बुधवार, 28 जनवरी 2015

चाळिशीनंतरची अनियमित पाळी अनियमित 'मासिक' त्रास!

मासिक पाळी अनियमित होण्याची कारणे अनेक आहेत. शिवाय ही कारणे स्त्रीच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यात वेगवेगळी असू शकतात. मुलगी वयात येते तेव्हा म्हणजे पाळी सुरू झाल्यानंतर सुरुवातीला ती अनियमित होणे, तरुण वयात म्हणजे ज्याला 'रीप्रॉडक्टिव्ह एज ग्रुप' म्हणतात त्या वयातली अनियमित पाळी आणि रजोनिवृत्तीच्या वेळी पाळीच्या चक्रात होणारे बदल या तिन्ही गोष्टींचा इथे वेगवेगळा विचार करावा लागेल. या तीन वयोगटांमध्ये अनियमित पाळीचा त्रास कसा होतो ते जाणून घेऊ..
मासिक पाळी सुरू होण्याचा काळ
वयाच्या दहाव्या- बाराव्या वर्षी जेव्हा मुलींची मासिक पाळी नुकतीच सुरू होते, तेव्हा सुरुवातीला ती नियमितपणे येतेच असे नाही. पहिल्यांदा पाळी आल्यानंतर पुढचे २-३ महिने, अगदी ६ महिनेदेखील पाळी आलीच नाही, असेही होऊ शकते. स्त्रीच्या शरीरात स्त्रीबीज तयार होण्याचे जे चक्र असते (ओव्ह्य़ुलेशन सायकल) ते सुरळीत नसणे हे याचे कारण असते. वयात येताना सुरुवातीला कधी कधी संप्रेरकांमधील बदलांमुळे पाळी येते, पण ओव्ह्य़ुलेशनच होत नसते किंवा ते अनियमित होत असते. या सर्व कारणांमुळे मासिक पाळी सुरू झाल्यानंतर पहिली दोन वर्षे ती अनियमितपणे येण्याची शक्यता असते. या काळात तीस दिवसांऐवजी चाळीस दिवसांनी किंवा साठ दिवसांनी पाळी आली तरी लगेच मुलींनी घाबरून जाण्याचे कारण नाही. पाळीच्या चक्राची घडी नीट बसण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो हे लक्षात ठेवावे.
पाळीच्या ठरलेल्या चक्रापेक्षा आधीच म्हणजे दर १०-१५ दिवसांनी पाळी येत असेल तर मात्र लगेच डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे. पाळी उशिरा आल्यानंतर अधिक दिवस रक्तस्राव सुरू राहिला किंवा खूप जास्त रक्तस्राव होत असेल तरीही डॉक्टरांचा सल्ला गरजेचा. काही जणींना ३-४ महिन्यांनी पाळी येते आणि मग २०-२५ दिवस रक्तस्राव थांबत नाही. अशा वेळीही डॉक्टरांकडे जाणे टाळू नये. शरीरातून गरजेपेक्षा अधिक रक्तस्राव होऊ नये यासाठी वेळीच केलेले उपचार उपयुक्त ठरतात.
प्रजननक्षम वयातील अनियमित पाळी
प्रजननक्षम वयात पाळी एकदम अनियमित होऊ लागली तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. या वयात पाळी चुकल्यानंतर गरोदर राहण्याची असलेली शक्यता आधी पडताळून पाहिली जाते. तशी शक्यता नसेल तर पाळी अनियमित होण्याची इतरही कारणे असू शकतात.
पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसिज (पीसीओडी)
शरीरातील मासिक पाळीच्या चक्राची घडी बसल्यानंतर म्हणजे तरुण वयात पाळी अनियमित होण्याचे सर्रास दिसणारे कारण म्हणजे 'पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसिज'. यात ओव्हरीजवर लहान लहान 'सिस्ट' म्हणजे गाठी येतात. स्त्रीबीजनिर्मितीच्या प्रक्रियेतील दोषांमुळे असे होऊ शकते. यामुळे संप्रेरकांच्या पातळीत असंतुलन होऊन बीजनिर्मिती अनियमित होते किंवा ती होतच नाही. याचाच परिणाम म्हणून मासिक पाळी अनियमित होते. यात मुलींचे वजन वाढू लागते, चेहऱ्यावर मुरुमे येऊ लागतात. हनुवटी किंवा ओठांवरती लवदेखील वाढू शकते. डोक्यावरचे केस गळू लागतात. शरीरात होणाऱ्या 'इन्शुलिन' निर्मितीत अडचणी निर्माण होऊन पुढे मधुमेहाचाही धोका उद्भवू शकतो. 'पीसीओडी'मध्ये बीजनिर्मिती प्रक्रिया अनियमित होत असल्याने पुढे वंध्यत्वाची समस्या निर्माण होण्याचीही शक्यता असते. 'पीसीओडी'चे निदान झाल्यास त्यावरील वैद्यकीय उपचार वयानुसार वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. तरीही नियमित व्यायाम 'पीसीओडी'मध्ये खूप फायदेशीर ठरतो. वजन वाढले असेल तर ते कमी करून प्रमाणात राखणे देखील तितकेच महत्त्वाचे. बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, वाढते वजन, मूल होण्याचे पुढे गेलेले वय ही कारणे बहुतेक जणींच्या 'पीसीओडी'मागे दिसतात.
थायरॉइड डिसऑर्डर्स
थायरॉइड ग्रंथीद्वारे स्रवणाऱ्या संप्रेरकाच्या कमतरतेमुळेही अनियमित पाळीचा त्रास उद्भवू शकतो. यात अचानक काही महिन्यांत वजन वाढते, सतत दमल्यासारखे वाटते तसेच पाळीच्या वेळी रक्तस्राव कमी होतो. अनियमित पाळीची तक्रार घेऊन येणाऱ्या स्त्रियांना हॉर्मोन्सच्या म्हणजे संप्रेरकांच्या चाचण्या करायला सांगितल्या जातात. त्यात थायरॉइडच्या त्रासाचे निदान होते. त्यावरही औषधोपचारांच्या बरोबरीने अतिरिक्त वजन कमी करण्यास सांगितले जाते.
स्थूलत्वामुळे अनियमित होणारी पाळी
केवळ स्थूलत्वामुळेही पाळी अनियमित होऊ शकते. यात योग्य व्यायाम आणि योग्य आहाराच्या साहाय्याने वजन कमी करणे गरजेचे ठरते. हल्ली मुलींमध्ये अनियमित पाळीसाठी वाढलेल्या वजनाचे कारण मोठय़ा प्रमाणावर बघायला मिळते.
चाळिशीनंतरची अनियमित पाळी
चाळिशीनंतर म्हणजे रजोनिवृत्तीच्या काळात पुन्हा 'ओव्ह्य़ुलेशन'चे चक्र अनियमित होऊ लागते. संप्रेरकांच्या पातळीतही असंतुलन होते. परिणामी मासिक पाळी अनियमित होते. यातही लगेच घाबरून जाण्यासारखे काही नाही. मात्र या वयात पाळी आली नाही म्हणजे तो रजोनिवृत्तीचाच एक भाग असावा असे गृहीत धरू नये. अगदी पन्नाशीपर्यंतच्या स्त्रियांनीही पाळी चुकण्याचा अर्थ आपण गरोदर तर नाही ना ही शक्यता जरूर पडताळून पाहावी. ही शक्यता नाही हे ताडून पाहिल्यानंतरही पाळी उशिरा येत आहे, असे दिसले तर घाबरायचे कारण नाही. पण पाळी लवकर येऊ लागली, अधिक दिवस तसेच अधिक प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला, पाळी सुरू असताना वेदनांचा त्रास होऊ लागला तर मात्र डॉक्टरांना लगेच दाखवावे. या वयातही काही जणींना ३-४ महिन्यांनी पाळी येते आणि ती खूप दिवस टिकते. असे असेल तरी डॉक्टरांचा सल्ला गरजेचा. काही वेळा पाळी ठरलेल्या वेळेवर येते पण दोन मासिक चक्रांच्यामध्ये देखील रक्तस्राव होतो. अशा वेळीही नेमका त्रास काय आहे याचे निदान करून घेणे गरजेचे ठरते.
पाळी अनियमित होऊ नये यासाठी काय करावे?
नियमित व्यायाम आवश्यकच.
वजनावर नियंत्रण हवे.
मानसिक ताणाचाही पाळीच्या चक्रावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे.
आहार संतुलित आणि वेळच्या वेळी घेणे गरजेचे आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly