सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेन्ट प्लॅन'ची गरज
सर्वसाधारण मध्यमवर्गीय गुंतवणूकदार मासिक प्राप्तीवर अवलंबून असतो. भविष्यातील गरजा भागविण्यासाठी दरमहा गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. तुमच्या गरजा कधी उभ्या राहतील, यावर तुम्ही कोठे गुंतवणूक करावी, हे ठरते. पैशांची गरज पाच वर्षे किंवा त्यानंतरच्या कालावधीत लागणार असेल तर शेअर बाजाराशी निगडीत योजनांमध्ये गुंतवणूक करावी.
म्युच्युअल फंड म्हणजे भागीदारीतील निधी. तिच्यावर, शेअर बाजारांप्रमाणेच 'सेबी'चे नियंत्रण आहे. म्युच्युअल फंडांमध्ये उच्च दर्जाचे व्यवस्थापन व पारदर्शकता असल्यामुळे गुंतवणूक-दारांसाठी इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक हा सोयीचा पर्याय आहे.
मुख्यत्वे करून सर्वसाधारण गुंतवणूकदार पैशांची एकरकमी गुंतवणूक करतो. त्यासाठी शेअर बाजार वाढण्याची जास्त शक्यता असताना गुंतवणूक करणे आवश्यक आहे. शेअर बाजारातील अनिश्चिततेवर उपाय म्हणजे सुनियोजित व शिस्तबद्ध गुंतवणूक करणे. नियमित गुंतवणूक योजना हे एक सोपे आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचे माध्यम आहे.
पोस्ट ऑफिस वा बँकेद्वारे चालविल्या जाणाऱ्या 'रिकरिंग' ठेव योजनांत दरमहा ठराविक रक्कम पोस्ट ऑफिसमध्ये वा बँक फिक्स्ड् डिपॉझिटमध्ये ठेवली जाते. गुंतवणुकीचा कालावधी संपल्यावर जमा झालेली रक्कम काढून घेऊ शकता. या प्रकारे म्युच्युअल फंडात 'रिकरिंग' पद्धतीने गुंतवणूक करता येते. त्यास 'सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेन्ट प्लॅन' ('एसआयपी'-'सिप') किंवा नियमित गुंतवणूक योजना म्हणतात.
' सिप'चे फायदे
- नियमित गुंतवणुकीची सवय : शेअर बाजारातील चढउतरांविषयी माहिती करून न घेता तुम्ही गुंतवणूक करू शकता.
- पॉवर ऑफ कंपाउंडिंग : कमी वयात गुंतवणुकीस सुरुवात केली तर त्यात वाढ होण्याची शक्यता अधिक असते. मात्र उशिरा सुरू केलेली गुंतवणूक तुमची आथिर्क उद्दिष्टे पूर्ण करण्यास असमर्थ असते. 'सिप'मध्ये दरमहा एक छोटी रक्कम तुम्ही गुंतवत असल्यामुळे दीर्घकाळात तुमची गुंतवणूक पद्धतशीर वाढू शकते.
- खर्चाची सरासरी : कोणत्याही व्यक्तीला बाजारात गुंतवणूक करण्याची योग्य तारीख किंवा वेळ माहीत होऊ शकत नाही. त्यामुळे जेव्हा 'सिप' पद्धतीने तुम्ही गुंतवणूक करता तेव्हा बाजारातील चढउतार होणाऱ्या किमतीची सरासरी तुम्ही मिळवू शकता. तुम्ही एका ठराविक रकमेची गुंतवणूक करत असल्यामुळे जेव्हा बाजारात किमती उतरतात, तेव्हा कमी दरात तुम्हाला म्युच्युअल फंडाची जास्त युनिट्स मिळतात. गुंतवणुकीचा दीर्घ कालावधी अशा खर्चाच्या सरासरीमुळे गुंतवणुकीतील वाढीला सहाय्यभूत होतो.
- सोयीची गुंतवणूक : 'सिप'मध्ये गुंतवणूक करणे अगदी सोपे आहेे. कोणत्याही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा तुम्ही प्रथम निर्णय घेतो तेव्हा एक सर्वसाधारण नोंदणी फॉर्म भरावा लागतो. तुम्ही त्यात तुमच्या पसंतीची म्युच्युअल फंड योजना व 'सिप'च्या कालावधीबरोबरच ईसीएस डेब्टसाठी तुमच्या बँकेविषयीची व खात्यासंबंधी माहिती भरता. 'सिप'ची नोंदणी झाल्यावर तुम्ही निवडलेल्या तारखेला ठरविलेली रक्कम तुमच्या बँक खात्यातून काढून म्युच्युअल फंडात गुंतवली जाईल.
कोणत्या फंडात 'सिप'मध्ये गुंतवणूक करावी : गुंतवणूक कालावधी पाच वर्षांपेक्षा अधिक असेल तर तुम्ही 'इक्विटी फंडा'त गुंतवणूक करावी. त्यासाठी आतापर्यंत ज्यांची कामगिरी चांगली राहिलेली आहे, अशा 'इक्विटी फंडा'ची निवड करावी. त्याची माहिती वृत्तपत्रे किंवा गुंतवणूक सल्लागारांकडून मिळू शकते. 'सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेन्ट प्लॅन'मुळे तुमची आथिर्क उद्दिष्टे गाठण्यासाठी खूप मदत होऊ शकते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें