अक्षय तृतीया मुहूर्त माहिती...
अक्षय तृतीया हे साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त आहे
हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वर्षभरात साडेतीन शुभ मुहूर्त असतात. ते खालीलप्रमाणे आहेतः
दसरा, गुढीपाडवा, अक्षय तृतीया
हे तीन पूर्ण मुहूर्त आहेत.तर दिवाळीचा पाडवा कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा अर्धा मुहूर्त आहे.
कोणतेही शुभ कार्याचा, नविन कार्याचा प्रारंभ या दिवशी करतात.हे मुहूर्त पुर्ण शुद्ध असल्यामुळे या दिवशी इतर दिवसांप्रमाणे कोणतेही शुभ काम सुरु करण्यास दिनशुद्धी बघण्याची गरज नाही.
ह्या दिवशी हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया येते. अक्षय्य तृतीया हा महत्त्वाच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो.
ह्या दिवशी नर-नारायण या जोडदेवाची जयंती, परशुराम जयंती, बसबेश्वर जयंती आणि, हयग्रीव जयंती असते.
अस्यां तिथौ क्षयमुपैति हुतं न दत्तं
तेनाक्षयेति कथिता मुनिभिस्तृतीया ।
उद्दिश्य दैवतपितॄन्क्रियते मनुष्यैः
तच्चाक्षयं भवति भारत सर्वमेव ।। – मदनरत्न
अर्थ : (श्रीकृष्ण म्हणतो) हे युधिष्ठिरा, या तिथीस केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही; म्हणून हिला मुनींनी ‘अक्षय तृतीया’ असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते.
सांस्कृतिक समारंभ
महाराष्ट्रातील स्त्रिया चैत्रातील एखाद्या दिवशी हळदीकुंकवाच्या निमित्ताने बायकांना घरी बोलावून मोगर्याची फुले किंवा गजरा, आंब्याची डाळ (किंवा भिजवलेले हरबरे) आणि पन्हे देतात. त्या हळदीकुंकू समारंभांचा (गौरी उत्सवाचा) अक्षय तृतीया हा शेवटचा दिवस असतो.
ज्योतिषविषयक समजुती
१. अक्षय तृतीयेला कृत युग संपून त्रेतायुग सुरू झाले असे सांगितले जाते. या दिवशी दुसरया युगाला सुरुवात झाली होती. ज्योतिषशास्त्रात कृत, त्रेता, द्वापर आणि कलियुगाची सर्व वर्ष मिळून होणारया काळाला ‘महायुग' असे म्हणतात. ही चार युगे महायुगाचे चार चरण असल्याचे मानले जाते. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा जो प्रारंभ त्याला ‘कल्पादीं' तसेच त्रेतायुगाचा (१२,९६,००० सौर वर्षाएवढा त्रेतायुगाचाकाळ) प्रारंभ म्हणजे ‘युगादी' ही तिथी वैशाख शुद्ध तृतीयेला येते.
शेतीसंबंधी प्रथा
१. मातीत आळी घालणे व पेरणी : पावसाळा तोंडावर घेऊन अक्षय्य तृतीया येते. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे मशागत करण्याचे काम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्ण करायची प्रथा आहे. (मशागत म्हणजे नांगरलेल्या शेतजमिनीची साफसफाई करून खत मिश्रित मातीच्या थरांना खालीवर करणे.) या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मृत्तिकेबद्दल कृतज्ञ भाव ठेवून काही शेतकरी पूजन केलेल्या मृतिकेमध्ये आळी घालतात. कोकणात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे, देशावर नाही. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही, अशी धार्मिक समजूत आहे. (बियाणे म्हणजे मळणीतील धान्य आपल्या आवश्यकतेनुसार खाण्यासाठी बाजूला काढून घेऊन पुढच्या पेरणीसाठी राखून ठेवलेले उरलेले धान्य.)
महाराष्ट्राच्या कोकण भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्या कारणाने एकदा पावसाला सुरुवात झाली की, सतत पाऊस पडत राहिल्याने सुपीक जमिनीतील चिकट मातीमध्ये आळी करून बियाणे पेरणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे पावसाळा तोंडावर असतांना मशागत केलेल्या भुसभुशीत मातीमध्ये बियाणे पेरणे सोपे जाते. (निदान पूर्वीतरी, अक्षय्य तृतीयेच्या शुभमूहुर्तावर म्हणजेच पावसाला सुरुवात होण्यापूर्वी पेरणीची कामे पूर्ण केली जात असत. हल्ली पावसाचे प्रमाण कमी झाल्याने व शास्त्राप्रमाणे पेरणी न केल्याने जमिनी नापीक होत चालल्या आहेत व कसदार धान्य पिकण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.)
२.. वृक्षारोपण : अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात अशी समजूत आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही, अशी समजूत आहे.
धार्मिक समजुती
हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे घागरीयेवढे मडके आणून, त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो.पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात खीर आंब्याचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान केला जातो. असे केल्याने पितरांचा आत्मा शांत होतो असे मानले जाई.
या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ 'अक्षय्य'(न संपणारे) असे मिळते, असा समज आहे. अक्षय्य तृतीयेला ब्रह्मा व श्रीविष्णु यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून, म्हणजे सगुणलोकांतून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्त्विकता १० टक्क्यांनी वाढते, अशी कल्पना आहे.
१. अर्थ : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सदोदित सुख व समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, अशी समजूत आहे
अक्षय तृतीया हा सण साजरा करण्याची पद्धत
‘कालविभागाचा कोणताही प्रारंभदिवस भारतियांना नेहमीच पवित्र वाटतो; म्हणून अशा तिथीस स्नानदानादी धर्मकृत्ये सांगितली गेली आहेत. या दिवसाचा विधी असा आहे – पवित्र जलात स्नान, श्रीविष्णूची पूजा, जप, होम, दान आणि पितृतर्पण. या दिवशी अपिंडक श्राद्ध करावे आणि ते जमत नसेल, तर निदान तिलतर्पण तरी करावे.
२ अ. उदकुंभाचे (उदककुंभाचे) दान
या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून ब्राह्मणाला उदककुंभाचे दान करावे.
२ अ १. महत्त्व
उदककुंभालाच ‘सर्वसमावेशक स्तरावरील निर्गुण पात्र’ असे संबोधले जाते.
२ अ २. उद्देश
अ. उदककुंभाचे दान करणे, म्हणजेच स्वतःच्या सर्व प्रकारच्या देहसदृश, तसेच कर्मसदृश वासनांच्या स्थूल, तसेच सूक्ष्म लहरी कुंभातील जलाला पवित्र मानून त्यात विसर्जित करणे आणि अशा प्रकारे स्वतःचा देह आसक्तीविरहित कर्माने शुद्ध करून त्यानंतर उदककुंभायोगे या सर्व वासना पितर अन् देव यांच्या चरणी ब्राह्मणाला ग्राह्य धरून अर्पण करणे
आ. पितरांच्या चरणी उदककुंभ दान दिल्याने पितर मानवयोनीशी संबंधित असल्याने ते आपल्या स्थूल वासना नष्ट करतात.
इ. देवाचा कृपाशीर्वाद हा आपल्या प्रारब्धजन्य सूक्ष्म कर्मातील पाप नष्ट करत असल्याने सूक्ष्म कर्मजन्य वासना देवांच्या चरणी या दानाकरवी अर्पण केल्या जातात.
२ अ ३. उदकुंभ दानाचा मंत्र
ब्राह्मणाला उदकुंभाचे दान देतांना पुढील मंत्र म्हणावा
एष धर्मघटो दत्तो ब्रह्मविष्णुशिवात्मकः ।
अस्य प्रदानात् तृप्यन्तु पितरोऽपि पितामहाः ।।
गन्धोदकतिलैर्मिश्रं सान्नं कुम्भं फलान्वितम् ।
पितृभ्यः सम्प्रदास्यामि अक्षय्यमुपतिष्ठतु ।। – धर्मसिन्धु
अर्थ : ब्रह्मा, विष्णु आणि शिव ज्यात सामावले आहेत असा हा धर्मघट मी ब्राह्मणाला दान केला आहे. या दानामुळे माझे पितर आणि देवता तृप्त होवोत. गंध, उदक, तीळ, यव आणि फळे यांनी युक्त असा हा कुंभ मी पितरांसाठी देत आहे. हा कुंभ माझ्यासाठी सदा अक्षय्य (क्षय न पावणारा) ठरो.
२ अ ४. शास्त्र
अक्षय तृतीया या दिवशी ब्रह्मांडात अखंड रूपातील, तसेच एकसमान गतीजन्यता दर्शवणार्या सत्त्व-रज लहरींचा प्रभाव अधिक प्रमाणात असल्याने या लहरींच्या प्रवाहायोगे पितर आणि देव यांना उद्देशून ब्राह्मणाला केलेले दान पुण्यदायी आणि मागील जन्माच्या देवाणघेवाण हिशोबाला धरून कर्म-अकर्म करणारे ठरत असल्याने या कधीही क्षय न होणार्या लहरींच्या प्रभावाच्या साहाय्याने केलेले दान महत्त्वाचे ठरते...
२. मृत्तिका पूजन : सदोदित कृपादृष्टी ठेवणाऱ्या मृत्तिकेमुळेच आपल्याला धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी व वैभवलक्ष्मी यांची प्राप्ती होते. अक्षय्य तृतीया हा दिवस म्हणजे कृतज्ञ भाव ठेवून अशा मृत्तिकेची उपासना करण्याचा दिवस.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी काय करावे
या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा समुद्रात अंघोळ करावी.
सकाळी पंखा, तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ आणि वस्त्राचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी.
ब्राह्मण भोजन घालावे.
या दिवशी सातूचे महत्त्व असून ते जरूर खायला हवेत.
या दिवशी नवीन वस्त्र, शस्त्र, दागिने विकत घ्यावेत.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामेही केली जातात.
शास्त्रांमध्ये अक्षय्य तृतीया
या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात. हे मंदिर अक्षय तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते.
नर-नारायण या जोडगोळीने या दिवशी अवतार घेतला होता.
श्री परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते.
वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात.
अक्षय्य तृतीयेचे माहात्म्य
जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो.
या दिवशी परशुरामाची पूजा करून त्यांना अर्घ्य दिले जाते.
शुभ कार्ये या दिवशी होतात.
श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते, की 'या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय्य तृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय अविनाशी) होते.
या दिवशी बद्रीधाम येथील बद्रीनारायणाच्या मंदिरात सहा महिन्यांच्या बंदकालानंतर प्रथम प्रवेश मिळतो. अयोध्येजवळच्या वृंदावनात कुंजबिहारी श्रीकृष्ण मंदिराचे दरवाजेपण याच दिवशी उघडले जातात. अक्षयतृतीया ही विष्णूचा एक अवतार समजल्या जाणाऱ्या परशुरामाची जन्मतिथी आहे.
अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त आहे. आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करतात व त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे घागरीयेवढे मडके आणून, त्यात पाणी भरुन त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो. पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात खीर आंब्याचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान केला जातो. असे केल्याने पितरांचा आत्मा शांत होतो असे मानतात. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ ‘अक्षय्य'(न संपणारे) असे मिळते.(ज्योतिष राहुल नारायणराव पुराणिक)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें