हम ना रहे कभी यारोंके बिन
राजेश, श्रीकांत, योगेश आणि किरण एकमेकांचे अगदि लंगोटी यार. शाळेपासूनचे मित्र. आत चाळीशी उलटून गेली तरी त्यांची मैत्री टिकून राह्यलेली. हे चौघं नेहमी बरोबर बॅड्मिंटन खेळणार, क्रिकेटच्या मॅचेस बरोबर पहाणार, मिसळ खाणार आणि एकत्र दारू पिणार! अगदि घट्ट मैत्री. पण एक दिवस किरणच्या बायकोचा, स्मिताचा, राजेशला फोन येतो. ती बरीच अस्वस्थ असते. ती राजेशला सांगते की गेले कित्येक दिवस किरणला ऑफीसमधे प्रचंड त्रास होतो आहे. बॉसकडून अक्षरश: छळ होतो आहे त्याचा. नोकरी सोडायची वेळ आली तर दुसरी कुठलीही चांगली नोकरी मिळायची शक्यता नाही आहे किरणला. त्यामुळे तो प्रचंड तणावात दिवस काढतोय. त्याचा परिणाम त्याच्या तब्येतीवर होतोय आणि कौटुंबिक स्वास्थ्यावरही. हे ऐकून राजेश हादरतोच. "दर रवीवारी आपल्याबरोबर टाईम पास करणारा आपला सख्खा मित्र! भारतीय क्रिकेट टीमचं नक्की काय चुकलं, मोदींनी निवडणूक प्रचारात नक्की काय “स्ट्राटेजी” अवलंबायला हवी हे सगळं आपण हिरीरीने तासंतास बोलणार! आणि इतक्या त्रासातून जात असताना त्याबद्दल त्याने अवक्षरही काढू नये! कसली मैत्री ही असली?' राजेश या विचारात आता बुडून गेला.
स्मिता, श्रेया आणि प्रीती आणि मीनल! अशाच अगदी घट्ट मैत्रिणी. प्रीतीच्या धाकट्या मुलीच्या वागण्यामुळे ती सध्या प्रचंड अस्वस्थ आहे. तिची रात्रीची झोप पळून गेली आहे आणि मागे हायपरटेंशनचं शुक्लकाष्ठ लागलं आहे. पण प्रीतीची ही अस्वस्थता अगदि बारकाव्यांसकट उरलेल्या तिघींना ठाऊक आहे. प्रीतीची भावनीक आंदोलनं तिघी मिळून सांभाळतायत! तिला समजून घेतायत. तिला कश्याने बरं वाटेल ते पहाण्यासाठी सगळ्यांचा अगदि आटापिटा चालू आहे. त्यांची मैत्री आहेच अशी. चौघींपैकी एकीच्याही आयुष्यात खुट्ट झालं की उरलेल्या तिघीना माहित असणार म्हणजे असणार. आणि मग जिला मदत हवी असेल तिच्यासाठी उरलेल्या तिघी अगदि पदर बांधून सरसावणार. भले एरवी त्याना फारसं भेटायला वेळ मिळत नसे ना का. सिनेमे पहायला आणि जेवायला जायला नाही व्हायचा वेळ नोकरी आणि घराचे धबडगे साम्भाळून. पण जेंव्हा एखादीला गरज असेल तेंव्हा तिच्यासाठी मात्र उरलेल्या तिघी खम्बीरपणे उभ्या रहायच्या. आणि ही गरज म्हणजे कुठलं काम किंवा काही मदत असं नसतच बहुतेकदा. गरज बरेचवेळा असते ती मानसीक आधार मिळवण्याची. आणि त्या बाबतीत या चौघी एकमेकींसाठी जे करतात त्याला तोडच नाही.
बायकांच्या मैत्रीची टर उडवणारे जोक्स सोशल मिडियावर सर्रास पहायला मिळतात. बायका एकमेकांच्या मैत्रीणी होऊच शकत नाहीत असं पुरुष अगदी नेहमी म्हणतात. लग्न झालं की बायकांची मैत्री संपते असं अगदि सर्रास समजलं जातं. आणि हे सगळं बर्याच प्रमाणात खरं आहे यात काही वादच नाही. पण तरीही मैत्रीत असलेल्या बायकांचा एकमेकांशी ज्या उच्च स्तरावर भावनिक संवाद चालतो त्याची सर पुरुषांच्या मैत्रीला येऊच शकत नाही. मी एक स्त्री आहे, म्हणून मी असं लिहितेय असा मात्र याचा अर्थ मुळीच नाही. मानसशास्त्रातल्या कित्येक संशोधन अहवालात हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे. बायका आणि पुरुषांच्या मैत्रीचा तुलनात्मक अभ्यास करून लिहिलेल्या कितीतरी शोध निबंधात हे लिहिलं आहे की पुरुषांची मैत्री “व्यवहारिक” ( transactional) प्रकारची असते. पुरुषांच्या मैत्रीत देवाण घेवाण अधिक प्रमाणात असते. पुरुष मित्र काही तरी एकत्र करत असतात (activity based). जसं की एकत्र क्रिकेट मॅच पहाणे, एकत्र ड्राइव्हला जाणे. याउलट बायकांची मैत्री ही “भावनिक” ( emotional) स्वरूपाची असते. बायका एकत्र काही करायला वेळ काढतील न काढतील. बरोबर चित्रपट पहायला जायचं ठरलं की कधी कुणाच्या मुलीची परिक्षा म्हणून, कधी कुणाकडे पाहुणे आले म्हणून, कधी घरात कुणी आजारी पडलं म्हणून, अश्या हजार कारणानी ते रद्द होईल. पण जर काही भावनिक अस्वस्थता असेल आणि आधार हवा असेल तर मात्र कुणीही स्त्री आपल्या मैत्रीणिकडे तो मागायला मागेपुढे पहाणार नाही. आणी मैत्रीणीही तो देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे असं समजून पुढे सरसावतील. या सगळ्या शोधनिबंधात पुरुष आणि बायकांची मैत्री वर्णन करताना दोन शब्द पुन्हा पुन्हा आलेले दिसतात. ते म्हणजे पुरुषांची मैत्री “side by side “ अश्या प्रकारची असते, म्हणजे खांद्याला खांदा लावून काही तरी काम करणारी. तर बायकांची मैत्री असते “ face to face” म्हणजे समोरासमोर बसून एकमेकींशी बोलणारी, एकमेकीना समजून घेणारी.
याशिवाय इतर अनेक प्रयोगात हे देखील सिद्ध झालेलं आहेच की “ऑक्सीटोसीन” हे जे बायकांमधलं “लव्ह हॉर्मोन” आहे ते तेंव्हा स्त्रवतं जेंव्हा त्या त्यांच्या मैत्रीणींबरोबर असतात. आणि ऑक्सीटोसीन स्त्रवलं की बायकाना फार आनंदी वाटू लागतं.
पण हे सगळं खरं असलं तरी बायकांना मात्र आपल्या मैत्रीणीसाठी काढायला वेळच मिळत नाही. नोकरी, मुलं, संसार या चक्रात त्या पायाला भिंगरी लागल्यासारख्या इतक्या गर गर फिरत असतात, की त्यात मैत्रिणींना भेटणं म्हणजे चैनच. ती कशी बरं करायची? आधी आपली कर्तव्य पार पाडली पाह्यजेत, मग ही चैन करू या अश्या विचाराने बायका सतत आपल्या मैत्रिणींना भेटणं लांबणीवर टाकत असतात. मैत्रिणींना द्यायचा वेळ म्हणजे "स्वत:ला" द्यायचा वेळ. आणि स्वत:ला वेळ द्यायचा म्हटलं रे म्हटलं की बायकाना अपराधी वाटायला लागत असतं. त्यामुळे आपल्या जवळ ही अशी जीवाभावाची मैत्री करण्याचा अमूल्य ठेवा आहे हे बायकांना कळतच नाही. आपल्या मैत्रीणींना भेटणं हे नुसतं आनंददायीच नव्हे तर थेराप्युटीक आहे हे त्या विसरतात. बॉलीवूड चित्रपट हे भारतीय समाजजीवनाचं प्रतिबिंब दाखवतात हे खरच आहे. मग आठवून पहा की दोन किंवा त्याहून अधिक मैत्रीणींच्या प्रेमाचे असे किती चित्रपट बॉलीवूडने आजपर्यंत दिले आहेत? आठवून पहा..आठवणारच नाहीत! शोले, दोस्ती, धरम वीर, दिल चाहता है, जिंदगी मिलेगी ना दोबारा असे "मित्रांची' गोष्ट सांगणारे चित्रपट ढीगने आहेत. पण मैत्रीणीवरच्या चित्रपटांची मात्र वानवाच आहे! आणि हे असं आहे याचं कारण बायका एकमेकांच्या चांगल्या मैत्रीणी होऊ शकत नाहीत हे नाहीच मुळी. तर त्याना एकमेकींसाठी वेळ काढण्याचा "गिल्ट" येतो हे आहे.
सगळ्या संशोधनानी सिद्ध केल्याप्रमाणे मैत्रिणींना मैत्रीचा असा आधार मिळत असेल, कठीण प्रसंगी भावनीक दिलासा मिळत असेल, तर हे आपल्याला मिळालेले एक नैसर्गीक वरदानच नव्हे का? आणि मग त्याचा पुरेपूर फायदा आपण का करून घेऊ नये? आपल्या जीवाभावाच्या संख्यांना फक्त " कठीण समय येता" न भेटता केवळ निखळ-निर्भेळ आनंद मिळवण्यासाठी का भेटू नये? आपल्या मालकीचा हा वेळ आपल्याला नाकारू नका मैत्रिणींनो ! भेटा, सहलीना जा, खळखळून हसा, मनसोक्त गॉसीप करा. कारण त्याने तुम्हाला तुमचं लव्ह हॉर्मोन मिळणार आहे. "यारोंके बिन" राहण्याचा त्याग करू नका. कारण मैत्रीतले अमूल्य क्षण मिळाले की जे "चमकीले दिन" मिळतात त्याला आपण का मुकायचं?
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें