेल्या रस्त्याने मागे फिरून आसपास एखादी नवीन वाट दिसते का ते शोधण्याचं ठरवलं.
हा उपाय खूपच परिणामकारक ठरला. त्याच रस्त्याने मागे फिरलो असताना आता रस्ता अजिबात ओळखीचा वाटत नव्हता. सर्व परिसर नवीन, वेगळा व अनोळखी वाटत होता. एखादी नवीन वाट आता आम्हाला नक्कीच सापडेल असा मनोमन विश्वास वाटत असतानाच दूर टोकावर एक मानवी आकृती उभी असलेली दिसली.
कमरेला फक्त वीतभर लांबीचा पंचा गुंडाळलेला एक उघडाबंब आदिवासी टोकाला घुंगरू लावलेली लांब काठी हातात घेऊन पुतळ्यासारखा स्थिर नजरेने आमच्याकडेच पहात होता. झुबकेदार मिशा, डोक्यावर मळकट मुंडासं, गळ्यात काळा गोफ, कानात कसल्यातरी धातूची भिकबाळी, खांद्यावर आखुडसं घोंगडं असलेला तो वनवासी जणू आमचीच वाट पहात रस्त्याच्या मधोमध उभा होता.
त्या माणसाजवळ जाताच रमेश म्हणाला..
"अरे..! ये तो अपना भिमन्ना है !"
भिमन्ना बिरसाईपेट जवळच्या एका आदिवासी तांड्यात राहणारा गुराखी होता. गुरांना चरण्यासाठी तो जवळपासच्या जंगलात घेऊन जात असे. रमेश त्याला चांगलाच ओळखत होता.
"भिमन्ना, हम रास्ता भटक गए है ! हमे बालमपुर जाना था.. लेकिन अब बहुत देर हो चुकी है, इसलिए अब उतनुर वापस जाने के लिए रास्ता बताओ..!"
रमेशचं हे बोलणं ऐकताच भिमन्ना किंचित हसला आणि जवळच्या झाडाची पाने बाजूला केली. तो काय..?
त्या झाडामागे एक पाऊलवाट होती. एकावर एक असे तीन कळस असलेलं एक मंदिर ही तिथून दिसत होतं. लाकडी ओंडके व दगडी शिळांनी आदिवासी शैलीत बांधलेल्या त्या अनोख्या आकाराच्या मंदिराच्या शिखरावर लालभडक रंगाची त्रिकोणी पताका होती. बालमपुर गावातील काही झोपड्याही तिथून दिसत होत्या.
आम्ही एकदाचे बालमपुर गावात येऊन पोहोचलो होतो. आता आधी तिथल्या कर्जदारांना भेटून मग एखाद्या गावकऱ्यालाच सोबत घेऊया. म्हणजे परत जाताना त्रास होणार नाही.
तहानेनं जीव कासावीस झाला होता. कधी एकदा गावात जाऊन पोटभर पाणी पितोय असं झालं होतं. मी बालमपुरच्या दिशेनं मोटर सायकल वळवली.
भिमन्नाशी बोलण्यासाठी रमेश मात्र मागेच थांबला होता.
"कहो भिमन्ना..! बहुत दिन हुए, दिखाई नही दिए गांवमे..! कहां गए थे..?"
खिशातून तंबाखू काढून तळहातावर चोळत रमेश शेजारी उभा असलेल्या भिमन्नाला म्हणाला.
मात्र भिमन्नाकडून काहीच उत्तर न मिळाल्यामुळे रमेशने त्याच्याकडे वळून पाहिले तर त्याला तिथे कुणीच दिसले नाही. भिमन्ना कुठेतरी अंतर्धान पावला होता.
"साब.. रुक जाओ ! आगे मत जाना !"
रमेश जीवाच्या आकांताने ओरडला..
मी तसाच मागे आलो.
"क्या हुआ रमेश ? तुम इतने क्यों घबराए हुए हो ? और.. भिमन्ना कहां गया ?"
"वो.. वो.. वो भिमन्ना नही था !!"
थरथर कापत रमेश म्हणाला..
क्षणार्धात सारा प्रकार माझ्या ध्यानात आला. त्या झाडाची पाने बाजूला सारत मी बालमपुरच्या रस्त्याकडे पुन्हा बघितलं.. मघाशी दिसलेली पायवाट, ते आगळं वेगळं मंदिर, त्या झोपड्या.. सारं काही अदृश्य झालं होतं. गर्द झाडीशिवाय तिथे काहीच नव्हतं.
"घबराओ मत रमेश ! वो छलावा हमारा कुछ नही बिगाड़ सकता !"
वरकरणी रमेशला धीर देत असलो तरी आतून मी सुद्धा चांगलाच टरकलो होतो. चकवा आमच्या चिकाटीला कंटाळून आता आमनेसामने लढायला आला होता.
खिन्न मनाने आम्ही पूर्वीच्याच उलट दिशेने प्रवास पुन्हा सुरू केला. थोडं पुढे जातो न जातो, एवढ्यात अचानक मोटर सायकल बंद पडली. कदाचित गाडीतील पेट्रोल संपलं असावं. पेट्रोल टँकला कान लावत गाडी हलवून पाहिलं. काहीच आवाज ऐकू आला नाही. म्हणजे नक्कीच पेट्रोल संपलं होतं.
निमुटपणे गाडी हातात घेऊन पायवाटेने चालत पुढे निघालो. या चकव्याचा प्रभाव नक्की कधी संपणार ? मारुती चितमपल्ली यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे शुक्राची चांदणी दिसेपर्यंत तर नाही ना ?
प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक, लेखक अरण्यऋषी डॉ. मारुती चितमपल्ली हे विदर्भातील तणमोराच्या संशोधनाच्या निमित्ताने रानोमाळ भटकत असताना तणमोराची शिकार करणारा पारधी भेटला. डॉक्टर सलीम अली यांच्या पक्ष्यांच्या पुस्तकातील घुबडाचे चित्र पाहून त्याने त्या पक्ष्याचे नाव सांगितले "चकवाचांदण". घुबडासारख्या अशुभ समजल्या जाणार्या पक्ष्याचे नाव इतके सुंदर, काव्यमय असू शकते याचे शब्दवेड्या चितमपल्लींना आश्चर्य, तसेच आनंद वाटला. साहजिकच त्यांच्या मनात "चकवाचांदण" या नावाविषयी जिज्ञासा निर्माण झाली.
त्यांनी त्या पारध्याला विचारले, "चकवाचांदण" म्हणजे काय ? तो म्हणाला "साब, ते पखेरू कलमुहा हाय. रानात सांजेला तो बोंबलू लागला की वाटेत आम्हाला चकवा मारतो. आमची रानभूल होते. अशा वेळी आम्ही जिथल्या तिथं बसून राहतो. आभाळात शुक्राची चांदणी दिसू लागते तेव्हा चकवा निघून जातो. आम्हाला वाट सापडते. म्हणून त्याला चकवाचांदण म्हणतो."
चितमपल्लींना नावाचा हा खुलासा आवडला. "चकवाचांदण" हे नाव त्यांना संधिप्रकाश आणि गूढता यांचे प्रतीक वाटले. चितमपल्लींनी वनविभागातील नोकरी ठरवून स्वीकारलेली नव्हती. चुकून ते या नोकरीच्या आडवाटेच्या वनात आले आणि चालताना त्यांना आयुष्याची सुंदर वाट सापडली. अरण्यातल्या चकव्यानंतर दिसलेल्या उगवत्या शुक्राच्या चांदणीचे सौंदर्य अगदी आगळेवेगळे दिसते, म्हणून मारुती चितमपल्लींनी आपल्या आत्मकथनाचे नाव "चकवाचांदण" असे ठेवले.
उतनुरच्या त्या जंगलात अस्वल, तरस, बिबट्या, चित्ता, अजगर अशा हिंस्त्र प्राण्यांचा मुक्त संचार होता. संध्याकाळनंतर तिथे थांबणं खूपच थोक्याचं होतं.
काहीही करून लवकरात लवकर जंगलाबाहेर पडणं अत्यंत जरुरीचं होतं.
गाडी बंद पडल्यामुळे आमचा प्रवासाचा वेग मंदावला होता. अशात एखाद्या जंगली प्राण्याने हल्ला केला तर वेगाने पळ काढणेही शक्य नव्हते.
रानभूल ठरावीक अंतरापर्यंत आणि ठरावीक वेळेपर्यंतच आपल्या मेंदूचा कब्जा घेते. या भुलीच्या सीमेबाहेर जाताच त्याचा परिणाम, गुंगी कमी होते. खंबीर व भक्कम मनाच्या व्यक्ती मात्र अशा रानभुलीतून बाहेर पडू शकतात. कमकुवत मनाच्या व्यक्तींवर मात्र त्याचा दीर्घ काळ परिणाम राहू शकतो.
जंगलातले प्राणी, चरायला गेलेली गुरं, शेळ्या-मेंढ्या, गुराखी, लाकूडफाटा गोळा करायला गेलेले बायका-पुरुष, खेडूत, आदिवासी यांनाही चकवा लागतो. ते भ्रमिष्ट होतात, फिरून फिरून त्याच जागी घुटमळतात. शेवटी थकून, कंटाळून भुताटकी समजून घाबरतात.अशा भ्रमिष्ट झालेल्या व्यक्तींवर प्रसंगी मांत्रिकाकडून अघोरी उपायही केले जातात. पण चकवा, रानभूल हा अंधश्रद्धेचा विषय नाही, ती एक नैसर्गिक अरण्यशक्ती आहे. या शक्तीच्या अस्तित्वाचे संकेत रानभुलीसारख्या अनुभवातून मिळतात.
नवेगाव अरण्यातल्या अशाच एका अनुभवाची गोष्ट. नवेगाव अरण्यातला निसर्ग आणि वन्यजीवांचं निरीक्षण करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांच्या सहली सतत जातात. एकदा एका शाळेतर्फे पाच दिवसांचं शिबीर तेथे भरवलं गेलं होतं. प्रत्यक्ष जंगलात वास्तव्य करून अरण्यवाचन शिकवलं जात होतं. वन्यजीव आणि त्यांची पर्यावरणातला समतोल राखण्यात होणारी मदत याबद्दलची माहिती दिली जात होती.
काही वेळानंतर सर्वानी दुपारच्या जेवणासाठी परतीची वाट धरली. वाटेवरच्या पाणवठ्यावर मुलं तहान भागवण्यासाठी थांबली. तेव्हा त्यांची गणती केली गेली. सर्व मिळून २४ जण होते. तिथून त्यांचा कॅम्प ३ किलोमीटर अंतरावर होता. थकव्यामुळे सर्वाची चाल मंदावली. पुढे १ किलोमीटरनंतर मागे-पुढे चालणाऱ्यांची गणती केली असता २ मुली आणि १ शिक्षिका दिसेनात.
त्या थकव्यामुळे सावकाश मागे चालत असतील असं समजून मागे जाऊन त्यांना शोधलं, सर्वानी खूप हाकाही मारल्या. पण काहीच प्रतिसाद येईना. मागच्या पाणवठ्यावरही शोधलं, पण त्या तिघी कुठेच दिसेनात. सूर्य डोक्यावर तळपू लागला. बाकी मुलामुलींना कॅम्पवर पोहोचवण्यात आलं, आणि त्या तिघींचा पुन्हा बारकाईनं शोध घ्यायला सुरुवात झाली. तेव्हा मात्र धास्ती वाटू लागली.
तेवढ्यात अचानक एका नाल्यापुढे ओलसर मातीत मुलींच्या पायांचे ठसे दिसले. त्यांना साद घालत घालत, शोधपथक निघालं. नाल्यातून तसंच २ किलोमीटर चालत गेल्यावर मोहाच्या एका झाडाला टेकून ती शिक्षिका सुन्नपणे बसलेली दिसली. तिच्या कुशीत त्या २ छोट्या मुली थकूनभागून पहुडल्या होत्या. शोधपथक आनंदानं त्यांच्याजवळ गेलं. पण त्यांनी त्यांना ओळखलं नाही. तिघींना हलवलं तरी त्यांनी कसली हालचाल केली नाही. त्या भान हरवल्यासारख्या बसल्या होत्या.
एकूण परिस्थितीवरून त्या रानभुलीच्या चक्रव्यूहात सापडल्याचं लक्षात आलं. त्यांना आधार देऊन उठवलं, आणि १ किलोमीटर चालत आणलं. दरम्यान, शोधार्थ निघालेली वन विभागाची जीप तेथे आली. काही वेळानं त्या शुद्धीवर आल्या.
पुढे "आकाशवाणी" वरच्या कार्यक्रमासाठी त्यांचे अनुभव ध्वनिमुद्रित केले गेले. तेव्हा ती शिक्षिका म्हणाली, ‘‘आम्ही सर्वाच्या मागे चालत होतो. तेवढय़ात एका मुलीला रस्त्याच्या डाव्या बाजूला सुंदर फुलं दिसली. ती तोडायचा मोह अनावर झाला, म्हणून तिघीही फुलांजवळ गेलो. तोच कसलातरी उग्र गंध आला आणि त्या वासानं आम्ही भांबावलो. काय चाललंय तेच कळेना. रस्ता दिसेनासा झाला. मुलींनी माझे हात घट्ट पकडले. आम्ही चालतच राहिलो. कुठे जातोय ते कळत नव्हतं. चालत चालत या नाल्यात आलो. थकव्यानं पायातलं त्राणच गेलं होतं, भान हरपलं होतं. फुलांचा मोह महागात पडला.’’
याचा अर्थ स्वसंरक्षणासाठी त्या झाडानं उग्र गंध सोडून त्या तिघींना बेभान केलं होतं.
मी व रमेश, आम्ही दोघेही अशाच कुठल्या झाडाच्या, वेलीच्या गंधजालात अडकलो होतो का ? तो रमेशच्या तोंडावर बसणारा वेलीचा फटका स्वसंरक्षणासाठीच होता काय ?
काही जाणकारांच्या मते अशा भूल पडणाऱ्या तीन प्रकारच्या वनस्पती आहेत. आदिवासी जिला "भुलनीदेवी" म्हणतात ती एक प्रकारची वनस्पती किनवट तालुक्यात आढळते. ज्या वनस्पतीवर पाय पडला किंवा फुलाचा सुगंध घेतल्यास भूल पडते ती "भूलनजडी" नावाची वनस्पती कोरपना ते राजुरा महामार्गावरील नदी शेजारील पायवाटेवर आढळते. ज्या वनस्पतीवर पाय पडल्यास ती त्या व्यक्तीला खाली पाडते अशी "भूतनी" नावाची वनस्पती पेटलावदच्या जंगलात तसेच निमाड भागात आढळते.
जंगलात भटकण्याची, गड किल्ले चढण्याची, ट्रेकिंग व अन्य साहसी प्रकारांची मनापासून आवड असल्याने माझं मनोधैर्य अद्याप तसं फारसं खचलं नव्हतं. उलट मला त्यात एक वेगळंच ॲडव्हेंचर दिसून येत होतं.
आम्ही खाली मान घालून चालतच होतो. इतक्यात..जंगलातील वातावरण हलके हलके बदलतं आहे असं जाणवू लागलं. पक्ष्यांचे कूजन पुन्हा कानावर पडू लागले. फळा फुलांचे सुगंधी वास पुन्हा दरवळू लागले. मघापासून प्रेतासारखे निर्जीव व भेसूर भासणारे जंगल आता पूर्वीसारखंच उल्हसित व चैतन्यपूर्ण वाटू लागले.
पुन्हा दूरवर एक मानवी आकृती दिसली. आम्ही एकमेकांकडे पाहिलं. या आधीचा अनुभव आठवून आता पूर्ण सावधगिरी बाळगायचं मनोमन ठरवलं.
हुबेहूब यापूर्वी भेटलेल्या माणसा सारखाच दिसणारा तो आदिवासी आमच्याकडे हसत हसत पहात उभा होता. फक्त त्याच्या खांद्यावर घोंगडी व हातात काठी नव्हती. त्याऐवजी खांद्यावर एक कुऱ्हाड लटकत होती. किंचित वयस्कर वाटणाऱ्या त्या आदिवासीला रमेशने तेलगू मिश्रित गोंड भाषेत अभिवादन करून रस्ता चुकल्याचे सांगितले व उतनुरचा रस्ता विचारला.
त्या माणसाने सांगितले की पुढे जाऊन तुम्हाला दोन रस्ते दिसतील. त्यातील डाव्या रस्त्याने न जाता उजव्या रस्त्याने जा. डावा रस्ता "जुन्या बालमपुर" गावाकडे जातो तर उजवा रस्ता दंतनपल्ली गावाजवळ निघेल.
रमेशने त्या आदिवासीचा हात धरून ठेवला. आणि मला खरोखरीच पुढे दोन रस्ते आहेत का.. हे पाहण्यासाठी पुढे पाठविले.
पुढे खरोखरीच दोन पायवाटा होत्या. त्या आदिवासीचे आभार मानून त्याचे नाव विचारले तेंव्हा तो नमस्कार करत हसून म्हणाला.. "देवू.. देवन्ना !"
आम्ही पायीच पुढे चालू लागलो तेंव्हा तो म्हणाला.. "गाडी पर बैठो, साब..!"
गाडीतील पेट्रोल संपल्याचं सांगितल्यावर त्याने गाडी धरून जोरात हलवली तेंव्हा टाकीतील पेट्रोलचा आवाज आम्हाला स्पष्ट ऐकू आला.
आश्चर्य वाटून गाडीला किक मारली आणि पहिल्याच किक मध्ये गाडी सुरू झाली. आमचे चेहरे आनंदाने फुलले. त्याचे पुन्हा पुन्हा आभार मानीत आम्ही उजव्या रस्त्याने निघालो. थोडं दूर आल्यावर मागे वळून पाहिलं तर "देवू" अजूनही आम्हाला हात हलवून निरोप देत उभा होता.
जाताना सहज डाव्या बाजूच्या पायवाटेकडे नजर गेली. ती पायवाट एक प्रचंड मोठ्या तलावाला जाऊन मिळाली होती. त्या विस्तीर्ण जलाशयात एक मंदिर पूर्णपणे बुडालेले दिसत होते. फक्त त्या मंदिराचे एकावर एक तीन कळस असलेले शिखर तेवढे पाण्याच्या वर होते. मंदिराच्या शिखरावर लालभडक त्रिकोणी पताका फडकत होती.
सुमारे चार किलोमीटर अंतर कापल्यावर आम्ही दंतनपल्ली गावाजवळ पोहोचलो तेंव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते. तिथून मग अर्ध्या तासात ऊतनुरला पोहोचलो.
दुसऱ्या दिवशी बिरसाईपेटचे गावकरी बँकेत आले असता त्यांना आदल्या दिवशीचा अनुभव कथन केला तेंव्हा त्यांनी जो खुलासा केला तो ऐकून तर आम्ही आश्चर्याने फुटभर उंच उडालोच.
सुमारे दोन वर्षांपूर्वी बालमपुर गावाजवळ छोटेसे धरण बांधण्यात आले. त्यामुळे बालमपुर गावाचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले. मात्र काही आदिवासी गावकऱ्यांनी गाव सोडण्यास नकार दिला. संपूर्ण गाव धरणाच्या पाण्याखाली जाणार असल्याने धरणाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर पाणी सोडण्यापूर्वी वन खात्याने व पाटबंधारे खात्याने संयुक्त मोहीम राबवून या हट्टी गावकऱ्यांना बळजबरीने पकडून दहा किलोमीटर दूर अंतरावर उभारलेल्या निर्वासितांच्या छावणीत स्थलांतरित केले.
मात्र काही जिद्दी आदिवासी गावकरी संध्याकाळ होताच तेथून निसटले आणि पायी चालत बालमपुरला येऊन आपापल्या झोपड्यांमध्ये जाऊन झोपले. रात्री बारा नंतर धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले. या पाण्यात बालमपुर गाव पूर्णपणे बुडाले. आदल्या रात्री झोपड्यांमध्ये येऊन झोपलेले तेवीस आदिवासी झोपेतच बुडून मरण पावले.
दुसऱ्या दिवशी ही बातमी समजताच प्रशासनात एकच हडकंप माजला. पत्रकारांवर व अन्य प्रसिद्धी माध्यमांवर वरून दबाव आणून बातमी दडपण्यात आली. मृतांच्या कुटुंबियांना भरपूर नुकसान भरपाई देऊन त्यांची तोंडे बंद करण्यात आली.
मात्र त्या दिवसापासून बालमपुर गावाच्या आसपासच्या परिसरात, जंगलात लोकांना विचित्र अनुभव येऊ लागले. तलावात मृत झालेल्या व्यक्ती लोकांना दिसायच्या. काही दुष्ट मृतात्मे त्या जंगलात शिरणाऱ्या लोकांना तलावाजवळ नेऊन त्यांना बुडवून त्यांचा जीव घेऊ लागले. तर काही सत्प्रवृत्त मृतात्मे या दुष्ट मृतात्म्यांपासून लोकांचे रक्षण करून त्यांना मदतही करीत असत.
आम्हाला देवासारखा भेटलेला "देवन्ना" हा असाच एक सत्प्रवृत्त मृतात्मा असावा. भिमन्ना हा बिरसाईपेट जवळ राहणारा गुराखी सहा महिन्यांपूर्वी बालमपुरच्या तलावात बुडून मरण पावला होता. कदाचित तोच दुष्ट मृतात्मा बनून आम्हाला भेटला असावा.
माझ्या काही मित्रांच्या मते मला त्या दिवशी जे जे अनुभव आले त्या सर्वांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण देता येते. उदा. आम्हाला जंगलात जे कुजबुजण्याचे, हसण्याचे, विकट हास्याचे आवाज ऐकू आले ते दाट जंगलात जोरदार वाहणारा वारा कोंडला गेला की येऊ शकतात. याशिवाय मनाचे खेळ, भास, आजूबाजूला असलेल्या एखाद्या विषारी वनस्पतीने उत्सर्जित केलेल्या वायूचा परिणाम (हॅल्युसिनॅशन) असं सुद्धा असू शकतं.
हवेच्या दाबामुळे, वातावरणातील, हवेतील अतिउष्णता वा अतिशीतलता यामुळे, प्रकाशाच्या परावर्तन व अपवर्तन (reflection & refraction) हयामुळे सुद्धा अनेक प्रकारचे भास होतात. आकाशातील ताऱ्यांचे लुकलुकणे, पाण्याने भरलेल्या ग्लासात ठेवलेला चमचा तुटलेला दिसणे, पाण्याची खोली आहे त्यापेक्षा खूप कमी भासणे, आकाशात दिसणारे इंद्रधनुष्य हे सारे एकप्रकारचे दृष्टीभ्रम किंवा आभासच असून प्रकाशाच्या अपवर्तनाचे (refraction) परिणाम आहेत. वाळवंटातील मृगजळ (Mirage), हे ही याचेच उदाहरण.
वाळवंटात भरकटलेल्या व्यक्तींना बरेचदा दूर अंतरावर हिरवळीचा प्रदेश (oasis) असल्याचा भ्रम होतो. कारण त्यांचा मेंदू तशी कल्पना करून तसा आभास निर्माण करतो. हिमालय, अंटार्क्टिका या सारख्या अतिथंड बर्फाळ प्रदेशात सैनिकांना, संशोधकांना अत्याधिक थंडीमुळे विविध प्रकारचे आभास होतात.
आणि दिशाभूल ही तर कुठेही होऊ शकते. वाळवंटात, महासागरात, पर्वतराजीत, उजाड माळरानात किंवा दाट जंगलात दिशा भरकटल्याची असंख्य उदाहरणे आहेत. पण गजबजलेल्या शहरातही आपण अनोळखी गल्लीबोळातून जाताना अनेकदा रस्ता, दिशा चुकतो. भलत्याच दिशेने बाहेर निघतो. ही देखील एक प्रकारची दिशाभूलच असते. अनेकदा दुपारच्या झोपेतून उठल्यावर आपल्याला सकाळ झाल्याचा भास होतो हा ही एक प्रकारचा कालभ्रम असतो.
ज्याला आपण "चकवा" म्हणतो तो कदाचित एखादा स्थलकालाचा अपघात असू शकेल. वेळ आणि काल यांच्यातला परस्पर संबंध अजूनही आजच्या विज्ञानाला नीटसा उमजलेला नाही. उदाहरणार्थ, एखाद्या कागदावर काही अंतरावर दोन ठिपके काढले तर त्यांना जोडणारी सरळ रेषा हाच सर्वात जवळचा मार्ग असू शकतो. पण त्याच कागदाची घडी घातली तर त्या दोन बिंदूमध्ये अजूनही जवळचा मार्ग निर्माण होऊ शकतो.
किंवा एखाद्या रबरी फुग्यावर दोन्ही बाजूंना दोन बिंदू रेखाटले तर फुग्याच्या बाहेरून वळसा घालत जाणारी रेषा हा जवळचा ज्ञात मार्ग असू शकतो, पण फुग्याच्या आतमधून दोन बिंदू जोडणारा मार्ग सर्वात जवळचा असेल. फक्त त्याची कल्पना यायला हवी. मानव त्रिमिती मध्ये जगतो म्हणून त्याला कदाचित याचं आकलन होऊ शकेल, पण मुंगीसारखा प्राणी जो द्विमिती मध्ये जगतो त्याला याची कल्पनाच येऊ शकणार नाही.
विश्वात अजूनही असे काही मार्ग असतील ज्यांची आपल्याला जाणीव होत नाही किंवा आपल्याकडे त्याची जाणीव करून देणारी सक्षम ज्ञानेंद्रिये नाहीत. किंवा हे अनुभव इतके प्रखर असतील कि ज्याची जाणीव मेंदू आपल्याला होऊ देत नाही. मग हे अनुभव एखाद्या फिल्टर झालेल्या गोष्टींसारखे निरुपद्रवी रूपात आपल्याला सामोरे येत असतील.
कारण समोरच्या गोष्टीचं नीट आकलन होत नसेल तर मेंदू त्याला सर्वात जवळचं रूप देतो आणि त्याच स्वरूपात ती आपल्याला दिसते किंवा दाखवली जाते. पण दरवेळी ती तशीच असेल असं नाही. एखाद्या स्थलकालाच्या क्वचित घडणाऱ्या आणि क्षणिक टिकणाऱ्या अपघाताचा कोणीतरी साक्षीदार होत असेल आणि तो त्याला "चकवा" या निरुपद्रवी रूपात जाणवत असेल किंवा जाणवून दिला जात असेल.
बालमपुरच्या जंगलातील त्या दिवशीच्या दुपारी आम्हाला आलेला अनुभव एवढेच सांगतो की काही गोष्टी अशा असतात की ज्यांचे कोणतेही शास्त्रीय, वैज्ञानिक वा मानसशास्त्रीय स्पष्टीकरण दिलेच जाऊ शकत नाही.
अजूनही दैनंदिन जीवनात जेंव्हा जेंव्हा सुष्ट व दुष्ट प्रवृत्तीची माणसे एकाच वेळी भेटतात तेंव्हा तेंव्हा बालमपुरच्या जंगलात भेटलेल्या देवन्ना व भिमन्ना यांची आठवण आल्याखेरीज रहात नाही.
🙏🌹🙏
(समाप्त)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें