मंगलवार, 25 अक्तूबर 2011

बचत करा, श्रीमंत व्हा

पूर्वीच्या काळापासून, आजच्या आधुनिक युगापर्यंत, बचत करणं हा नेहमीच कळीचा मुद्दा ठरला आहे. महागाई वाढली आणि खर्चही वाढले. अशा नाना कारणांनी, बचत होत नाही म्हणून त्याबद्दलची चिडचिड आपल्याला नेहमीच ऐकायला मिळते. पण आज कमावलं आणि आजच खाऊन टाकलं, तर उद्याचं काय? हा प्रश्न सगळ्यांना नेहमीच भेडसावणार असला तरी हाच प्रश्न आपल्याला सक्तीची बचत करायलाही भाग पाडू शकतो.

...........

आपण पैसे कमावतो आणि ते खर्च करतो. उरले तर त्याची बचत करतो. खर्चावर आपला काहीच ताबा नसल्यामुळे बचत होणं अवघड होऊन जातं. अचानकपणे आलेले जादा खर्च आपलं बजेट हलवून टाकतात आणि मग आपण हवालदिल होतो. या प्रकाराला कुठेतरी आळा घालायचा असेल तर समीकरणं बदलण्याची नितांत गरज आहे आणि ती म्हणजे उत्पन्न - खर्च = बचत असं न करता उत्पन्न - बचत = खर्च असं करून आपली मानसिकता बदलायला हवी. दुसऱ्या समीकरणात आपण बचत आधीच ठरवल्यामुळे ठरलेल्या पैशात खर्च करणं आपल्याला भाग पडतं आणि खर्चावर आपोआप मर्यादा येतात. मोकळा पैसा ओंजळीतल्या पाण्यासारखा आहे, कधी वाहून जाईल हे सांगता येत नाही. त्यामुळे उत्पन्न हातात आल्यावर अगोदरच थोडा पैसा बाजूला काढून वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गुंतवला तर बचत होऊ शकेल आणि भविष्यात हाच पैसा गरजेला उपयोगी पडू शकेल.

भविष्यात लहानमोठे खर्च वाढून ठेवलेले असतातच. उदाहरणार्थ पुढल्या ५-१० वर्षांत येणारे खर्च म्हणजे घराचं इंटिरिअर, गाडी, फॉरेन टूर वगैरे असू शकतात. त्याही पुढले खर्च म्हणजे मुलांची शिक्षणं, लग्न, सेवानिवृत्तीची तरतूद... अशा मोठ्या स्वरूपाचे असू शकतात. म्हणून जर आजपासून पैसा बाजूला काढला नाही तर येणाऱ्या खर्चांच्या आणि कर्जाच्या बोझ्याखाली नक्कीच दबावं लागेल.

बचत करू शकत नाही असं म्हणण्यापेक्षा मी पहिल्यांदा बचत करीन, मगच खर्च ठरवीन, असा निर्धार जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत बचत करणं जमणार नाही.

बचत करणं हा निव्वळ मानसिकतेचा भाग आहे. थोडंसं मागे वळून पाहिलं तर नक्कीच लक्षात येईल की, जेव्हा नवीन नोकरी मिळाली होती तेव्हा आपल्याला पगार होता पाच हजार रूपये. त्यावेळी तो खूप वाटला होता आणि ते पाच हजार रूपये महिन्यात अगदी व्यवस्थितपणे पुरवले जात होते. त्यावेळी बचतीची सवय नव्हती मग शिल्लक राहण्याचा प्रश्रच नव्हता. पण त्या पैशांमध्ये स्वत:ला अॅडजस्ट करण्याची सवय होऊन गेली होती. नंतर दुसऱ्या कंपनीची ऑफर आली आणि पगार चक्क दुप्पट झाला. पाच हजार रूपयात मॅनेज करून आनंदी राहणाऱ्याला आता दहा हजार रूपये मिळायला लागले. बसऐवजी टॅक्सीचा प्रवास आरामदायी वाटायला लागला. साध्या वस्तूंची जागा ब्रॅण्डेड वस्तूंनी घेतली आणि मग दहा हजारही महिन्याला पुरेनासे झाले. मात्र पाच हजार पगारात केलेली मजा पुन्हा कधीच अनुभवता आली नाही. पगार वाढतच राहीला, राहणीमानही वाढत राहिलं परंतु बचत होऊ शकली नाही.

वरील उदाहरणात आपण जर विचार केला तर, पाच हजारांवरून पगार एकदम दहा हजारांवर गेल्यावर वाढलेल्या रकमेपैकी ७० टक्के रक्कम जरी मिळालीच नाही असं समजून बाजूला काढले असते, तर उरलेल्या पैशांमध्येही थोडंसं राहणीमान वाढवून बचतीचा आनंद लुटता आला असता. हीच सवय आणि मानसिकता प्रत्येक पगारवाढीच्या वेळी उपयोगी पडणारी आहे.

पहिल्यांदा आपल्याकडे ब्लॅक अॅण्ड व्हाइट टीव्ही होते, त्यावेळीही आपण मनोरंजनाचा आनंद खूप लुटत होतो. त्यानंतर चौपट पैशात कलर टीव्ही आले. मग ते हवेसे वाटायला लागले. आता लेड स्क्रीन टीव्ही आल्यामुळे एलसीडी स्क्रीन टीव्हीच्या किमती उतरल्या. पण आता एलसीडी कुणाला हवाय? कारण आता लेड स्क्रीनशिवाय मनोरंजन होऊच शकत नाही आणि खर्चाचं हे दुष्टचक्र कधीच थांबणार नाही.

सुखाची व्याख्या कशी करणार? कारण सुख मानण्यावर आहे. बचत करून मग आपल्या खिशाला परवडतील त्या गोष्टी मिळूनही सुख मानता नाही आलं तर... येणाऱ्या काळात तथाकथित सुख मिळवण्यासाठी कर्जाचा आधार घ्यावा लागेल. कर्ज काढून विकत आणलेली चैनीची वस्तू दोन दिवस सुख देईल आणि नंतर तेही रूटीन होऊन जाईल. पण घेतलेल्या कर्जांचे हप्ते भरताना, ताळेबंद जुळवताना, नाकी नऊ येतील. त्यातून मधून येणाऱ्या पैशाची आवक थांबली तर उभ्या करून ठेवलेल्या हप्त्यांच्या बोझ्याखाली जीव गुदमरुन जाईल आणि ज्या सुखासाठी आपण एवढा आटापीटा केला ते हेच का, हा प्रश्न आ वासून उभा राहील.

' पुढच्यास ठेच, मागचा शहाणा' या उक्तीप्रमाणे आजच्या तरुण पिढीने आपलं पुढचं पाऊल जर नाही उचललं तर त्यांची अवस्था याहूनही बिकट असेल. कारण पूवीर्पेक्षा हल्ली चंगळवाद खूप बोकाळलाय. ब्रॅण्ड्स म्हणजे आता स्टेट्स सिम्बॉल झालाय. इतरांकडे असलेल्या गोष्टी आपल्याकडेही असाव्यात हा अट्टहासही वाढत आहे. आजच्या तरुण पिढीचा जर अभ्यास केला, तर नोकरदार वर्ग, नोकरी लागल्यानंतर बचतीचा विचार करताना दिसत नाहीत. एन्जॉय करण्याकडे त्यांचा झुकता कल दिसतो. पाटर््यां, हायटेक मोबाइल फोन्स या सगळ्या गोष्टींमुळे ते बचतीकडे कानाडोळा करताना दिसतात. लग्न झाल्यावर मात्र हे सर्वजण जीवनाबाबत गंभीर होतात आणि बचत करायला सुरुवात करतात. आतापर्यंतच्या कमाईतून पैसे साठवले असते तर खूप बरं झालं असतं, असंही ऐकायला मिळतं. खरंच, जर वयाच्या २२व्या वष्ीर् एखाद्या तरुणाने वयाच्या ५० व्या वर्षांपर्यंत पाच हजार रूपये महिना फक्त ८ टक्के दराने गुंतवले तर त्याला ६२,८४,४४१ रूपये मिळू शकतात. पण हेच २८ वर्षं वयाच्या तरुणाने वयाच्या ५० व्या वर्षांपर्यंत पाच हजार रूपये ८ टक्के दराने गुंतवले तर ३६,०७,८३३ रूपये मिळतील. याचाच अर्थ लवकर सुरुवात करणाऱ्याला जास्त फायदा होऊ शकतो. कारण बचतीसाठी त्याला जास्त कालावधी मिळू शकतो.

आजच्या तरुण पिढीमध्ये धंदेवाईक वर्ग अधिक जोमाने पैसा वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करताना दिसतो. पण या दोन्ही वर्गांमध्ये काही अपवाद असतीलच. आथिर्कदृष्ट्या जर सक्षम व्हायचे असेल तर सक्तीची बचत करून बचतीचं नियोजन करण्याची नितांत गरज आहे.

कमावलेल्या पैशांमध्ये अगोदर ३० टक्के रक्कम तरतुदींसाठी बाजूला काढली तर ती रक्कम कमी, मध्यम आणि लांब कालावधीच्या उद्दीष्टांसाठी गुंतवता येऊ शकते. नियोजन करताना प्रथम, आपल्यानंतर आपल्या उत्पन्नाची सुरक्षितता आणि आरोग्याच्या दृष्टीने काही आव्हानं आलीच तर त्यासाठी जीवन आणि आरोग्यासाठी पॉलिसी काढणं अत्यंत आवश्यक आहे. यानंतर आपल्या गरजांनुसार बँक, पोस्ट, विमा कंपन्यांच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक व्हायला हवी. याचप्रमाणे सोनं आणि प्रॉपटीर्मध्येही गुंतवणूक व्हायला हवी. त्याचप्रमाणे जोखीम असलेल्या पण जास्त नफा देणाऱ्या शेअर्स आणि म्युच्युअल फंडाच्या योजनांचाही आधार घ्यायला हवा.

उत्पन्नाच्या ४० टक्क्यांपेक्षा जास्त कर्जाचा बोजा नसावा. यात सर्व प्रकारची कर्ज यामध्येच बसवता आली तर भविष्यात आपणास मोकळं वावरता येईल. उरलेल्या ३० टक्क्यांमध्ये आपलं राहणीमान नीट करून आपल्याला जीवनाचा आनंद पुरेपूर उपभोगता येऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार वरच्या वगीर्करणात थोडेफार बदल होऊ शकतात.

अशा प्रकारे नियोजन केल्यामुळे बचतीची शिस्त लागेल आणि हळुहळू पैसा जमा होत गेला तर बचतीची गोडी निर्माण होईल. थोडाफार भावनांना आवर घालता आला तर आपल्या इच्छा नियोजनाद्वारे कर्ज न घेताही साकार होऊ शकतात. प्रॉपटीर्, कार इत्यादींसाठी कर्जाची गरज भासू शकते. पण त्यांचा हप्ता शक्यतो उत्पन्नाच्या ४० टक्क्यांपेक्षा जास्त नसावा.

आपल्या खचिर्क स्वभावाला आवर घालून बचत सुरू केल्यास उरलेल्या पैशात खर्च करण्याची सवय लागेल आणि हीच सवय येणाऱ्या काळात यशस्वी करेल. यश म्हणजे नुसताच पैसा नाही तर त्याबरोबरच मानसिक शांतता आणि आनंदही आहे.
 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly