रविवार, 19 मई 2013

आमची भटकंती

आमची भटकंती
अंजनीमाता मंदिर
पुण्यापासून वीसएक किलोमीटर अंतरावर असलेले अंजनीमातेचे मंदिर म्हणजे एका दिवसाच्या सहलीसाठी उत्तम ठिकाण. डोंगरदऱ्या, वृक्षराजी अशा निसर्गसंपत्तीने नटलेले असल्याने इथे आल्यावर मनाची मरगळ नक्की दूर होते. अंजनीमातेचे मंदिर पुण्याहून रेल्वेने मुंबईकडे जाताना वाटेत कान्हे नावाचे स्टेशन लागते. तिथून सुमारे 22 किलोमीटर अंतरावर (टाकवे बु.च्या पुढे 7-8 कि.मी.) नागाथली-कुसवली गावांजवळ अंजनी मातेचे मंदिर आहे. मंदिरापर्यंत जायला किमान एक तास लागतो पण हा प्रवास अजिबात कंटाळवाणा होत नाही कारण एकीकडे डोंगर, तर दुसरीकडे शेते, वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष, निरनिराळे पक्षी, मध्येच इंद्रायणी नदी यामुळे आजूबाजूला पाहात प्रवास कधी संपतो ते कळतही नाही मात्र अरुंद रस्ता, आजूबाजूला मोठमोठ्या कंपन्या असल्यामुळे सतत मालवाहतूक यामुळे थोडा त्रास होतो. अंजनीमातेचे हे मंदिर खूपच सुंदर आहे. मंदिराजवळ पोचल्यावर उरला सुरला शीणही निघून जातो. मंदिरामागे डोंगर, करवंदांच्या जाळ्या, समोर टाटा डॅमच्या पाण्याचा तलाव त्यावर बसलेले पांढरे करकोचे, फुले असा सुंदर देखावा असतो. पावसाळ्यात गेलात, तर छोटे मोठे धबधबेही पाहायला मिळतात.

Read More »

आरेवारे बीच, बह्मगिरी पर्वत
आरेवारे : समुद्र किनाऱ्याचे स्वयंभू रूप एका बाजूने घाट आणि दुसऱ्या बाजूने समुद्रकिनारा असे सहसा न पाहिलेले "कॉम्बिनेशन' पाहायचे असेल, तर रत्नागिरीजवळच्या आरेवारे बीच ला भेट द्यायलाच हवी. रत्नागिरी पासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर आरेवारे समुद्रकिनारा आहे. पर्यटकांची नेहमीची गर्दी, समुद्रकिनाऱ्यावरील कलकल इथे बघायलाही मिळणार नाही. त्यामुळेच दूरवर पसरलेला समुद्र, पांढरीशुभ्र रेती, आजूबाजूला नारळाची आणि सुरुची बने अशा अस्सल कोकणातील निसर्ग सौंदर्याचा अनुभव येथे घेता येतो. अजूनपर्यंत पर्यटकांची "वक्रदृष्टी' इथे पडली नाही हेच आरेवारेच्या सौंदर्याचे गुपित आहे. रत्नागिरी - गणपतीपुळे घाट रस्त्याने निघाले, की एका बाजूला लाल मातीचे डोंगराकडे आणि दुसऱ्या बाजूला समुद्राचा नजारा शिवाय रस्ताही वळणावळणाचा... या वाटेवरून जाणे हा देखील वेगळाच अनुभव असतो. इथे यायचे असेल, तर शक्‍यतो, स्वत:चे वाहन असावे. रस्त्यावरून थोडे खाली उतरले, की समुद्रकिनाऱ्यावर आपण थेट समुद्रकिनाऱ्यावर येऊन पोचतो. पाच ते सात किलोमीटर लांब हा किनारा पसरला आहे.

Read More »

रांजणखळगे : एक नैसर्गिक चमत्कार
पुणे व नगर जिल्ह्यात शिरूर व पारनेर तालुक्‍याच्या सरहद्दीवरून कुकडी नदी वाहते. या कुकडी नदीवरच रांजणखळग्याच्या रूपात निसर्गाचा अनोखा आविष्कार पाहायला मिळतो. नगरवरून याठिकाणी यायचे असेल, तर निघोज गावात यावे आणि पुण्यावरून यायचे असेल, तर शिरुरमार्गे टाकळीहाजी गावात यावे. पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरच हे ठिकाण आहे. नदीत असणाऱ्या बेसॉल्ट खडकात रांजणाच्या आकाराचे प्रचंडमोठे खळगे पडले आहेत. त्यामुळेच याठिकाणाला रांजणखळगे म्हटले जाते. काही रांजणखळगे इतके जवळ आहेत, की त्यांच्या भिंती एकमेकांत मिसळून गेल्या आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे रांजणखळगे आहेत परंतु असे असंख्य रांजणखळगे कोठेही नाहीत. 1990मध्ये या ऐतिहासिक रांजणखळग्यांची नोंद "गिनीज बुक ऑफ रेकॉर्डस' मध्ये सुद्धा करण्यात आली आहे. हा नैसर्गिक चमत्कार पाहण्यासाठी अनेक पर्यटक, अभ्यासक येथे येतात. नदीच्या काठावरच मळगंगा देवीचे मंदिर आहे. त्यामुळे भाविकांचीही येथे गर्दी असते. हे रांजणखळगे व्यवस्थित पाहायचे असतील, तर उन्हाळ्यात याठिकाणी यावे. रांजणखळग्यातून पाणी वाहताना ते वळणदार गिरकी घेत घेत वाहते.

Read More »

राजगड, पन्हाळेकाजीची लेणी, बनेश्वर
राज गड चे अविस्मरणी य ट्रेकिंग कॉलेजमध्ये असताना गड-किल्ल्यांचे ट्रेकिंग हा खूप आवडीचा विषय होता. राजगड ही हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी. या गडाचे नाव घेताच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतो. त्यामुळे राजगड पाहण्याचे आम्ही ठरविले. आवडीला सवड आणि सवंगडी मिळाले आणि आमचा ट्रेक नक्की झाला. शेवटी आमचा ट्रेकिंगचा दिवस उजाडला आणि आम्ही चढाईचा निर्धार करून निघालो. भोरपासून पहिले एसटीने चेलाडीपर्यंत प्रवास केला. तिथून राजगड किल्ल्याच्या पायथ्याला गुंजवणे गावापर्यंत जीपने प्रवास करून पोचलो. तिथून आमचा खऱ्या अर्थाने ट्रेक सुरू झाला. पावसाळा असल्याने रात्री पूर्णपणे काळोख होता. त्यामुळे जास्त अंधार पडायच्या आत राजगड गाठायचा होता. त्यासाठी आमची सुरवातीपासूनच घाई होती परंतु मध्येच माशी शिंकली आणि चढाईला सुरवात होताच मुसळधार पावसाला सुरवात झाली. गडद अंधार आणि वरून कोसळणारा पाऊस यामुळे आम्ही दुहेरी संकटात सापडलो. शेवटी रात्री साडेदहाच्या सुमाराला आम्ही गडावर पोचलो. पहिले पद्मावती देवीचे मंदिर दिसले. पौर्णिमा असल्याने दुधाळ चंद्रप्रकाशात संपूर्ण गड उजळला होता.

Read More »

नागफणी , औंधची यमाई
मंदिरे, राजवाडे, संग्रहालये यांसारख्या वास्तू पुरातन काळाची साक्ष देतात. त्यांची माहिती घेऊन जतन आणि संवर्धन करणे हा पर्यटनामागचा एक उद्देश&nbsp असतो. नागफणी खंडाळ्याच्या घाटात एक मोठा सुळका आकाशात घुसलेला दिसतो. त्याचे नाव नागफणी. यालाच ड्युक्‍स नोज असेही म्हटले जाते. पुण्याहून सकाळी सकाळी खंडाळ्याच्या स्टेशनवर यावे. तिथून मुंबईच्या दिशेने थोडे पुढे गेले, की रेल्वे रुळाच्या डाव्या-उजव्या बाजूंना जुने चढावावरचे वापरात नसलेले रेल्वेमार्ग दिसतात. त्यावरून पुढे गेल्यावर एक डांबरी रस्ता लागतो. तो ओलांडून पुढे गेल्यावर टाटांच्या वीज योजनेतील कालवा दिसतो. तिथून पुढे गेल्यावर एक पाऊलवाट नागफणीला जाते. खंडाळा परिसरातून एका विशिष्ट जागेवरून हा सुळका अगदी विशालकाय चेहऱ्यासारखा वाटतो. त्यामध्ये कपाळ, भुवई, नाक, ओठ असे अवयवही दिसू शकतात. सरत्या पावसाळ्यात येथे आले, तर इथून भीमाशंकरच्या मागे लपलेले महाराष्ट्र एव्हरेस्ट-शैल कळसूबाईही स्पष्ट दिसू शकते. या नागफणीच्या माथ्यावर एक छोटेसे शिवमंदिरही आहे. ट्रेकर्ससाठी हे उत्तम ठिकाण आहे.

Read More »

पानवळ रेल्वे पूल, केतकावळे
निसर्गातील सुंदर ठिकाणे ही पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय ठरतात मात्र मानवनिर्मित कलेचा आविष्कार असणारी काही ठिकाणांनाही लोकांची पसंती मिळते. त्यापैकीच दोन ठिकाणे म्हणजे कोकणातील पानवळ पूल आणि केतकावळे येथील प्रतिबालाजी मंदिर. पानवळ रेल्वे पूल कोकण रेल्वेवरील पानवळ पूल हा एक अभियांत्रिकी चमत्कार आहे. हा पूल कोकण रेल्वेवरील रत्नागिरी आणि निवसर या दोन स्थानकांदरम्यान पानवळ नदीवर बांधला आहे. रत्नागिरी स्थानकापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या या पुलाची लांबी सुमारे 360 मीटर्स आहे. सर्वसाधारणपणे इतक्‍या लांब पुलाच्या निर्माणासाठी अनेक गर्डर्स वापरले जातात परंतु पानवळ पुलाच्या निर्मितीसाठी केवळ एक सलग गर्डर बनविला गेला. हा गर्डर इंक्रीमेंटल लॉंचिंग या पद्धतीने पुलाच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत लॉंच केला गेला. या गर्डर लॉंचिंगचा वेग सुमारे दोन फूट प्रती तास एवढा होता. अशाप्रकारचे गर्डर लॉंचिंग तंत्र भारतीय रेल्वेत पहिल्यांदाच वापरण्यात आले. या पुलाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे याचा एक पिअर कुतुब मिनारपेक्षाही उंच आहे. या पुलावरून खाली पाहिले, तर जीप आगपेटीएवढी दिसते.

Read More »

अजंठा लेणी, अलिबाग
आपल्या देशात अनेक प्राचीन मंदिरे आणि लेण्या आहेत. औरंगाबादमधील अजिंठा-वेरूळच्या लेण्या, अलिबाग येथील कान्होजी आंग्रे यांचा पुरातन वाडा या सर्व वास्तू इतिहासाची साक्ष देत आजही दिमाखात उभ्या आहेत. त्यांची माहिती पर्यटकांसाठी नेहमीच रंजक ठरते. अजंठा लेणी औरंगाबादमध्ये असलेली अजंठा लेणी शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना मानली जातात. त्यामुळे ती पाहण्यासाठी निघालो. लेणी पाहण्यासाठी डोंगराची चढण चढताना अजिबात दमल्यासारखे होत नाही. हवेतील गारवा आपल्याला सुखावून जातो. ही पुरातन वास्तू असल्याने आपल्यासोबत गाईड महत्त्वाचा असतो. लेण्यांतील चित्रकला, कोरीवकाम पाहून अचंबित व्हायला होते. भिंतीवर, छतावर सुंदर कोरीवकाम केले आहे. किनाऱ्याकडे झेप घेणाऱ्या लाटा, मंडप, महिरप अशा कितीतरी कलाकृती साकारलेल्या आहेत. एका गुहेमध्ये चित्रकलेचा खास नमुना पाहायला मिळतो. यात हरणांची चार धडे व एक शीर अशाप्रकारे काढली आहेत, की ती चारही हरणे स्वतंत्र वाटतात. एका गुहेतील दगडी खांब वाजविल्यास त्यातून तबला, मृदंग, ढोली अशा विविध वाद्यांचा आवाज येतो. लेण्यांमध्ये तपसाधनेसाठी छोट्या छोट्या गुहाही आढळतात.

Read More »



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly