बुधवार, 12 अप्रैल 2023

विरूद्ध आहार

 विरूद्ध आहार ही संकल्पना फक्त आयुर्वेदात सांगितलेली आहे असे मला वाटते. दोन विरूद्ध गुणाचे पदार्थ एकत्र करून खाऊ नयेत. म्हणजे दूध आणि फळे, दूध आणि मासे, दूध आणि मीठ इ.इ. आता हे बहुतेक सर्वांना माहिती आहे. पण गाडी योग्य मार्गावर वळत नाही. हाच बदललेला आहार.


चहातून चपाती खाणे, केळ्याची शिकरण खाणे, माश्यांचे जेवण झाले असले तरी त्यावर दुधाचे आईस्क्रीम खाणे. याला संयोग विरूद्ध म्हणतात. 


दुधाबरोबर कुळीथ, वरी, वाल, मटकी, गुळ, दही, चिंच, जांभूळ किंवा कोणताही आंबट पदार्थ खाऊ नये. लसूण, मुळा, पालेभाज्या पण दुधाबरोबर खाऊ नयेत.


तांदुळ आणि मुगाच्या खिचडीत दूध घालून घेऊ नये.


दह्याबरोबर गरम पदार्थ, फणस, ताडगोळा, दूध, तेल, केळे, मासे, मांस चिकन, किंवा गुळ खाऊ नये.


निरनिराळ्या प्राण्यांचे मांस एकत्र शिजवून खाऊ नये. (मुळात मांसाहार करूच नये)


उडदाच्या डाळीबरोबर मुळा खाऊ नये, फणसाचे गरे खाल्यावर विडा खाऊ नये, पालक तीळाच्या तेलात तळून खाल्ल्यास जुलाब होतात. जलचर प्राण्यांचे मांस खाताना भात, मोड आलेली कडधान्ये, उडीद अथवा तीळ यासोबत खाऊ नये. असे बरेच दिवस केल्यास दृष्टीदोष, ऐकू न येणे, कंप सुटणे, उच्चार स्पष्ट न होणे, मानसिक अस्वास्थ्यता क्वचित मृत्यु देखील येतो. असे चरकाचार्यांनी आपल्या ग्रंथात सव्वीसाव्या अध्यायातील श्लोक 87 ते 106 मधे म्हटले आहे. आम्ही वैद्य मंडळी त्याचा अभ्यास करून अनुभव घेत आहोत.


केवळ एवढेच नाही तर, आणखीन ही काही विरूद्ध बघायला मिळतात.


जे पदार्थ गरम करू नयेत, ते करणे याला पाक विरूद्ध म्हणतात. जसे दही. मध. आज पंजाबी ग्रेव्हीमधे दही घालून शिजवले जाते. गरम सॅण्डवीच वर अॅण्टीऑक्सीडन्ट म्हणून मध लावतात. हे चुक आहे.


कोकणात गहू, सफरचंद, द्राक्षे खाणे हे देशविरूद्ध आहे.


हिवाळ्यात थंड आणि उन्हाळ्यात उष्ण पदार्थ खाणे, रात्री दही खाणे. हे काल विरूद्ध आहे.


पचनशक्ती म्हणजे अग्नि कमी असताना पचायला जड असे, श्रीखंड, पुरणपोळी असे पदार्थ खाणे, हे अग्निविरूद्ध आहे.


पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने तिखट, आंबट, खारट पदार्थ खाल्ले की त्रास होणारच. हे प्रकृतीविरूद्ध आहे.


एखाद्या व्यक्तीला विशिष्ट पदार्थ खाल्ला की असात्म्यता निर्माण होते, यालाच अॅलर्जी असे म्हणतात. अंडी खाल्ली की पितांब येणे, आंबोळी खाल्ली की पोटात दुखणे, जुलाब होणे, हे सात्म्यविरूद्ध आहे.


दूध आणि मासे दोन्ही पदार्थ गुणांनी कफ वर्धकच असल्यामुळे शरीरात गेल्यावर कफ वाढणारच. हे दोषजवृद्धी विरूद्ध आहे.


कल्हई न केलेल्या तांबे किंवा पितळीच्या भांड्यात आंबट पदार्थ ठेवल्यास, तवंग किंवा निळसर रंग येतो, चव बदलते, किंवा अॅल्युमिनीयम, हिंडालियमच्या भांड्यात जेवण करणे, हे पात्र विरूद्ध झाले.


गरम आणि गार पदार्थ एकाच वेळी घेणे, जसे गरमागरम जेवणासोबत थंडगार पाणी पिणे हे वीर्य विरूद्ध आहे. (वीर्य म्हणजे केवळ शुक्र नव्हे. तर पदार्थातली शक्ती असा होतो. )


शू किंवा शी होत असताना ती रोखून धरून जेवणे हे क्रमविरूद्ध आहे.


कच्चे किंवा जळलेले, किंवा अर्धवट शिजवलेले अन्नपदार्थ खाणे, शिळे अन्न परत परत गरम करून खाणे, तेच पाणी किंवा चहा वारंवार तापवून घेणे, हे पाक विरूद्ध आहे.


मध तूप तेल प्राण्यांची चरबी समप्रमाणात घेऊ नये. तूप आणि मध एका प्रमाणात एकत्र करून घेऊ नये. याला प्रमाणविरूद्ध म्हणतात.


आवडत नसलेले पदार्थ खाल्ले की ते मनाविरुद्ध होतात.


विरूद्ध म्हणजे विषवत. पाॅयझन नव्हे. या विरूद्ध आहारामुळे टाॅक्सीन्स तयार होतात, जी शरीराला हितकारक नसतात.  एकदा खाऊन त्रास होईलच असे नाही, पण पंधरा दिवस महिनाभर जर यातील विरूद्ध पोटात जात राहीले तर परिणाम दिसून येतात.


त्वचेचे रोग, कोड, पुटकुळ्या येणे, रक्ताल्पता, रक्तस्राव होण्याची प्रवृत्ती वाढणे, तोंडाचे आजार, अपचन, पोटदुखी सारखे पोटाचे विकार, जुलाब, अम्लपित्त, जेवणानंतर लगेचच दोन नंबरला धावावे लागणे, सूज, अशक्तपणा, वजन कमी होणे, आळस, रागीटपणा वाढणे, मानसिक असंतुलन इ  अवस्थांमधे विरूद्ध आहार हे कारण असू शकते.


एखाद्या माणसाची पचनशक्ती चांगली असल्यास तो विषही पचवू शकतो, पण ही शक्ती कमी पडल्यास त्याला रोग होण्याचा संभव असतो.


हल्ली आधुनिक वैद्यकीय शास्त्रामधे अनेक रोगांची कारणेच सापडत नाही. अशा जीर्ण रोगात या विरूद्ध आहाराचा विचार केल्यास उपचारांना योग्य दिशा नक्कीच मिळते.


निरोगी रहाण्याचा राजमार्ग हा आहारातूनच जात असल्याने, आणि बदललेला आहार जर आपल्याला विरूद्ध मार्गावर घेऊन जात असेल तर विरूद्ध म्हणजे अगदी एकशे ऐशी अंशात विरूद्ध यावे लागले तरी चालेल, पण मागे फिरावे आणि योग्य मार्गाचा अवलंब करावा. इथे अहंकार नको, आखीर जिंदगी का सवाल है !

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly