शुक्रवार, 28 अप्रैल 2023

ट्वीनिंग

 


ट्वीनिंग

 

                   खूप मोठ्या आणि सुरेख सजवलेल्या मांडवात सगळ्या नातेवाईकांची लगबग सुरू होती . नुकतीच वरमाला गळ्यात पडलेली आसावरी आणि आशिषची देखणी जोडी राजेशाही मंचावर उभं राहून ,  त्यांना भेटायला येणाऱ्या आप्त आणि मित्र मंडळींचे आशीर्वाद शुभेच्छा स्वीकारत होते . आसावरीचं  लक्ष सारखं बोटातल्या अंगठीकडे जात होतं . कालच साखरपुडा झाला ...तेव्हा आशिषने बोटात घातलेली अंगठी ..तशी छानच होती , पण ....कियाला  मनीष ने घेतलेली कसली भारी होती . लांबूनही चमकत होता त्यातला हिरा . खास मागवून घेतली होती म्हणे मुंबईवरून . नशीबवान आहे किया . मलाही तशीच हवी होती , पण सगळंच इतकं घाईत ठरलं की पसंतीला जायला सुद्धा वेळ मिळाला नाही . ती बोटातली अंगठी फिरवत असताना आशिषचा आवाज आला ...

" आसावरी , मामी आशीर्वाद देत आहेत . " आशिष हळूच तिच्या कानात पुटपुटला  तशी ती विचारातून बाहेर आली .

आशिष चे मामा मामी समोर बघून दोघेही नमस्कार करायला वाकले . आसावरी समारंभात असून नसल्यासारखी होती . 

 होमाच्या वेळी अशिषच्या आईवडिलांनी तिला दिलेला मोत्याचा सेट तिला आवडला नाही असं नाही , पण त्यात ' खास ' असं काही नव्हतं . तसे एकदोन सेट तिच्याकडे आधीपासूनच होते . आपल्या बाबतीत आपल्या इतर मैत्रिणींसारखं ' स्पेशल ' असं काही घडत नाहीये ह्या विचाराने ती अस्वस्थ होती . 

     गेल्या आठवड्यात रुचिरा कसलं वर्णन करून करून सांगत होती .... नुसती पसंती झाली तर  तिला सासर कडून  महागडी गढवाल , त्यावर शोभणारे मोती पोवळ्याचे दागिने मिळाले . बाकी साखरपुडा काय लग्न काय ... सगळंच डोळे दिपवणारं! 

तिच्या रिसेप्शनला तिने घातलेला गाऊन खास ' हिमानी रॉय ' कडून डिझाईन करून घेतला होता . 


           " आसावरी , अगं कुठे लक्ष आहे तुझं ? गौरिहार पुजला , निघायची वेळ झाली ...काय झालं बेटा ? चिंता नको करूस  सोनू , एकाच गावात आहोत आपण . नेहमी भेटत जाऊ ....आता छान हास बरं ..." हातात ओटी ठेवत आई म्हणाली , आणि तिला हुंदका फुटला . तिच्या भावना संमिश्र होत्या .    तिला वाटलं , आपल्याला रडू आलं त्याचं नेमकं कारण काय ? 

 माहेर सोडून जातोय हे ? नाही , सासर अगदी जवळ आहे ...मग ? नेमकी नाराजी कशामुळे ? आपलं लग्न कसं व्हावं , सगळं कशा पद्धतीने घडावं ह्याबद्दल आपण नकळत काही सप्न बघितलं होतं ....पण सत्यात जे घडतंय ते वाईट नाही , पण अपेक्षेप्रमाणे नाही ..ह्याचं वाईट वाटतंय . 

        मावशी , आत्या , आई बाबा आणि बाकी जवळचे नातेवाईक ह्यांना भेटून डोळे पुसत ती आशिष सोबत कार पर्यंत पोहोचली , आणि थबकली . एक साधीशी कार अगदी माफक सजवलेली ...पुन्हा तिचा चेहरा पडला . काय माणसं आहेत ही ? यांच्या घरची लक्ष्मी मी ....तिला घरी नेताना ही अशी नेणार ? काहीशा घुश्यातच ती आत बसली . सगळ्यांना निरोप देऊन कार निघाली ... त्याने तिच्याकडे प्रेमाने बघितले , पण तिची नजर  मान फिरवून खिडकी बाहेर ! त्यानं अलगद तिच्या हातावर हात ठेवला . तिने झटक्यात हात काढून घेऊन अजून अंग आक्रसून घेतलं .

" वाईट वाटतंय न? मी समजू शकतो , घरी लक्ष्मीपूजन झालं की एक चक्कर मारून येऊ आपण तुझ्या घरी . सगळ्यांना सरप्राइज देऊ ..चालेल ? " तो म्हणाला.

" नको . संध्याकाळी रिसेप्शन आहे . तेव्हा येणारच आहेत सगळे . इट्स ओके ." ती तुटकपणे म्हणाली .

" संध्याकाळच्या रिसेप्शन साठी घेतलेला घागरा नीट बसला न तुला ? फार कमी वेळ होता ग  , नाहीतर अजून बरेच मोठे मोठे शो रूम्स बघितले असते आपण . तुझ्या घाग्र्याला मॅचींग सूट घेतला बरं का मी . तुला फोटो पाठवला होता , आवडला न तुला ? " 

" मी तो तुम्ही घेऊन दिलेला घागरा घालणार नाहीये . मला हवा तसा गाऊन मिळाला चार दिवसांपूर्वी . तो घालणार आहे ." हे बोलताना तिच्या स्वरात किंचितसा अपराधी भाव जाणवला त्याला . पण तो काहीच बोलला नाही .

वाट बघून तिच म्हणाली , " चालेल न तुला ? तुझ्या घरचे नाराज तर नाही होणार ? कारण आता आपलं ट्वींनिंगही नाही होणार . "

" इट्स ओके . पण मला रंग सांगितला असतास तर मी पण घेतला असता तसा सूट .  नुसते कपडे मॅचिंग करून मनं जुळवता आली असती तर किती छान झालं असतं नाही ? " 

त्याच्या ह्या प्रश्नावर ती काहीच बोलली नाही .


                 दारात सजवलेलं माप ओलांडून दोघं आत आली . आल्या बरोबर थंडगार पन्ह्याचा ग्लास घेऊन खुद्द सासरेबुवा हजर .  "घ्या आसावरी मॅडम . तुमच्या सासरबुवांच्या हाताला चव आहे का बघा जरा ."  हे  मात्र तिच्यासाठी अगदी नवीन आणि खास होतं . तिचं मन वाचल्यागत. तिच्या शिणलेल्या मनाला असच  काहीतरी  पेय फार आवश्यक होतं . पन्ह अप्रतिम झालं होतं . 

      तिची बॅग घेऊन ती आणि आशिष त्यांच्या खोलीत गेले . आत मंद सुगंध होता ...तिच्या आवडीचा ...मोगऱ्याचा . हुश्श करून ती कॉटवर बसली , आणि समोरचा टेबल बघून ताडकन उभी राहिली .

तिच्या घराचा तिचा लाडका टेबल ...त्यावर तिचा आणि आईबाबांचा फोटो ...तिचा  टेबल lamp .. तिचा खास टेडी....तिची आवडती पुस्तकं ....तिने बालपणी जमवलेल्या पोस्टाच्या तिकिटांची चिकट वही ....आणि त्यावर एक पत्र .

अतिशय भारावलेल्या अवस्थेत तिने पत्र उघडलं ..." प्रिय आसावरी ...आपलं लग्न फार घाईत ठरलं ...एकमेकांना नीट जाणून घेण्यासाठी फार वेळ नाही मिळाला... लग्नाबद्दल तुझ्या मनात काही अपेक्षा असतील , तू काही स्वप्न बघितली असतील ...आणि कदाचित सत्यात त्यापेक्षा काही वेगळंच घडत असेल . पण मी तुला खात्री देतो की आपल्या सहजीवनात माझ्याकडून जाणतेपणी कधीही तुझं मन दुखावल्या जाणार नाही . लग्नातील धामधुमीत ह्या दोन दिवसात  नकळत कुठे तुझं मन दुखावलं गेलं असेल तर माफ कर . 

मुलगी आपलं घर आणि आपली माणसं सोडून एकदम अनोळख्या लोकांमध्ये येते तेव्हा तिची भावना काय असते हे पती म्हणून मी कदाचित नाही समजू शकणार ..पण एक जवळचा मित्र बनून,  भावसखा म्हणून जाणून घेण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो . तुझं बालपण जिथे हुंदडलं त्या घराची सर ह्या घराला कदाचित नाही येणार , पण तुला कुठली उणीव भासू नये इतकं प्रेम नक्कीच देऊ शकतो . तुझा ....आशिष . " शेवटचा शब्द तिला नीट दिसलाच नाही , कारण ती अक्षरं ओली झाली होती . तिने मान वळवून त्याच्याकडे बघितलं , आणि धावत जाऊन त्याला बिलगली . त्यानेही आत्यंतिक प्रेमाने आपले हात तिच्या भोवती वेढून घेतले . 

" आसावरी , आता अशीच मला चीटकुन  रहाणार आहेस का ? तुला संध्याकाळची तयारी करायची आहे न  ? "

" हं .."

" तुझा तो खास गाऊन आणलाय न सोबत ? "

"आता तो  गाऊन नको , आपण तुमच्यातर्फे घेतलेला घागराच घालेन मी . आपल्याला ट्वींनिंग करायचंय न? कसं आहे न , मनं जुळली की बाकी आपोआप जुळतं . " म्हणत ती पुन्हा त्याला बिलगली .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly