मंगलवार, 11 अप्रैल 2023

मनसोक्त:-

 मनसोक्त:-


मालतीबाईंनी दिव्याची वात पेटवली. दिव्यात घालायला काही विशेष तेल नव्हते. खरतंर कशासाठीच काही नव्हते. एक नजर त्यांनी पलंगावर झोपलेल्या मोहनरावांकडे टाकली..त्यांच्याकडे पाहून त्यांनाच वाईट वाटले. काय हे आयुष्य! सरकारी कंपनीमधून रिटायर्ड झालेला आपला नवरा आता अंथरुणावर खिळून आहे. आताशी त्यांना काहीच समजत नाही. किंवा समजत असेल पण त्यांना हे समजून घ्यायचे नाही. डॉक्टरांनी  काहीतरी आजार आहे असे लेबल लावून दिले आहे त्यांच्या मागे. 

कधीतरी माझ्याकडे नजर लावून बघतात. काय बघत असतात त्यांनाच माहिती? काय उरले आहे नक्की त्यांच्या आयुष्यात? 

एकुलता एक मुलगा होता, वाईट संगतीला लागून कुठेतरी निघून गेला. कुठेतरी आपल्याच संस्कारात कमी राहिले असा विचार करत त्यांच्या डोळ्यातून पाणी चटकन खालती ओघळले. 


पदराने डोळे टिपून मालतीबाईंनी त्या तसबिरी मधील गणपती समोर हात जोडले आणि त्याला रोजच्या प्रमाणे प्रार्थना केली. "तुला वाटत असेल तर जिवंत ठेव नाहीतर एकदाचे घेऊन जा आम्हाला. फक्त एकाला नको दोघांनाही ने. दररोज जेवणाचा नैवेद्य दाखवते ते उगाच का? तुला त्या जेवणाची शप्पथ आहे" क्षणभर तसबिरीमधील बाप्पाकडे रागाने पाहत त्या उठल्या.


मालतीबाई निस्सीम गणपती भक्त. विनायकी आणि संकष्टी कधी चुकल्या नाहीत. कसबा गणपतीला जाऊन  जास्वंदाचा आणि दुर्वेचा हार कायम स्वतःच्या हाताने केलेला वाहणार. देवासमोर बसून सगळी स्तोत्रे म्हणणार. 

घरातल्या घरी अभिषेक करणार आणि प्रेमाने केलेला स्वयंपाकाचा नेवैद्य बाप्पाला दाखवून मग उपवास सोडणार. 

पण माधव घर सोडून गेल्यापासून त्या आतल्या आत खचल्या होत्या...

आता कसबा गणपतीला जाणे नाही व्हायचे तरी जे जमेल ते घरात करायच्या.


घरात असणाऱ्या एकुलत्या एक विजेच्या दिव्याला त्यांनी चालू केले. खोलीतला अंधार गुपचूप पळून गेला आणि तिथे पांढऱ्या प्रकाशाचे साम्राज्य पसरले. 

आता भाकरी आणि पिठले करायला घेतली पाहिजे या विचाराने त्यांनी स्वयंपाक घराकडे मोर्चा वळवला.

स्वयंपाक घर म्हणायला. दरवाज्यापाशी सुरू झालेली खोली पुढे स्वयंपाकघरापाशी संपत होती. बाजूला न्हाणीघर आणि मागच्या व्हरांड्याला जोडणाऱ्या जागेत छोटेसे शौचालय. तिथपर्यंत कसेतरी मोहनराव चालायचे म्हणून भागत होते नाहीतर त्यांना एकटीला सगळे कितपत जमले असते कुणास ठाऊक. येणाऱ्या तुटपुंज्या पेन्शन वर ते घर चालू होते. 


त्यांनी भाकरीचे पीठ परातीत घेतले तेवढ्यात बाहेरून आवाज आला, 

"मालती मावशी, येऊ का?"

तेव्हढ्याश्या दिव्यात त्यांना कळले नाही की बाहेर कोण आहे. गुडघ्यांवर हात ठेवत हळूहळू चालत त्या दारवाज्यापाशी आल्या. 

बाहेर एक गोरापान तरणाबांड मुलगा, खांद्याला एक बॅग घेऊन हसत उभा होता. 

"ओळखले नाही का मावशी?"

मालतीबाईंनी खरंच ओळखले नव्हते. त्या नुसत्याच उभ्या राहिल्या.

"अहो मावशी, मी अथर्व. तुमच्या कोकणातील घरासमोर असायचो...काही आठवले का?"

मालतीबाईना काही आठवेना. पण तो एवढे म्हणतो आहे तर असावे हा विचार करून त्या म्हणाल्या, "ये ना रे, ये!" 

तो आत आला आणि एकदम मोहनरावांनी डोळे उघडले...

"अहो, अथर्व आला आहे...आपल्या कोकणातील घरासमोर राहायचा...आठवतेय का?"

त्यांनी एक क्षणभर त्याच्याकडे पाहिले पण काहीच बोलले नाही. 

" पुण्यात आलो होतो..तुम्ही काही गावी येत नाही. तुमचा पत्ता मिळाला आणि म्हणले भेटून घ्यावे तुम्हाला."


"बरे केलेस हो, नाहीतर आम्हाला भेटायला कोण येते आजकाल? आमचा माधव गेल्यापासून आम्ही दोघे म्हातारे एकटेच..त्यात यांना घराबाहेर जाता येत नाही आणि मी फारशी कुठे जात नाही. 1 तारखेला पेंशन घ्यायला जायचे तेवढे. बाकी दूधवाला, भाजीवाला, किराणा सगळे घरीच येऊन देतात. खालती राहणारा छोटू माझे लाईट बिल भरून देतो. आता मी कुठे जात नाही... ना बाहेर, ना कोकणात..आता आम्ही इथेच...शेवटपर्यंत. मनातला हुंदका दाबत त्या म्हणाल्या.


अथर्व ने काही न बोलता फक्त त्यांच्याकडे पाहिले.

थोड्या वेळाने मालतीबाई शांत झाल्यावर त्यांनी विचारले, "अथर्व पिठलं भाकरी चालेल ना रे तुला?"

त्याने हसून मान डोलावली. 

त्यांनी भाकरी चे पीठ मळायला घेतले. चूल पेटवली आणि दुसऱ्या डब्यातून डाळीचे पीठ काढले.


"मावशी, तुम्ही कोकणातील घरी आता येणार नाही का परत?"

"आता काय करू येऊन? ज्याच्यासाठी जागा घेतली तोच आम्हाला सोडून गेला. आता तिथे जाऊन काय करायचे? आमचे कोणी सुद्धा तिथे नाही"


"पण तिथे बाकीचे लोक आहेत की. पुणे सोडून या तिकडे. गावाची हवा घेतली की तुम्हा दोघांनाही बरे वाटेल"


"एकदा केला होता विचार, पण तिथे हॉस्पिटले नाहीत. रात्री बेरात्री यांना काही लागले तर कुठे धावपळ करायची? त्यामुळे इथेच पुण्यात बरं आम्हाला. इथला मालक महिन्याला फक्त 200 रुपये घेतो आमच्याकडून जागेचे. आता यांना 9000 पेन्शन आहे. यात सगळे आम्ही भागवतो. जे उरेल ते आम्हाला औषध पाण्याला लागेल म्हणून मी जपते"


"पण तुम्ही सोने विकून ती कोकणातील जागा घेतली होती ना?"


त्याचे हे बोलणे ऐकून त्यांनी  चेहरा तिकडे घेऊन आपले डोळे लपवले.

"मावशी...?"

"काही नाही रे,  कधीतरी हे डोळे चुलीच्या धुराला सहन करू शकत नाहीत ना...आता वय झाले...साठीला पोचले की मी." त्या हसत म्हणाल्या.

तो ही हसला...


 दोन क्षण गेल्यानंतर त्या म्हणाल्या, "सगळ्या गावाला माहिती आहे हे. पुण्यात घर घेता येणार नाही म्हणून ह्यांच्या ओळखीने एक जागा कोकणात मिळाली. हे रिटायर्ड  झाल्यावर आम्ही नवरा बायको तिकडे जाऊन राहणार होतो, आंब्याची शेती करणार होतो. जेवढे सोने होते तेवढे मोडून घर घेतले. मोठी जागा मागे..वाडीच बनवायची होती तिथे....

आम्ही दर सुट्टीत तिथे जाऊन राहायचो.

चांगले 2 महिने तिथे असायचो. हे कुठून कुठून आंब्याची रोपे घेऊन यायचे आणि मी त्यांची काळजी घ्यायचे... खूप स्वप्ने पाहिली होती त्या झाडांबरोबर....पण आमची सगळी स्वप्ने माधव घेऊन गेला...आता 3 वर्षे झाली त्याला जाऊन ...तो येणार नाही परत हे आता मी मान्य केले आहे"


"हे म्हणाले होते की, मालते तुझे सोने आत्ता घेतोय पण आपण गावी जाऊन एवढे आंबे पिकवू की तुला सोन्याने मढवेन बघ. कसले काय आणि कुठले काय? जे राहिले ते राहिलेच" 


बोलता बोलता पिठले भाकरी तयार झाले. मालतीबाईंनी त्यातला एक भाग फोटोतल्या गणपतीसाठी काढून ठेवला. दुसरा भाग नवऱ्याच्या ताटात दिला आणि बाकीचे अथर्वला दिले. 


ताटात पिठले भाकरी, लाल ठेचा आणि हिरवी मिरची असे पाहून अथर्व खुश झाला. बराच भुकेलेला दिसत होता तो. जेवणावर मनसोक्त ताव मारत होता. त्याची जेवणाची पद्धत पाहून क्षणभर मालतीबाईना हसू आले पण मग आपले जेवण कोणीतरी मनापासून खात आहे हे पाहून त्यांनी पण भरभर भाकऱ्या केल्या. 

"सकाळचा थोडा भात आहे घेणार का?" त्यांनी विचारले. 

याने लगोलग मान डोलावली. 

त्यांनी भाताला तव्यावर गरम केले आणि पिठल्या सोबत दिले.

मनसोक्त जेवल्यावर तृप्तीचा ढेकर देऊन

"अन्नदाता सुखी भव" असे म्हणत तो उठला.


मोरीत जाऊन तांब्याने हात धुवून तो परत त्यांच्या समोर येऊन बसला.

"खूप दिवसांनी एवढे मनसोक्त जेवलो मावशी. हाताला खूप गोडवा आहे तुमच्या" 

त्याच्या बोलण्याने त्या प्रसन्न हसल्या. खूप दिवसांनी त्यांना सुद्धा अतीव समाधान वाटत होते.


"मावशी मुख्य काम सांगायचं राहूनच गेले."

"काय रे?" त्यांनी प्रश्नार्थक नजरेने विचारले.


"तुमच्या कोकणाच्या जागेमधून गावातील पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होते तेव्हा तिथे खोदकाम करत असताना एक मोठी पेटी सापडली. उघडल्यावर त्यात खूप सारे सोने सापडले. सरकारने ते त्यांच्या जवळ ठेवले पण तुमच्या जागेत सापडले म्हणून त्याचे 10 टक्के बक्षीस म्हणून तुम्हाला पैसे पाठवले आहे बघ."

असे म्हणून त्याने त्याच्या बॅगेतून एक पुडके बाहेर काढले आणि त्यांच्या हातात दिले. 


मालतीबाईंनी ते पुडके घेतले आणि बघितले तर आत खूप साऱ्या नोटा होत्या. एवढ्या नोटा त्यांनी कधीच पाहिल्या नव्हत्या.


त्या निःशब्दपणे त्या नोटांकडे आणि त्याच्याकडे बघत होत्या.


"एवढे पैसे???"

""मावशी तुमचेच आहेत ते. यातून तुमचे सोने पण तुम्हाला आणता येईल आणि काकांचे योग्य उपचार पण करता येतील"


"पण मी काय करू एवढे पैसे घेऊन?"

"मावशी, तुम्हीच देवाला म्हणायच्या ना, तुला वाटत असेल तर जिवंत ठेव, मग बघा त्याने म्हणूनच हे पैसे पाठवले असतील"


"अरे पण..."

""बघा त्या देवाचीच ईच्छा असेल तुम्ही अजून जगावे. छान राहावे. गावी जाऊन शेती करावी. रिटायर्ड जीवन उत्तम जगावे."


"पण त्याने खरंच माझे ऐकले असेल..?"

"म्हणून तर तुम्हाला आत्ता हे पैसे मिळाले ना? जर तुमचा मुलगा असताना मिळाले असते तर त्याने ते सुद्धा वाया घालवले असते"


"पण हे पैसे देण्यापेक्षा त्याने आम्हा दोघांना नेले असते तर बरे नसते झाले का?"


"असे का म्हणता मावशी? अगं आपली कर्मे केल्याशिवाय, आपले भोग भोगल्याशिवाय तो नेतो का कुणाला? मग आता तूम्ही दोघे सुखाचे दिवस भोगा आता"


त्याचे हे बोलणे ऐकून मालतीबाई स्फुंदून स्फुंदून रडायला लागल्या. बऱयाच वेळ त्या रडत होत्या शेवटी डोळे पुसून त्या मोहनरावांकडे गेल्या. 


"अहो ऐकले का? आपल्या शेतात खजिना सापडला आहे. त्याचे पैसे घेऊन अथर्व आला आहे. आता आपण कोकणात जाऊ. परत शेती करु. तुम्हाला मी बरे करेन. तिथली माती, तिथली हवा सगळे तुम्हाला बरे करेल. आपण उद्याच जाऊयात. हा अथर्व घेऊन जाईल आपल्याला. चालेल ना रे अथर्व?"


त्यांनी त्याच्याकडे पाहिले तर तिथे कोणीच नव्हते. त्या इकडे तिकडे बघायला लागल्या तर आजूबाजूला कुठेच तो दिसेना. त्यांनी दारात पाहिले, जिन्यात पाहिले कुठेही तो नव्हता. 

खालती छोटूला हाका मारून त्यांनी विचारले की त्याने एका मुलाला पाहिले का?

त्याने नाही म्हणले तेव्हा त्या एकदम दचकल्या. 

आत जाऊन त्यांनी पाहिले तर नोटांचे पुडके तसेच होते सही सलामत. पण अथर्वचा पत्ता नव्हता.


तेवढयात त्यांना आठवले,

"मावशी, मी अथर्व. तुमच्या कोकणातील घरासमोर असायचो...!"आणि कोकणातील त्यांच्या घरासमोर तर कुठलेच घर नव्हते.

त्यांच्या भक्तीमुळे त्यांनी घरासमोर एक छोटेसे गणपतीचे मंदिर घरासमोर अंगणात बांधले होते जिथं त्या रोज नेमाने पूजा आणि अथर्वशीर्ष आवर्तन करायच्या.


"घरासमोर मंदिर..अथर्व...गणपतीचे नाव!"

मालतीबाईंच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्या धावत गणपतीच्या तसबिरी समोर गेल्या. तिथल्या तसबिरीत त्यांना त्यांचा घरातील गणपती त्यांनी स्वतः केलेल्या नैवद्याने तृप्त दिसत होता. 

कोकणातील त्यांचा गणपतीरुपी अथर्व आज त्यांच्या हाकेला धावून आला होता हे सांगायला की,

" अजून जिवंत राहायचे आहे तुम्हाला, मनसोक्त आयुष्य जगायला!"

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly