रविवार, 13 नवंबर 2011

जगातील सात आश्‍चर्ये माहिती आहेत?

जगातील सात आश्‍चर्ये माहिती आहेत? भारतातील ताजमहाल, इजिप्तमधील गिझाचा पिरॅमिड, रोमचे कोलोसियम, चीनची प्रचंड भिंत, इस्तंबूलमधील हेजिया सोफिया, इंग्लंडच्या विल्टशायरमधील स्टोनहेंज आणि पिसाचा झुलता मनोरा ही पारंपरिक नावे लगे आठवतात. परंतु, स्वित्झर्लंडच्या झुरिक शहरातील बर्नार्ड वेबर या गृहस्थाच्या डोक्‍यातून २००१ मध्ये एक अफलातून कल्पना बाहेर पडली आणि त्याने नवीन सात आश्‍चर्यांसाठी जगभरातील नेटिझन्सची मते मागविली. ही परंपरा आजही चालू असून, ११.११.११ च्या गणिती मुहूर्तावर त्यांनी नव्या सात नैसर्गिक आश्‍चर्यांची यादी जाहीर केली आहे. ही प्रक्रिया अद्याप चालू राहणार आहे. ही सात आश्‍चर्ये निसर्ग, वास्तुकला आदींवर आधारित आहे. जागतिक मतांच्या आधारावर पुढील वर्षाच्या सुरवातीला या आश्‍चर्यांची अधिकृत यादी जाहीर करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात निसर्गावर आधारित ही सात आश्‍चर्यांची यादी...

ऍमेझॉन वर्षावन
ऍमेझोनिया या नावानेही ओळखले जाणारे हे वर्षावन दक्षिण अमेरिकेत आहे. ऍमेझॉन नदीच्या खोऱ्यातील या वर्षावनाचे क्षेत्रफळ ७० लाख चौरस किलोमीटर असले, तरी प्रत्यक्ष जंगल ५५ लाख चौरस किलोमीटर क्षेत्रावर आहे. या वर्षावनाने दक्षिण अमेरिकेतील एकूण नऊ देश व्यापले आहेत. अत्यंत दुर्मिळ वनस्पतीची, कीटकची आणि प्राणीची हे या वर्षावनाचे वैशिष्ट्य आहे.


हालॉंग बे
व्हिएतनामच्या क्वांग निन्ह प्रांतामध्ये हा उपसागर आहे. या उपसागरात चुनखडीने तयार झालेली अक्षरशः हजारो लहान मोठी नैसर्गिक शिल्पे आहेत. या उपसागराचा किनारा १२० किलोमीटर पसरलेला असून, त्याने सुमारे १,५५३ चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापणारी १,९६९ बेटे आहेत. बहुतेक बेटे पोकळ असून, त्यात अत्यंत प्रेक्षणीय नैसर्गिक गुहा आहेत.


इग्वासु धबधबा
दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलमधील पाराना राज्य आणि अर्जेंटिनाच्या मिसिओन्स प्रांताच्या सीमेवर हा धबधबा आहे. इग्वासु नदीवरील त्याच नावाच्या या धबधब्याची जगात सर्वात रुंद म्हणून नोंद झाली आहे. अर्धवर्तुळाकारातील हा धबधबा २,७०० मीटर रुंदची आहे. या धबधब्यातून एकूण २७५ प्रवाह ८० मीटर उंचीवरून कोसळतात. परिसरात दोन राष्ट्रीय अभयारण्ये आहेत.


जेजु
दक्षिण कोरियाच्या दक्षिण किनाऱ्यापासून सुमारे १३० किलोमीटरवर जेजु हे ज्वालामुखीचे बेट आहे. कोरियातील हे सर्वात मोठे बेट. १,८४६ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या या बेटावर, दक्षिण कोरियातील सर्वात उंच हलासन नावाचा पर्वत आहे. त्याची उंची समुद्रसपाटीपासून १,९५० मीटर आहे. मुख्य ज्वालामुखीच्या सभोवार ३६० लहान ज्वालामुखीही आहेत.


कोमोडो आयलंड
इंडोनेशियातील कोमोडो राष्ट्रीय उद्यान हे कोमोडो, रिंका आणि पाडार या मोठ्या बेटांसह अनेक लहान लहान बेटांवर पसरले आहे. या सर्व बेटांचे एकूण क्षेत्रफळ १,८१७ चौरस किलोमीटर आहे. जगात केवळ याच ठिकाणी आढळणाऱ्या कोमोडो या राक्षसी सरड्याचे हे वसतीस्थान आहे. त्यांच्या संरक्षणासाठी १९८० मध्ये या उद्यानाची घोषणा करण्यात आली.


प्युएर्टो प्रिन्सिआ
फिलिपीन्समधील प्युएर्टो प्रिन्सिआ भूमिगत नदी राष्ट्रीय उद्यान हे त्याच नावाच्या शहरापासून सुमारे ५० किलोमीटरवर आहे. चुनखडीच्या ८.२ किलोमीटर लांबीच्या सागरकिनाऱ्यावर, नैसर्गिकरित्या तयार झालेली पाषाणशिल्पे हे प्रमुख आकर्षण. भूमिगत नदीतील जलप्रवास हे दुसरे आकर्षण. वाऱ्यामुळे तयार झालेल्या गुहा हे या उद्यानाचे आणखी एक वैशिष्ट्य.


मेन्सा टेबललँड
दक्षिण आफ्रिकेतील पठारी डोंगरमाथा (टेबललॅंड) असलेला मेन्सा हा डोंगरी प्रदेश ६० लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात आला. एवढी वर्षे अखंड धूप होत असल्याने या डोंगराचा माथा सपाट झाला आहे. हे पठार वैशिष्ट्यपूर्ण १,४७० प्रकारच्या फुलांसाठी प्रसिद्ध आहे. १,०८६ मीटर उंचीच्या या पठारावर दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या काही वनस्पतींची नोंद झाली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly