रविवार, 16 अप्रैल 2023

भक्ताचा गौरव

 दत्त महाराजांना आपल्या भक्ताचा गौरव अथवा प्रसिद्धी झालेली अत्यंत प्रिय आहे . महाराज हे भक्ताभिमानी आहेत तेव्हा आपल्या भक्तांची ओळख सर्व जगताला करून देण्याचे काम ते नकळत करीत असतात . दत्त माहात्म्यात ,गुरुचरित्रात आणि अन्य अनेक ग्रंथांमध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत . केवळ प्रसिद्धी नाही तर अनेक भक्तांच्या पूजनाची त्यांची आज्ञा आहे . नारायण स्वामी महाराज हे दत्त महाराजांना अतिप्रिय . नृसिंहवाडीला आजही दत्त महाराजांच्या आधी नारायण स्वामी महाराजांची पूजा केली जाते इतकी त्यांची योग्यता आहे . आपल्या आधी आपल्या भक्ताला पूजनाचा मान देणे हा त्या भक्ताचा गौरवच नाही का ? आजही नारायण स्वामी महाराजांच्या जागीच दत्त महाराजांची उत्सव मूर्ती (स्वारी ) विराजमान असते .दत्त महाराजांना आजही त्यांचे सान्निध्य सोडवत नाही असेच म्हणावे लागेल . 


कार्तवीर्याला तर दत्त महाराजांनी अनेक वर दिले . कार्तवीर्य हा दत्त महाराजांच्या अत्यंत प्रिय शिष्यांमधील एक . कार्तवीर्याला वरदान देताना दत्त महाराजांनी त्याची देवो मन्नाम नष्ट लाभ ll हि मागणी मान्य केली . यामुळे आजही या वरदानाच्या प्रभावाने कार्तवीर्याच्या नामजपाने हरवलेली , नष्ट झालेली वस्तू परत मिळते . असे वरदान भक्ताला देणे म्हणजेच कायम स्वरूपी त्याची कीर्ती होणे हे दत्त महाराजांना अपेक्षित आहे . सर्व जगताच्या स्मरणात कार्तवीर्य कायमस्वरूपी राहिला . 


आपल्या भक्तांचा दत्त महाराजांना अभिमान आहे आणि त्यामुळे भक्तांना कोणी दंड वा क्लेश देत असेल तर महाराज हे खपवून घेत नाहीत . गुरुचरित्रात दहाव्या अध्यायात वल्लभेशाला मारणाऱ्या चोरांना तात्काळ प्रकट होऊन शासन केले ,चौदाव्यात यवन अधिकाऱ्याला सायंदेवासमोर शरणागत केले ,पूर्व जन्मीचे देणे देत नाही या कारणास्तव स्त्रीची संतती मारणाऱ्या पिशाच्चाला गती दिली ,त्रिविक्रम भारतींना पायी चालवून आपण पालखीत बसणाऱ्या मदोन्मत्त व्दिजांना धडा शिकविला . किती म्हणून भक्तवत्सलता वर्णावी ?? 


भक्तवशता दावी जगाला ll असे थोरल्या महाराजांनी दत्त माहात्म्यात केलेले वर्णन यथार्थ आहे . महाराजांना निस्सीम प्रेमाने आळवणारा त्यांचा भक्त हा त्यांना अतिप्रिय असतो ,त्या भक्ताला ते इतका मान देतात कि त्याचा अपमान ,त्याला झालेले क्लेश ,त्याची दुःख हि महाराज आपली मानतात आणि त्याचे निराकरण करतात . नारायण स्वामी महाराजांची एक गोष्ट सांगून या लेखाचा समारोप करतो . नारायण स्वामी महाराज अनेकदा ध्यानात असत आणि या ध्यानात  बाधा येऊ नये म्हणून एकदा दत्त महाराजांनी स्वतः नारायण स्वामींचे रूप घेऊन त्यांच्या मुलींना शौचास नेऊन आणले आणि त्यांची नंतरची स्वच्छता केली . भक्तवत्सलता आणखी काय वर्णन करावी ?? महाराज आपल्या भक्तांसाठी काय करू शकतात याचे हे उदाहरण !!!  श्री गुरुदेव दत्त !!! 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly