सोमवार, 3 मई 2010

सेफ ड्रायव्हिंग : रिव्हर्स गिअर

याआधीच्या लेखात आपण कार इंजिन सुरू करून क्लच दाबून पहिल्या गिअरमध्ये कार घेतली आहे. हळूहळू क्लच सोडून कार समोर चालायला लागली आहे. पुन्हा क्लच पूर्ण दाबून दुसऱ्या गिअरमध्ये कार टाकली आहे. क्लच पुन्हा हळूहळू वर घेतला आहे. स्मूथली कार सुरू आहे. मध्ये काही अडथळे नाहीत. म्हणून थोडा अॅक्सिलेटर आपण दिलेला आहे. तीसपर्यंत वेगाचा काटा जात असताना कारचं इंजिन जड वाटू लागलं म्हणून पुन्हा क्लच दाबून आपण तिसऱ्या गिअरमध्ये कार घेतली आहे. हळूहळू क्लच सोडून आपण अॅक्सिलेटर वाढवतो आहोत. कारने वेग घेतला आहे. याच पद्धतीनं आपण चवथ्या आणि पाचव्या गिअर्समध्ये कार घेऊ शकतो.
रिव्हर्स गिअरचं आपल्याला अद्याप काम पडलं नाही, म्हणून आपण त्याचा विचार आधी केला नाही. ६०-७० वेगापर्यंत तुम्ही कार नेऊ शकता, म्हणजे तुम्हाला आता कार चालवायला येऊ लागली आहे. कार शिकायला येणे याची ही निव्वळ सुरुवात आहे.
‘रिव्हर्स गिअर’चा वापर हा कार पाठीमागे नेण्यासाठी आणि कार वळवण्यासाठी होतो. काही वेळेस तुमच्या वाहनाच्या समोर एखादा ट्रक अडून आहे, बंद पडला आहे आणि तुमची कार फारसं अंतर न ठेवता ट्रकच्या पाठीमागे उभी आहे, अशा वेळेला तिला थोडसं पाठीमागे घ्यावं लागेल. येथे रिव्हर्स गिअरचा उपयोग होतो.
आपल्याला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवाही गिअर टाकता येतो. हे समोर जाण्याचे गिअर्स आहेत. गिअर रॉडवर (फ) काढलेला असतो. त्याची दिशाही दिली असते. हा (फ) आपल्याला ओढायचा असतो. (गिअर रॉड आपल्या बाजूने म्हणजे स्टिअरिंगवर आपण बसलो आहोत. समोर इंजिन-बोनेट आहे. त्याच्या अगदी विरुद्ध दिशेला) गिअर्सचा अनुक्रम असा येईल. न्यूट्रलमध्ये कार उभी आहे. क्लच दाबून गिअर रॉड आपण डावीकडे सरकवला. मग बोनेटच्या दिशेने टाकला. म्हणजे समोरच्या बाजूला रॉड नेला. येथे पहिला गिअर. गिअर रॉड तसाच सरळ रेषेत मागे आणायचा म्हणजे दुसरा गिअर. पुन्हा न्यूट्रलच्या दिशेने आणून न थांबता रॉड समोरच्या दिशेला ढकलला की तिसरा गिअर. गिअर रॉडला तसंच सरळ मागच्या अंगाने सरळ रेषेत ओढले की चौथा गिअर. पुन्हा न्यूट्रल मार्गे सरळ पाचवा गिअर. पुन्हा न्यूट्रल मार्गे सरळ रेषेत (फ) रिव्हर्स गिअर. न्यूट्रलमधून एकदम रिव्हर्स गिअर आपण टाकू शकतो पण, अर्थात सराव झाल्यानंतरच.
आपण बाजारात कार घेऊन गेलो. कुठंतरी कार पार्क केली आहे. कारच्या समोर दुसरी कार उभी आहे, अशा वेळेस कार मागे घेऊन काढायची आहे. त्यासाठी आपल्याला रिव्हर्स गिअर टाकणं शिकायचं आहे. कार पुन्हा मोकळ्या मैदानात न्यायची आहे. खरं तर रस्त्यावरही आपल्याला रिव्हर्स गिअर शिकता येतो पण, मोकळ्या मैदानात सराव चांगला होतो. आपल्याला गिअर टाकता आला की, रस्त्यावर आपण जाणारच आहोत पण, रिव्हर्स गिअर टाकतानाचे बारकावे आपल्याला शिकायचे आहेत, जाणून घ्यायचे आहेत. तसं आपण स्वत: पहिल्या-दुसऱ्या गिअरमध्ये कार घेऊन खुशाल मोकळ्या मैदानावर येऊ शकलो. समोर कार न्यायला आपण शिकलो आहोत. स्पीड वाढवता येऊ लागली आहे.
आपली कार आता मोकळ्या मैदानात उभी आहे. ड्रायव्हर सीटवरची काच आपण नीट लावून घेतली आहे. म्हणजेच मागची बाजू आपल्याला स्पष्ट दिसते आहे. उजवीकडची (आपल्या) काचही नीट लावली आहे. या काचेत आपल्या कारचं मागचं चाक अर्धवट दिसते आहे. त्यामुळे मोकळा रस्ता, मैदान स्पष्टपणे दिसते आहे.
कार न्यूट्रलवर आहे. डाव्या पायाजवळील क्लच आपण पूर्णपणे खाली दाबून ठेवला आहे. आता गिअर रॉड आपल्याला मागे न्यायचा आहे. क्लच दाबूनच ठेवला आहे, अशा वेळेला पाच गिअर्स आपण तिथल्या तिथं बदलवू शकतो. आता सहाव्या रिव्हर्स गिअरमध्ये कार घेतली आहे. अद्याप क्लच पायानं दाबूनच ठेवला आहे. तो आता हळूहळू सोडायला लागा. कार हळूहळू मागे येऊ लागेल. घाबरू नका. क्लच एकदम सोडू नका. स्टिअरिंग नीट सांभाळा! क्लच उचला, थोडंसं अॅक्सिलेटर द्या. अॅक्सिलेटर अधिक दाबलं गेलं असेल तर थोडासा ब्रेक द्या. कार मागे येऊ द्या. कार मागे येताना तुमच्या डोक्यावरच्या आरशात बघा. बाजूच्या आरशात बघा. मागे येतानाही कार सरळ रेषेतच मागे आली पाहिजे. तिरपी वळणदार नको जायला. सरळ रेषेत कार मागे घेता आली पाहिजे.
आता पुन्हा कार समोर घ्या. पुन्हा रिव्हर्स गिअरमध्ये टाका. क्लचच्या जोरावर हळूहळू कार मागे जाऊ द्या. रिव्हर्स गिअरमध्ये टाकल्यानंतर कार क्लचवरच हळूहळू उचलली गेली पाहिजे. हळूहळू मागे आली पाहिजे. कार वेगात पळवणं सोपं आहे पण, अशी मुंगीच्या पायानं चालवणं अवघड काम आहे. मुंगीच्या पावलानं कार ज्यावेळी हळूहळू मागे सरकायला लागली तेव्हा रिव्हर्स गिअर तुम्ही शिकला असं म्हणायला हरकत नाही. रिव्हर्स गिअरमध्येही खूप सराव हवा.
नवशिके चालक रिव्हर्स गिअरमध्ये कार मागे घेताना कधी इलेक्ट्रीकच्या खांबाला धडक देतात, कधी रस्त्याच्या अगदी कडेने कारचं चाक घेऊन जातात. विशेषत: शहरातून कार काढताना असे प्रकार होतात. याला एकच कारण आहे, कार मुंगीच्या पायानं चालवता येत नाही. म्हणून आपण मोकळ्या मैदानात एकच शिकायचं आहे, कार मुंगीच्या पायानं मागे न्यायची तशीच पुढेही न्यायची आहे. सगळा खेळ क्लचचा आहे. क्लच दाबण्याचा अंदाज यायला हवा. मोकळ्या मैदानात असा सराव केला तर निश्चितपणे ‘क्लच’चं अंतरंग आपण समजून घेऊ शकू.
कार चालवणं म्हणजे क्लच आणि अॅक्सिलेटरची जुगलबंदी आहे. ही जुगलबंदी आपल्याला डाव्या आणि उजव्या पायानं साधायची आहे. या जुगलबंदीतूनच आपल्याला संयोगबिंदू सापडतो.
रिव्हर्स गिअरमध्ये कार हळूहळू मागे नेता आली की उजव्या हाताला बाहेर जो आरसा लागला आहे, त्यात बघून हळूहळू कार मागे घ्यायची आहे. या काचेमध्ये बघायची सवय लागली पाहिजे. जेणेकरून त्यात बघून कार पाहिजे तशी, पाहिजे तेथे नेता आली पाहिजे. एकीकडे पायांनी क्लच अॅक्सिलेटरची जुगलबंदी नीट साधायची आणि त्याचवेळी साईट मिररमध्ये बघून कार इप्सीत ठिकाणी न्यायची. वारंवार सराव करत राहिलं पाहिजे. याचा उपयोग शहरात, गर्दीच्या ठिकाणी आपण कार नेतो तेव्हा होतो. शहरात गर्दीच्या ठिकाणी कार रिव्हर्स घेताना मुंगीच्या पायांनी गाडी मागे सरकायला हवी. वाहनं, माणसं, बाईकस्वार मागे नाहीत हे आरशात बघून घ्यायला हवे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अॅक्सिलेटर अधिक दाबायला नको. गर्दीच्या ठिकाणी झालेली एखादी चूक अतिशय महागात पडू शकते. म्हणूनच मोकळ्या मैदानात रिव्हर्स गिअरची प्रॅक्टीस करायला हवी. रिव्हर्स गिअरला एखादी गाण्याची किंवा संगीताची टय़ून लावून घेतली तर अधिक चांगले. कार घेताना कंपनीवाले मात्र या गोष्टीला तयार नसतात. टय़ूनचा आवाज सुरू राहिला तर गर्दीच्या ठिकाणी लोकंही सावध राहतात. कार मागे येते आहे, हे लोकांच्या लक्षात आल्यामुळे ते सुरक्षात्मक पवित्रा घेतात. चालकाच्याही लक्षात येते की, रिव्हर्स गिअर पडला किंवा नाही. रिव्हर्स गिअर नीट लागला नसेल तर टय़ूनचा आवाज येत नाही. अशावेळी पुन्हा कार न्यूट्रलमध्ये घेऊन रिव्हर्स गिअर टाकावा. कारमध्ये डेक, टेपरेकॉर्डर नसला तरी चालेल पण, रिव्हर्स गिअरला संगीताची एखादी टय़ून जरूर लावावी, असे माझे स्पष्ट मत आहे. त्यात कमी जागेतून गाडी वळवण्यासाठी रिव्हर्स गिअर फार महत्त्वाचा ठरतो.
रिव्हर्स गिअर टाकताना आणखी एक पथ्य तुम्हाला पाळायचं आहे. समजा आपली कार ६०-७० च्या वेगानं पुढे पळते आहे, अचानक तुम्हाला वाटलं की, मागच्या चौकात आपल्याला काम होतं, थांबायला हवं होतं. या विचारात तुम्ही क्लच दाबून एकदम रिव्हर्स गिअर टाकू शकत नाही. रिव्हर्स गिअरसाठी स्पीड कमी करायला हवी. अशा वेळेला चवथ्या गिअरमध्ये कार पळत असेल तर लगेच दुसऱ्या गिअरमध्ये घ्या. म्हणजे स्पीड कंट्रोल करता येईल. अॅक्सिलेटर सोडून द्या, म्हणजे अॅक्सिलेटरवरचा पाय काढा. कार हळूहळू स्लो होत जाते. स्लो झाल्यावर हळूच ब्रेक देऊन कार थांबवता येते. मग पुन्हा न्यूट्रलमार्गे रिव्हर्स गिअर टाका. कार हळूहळू मागे घ्या किंवा मागे घेऊन वळवून घेता येईल. चौकाचं अंतर खूप असेल तर कार मागे मागे नेण्यात अर्थ नाही. थोडीशी मागे घेऊन चौकाच्या दिशेने वळवून घ्यावी.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly